शब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत नाहीत तर इतिहासातली महत्त्वाची नोंद ठरतात. शब्दांना हे सामथ्र्य येते ते लोकांच्या मनातील आवाज ओळखल्यामुळे. प्रत्येक चळवळ नवी घोषणा घेऊन जनतेपर्यंत जाते. यात गेल्या काही वर्षांत जाणवणारी एक बाब म्हणजे चळवळीतल्या घोषणा अजूनही काळाच्या संदर्भानुसार बदलताना दिसत नाहीत. याचे कारण प्रश्न अजून तसेच आहेत आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीची हत्यारेही तीच आहेत.
शास्त्र आणि सिद्धांत सांगणारी भाषा ही वस्तुनिष्ठ आणि तर्कावर आधारित असते. लोकांना आवाहन करणारी, उठविणारी, संघटित करणारी भाषा ही अशी प्रमाणबद्ध असू शकत नाही. लोकजीवनातला रसरशीतपणा, ओबडधोबडपणा या भाषेत असतो अशी भाषा अवलंबिल्याखेरीज लोकांपर्यंत पोहोचता येत नाही. या भाषेत लोकांच्या जगण्याचे संदर्भ असतात, त्यांच्या अवतीभोवतीच्या जगातले तपशील असतात. मोठमोठय़ा पुस्तकांद्वारे जे साध्य होणार नाही ते एखाद्या घोषणेतून साध्य होते याचे कारण त्या घोषणेतल्या शब्दामागचा आशय लोकांच्या मनावर नेमकेपणाने बिंबवला जातो. जेव्हा जेव्हा समाजात घुसळण होते, चळवळी आकाराला येतात, जनमत संघटित होऊ लागते, लोक जागे होऊ लागतात तेव्हा अशा घोषणांनी जबरदस्त परिणाम साधलेला असतो. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ‘पत्रीसरकार’ (प्रतिसरकारचा अपभ्रंश)चा जोर होता तेव्हा या चळवळीने विशेषत: ग्रामीण भागातील माणूस स्वातंत्र्य चळवळीत ओढला. कष्ट करून जगणाऱ्या माणसालाही स्वातंत्र्याची आस लागली होती. त्या वेळी या चळवळीतली एक घोषणा अशी होती, ‘स्वराज्य मिळवाचंय औंदा, म्हणून कारभारणी सोडलाय धंदा’. या घोषणेत कामधंदा विसरून स्वातंत्र्य चळवळीत उतरलेल्यांची नेमकी भावना आलेली होती.
‘शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव मिळालाच पाहिजे. या मागणीखातर जेव्हा शेतकरी चळवळीने शेतकऱ्यांना संघटित केले तेव्हा या चळवळीला आकडेवारीपेक्षा आणि आíथक ताळेबंदापेक्षा ‘भीक नको, हवेत घामाचे दाम’ हे सूत्र महत्त्वाचे वाटले. लोकांपर्यंतही याच चळवळीचा नेमका आशय अशा संकल्पनेतूनच पोहोचला. पुढे शेतकऱ्यांना संघटित करण्यासाठी, रस्त्यावर आणण्यासाठी आणि त्यांच्या लढय़ाला धार येण्यासाठी ‘हातात रुमणं, एकच मागणं’ यासारखी घोषणा महत्त्वाची ठरली. या घोषणेत सगळेच होते. रुमणं हे हत्यार कृषी व्यवस्थेतले होते. ते हातात घेऊन एखादे मागणे मागताना जाब विचारणेही आलेच. जेव्हा जेव्हा अशा घोषणा साकारतात तेव्हा तेव्हा त्या लोकभावनेला हात घालतात. लक्षावधी लोकांची भावनाच त्यातून व्यक्त होते. एका अर्थाने तो लोकांचा आतला आवाजच असतो. जेव्हा मोठय़ा संख्येने लोक रस्त्यावर येतात तेव्हा बरीच गर्दी काठावर असते. हाताची घडी करून काय चालले आहे ते पाहणारी माणसे किनाऱ्यावर असतात. या किनाऱ्यावरच्या माणसांना प्रवाहात ओढायचे असेल तर ‘बघता काय, सामील व्हा’ अशी आरोळी महत्त्वाची ठरते. काठावरची, किनाऱ्यावरची माणसे त्यांच्यातला कातडीबचाऊपणा सोडून प्रवाहात सहभागी व्हावीत असे आवाहनच जणू या घोषणेमागे असते.
