आज आवश्यकता आहे ती सामाजिक समतेची. कारण त्यातूनच सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. समाजाला ही दिशा सुधारकांनी मिळवून दिलेली आहे, संतांनी नव्हे. आज भारताबाहेर किती व कसे बदललेले जग आहे, जे संतांना कधी दिसले नाही, ते जग व ती परिस्थिती सुधारकांना व बुद्धिवाद्यांना मात्र दिसलेली आहे..
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीपासून भारतभर ब्रिटिशांचे राज्य स्थिरस्थावर होऊ लागले. इंग्रजांनी इंग्रजी भाषा व वेगळी शिक्षणपद्धती आणली आणि सर्व शिक्षण सर्व जातिवर्णाना खुले ठेवले. काही थोडे भारतीय समुद्र पर्यटनाची बंदी (धर्माने घातलेली) झुगारून समुद्रापलीकडे जाऊ लागले. त्यामुळे भारताबाहेरही काही जग आहे अशी जाणीव भारतीयांना नव्याने प्रथमच होऊ लागली. फ्रेंच राज्यक्रांतीने निर्मिलेल्या व नंतर जगभर पसरलेल्या ‘स्वातंत्र्य, समता व बंधुता’ या मूल्यांचे महत्त्व भारतीय सुशिक्षितांना (नवशिक्षितांना) पटू लागले. इकडे भारत देशभर ख्रिस्ती मिशनऱ्यांनी, हिंदू धर्मातिक अंधश्रद्धा, अस्पृश्यता व जन्मजात उच्च-नीचता वगैरे अनेक दोषांवर बोट ठेवून जोरदार प्रचार केला. अशा अनेक कारणांनी भारतातील बुद्धिमंत ‘आत्मपरीक्षण’ करू लागले. त्यामुळे ‘देवभक्तीभोवती फिरणाऱ्या संतांच्या स्थितिप्रिय शिकवणुकीचा प्रभाव’ कमी होऊ लागून एकोणिसाव्या शतकाने भारताला विशेषत: महाराष्ट्राला मोठे ‘संत’ देण्याऐवजी मोठे ‘समाजसुधारक’ दिले. त्यात राजा राममोहन रॉय (बंगाल), महात्मा फुले, लोकहितवादी, आगरकर, न्यायमूर्ती रानडे अशी किती तरी नावे आहेत, की ज्यांनी भारतीयांच्या आचारविचारांना योग्य पुरोगामी दिशा देण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले.
स्त्रियांबाबत विधवाविवाहविरोध, जरठ-बालविवाह, स्त्रियांचे अज्ञान, परावलंबित्व, कुचंबणा वगैरे दु:खांची मुख्य कारणे ‘स्त्री-शिक्षणाचा अभाव’ आणि त्यामुळे त्यांच्या सर्वागीण विकासाला होणारा अडथळा हीच आहेत हे ओळखून महात्मा फुले, महर्षी कर्वे वगैरे थोर समाजसुधारक स्त्री-शिक्षणासाठी जन्मभर झिजले. सनातन्यांचा विरोध आणि जननिंदा सोसूनही त्यांनी महाकठीण कर्म केले. आज भारतात जवळजवळ सर्वच क्षेत्रांत सुशिक्षित आणि शहाण्या स्त्रिया कार्यरत आहेत ते या सुधारकांच्यामुळेच होत. स्त्री-शिक्षण संकल्पनेत स्त्री-पुरुषांतील समानता ही कटाक्षाने अभिप्रेत होती. ‘चूल आणि मूल’ यात स्त्रीचे आयुष्य बंदिस्त करून ठेवणे हा सनातनी अन्याय सुधारकांना मान्य नव्हता.
संतांनी लोकांना ‘स्वधर्मपालनाच्या नावाखाली’ आपापल्या जाती-वर्णाची कर्तव्ये करीत आयुष्य व्यतीत करा, असे सांगितले होते. स्वधर्म शब्दाचा त्यांचा अर्थ वर्णधर्म किंवा जातीधर्म हाच होता. वर्णयोग्य धर्मपालन हे त्या काळी परमार्थाचे साधन मानले जात होते. संतांनी परमार्थाचा अधिकार सर्व जाती-वर्णाना व स्त्री-पुरुषांना बहाल केला खरा; परंतु ‘वर्णजातिव्यवस्था व स्पृश्यास्पृश्यता या ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहेत व त्या अन्यायकारक आहेत म्हणून त्या झिडकारल्या पाहिजेत’ हे सत्य जे संत कधीच सांगू शकले नाहीत ते अखेरीस एकोणिसाव्या शतकातील सुधारकांनी ठणकावून सांगितले. शेकडो वर्षे हिंदू धर्मात प्रस्थापित झालेल्या या व्यवस्था हे हिंदू धर्माचे गुण नसून ते त्यातील दोष आहेत, असे प्रथम सांगितले ते सुधारकांनीच होय.
ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज वगैरे नवविचारांवर आधारलेल्या सामाजिक चळवळींनी एकोणिसाव्या शतकात जातिसंस्थेवर आणि स्पृश्यास्पृश्यतेवर प्रखर हल्ले केले. अशा नवसमाजांचे काम विसाव्या शतकात बुद्धिवाद्यांनी चालू ठेवले. संतांनी आध्यात्मिक समतेचे पहिले पाऊल तरी टाकले असे जरी म्हणता येईल, तरी त्यामुळे ना जातिभेद शिथिल झाले, ना अस्पृश्यता कमी झाली, ना वंचितांचे दु:खनिरसन झाले, ना समाजजीवनाला मानवतावादी वळण लागले. हे सर्व करून दाखविले, ते सुधारकांनीच होय.
प्रामाणिक विचार करणाऱ्या सर्वाना आता ही गोष्ट पटलेली आहे की, आजच्या काळाला आध्यात्मिक समता उपयोगाची नाही. कारण ती केवळ कल्पित परमार्थासाठीची समता आहे. त्यात इहलोकी लागणारी ‘रोटी, कपडा और मकान’ येत नाहीत. त्यामुळे आज आवश्यकता आहे ती सामाजिक समतेची. कारण त्यातूनच सामाजिक एकता व राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल. समाजाला ही दिशा सुधारकांनी मिळवून दिलेली आहे, संतांनी नव्हे. आज स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही जाती-पंथाच्या व्यक्तीला हवे ते शिक्षण मिळू शकते. कुठल्या जाती-वर्णाच्या माणसाने कुठला व्यवसाय करावा यावर काहीही बंधने नाहीत. प्रत्येक व्यक्तीला आपापले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. स्त्रीला व्यवहारात बरोबरीचा दर्जा, व्यवसायाची समान संधी व समाजात स्वतंत्र स्थान मिळत आहे. परंपरेने तिच्या पायात अडकवलेल्या बेडय़ा तुटल्या आहेत. जातींच्या संस्था व त्यांचे काही उपद्रव (उदाहरणार्थ बहिष्कार) अजूनही टिकून आहेत; पण शहरी, निमशहरी वातावरणात तरी आंतरजातीय विवाह होत आहेत. जातिसंस्था किंवा कोणीही त्यांना रोखू शकत नाहीत. सामाजिक व्यवहारात कुणी कुणाला जात विचारीत नाही. कुणी कुणाचा अपमान करू धजत नाही. आपली योग्य दिशेने एवढी वाटचाल संतांमुळे नव्हे, तर सुधारकांमुळे झालेली आहे; फुले, आगरकर, सावरकर व आंबेडकर यांच्यामुळे झालेली आहे.
आज आपल्या देशापुढे किती तरी कठीण प्रश्न उभे आहेत. लोकसंख्येची बेसुमार वाढ होत आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार फोफावत आहे व त्यावर काही उपाय सापडत नाही. बहुतांश जनतेत शिक्षणाचा व विज्ञानाचा प्रसार होत असूनही, जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मात्र अंगीकार होत नाही. अतिदूरच्या ग्रामीण भागात आणि तळागाळातील लोकांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा व प्राथमिक सोयीसुविधांचासुद्धा अभाव आहे. अशा निरक्षरतेचे व अशा विषमतेचे, दारिद्रय़ाचे निर्मूलन होणे आवश्यक आहे.
