देशात सत्तांतर झाल्यानंतर पहिला लक्षणीय बदल शासनव्यवस्थेत दिसेल, असे स्वप्न लोकसभा निवडणुकीआधीच्या जाहीर सभांमधून भाजपने जनतेच्या मनात रुजविले होते. सत्तांतर झाल्यानंतर आता सुशासनाच्या संकल्पनेचा वारू एकएक प्रशासकीय क्षेत्र पादाक्रांत करीत सुटला आहे. मात्र हा वारू बेफाम तर होणार नाही ना, अशा नव्याच काळजीचे सावट आता शासनव्यवस्थेवर दाटू लागले आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने शिक्षणक्षेत्रात सुरू केलेल्या सुशासनाच्या कथित प्रयोगांमुळे सुरू झालेले घोळ आणि ते निस्तरण्यासाठी सुरू असलेली कसरत हे या काळजीचे एक उदाहरणच ठरू पाहत आहे. शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली देशाच्या मानव संसाधन विकासमंत्री स्मृती इराणी यांनी नवा प्रयोग हाती घ्यावा आणि त्याभोवती वादाची वलये दाटू लागताच त्या प्रयोगाचे प्रयोजन तसे नव्हते, असे सांगत त्यातून सावरण्याची धडपड सुरू करावी हे आता सर्रासपणे दिसू लागले आहे. येत्या २५ डिसेंबरला देशात सर्वत्र ख्रिसमसच्या सणाचा उत्साह दाटून राहिलेला असेल. तो तसा दर वर्षीच असतो. शाळकरी मुलांना तर सुट्टी ही पर्वणीच असते. अशा वेळी सुशासनाचा वारू सुट्टीवर आक्रमण करू पाहत असेल, आणि त्याची प्रतिक्रिया उमटणे गैर मानता येणार नाही. याच दिवशी देशाचे माजी पंतप्रधान आणि भाजपचे आदरणीय नेते अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस असतो. वाजपेयी यांनी आपल्या सत्ताकाळात देशात सुशासनाचे आदर्श घालून दिल्याने, मोदी सरकारच्या सुशासनाच्या संकल्पनेने त्याच वाटेने चालावे, अशी अपेक्षाही काही गैर नाही. त्यामुळे ‘सुशासन दिवस’ साजरा करण्यासाठी वाजपेयी यांचा वाढदिवस हाच योग्य दिवस आहे. पण त्यासाठी सुट्टीवर आणि सणाच्या आनंदावर विरजण पडू नये, अशी भावना लगेचच व्यक्त झाली. सुट्टीच्या दिवशी सुशासन दिवस साजरा करताना शाळकरी मुलांना ‘कामाला लावण्याच्या’ संकल्पनेचे पडसाद उमटल्यावर हे मंत्रालय भानावर आले, आणि सुशासन दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धा केवळ ऐच्छिकच असल्याचा खुलासा त्यांना करावा लागला. मात्र तेवढय़ाने या सुसाट वारूच्या दौडीला लगाम बसलेला नाही. गेल्या मंगळवारी याच मंत्रालयाने प्रसृत केलेल्या एका परिपत्रकाने घालून ठेवलेला घोळ कसा निस्तरावा याची चिंता आता या मंत्रालयाला लागली असावी. सुशासन दिनाची स्पर्धा ऐच्छिकच असून त्यासाठी सुट्टी रद्द केलेली नाही, असा खुलासा एकीकडे स्मृती इराणी करीत असताना, निबंध स्पर्धाचे चित्रीकरण करण्याचे आदेश त्या परिपत्रकाने जारी केले आहेत. या दिवशी कोणते उपक्रम राबविले, कोणत्या स्पर्धा आयोजित केल्या आणि ख्रिसमसच्या सणानिमित्त कोणत्या वृत्तचित्रफिती दाखविल्या याचे अहवाल सादर करण्याचेही या परिपत्रकाद्वारे फर्मावले गेले असल्याने, ऐच्छिक स्वरूपात पाळावयाच्या या दिवशी चित्रीकरण कसे शक्य आहे, या साहजिकपणे पडणाऱ्या प्रश्नाने डोके वर काढले आहे. २५ डिसेंबरला वाजपेयी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजऱ्या केल्या जाणाऱ्या सुशासनदिनी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनच या परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यावर वादळ माजणार असे स्पष्ट होताच इराणी यांनी पुन्हा एकदा माध्यमांच्या कपाळावर उतावीळपणाचा शिक्का मारत सुशासनाचा घोळ सावरण्याचा प्रयत्न सुरू केला असला तरी याच वाटेने सुशासनाचा वारू वाटचाल करणार असेल, तर तो कधीतरी भलतीकडेच भरकटेल आणि वाजपेयींनी आखून दिलेली सुशासनाची वाट मात्र एकाकीच राहील, अशीच शक्यता अधिक आहे. सुशासनाचा मार्ग आखताना तरी अशैक्षणिक घोळ घालू नये, एवढे भान आता या मंत्रालयाला ठेवावे लागेल.
सुशासनाचा घोळ
देशात सत्तांतर झाल्यानंतर पहिला लक्षणीय बदल शासनव्यवस्थेत दिसेल, असे स्वप्न लोकसभा निवडणुकीआधीच्या जाहीर सभांमधून भाजपने जनतेच्या मनात रुजविले होते.
First published on: 17-12-2014 at 01:20 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani create controversy over good governance day on christmas