वर्षांनुवष्रे त्याच त्या प्रश्नासाठी लढे उभारावे लागतात, संघर्ष करावा लागतो, हत्यारांना धार आणावी लागते. वारंवार झगडूनही पदरात काही पडत नाही तेव्हा व्यवस्थेशी संघर्ष करताना हा स्वर जरा चढा होतो. ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’ अशी निर्वाणीची भाषा व्यक्त होऊ लागते. कधी कधी काही घोषणा एखादे महत्त्वाचे सत्य सांगू पाहतात. जेव्हा राबणाऱ्यांच्या असे लक्षात आले की आपल्या राबण्याचे मोल होत नाही, आपण कष्ट करतो पण जमिनीवर मालकी दुसऱ्याचीच. अशा वेळी ‘कसेल त्याची जमीन’ ही घोषणा पुढे आली. जेव्हा या घोषणेचा बोलबाला वाढला तेव्हा ‘कसेल त्याची जमीन, नसेल त्याचे काय?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला. लोकांचीच भाषा घेऊन लोकांत मिसळले तरच या मांडणीवर लोकांचा विश्वास बसतो. ज्यांना ही लोकभावना ओळखता आली आणि लोकांच्या आकांक्षेची अचूक अशी नस सापडली त्यांनी लोकांना संघटित केले आणि लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवले हा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा चळवळी उभ्या राहिल्या आणि या चळवळींनी समाजात मोठी उलथापालथ घडविली तेव्हा तेव्हा लोकभावनेला साद घालणारी भाषा महत्त्वाची ठरली. या भाषेनेच समाजातला जिवंतपणा कायम ठेवला. प्रत्येक वेळी या जिवंतपणाला अधोरेखित करणारी एखादी ओळ जन्माला येते, एखादी घोषणा अवतरते. एका अर्थाने अशा घोषणा म्हणजे चळवळींना व्यापक जनाधार देण्याचेच काम करतात. शब्दांचे सामथ्र्य जर लोकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचले तर सिंहासने उलटतात, क्रांत्या होतात आणि अनेकदा इतिहासाचे नवे पान लिहिले जाते. तसे वजन मात्र त्या त्या शब्दांना हवे. शब्दातले सामथ्र्य समाजात नवी मूल्ये रुजविते आणि नव्या व्यवस्थेची पायाभरणीही करते. ‘चले जाव’, ‘खेडय़ाकडे चला’ यांसारखे शब्द केवळ औपचारिकता राहत नाहीत तर इतिहासातली महत्त्वाची नोंद ठरतात. शब्दांना हे सामथ्र्य येते ते लोकांच्या मनातील आवाज ओळखल्यामुळे. कुणाच्या तरी ‘आतला आवाज’ अशा वेळी साऱ्या समाजाचा होतो. भाषेने केवळ संवाद साधण्याचेच काम होत नाही तर एका क्रांतिकारी बदलाचेच काम होते. नवा इतिहास भाषेद्वारे घडविला जातो. भाषा जर लोकांना आपली वाटली तर लोक आपोआपच या भाषेवर जीव ओवाळतात.
लोकांचे जगणे उन्नत करण्यासाठी सतत वेगवेगळ्या चळवळी जन्माला येतात. प्रत्येक चळवळ नवी घोषणा घेऊन जनतेपर्यंत जाते. यात गेल्या काही वर्षांत जाणवणारी एक बाब म्हणजे चळवळीतल्या घोषणा अजूनही काळाच्या संदर्भानुसार बदलताना दिसत नाहीत. याचे कारण प्रश्न अजून तसेच आहेत आणि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीची हत्यारेही तीच आहेत. जेव्हा जेव्हा चळवळी उभ्या राहतात तेव्हा तेव्हा त्यांना व्यवस्थेत काही बदल करायचे असतात, नवी मांडणी करायची असते. आता व्यवस्था बदलण्यापेक्षा व्यवस्थेचे लाभ पदरात पाडून घेण्याकडेच बहुतेकांचा कल आहे. व्यवस्थेत लाभार्थी म्हणून आपली जागा निश्चित करण्याकडेच अनेकांचा आटापिटा चाललेला आहे. अशा वेळी पुन्हा व्यवस्थेला सुरुंग लावणारा उद्गार काढणे हे मोठेच आव्हानात्मक काम होऊन बसते. त्यामुळेच आता चळवळीही मंदावल्या आणि चळवळींना बळ देणाऱ्या भाषेतला जोमही ओसरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा