श्रीराम भालेराव, श्रीकांत बापट, वीरेंद्र उपाध्ये आणि विजय बिबीकर या चौघांनी एक कंपनी स्थापली.. तिचा विस्तार चारही महानगरांत झाला आणि दिल्लीची जबाबदारी वीरेंद्र उपाध्ये यांच्यावर आली.. ती पार पाडून दिल्लीत जम बसवताना सौम्यपणे ग्राहकांशी वागण्याची वृत्ती आणि तत्पर सेवा देण्याची तयारी हेच खरे भांडवल ठरले..
चार मराठी मित्रांनी मिळून एखादा व्यवसाय करायचा ही गोष्ट दुर्मीळच. व्यवसायात अपयश आले तरी एकत्र राहता येत नाही आणि यश डोक्यात गेले तर विचारायलाच नको, पण ३२ वर्षांपूर्वी चार मित्रांनी आपापल्या महिन्याभराच्या पगाराच्या भांडवलावर ठाण्यात सुरू केलेल्या लॅब इंडियाने हा समज खोटा ठरविला आहे. वैद्यकीय आणि जैवतंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांचे मार्केटिंग, विक्री आणि तांत्रिक साहय़ात अग्रणी असलेली ही कंपनी आज दिल्लीसह भारतातील विविध शहरांमध्ये सुमारे पाचशे-सहाशे कोटींची उलाढाल करीत आहे ती चार मित्रांच्या मैत्रीतील सौहार्द, परस्परसमन्वय आणि सामंजस्याच्या जोरावर. लॅब इंडिया समूहाच्या लॅब इंडिया इन्स्ट्रमेंटस्, लॅब इंडिया हेल्थकेअर, लॅब इंडिया अॅनालिटिकल इन्स्ट्रमेंटस् आणि लॅब इंडिया इक्विपमेंटस् अशा चार प्रमुख कंपन्यांसह देशभरात १७-१८ कार्यालये आहेत. दोन वर्षांपूर्वी लॅब इंडिया हेल्थकेअर या नव्या कंपनीचे दिल्लीत बस्तान बसविण्यात व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र उपाध्ये यांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
वीरेंद्र उपाध्ये यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाच्या कुडाळ तालुक्यातील वालावलचा. वडील सीताराम उपाध्ये पुण्यात शिकले आणि वालावलमध्ये परतून शिक्षकाच्या पेशात रमले. बालपणापासूनच घडय़ाळे, सायकली, गाडय़ा उघडणे, त्यांची मोडतोड करणे हे त्यांचे आवडते ‘उद्योग’ होते. विज्ञानाच्या आकर्षणानेच, अकरावीपर्यंत वालावलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून त्यांनी भौतिकशास्त्रात पदवी मिळविली. वॉटरपोलो आणि जलतरणात त्यांनी पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केले. ते १९७७-७९ चे दिवस होते. वाडिया महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ इंजिनीअिरगमध्ये डिप्लोमा केल्यानंतर उपाध्येंना फिलिप्स कंपनीत नोकरी मिळाली, पण नोकरीत आव्हानात्मक असे काही नसल्याने मन रमत नव्हते म्हणून स्विमिंग टँकवरील सहकारी श्रीराम भालेराव यांच्यासोबत त्यांनी मुंबईत एलटेक कंपनीत सव्र्हिस इंजिनीअरची नोकरी पत्करली. सोबत विजय बिबीकर, श्रीकांत बापट होते. त्या नोकरीतही मजा नाही म्हणून या चौघा मित्रांनी १९८१ साली लॅब इंडिया सुरू केली. हळूहळू ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळून कंपनीची वाढ झाली. एका नावाजलेल्या कंपनीकडून एजन्सी काढून पर्किन एल्मर या अमेरिकन कंपनीने लॅब इंडियाला भारतभरासाठी एजन्सी दिली. तिथून उपाध्ये, बिबीकर, बापट आणि भालेराव यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. या चौघांपैकी उपाध्ये, १९८५ साली लॅब इंडियाच्या विस्तारासाठी दिल्लीला आले. मराठी असल्यामुळे कसा निभाव लागणार, हा सर्वाना पडणारा सवाल त्यांच्यापुढे होता. वर्षभर राहून कंपनी स्थिरस्थावर करावी, अशा विचाराने आलेले उपाध्ये मुंबईपेक्षा रुंद रस्त्यांच्या हिरव्यागार दिल्लीच्या प्रेमात पडले. सौम्य स्वभावामुळे त्यांनी आपल्या व्यवसायातील आक्रस्ताळी उत्तर भारतीय स्पर्धकांना मागे टाकले. त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. कंपनी बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाल्यामुळे दिल्लीत आर्थिक अडचणीही आल्या नाहीत. ‘दिल्लीत गाडी आणि घर असेल तर जम बसायला वेळ लागत नाही आणि दिल्ली आवडायला लागते,’ असे ते स्वानुभवातून सांगतात. उपाध्ये यांच्या मते मुंबईत कामाची संस्कृती जास्त चांगली. दिल्लीत लोक आरामशीर असतात. लॅब इंडियाच्या गुरगाव शाखेत वीसपेक्षा जास्त मराठी कर्मचारी आहेत. बी.एस्सी. आहेस की एम.एस्सी. यापेक्षा मराठी आहेस का, हा प्रश्न जणू त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. अर्थात, संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता बघूनच कामाचे स्वरूप ठरविले जाते. अनौपचारिक, साधेपणा आणि विश्वास टाकून कर्मचाऱ्यांशी वागणे या आम्हा चारही भागीदारांमधील समान वैशिष्टय़ांमुळे आमच्याकडे तीस-तीस वर्षांपासून कर्मचारी टिकले आहेत, असे ते सांगतात.
लॅब इंडिया ही काही तरी करायचे एवढय़ाच उद्देशातून जन्माला आली. आम्ही सुदैवी ठरलो. चांगले आणि योग्य तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय केल्याने आम्हाला संघर्ष करावा लागला नाही, असे उपाध्ये सांगतात. कंपनी स्थापन करण्यासाठी एकत्र आलेले उपाध्ये, भालेराव, बापट आणि बिबीकर यांपैकी कुणाकडे सुरुवातीला पैसे नव्हते. प्रत्येकाचा पगार हेच भांडवल होते. त्यातले उपाध्येंचे भांडवल ४०० रुपये पगाराचे. भांडवलाशिवाय सेवा देत त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. ज्या कंपनीची एजन्सी घेतली त्यांच्याकडूनच कर्ज घेतले. मुंबईतल्या मराठी ग्राहकांचा त्यांना खूूप फायदा झाला. मराठी आहात ना, मग घ्या ऑर्डर, असाच सद्भाव त्यांच्या वाटय़ाला आला. ग्राहकांशी कोणतीही वाटाघाटी, घासाघाशी झाली नाही. आम्हाला सुरुवातीचा टेकू मुंबईतल्या मराठी लोकांनी दिला. दिल्लीतल्या मराठी ग्राहकांचेही पाठबळ लाभले, असे आवर्जून सांगणाऱ्या उपाध्ये यांचा ‘मराठी माणसं मराठी माणसांचे पाय ओढतात,’ यावर मुळीच विश्वास नाही.
उपाध्येंनी दिल्लीत लॅब इंडियाचे कार्यालय आणि प्रयोगशाळा सुरू केली. दरम्यान, चारही महानगरांमध्ये लॅब इंडियाचा विस्तार झाला. नवे तंत्रज्ञान भारतात आणून लोकांना उपलब्ध करून देणे, हे लॅब इंडियाचे आवडते काम. रुग्णांना लवकर बरे वाटेल, असे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा उपाध्येंचा प्रयत्न असतो. लॅब इंडियाच्या माध्यमातून त्यांनी आरोग्य क्षेत्रात नवनवे तंत्रज्ञान आणले. शरीरात कुठल्याही प्रकारच्या वेदनांचे व्यवस्थापन करणारे लेझर तंत्रज्ञान, स्तनांच्या कर्करोगाचे सुरुवातीच्या टप्प्यातच निदान करणारे तंत्रज्ञान, शहरातील लोकांना नीट निद्रासुख देणारी स्लीप लॅब, कुठल्याही प्रकारची, लवकर न बरी होणारी जखम अल्पावधीत भरून काढणारे वुंड मॅनेजमेंट अशा नवनव्या उपकरणांना त्यांनी भारतातील बडय़ा बडय़ा रुग्णालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला. त्यांच्या मते वुंड मॅनेजमेंट हे जादूई तंत्रज्ञान आहे. डायग्नोस्टिक, अल्ट्रासाऊंड, अॅनेस्थेशियाची उपकरणे व तंत्रज्ञान ते विकतात. जैवतंत्रज्ञानामुळे जगभरात अनेक गोष्टी निर्माण होत होत्या. या उच्च तंत्रज्ञानाची माहिती सर्वानाच असल्यामुळे त्याचा व्यवसाय करणे अवघड गेले नाही. ज्या कंपनीची उपकरणे आम्ही विकायचो ती जगातील अव्वल क्रमांकाची कंपनी होती. आमच्या स्पर्धक कंपन्या (जीई, ब्ल्यू स्टार, विप्रो) खूपच मोठय़ा होत्या, पण त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त यश मिळाले; कारण आम्ही विक्रीनंतरच्या सेवेकडे व्यक्तिश: लक्ष दिले. अमेरिका आणि युरोपातील ग्राहकांना वेळेच्या आत आणि स्वस्तात काम करून देणाऱ्या कंपन्या एखाद्या गोष्टीसाठी पाचऐवजी चार उपकरणांचा वापर करून दोनऐवजी दीड महिन्यात काम करण्याचे उद्दिष्ट ठेवतात. त्यासाठी सर्व उपकरणे २४ तास सुरू ठेवली जातात आणि ती बंद पडतील अशी कल्पनाही करू शकत नाहीत. त्यामुळे उपकरणे तात्काळ दुरुस्त व्हायला पाहिजेत, अशी आमच्या ग्राहकांची अपेक्षा असते आणि आम्ही ती पूर्ण करतो. आमच्या इंजिनीअर्सना लोक रात्री दोन दोन वाजता उठवून घेऊन जातात. आम्ही कटकट न करता जातो. मोठी कंपनी आधी पैसे मागते. आम्ही आधी सेवा देतो, नंतर पैसे मागतो, अशा शब्दांत उपाध्ये आपल्या व्यावसायिक यशाचे रहस्य उलगडून सांगतात.
आज गुरगावच्या उद्योगविहार फेज-दोनमध्ये लॅब इंडिया हेल्थकेअरची प्रशस्त प्रयोगशाळा व कार्यालय आहे. या प्रयोगशाळेत अत्याधुनिक डीएनए आणि प्रोटीन अॅनालिसिसची उपकरणे उपलब्ध करून दिली जातात. लोकांना फायदा होईल, असे नवे तंत्रज्ञान भारतात आणण्याचा उपाध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असतो. जैवतंत्रज्ञान क्षेत्रात लॅब इंडियाचे नाव मोठे झाले. मंत्रालयाच्या पातळीवर तसेच डीबीटी, डीएसटीसह दिल्लीतील प्रमुख ग्राहक त्यांचे तंत्रज्ञान वापरू लागले. राइस जिनोमपासून ते गुन्हे-तपासवैद्यकामध्ये लॅब इंडियाचे तंत्रज्ञान वापरले जाते. भारतातल्या जवळपास सर्व महत्त्वाच्या औषध कंपन्या, रिसर्च लॅब्स, सर्व कॉर्पोरेट आणि सरकारी इस्पितळे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये संशोधन करणाऱ्या संस्था त्यांच्याकडून उपकरणांची खरेदी करतात. एनसीएल, एनपीएल, कृषी महाविद्यालये, एम्स, सीसीएमबी, सीडीएफडी या नावाजलेल्या संस्था त्यांच्या ग्राहक आहेत. आरोग्यसेवेत प्रस्थापित कंपनीला समाविष्ट करून उलाढाल हजार कोटींच्या वर नेण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
उपाध्ये यांच्या पत्नी हेमा मुंबईतल्या. त्यांचे माहेरचे नाव कुलकर्णी. मुंबईत एलटेक कंपनीतच त्या काम करायच्या. त्यांचे भाऊ राजेंद्र वालावलशेजारच्या पाट येथे मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत. बहीण धनश्री पाटील कोल्हापूरला राहते. वडील निवृत्तीनंतर आता कोकणातच राहतात. पुण्यात मराठी मित्र आणि नातेवाईक खूप आहेत. पुण्यातील मुकुंद देशमुख, माधव येरवडेकर, श्रीधर फडके ही त्यांची मित्रमंडळी. उपाध्येंना रस आहे तो संगीत आणि कलेत. मराठी मित्र, चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्राशी त्यांचे संबंध आहेत. शास्त्रीय संगीत, मराठी जुनी गाणी, बाबुजी, श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर, श्रीधर फडके हे आवडते संगीतकार. श्रीधर फडकेंचे संगीत असलेले ‘संगीत मन मोहिरे’ या सीडीची निर्मिती त्यांचीच. श्रीधर फडके आणि आशा भोसलेंसोबत ते आणखी एक सीडी काढत आहेत. त्यांचे पुत्र वरुण मराठी चित्रपटसृष्टीत जम बसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्रामाणिकपणे काम आणि लोकसंग्रहाची आवड असलेले उपाध्ये आता हृदयविकाराला रोखणाऱ्या ओमेगा-३ चा समावेश असलेले फिश ऑइल स्कँडेनेव्हियन देशांतून भारतात आणण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतले आहेत. व्यवसायातून निवृत्ती अजून दूर असली तरी दहा-पंधरा वर्षांनंतर कोकणात घर बांधून राहण्याची त्यांची इच्छा आहे.