साहित्याच्या नोबेल पारितोषिकासाठी दोनदा शिफारस झालेल्या, २००९ चा ‘सिमॉन द बूव्हॉ पुरस्कार’ मिळालेल्या सिमिन बेहबहानी या कवयित्री, लेखिका आणि कार्यकर्त्यां. ‘इराणची सिंहीण’ म्हणूनच त्या अधिक प्रसिद्ध होत्या. हा त्यांचा गौरव कोणी आणि कधी केला, ही माहिती उपलब्ध नाही. मात्र १९ ऑगस्टच्या मंगळवारी सिमिन यांचे निधन झाल्याच्या बातम्या आधी इराणी, सौदी, आखाती देशांमधील प्रसारमाध्यमांनी, मग जर्मन नभोवाणी आणि अन्य माध्यमांनी व त्यानंतर अमेरिकी वृत्तपत्रांनी गेल्या चार दिवसांत दिल्या, त्या सर्वात ‘इराणची सिंहीण’ हा उल्लेख आहेच.. तो का?
वास्तविक, स्त्रीच्या भावभावनांना आणि दबलेल्या आवाजांना, साध्यासुध्या स्वप्नांना शब्दांचे बळ देणाऱ्या ज्या तीन-चार कवयित्री इराणमध्ये १९५० च्या दशकात लिहू लागल्या, त्यापैकी सिमिन एक. समकालीन कवयित्रींकडे नसलेला एक गुण सिमिन यांच्यात होता : लढाऊ बाणा! शहा मोहम्मद रझा यांची राजवट (१९४१-७९) होती, तेव्हाच्या शांत- प्रगतिशील- आधुनिकतावादी काळातसुद्धा हा बाणा कधी कधी दिसे, पण तेव्हाची लढाई स्त्रीनं घरात आणि बाहेर ‘स्त्री’ म्हणून होणाऱ्या मुस्कटदाबीविरुद्ध होती, तशी ती सर्वच पुढारलेल्या देशांतही करावी लागतच होती. शहांना उलथवणारी खोमेनींची धर्मसत्ता इराणात आली, तेव्हापासून मात्र संदर्भ बदलले. अभिव्यक्तिस्वातंत्र्य खालसाच झाले, पण रोज जगताना ‘ट्रकभरून दिसताहेत तरुण.. प्रेतवत, प्रेतंच ती! आता त्यांना कबरस्तानाकडे नेलं जातंय’ असा अनुभवही सिमिन यांना मांडावा लागला आणि ‘रोटीतुकडय़ासाठी रांग. मग हात पुसायला कागद हवा, तो कागद घेण्यासाठी रांग’ अशी नागरिकांना सत्ताधाऱ्यांचे मिंधे बनवणारी हलाखीही या अनुभवांत आली. अशा वेळी ‘माझा देश तरुण राहावा, त्या यौवनफुलाचा सुगंध पसरावा’ अशी सूचक, सांकेतिक भाषा सिमिन यांनी वापरलीच, पण ‘देशाचं बांधकाम पुन्हा करायचंय..  या बांधकामासाठी काय लागतं? .. विटा? देते की मी माझ्या आयुष्यातल्या वर्षांच्या.. खांब? स्वखुशीनं देते मी हाडं माझी’ असा थेट शब्दप्रवाह मोकळा करून, वाचकांच्या साकळलेल्या मनांनाही उभारी दिली. ‘साहित्यिक म्हणून काम करताना राजकारण आपसूक येतंच..’ ही (त्यांनीच एका मुलाखतीत स्पष्ट केलेली) संकल्पना त्या जगल्या. सिंहीण तिची जागा नाही सोडत. ती राहते बछडय़ांजवळच. गुरगुरते, हल्ला न करता रक्षण करते. हेच सिमिन यांनी केले. उमेदवारीच्या काळात गझल हा प्रकार पुरुषांच्या तावडीतून सोडवल्याबद्दल त्यांचे कौतुक करणारे पुढे त्यांना ‘देशद्रोही’ म्हणू लागले, तरीही सिमिन यांनी मायदेश- इराण सोडला नाही! इराणमधील पुरोगामी हुंकार या सिंहिणीने बछडय़ांसारखे जपले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा