मुलायमसिंह यादव, त्यांच्या समाजवादी पक्षाचे मुंबईतील नेते अबू आझमी यांनी गेल्या काही दिवसांत जे काही अकलेचे तारे तोडले आहेत, त्यावरून आधुनिक, सुसंस्कृत समाजाचे नेतृत्व करण्यासाठी ते किती नालायक आहेत, हेच दिसून येते. या दोघांकडून उच्च दर्जाच्या सांस्कृतिक मूल्यांची अपेक्षा कोणीही करणार नाही. ते व्यर्थ आहे. परंतु म्हणून किमान सांस्कृतिकतेपासूनही त्यांनी घटस्फोट घेण्याचे कारण नाही. मुलायमसिंह यांच्या पक्षाने २००९ सालच्या जाहीरनाम्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळा आणि संगणक आदी साधने वापरणाऱ्यांच्या विरोधात आगपाखड केली होती. या दोन्हींवर बंदी आणण्याचा त्यांचा इरादा होता. त्यावरून आधुनिक समाजाचे किती वावडे त्या पक्षाला आहे, हे लक्षात यावे. हे दोघे वा त्यांच्या पक्षाचे एके काळचे अध्वर्यू अमरसिंह यांची महिलांविषयक मतेदेखील किती हीन आहेत याचा प्रत्यय अनेकदा आलेला आहे. या दोघांच्या संभाषणाची एक सीडी त्या वेळी बरीच गाजली होती. परंतु तो त्यांच्या हीनतेचा अंत नसेल, असे वाटले नव्हते. बलात्कार या अत्यंत घृणास्पद गुन्ह्य़ाची शिकार व्हावे लागलेल्या महिलांविषयी त्यांनी मांडलेली मते आणि स्त्री-पुरुष संबंधांविषयी अबू आझमी यांनी उधळलेले शहाणपण पाहता या पक्षाच्या नेत्यांची क्षुद्रता अथांग आहे, असे म्हणावयास हवे. बलात्कारी गुन्हेगारांना फाशी नको, असे मत मांडणे वेगळे.. ते तसे अनेकांचे आहे आणि त्यास हे वर्तमानपत्र अपवाद नाही.. आणि बलात्कार या कृत्यास केवळ तरुणांची चूक मानणे वेगळे. मुलायमसिंह यांच्या मते हा गुन्हा ही केवळ एक चूक आहे. अबू आझमी आपल्या नेताजींच्या पुढे एक पाऊल जातात. त्यांच्या मते अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलांना फाशीची शिक्षा दिली जायला हवी. यानंतरचा साधा प्रश्न असा की, मग पुरुषांचे काय? ते त्याबाबत बोलावयास तयार नाहीत. यावरूनच त्यांच्या विचारकक्षास सुईच्या अग्राइतकी जागादेखील भव्य वाटत असावी. मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद वा हे असले अन्य कोणी, हे एके काळचे लोहियावादी. राममनोहर लोहियांच्या तालमीत तयार झालेले, परंतु त्यांचे वर्तन समाजवादाच्या सहिष्णू आणि बौद्धिकतेपासून शेकडो योजने दूरच राहिलेले आहे. उत्तर प्रदेश वा बिहारसारखी राज्ये अत्यंत मागास राहतात ती हे नेते त्याहीपेक्षा मागास आहेत म्हणून. त्यांच्या समाजातील काही मुखंडांचे नेतृत्व अबाधित राहणे हे त्यांच्या मते प्रगतीचे लक्षण. या नेतृत्वास आव्हान निर्माण झाले की त्यांचा तोल जातो आणि ते काहीही बरळू लागतात. आताही तसेच होताना दिसते. भाजप आणि त्याच्या बरोबरीने आम आदमी पक्ष यांचे आव्हान मुलायमसिंह यांना वाटत होते त्यापेक्षा अधिक गंभीर आहे. भाजपने उत्तर प्रदेशात अमित शहा यांच्यासारखा ठकास व्हावे ठक यासारखा नेता आणून ठेवल्यापासून उत्तर प्रदेशातील राजकीय मतांचे ध्रुवीकरण मोठय़ा प्रमाणावर सुरू झाले आहे. याच्या जोडीला मुसलमान समाज लक्षणीयरीत्या आम आदमी पक्षाच्या मागे जाताना दिसतो. हे कमी म्हणून की काय मायावती यांचा बहुजन समाज पक्ष हादेखील पुनरुज्जीवित होईल अशी शक्यता असून तसे झाल्यास समाजवादी पक्षाचे लचके आणखी तुटू शकतात. ही सगळी आव्हाने पेलायची तर राजकीय परिस्थितीवर पक्की मांड हवी. परंतु मुलायमचिरंजीव अखिलेश यांचे उत्तर प्रदेश मुख्यमंत्रिपदाचे आसन दोन वर्षे होत आली तरी अजूनही डळमळीतच असून त्यांना तीर्थरूपांकडूनच जाहीर कानपिचक्या मिळत असतात. परिस्थितीची वाळू हातातून झरझर सुटत चालली की माणूस सैरभैर होऊ लागतो. मुलायमसिंह आणि कंपूचे तसेच झाले आहे. या त्यांच्या माजवादास मतपेटीतून उत्तर मिळणे हेच एक उत्तर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा