युरोपात स्थलांतरित झालेल्या शीख समुदायाची संख्या मोठी आहे. २०१० साली नॉर्वेतील एकंदर भारतीयांमध्ये ५० टक्क्य़ांहून अधिक शीख होते. त्यामुळेच प्रस्तुत पुस्तकात युरोपातील वेगवेगळ्या देशांतल्या शिखांची स्थिती, गती, त्यांचे व्यवसाय, त्यांची धार्मिकता आणि त्यांची आधुनिकता वगैरेंचा समाजशास्त्रीय अभ्यास मांडला आहे.
शीख हा भारतातील लक्षणीय अल्पसंख्य समाज आहे. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत शिखांची कामगिरी अनन्यसाधारण आहे. १९६० च्या दशकात ‘पंजाब’ राज्याची स्थापना झाली. त्यानंतर पंजाब राज्यातल्या शेती, उद्योग, व्यापार क्षेत्रात प्रगतीची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू झाली. सध्या जगातील शीख लोकसंख्या अंदाजे २.३-२.५ कोटी आहे. त्यापैकी १.५ कोटी व अधिक शीख भारताबाहेर जगाच्या निरनिराळ्या भागांत राहत आहेत.
प्रस्तुत पुस्तकात संपादकद्वयांनी युरोपातील नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, पोलंड, इटली, फ्रान्स, स्पेन, ग्रीस, ब्रिटन, आर्यलड अशा देशांतील शीख समाजातील स्थितीविषयी १३ लेख संपादित केले आहेत. १९६९ मध्ये नॉर्वेमध्ये पहिला शीख येऊन तो तेथे स्थिरावला.            १ जानेवारी २०१० रोजी नॉर्वेमध्ये ८, ७४७ भारतीय होते. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक शीख होते. सध्या नॉर्वेत दोन गुरुद्वारा आहेत. शीख धर्मवादी वृत्तीची गेल्या दशकात विशेष वाढ दिसून आली आहे. नॉर्वेतील शीख समूहाने लक्षणीय संस्थात्मक बांधणी रून दाखवली आहे. संस्था उभारल्या आहेत. नॉर्वेमधील शीख आग्रहपूर्वक सांगतात की, नॉर्वेजिअन संस्कृती व शीख धर्म यामध्ये समान मूलभूत मूल्ये आहेत. स्त्री-पुरुष समता, प्रभावी कार्य संस्कृती, सामाजिकपणा आणि शिक्षणाची ओढ. समाजासाठी स्वयंसेवी काम ही नॉर्वेजियन पारंपरिक वृत्ती आहे. पंजाब व नॉर्वेजिअन प्रामुख्याने कृषी समाज आहेत. म्हणून त्यांच्यामध्ये हे साम्य आहे. मात्र तेथील गुरुद्वारांनी पंजाबी शीख ओळख व अस्मिता कायम ठेवण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
डेन्मार्कमधील शीख समाजातील ‘आधुनिक’ विरुद्ध ‘परंपरावादी’ यामधील संघर्ष, ताणतणाव, भांडणतंटे यांचे विश्लेषण हेलनि इल्कजर यांनी केले आहे. ‘आधुनिक’वाद्यांनी धार्मिक प्रतीके व नैतिक ध्येये, उद्दिष्टे यावर भर दिला तर ‘परंपरावादी’ शिखांच्या दैनंदिन प्रार्थना, शाकाहार आणि न कापलेले केस ठेवण्याचा आग्रह धरला. गुरुद्वारांमधील संघर्ष सुरू झाले ते १९८० च्या दशकातील खलिस्थानसंबंधीच्या मतभेदावरून. लेखिकेने सुचवले आहे की डेन्मार्कमधील शीख समाज सहकार, साहाय्यता व संघर्षांच्या चक्रामधूनच सारखा फिरत आहे.
क्रिस्तिना यांनी स्वीडनमधील शीख समाजाचे यशस्वी आर्थिक एकत्रीकरण स्वीडिश समाजाशी कसे झाले आहे, याचे विवेचन केले आहे. स्वीडनमधील शीख समाजाचे आगमन युरोपातील इतर देशांतील स्थलांतराच्या पद्धतीनुसार झाले आहे. दरवर्षी काही व्यक्ती- मुख्यत: पुरुष प्रथम येतात. त्यांचे वास्तव्य कायदेशीर झाले की मग इतर नातेवाईक येतात. लॉरा या लेखिकेने म्हटले आहे की फिनलंडमधील शीख संख्येने खूपच कमी आहेत. साधारणत: ६००, त्यापैकी बहुसंख्य बार, पब्जमध्ये काम करणारे आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचा हाच मुख्य आधार आहे. बार वा पब्जची मालकी असणे हेच फिनलंडमधील शिखांचे ध्येय आहे. पूर्व युरोपात सर्वात जास्त संख्येने शीख पोलंडमध्ये आहेत. १९८९ मधील कम्युनिस्ट राजवटीचा शेवट होण्यापूर्वी पोलंडमध्ये शीख येऊ लागले. झगिन्यूई यांनी म्हटले आहे की मॉस्कोमधील गुरुद्वारावगळता पोलंडमधील गुरुद्वारा पूर्व युरोपातील एकमेव गुरुद्वारा आहे की ज्यामुळे शीख समाजाला पोलंडमध्ये येण्याचा व राहण्याचा उत्साह देतो. बारबारा, फ्रेडरिक आणि फॅबिओ यांनी इटलीतील शीख समाजाविषयी लिहिले आहे. इटलीतील शिखांनी स्थानिक जनतेशी चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत.
फ्रान्समधील स्थलांतरित शीख समाजाचा आढावा ख्रिस्तिन यांनी घेऊन बेकायदेशीर वा नोंदी नसलेल्या स्थलांतरितावर लक्ष केंद्रित केले आहे. बेकायदेशीर स्थलांतरण जगात फार मोठय़ा वेगाने होत असून, याचा विशेष अभ्यास करण्याची निकड आहे, असे लेखिकेस वाटते. कॅथरीन या लेखिकेने स्पेनमध्ये स्थलांतरित झालेल्या रविदासीया व चमार या शिखांतील उपजातींच्या जीवनाचा अभ्यास केला आहे. १९९० च्या दशकात स्पेनमध्ये पंजाबीचे मुख्यत: लुबाना, जाट आणि रविदासीया स्थलांतरण सुरू झाले. पंजाबमध्ये रविदासीया चळवळ व दलितांची अस्मिता प्रभावीपणे जोपासली जाते. संत कवी रविदासना गुरूचा दर्जा, मुख्य समूहाच्या शिखामधील दहा गुरूंच्या समान दर्जा दिला गेला आहे.
ग्रीसमधील विद्यापीठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका निकी यांनी १९९० दशकानंतर स्थलांतरित शिखांबद्दल स्थितीविषयी विवेचन केले आहे. युरोपातील ७५ टक्के शीख ब्रिटनमध्ये राहतात. त्यामुळे व ऐतिहासिक संबंधांमुळे ब्रिटनमधील शीख समाजाची परिस्थिती जीवन वेगळे आहे. गणवेषासह फेटा वापरण्याचा शिखांचा हक्क आहे व त्याचबरोबर कृपाणाच्या वापरास परवानगी या दोन बाबी इतर देशांतील धोरणकर्त्यांना मॉडेल ठरल्या आहेत. ब्रिटनमधील शीख समाजाने युरोपातील इतर देशांमधील शीख समुदायात एक विशेष अधिकार मिळविला आहे. एलिनॉर यांच्या मते प्रारंभापासूनच ब्रिटिश शिखामधील वैविध्य हे वैशिष्टय़पूर्ण ठरले आहे. त्यानंतरच्या दशकादशकातील स्थलांतरणामुळे ती विविधता वाढतच आहे. एलिनॉर यांना असे वाटते की, ब्रिटनमधील शीख समाजातील ताणतणाव हे एखाद्या त्रिकोणासारखे आहेत. शीख पुरातन वाङ्मयातील मूल्ये, आधुनिकता, जागतिकीकरण या त्या तीन बाजू. इंग्लंडमधील शीख समाजातील अस्मिता या परिस्थितीनुरूप व एकात्मिक बहुविश्व आहेत. त्यामुळे त्यांचे वेगळेपण दिसून येते.
 जगजीतसिंग ‘ब्रिटिश शीख युथ कँपस’संबंधी लिहिताना म्हणतात की, युरोपात ज्या शिखांची जडणघडण झाली आहे, त्यांची धर्मविषयक दृष्टी, विचार आई-वडिलांपेक्षा वेगळे आहेत. ओपिंदरजीत कौर यांनी ब्रिटनमधील स्थिर झालेल्या वाल्मीकी, रविदासीया आणि नामधारी समूहाच्या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. जॉर्डन व सावींदरसिंग यांनी उत्तर आर्यलड व प्रजासत्ताक आर्यलडमधील छोटय़ा शीख समूहांच्या स्थलांतरण व संस्था उभारणीचा इतिहास विस्ताराने सांगितला आहे. आयरिश शीख कौन्सिलच्या स्थापनेने शिखामधील जाणीव जागृती वाढली आहे. आंतरवांशिक सद्भाव उंचावला आहे. प्रस्तुत पुस्तकात ८ तक्ते आणि २९ छायाचित्रे आकृत्या आहेत. शीख समाजाच्या अभ्यासकांनी, समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी आणि इतर जिज्ञासूंनीही प्रस्तुत पुस्तक अवश्य वाचावे.
सीख्स इन युरोप – मायग्रेशन, आयडेंटिटीज
अँड रिप्रेझेंटेशन्स : संपादन क्यूट ए जॅकोब्सन
अँड क्रिस्तिना म्यारवोल्ड,
अ‍ॅशगेट, इंग्लंड,
पाने : ३४६,  किंमत : ६० पौंड.