विचार केला तर असे दिसून येते की, आपल्या अनेक कठीण समस्यांची मूळ कारणे आपल्या वृत्तीत दडलेली आहेत. आपली प्रचंड लोकसंख्यावाढ, आपले अज्ञान व दारिद्रय़ यामुळे होत आहे. मुले ही देवाची देणगी मानल्यामुळे आम्ही कुटुंबनियोजनाच्या विरोधात आहोत. या प्रचंड लोकसंख्येच्या हवा, अन्न, पाण्याची काळजी ईश्वर घेईल, असे आपल्याला वाटते. आपण भ्रष्टाचार करण्याच्या मोहाला स्वत:च बळी पडतो आणि मग अमुकतमुक देवाच्या दर्शनाने व काही दान करून प्रायश्चित्त घेतो, आपण यातून पापमुक्त झालो असे मानतो व पुढचा आणखी एक भ्रष्टाचार करायला मोकळे होतो. तळागाळातील लोकांचे दारिद्रय़ व निरक्षरता ही त्यांच्या पूर्वजन्मींच्या कर्मामुळे आहेत असे आपण मानतो. देवच प्रत्येकाचे सुख-दु:ख व भाग्य ठरवीत असल्यामुळे जे जे घडेल ते आपण फक्त पाहत राहावे, असे आपण मानतो. गुरू, बुवा, बाबा अशांच्या चमत्कारांवर आपण विश्वास ठेवतो. काळ व परिस्थितीप्रमाणे बदलण्यास आपण तयार नसतो. आपले आजचे बहुतेक राजकीय नेते स्वत: ‘अंधश्रद्ध’ आणि ‘प्रतिगामी’ विचारांचे असतात. त्यांना शाळा, शिक्षण, समाजसेवा, हॉस्पिटल यांपेक्षा प्रचंड देऊळ बांधणे, त्यावर सोन्याचा कळस चढविणे आणि/किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये मिरविणे हे महत्त्वाचे वाटते. आपण वृत्तीने अजूनही अंधश्रद्ध, दैववादी आणि परंपराप्रिय आहोत. इंग्रजांच्या दास्याच्या शृंखला तोडून आपणाला आज ६८ वर्षे झाली खरी; परंतु आपल्याच विकृत सनातनी वृत्तींच्या शृंखला तोडण्यात आपण यशस्वी होऊ तेव्हाच आपण खरे स्वतंत्र होऊ, मुक्त होऊ.
महाराष्ट्रातील संतांचा काळ तेरावे ते सतरावे शतक असा आहे, तर येथील सुधारकांचा व बुद्धिवाद्यांचा काळ एकोणीस व विसावे शतक असा आहे. आज भारताबाहेर किती व कसे बदललेले जग आहे, जे संतांना कधी दिसले नाही, ते जग व ती परिस्थिती सुधारकांना व बुद्धिवाद्यांना मात्र दिसलेली आहे व त्यांनी ती लक्षात घेतलेली आहे. आधुनिक विज्ञानाच्या अनेक शाखांतील आश्चर्यकारक शोध आणि जगाची औद्योगिक आणि तंत्रज्ञानविषयक प्रगती या गोष्टी संतांच्या काळात नव्हे, तर सुधारकांच्या आणि बुद्धिवाद्यांच्या काळात घडलेल्या आहेत. अशा अनेक कारणांमुळे आपले आजच्या जीवनातले प्रश्न जे संतांना कळणे शक्य नव्हते ते सुधारकांना चांगले कळलेले आहेत. त्यामुळे आता सुरू असलेल्या एकविसाव्या शतकात आपल्या देशाच्या सव्वा अब्ज जनतेच्या सुखासाठी व प्रगतीसाठी आपण संतांच्या देवभक्तीच्या आणि स्थितिप्रिय’ मार्गाने नव्हे, तर सुधारकांच्या व बुद्धिवाद्यांच्या ‘मानवतावादी आणि चैतन्यमय’ मार्गाने पुढील वाटचाल केली पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा