डॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु ‘सामान्यांप्रमाणेच जगणारा’ असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान! या तंत्रज्ञानासोबतचा त्यांचा प्रवास जाणून घेताना, महाराष्ट्राबाहेरच्या दोन पिढय़ा अखेर ‘महाराष्ट्रवासी’ होण्याचे उपकथानकही उलगडते..
दिल्लीतील अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेसह (एम्स) विविध वैद्यकीय महाविद्यालयांपैकी नेमका कुठे प्रवेश घ्यायचा असा पेच डॉ. अनिल कार्लेकर यांना पडला तेव्हा मुलाने आपल्याच शहरात म्हणजे मेरठमध्ये एमबीबीएस करावे, असा मातृप्रेमसुलभ स्वार्थ त्यांच्या आईच्या मनात डोकावणे स्वाभाविकच होते. पण एमबीबीएस करायचे तर एम्समध्येच, असे म्हणत त्यांचे वडील सखाराम कार्लेकर (बाबूजी) यांनी मुलाला आपल्यासोबतच जखडून ठेवण्याऐवजी भरारी घेण्याची संधी देऊन कर्तृत्वाची उंची गाठू देणे हेच पालकांचे कर्तव्य असते, हे ओळखले. एम्समध्ये शिकल्यास अनिलसाठी नवे विश्व खुले होईल, असे ते त्यावेळी उद्गारले होते. पित्याचे ते उद्गार सदैव स्मरणात ठेवून डॉ. कार्लेकर यांनी अॅनेस्थेशियोलॉजीच्या क्षेत्रात उंच भरारी घेतली.
मेरठमध्ये १४ जून १९५१ रोजी जन्मलेले दिल्लीतील प्रसिद्ध फोर्टिस एस्कॉर्टस् हार्ट इन्स्टिटय़ूटचे कार्यकारी संचालक तसेच अॅनेस्थेशियोलॉजी आणि क्रिटिकल केअर विभागाचे प्रमुख डॉ. अनिल कार्लेकर आणि त्यांचे बहुतांश नातेवाईक हे प्रामुख्याने अनिवासी महाराष्ट्रीय. कार्लेकर ग्वाल्हेरचे; त्यांचे मूळ आडनाव नातू. चार-पाच पिढय़ांपूर्वी महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झालेले. मावशीने दत्तक घेण्यापूर्वी त्यांचे वडील रघुनाथ नातू या नावाने परिचित होते. दत्तकविधानानंतर त्यांचे नाव सखाराम शिवराम कार्लेकर झाले. नोकरीच्या निमित्ताने सखाराम कार्लेकर पश्चिम उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी वास्तव्याला होते. डॉ. कार्लेकर यांच्या आई सीता बनारसच्या चितळे कुटुंबातल्या, तर त्यांच्या पत्नी वसुंधरा लखनौमधील नामवंत वकील व इन्कम टॅक्स सल्लागार भाऊसाहेब ऊर्फ विनायक जोशी यांच्या कन्या. डॉ. कार्लेकर चौघा भावांतले तिसरे. थोरले बंधू शरद लष्करात इंजिनीअरिंगमध्ये होते, त्यांच्यापाठचे अरुण इंदूरला, तर धाकटे भाऊ मोहन ठाण्यात स्थायिक आहेत. बहीण आशा गोखले राजस्थानच्या कोटा आणि उदयपूरमध्ये राहिल्यावर निवृत्तीनंतर पुण्यात स्थायिक झाल्या आहेत. पुण्यात इंजिनीअिरगचे शिक्षण पूर्ण करून मुंबईत नोकरीला असलेले डॉ. कार्लेकर यांचे थोरले चिरंजीव नमित यांचा मेजर जनरल सुरिंदर सिंग यांच्या कन्या सोनलशी विवाह झाला आहे, धाकटे पुत्र रजत यांनी पुण्यातच व्यवसाय सुरू केला आहे.. पुढल्या पिढीने महाराष्ट्राशी नाते जोडल्याने डॉ. कार्लेकर यांनाही पुण्याची ओढ लागली आहे. अनिवासी महाराष्ट्रीय असण्याचा त्यांना अभिमान वाटतो. त्यांना मराठी भाषा शाळेत शिकण्याचा कधी प्रसंगच आला नाही. पण घरात आई-वडिलांनी मराठी बाणा कायम राखल्याने मराठी लिहिणे, वाचणे आणि बोलण्याचे त्यांच्यावर नकळत संस्कार झाले. घरी येणारी ‘स्त्री’ आणि ‘किर्लोस्कर’ मासिके वाचत ते लहानाचे मोठे झाले. मराठी भाषा येत असल्यामुळे आज महाराष्ट्रात कुठेही गेले की लगेच संवाद साधणे शक्य होते, याचे त्यांना अप्रूप वाटते.
अनिल कार्लेकर यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू असतानाच उत्तर प्रदेश सरकारमध्ये सिंचन विभागाच्या नोकरीतून त्यांचे वडील निवृत्त झाले तेव्हा मध्यमवर्गीय कार्लेकर कुटुंबाच्या आर्थिक अडचणी वाढल्या. त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी थोरले बंधू शरद आणि अरुण यांना आर्थिक हातभार लावणे क्रमप्राप्त ठरले. एमबीबीएसनंतर (१९७६) अनिल यांनी अॅनेस्थेशियोलॉजीमध्ये एमडी करण्याचे ठरविले तेव्हा या क्षेत्राला फारसे महत्त्व नव्हते. पण एम्समधील इंटर्नशिपदरम्यान एकदा कार्डियाक ऑपरेशन थिएटरमध्ये डॉ. कार्लेकर यांनी अॅनेस्थेशियातज्ज्ञ प्राध्यापक डॉ. पुन्नूस यांना अतिशय उत्साह, तत्परतेने व चपळतेने सर्व गोष्टींचे नियंत्रण करताना पाहिले आणि त्यांची छाप पडून भविष्याचा मार्ग निश्चित केला. तसाही भिडस्त आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा स्वभाव असल्याने हेच क्षेत्र आपल्यासाठी योग्य ठरेल, याची त्यांना खात्री पटली. हृदयाशी संबंधित अॅनेस्थेशिया देण्यात ३३ वर्षांपासून निष्णात झालेले डॉ. कार्लेकर यांच्यासाठी हे क्षेत्र व्यावसायिकदृष्टय़ाही अतिशय समाधान देणारे ठरले आहे. दिवसअखेर आज आपण काहीतरी चांगले काम केले या ‘समाधानाच्या शिणाने गाढ झोप लागते’, असे ते सांगतात.
डॉ. कार्लेकर यांना श्रीमंत घरच्या वसुंधरा यांचे स्थळ सांगून आले तेव्हा बाबूजींनी व्याही भाऊसाहेबांना स्पष्टच सांगितले : बाराशे रुपये पगार असलेले अनिल तुमच्या मुलीच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत! पण तुमचा मुलगा शिकलेला आहे एवढेच आपल्यासाठी पुरेसे आहे, असे त्यावर भाऊसाहेबांचे परिपक्व उत्तर होते. लग्नानंतर एम्सच्या छोटय़ाशा होस्टेलमध्ये संसाराची सुरुवात करताना पत्नीने श्रीमंतीचा लवलेशही जाणवू दिला नाही, याचा उल्लेख डॉ. कार्लेकर आवर्जून करतात. एमबीबीएस, अॅनेस्थेशियोलॉजीमध्ये एमडी आणि तीन वर्षांची सीनिअर रेसिडेंसी पूर्ण केल्यानंतर डॉ. कार्लेकर यांनीच एम्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जयपूरच्या संतोकबा दुर्लभजी हॉस्पिटलची नोकरी तत्परतेने स्वीकारली. त्यापुढची पाच वर्षे ते सौदी अरेबियात जेद्दाह्च्या किंग फाहद हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या हृदय शस्त्रक्रियांच्या वेळी अॅनेस्थेशिया देण्याचे काम स्वतंत्रपणे करीत होते. १९८८ साली एस्कॉर्टस्ची स्थापना झाली त्यावेळी त्यांनी दिल्लीत परतण्याचे ठरले. डॉक्टर नरेश त्रेहान आणि अन्य ख्यातनाम सहकाऱ्यांसोबत अखंड दोन-दोन दिवस काम करीत हृदयविकाराशी संबंधित सर्व प्रकारचे उपचार देणाऱ्या एस्कॉर्टस्चे नाव देशात प्रस्थापित करण्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला. अगदी आईच्या पोटात असलेल्या अर्भकाच्या हृदयावरही निगराणी ठेवण्यासारखे उपचार परदेशात उपलब्ध असत, ते आता भारतातही आहेत.
अॅनेस्थेशियाच्या क्षेत्रात डॉ. कार्लेकर यांच्या पिढीने नावीन्य आणि कल्पकतेला चालना देणारी तंत्रज्ञानाची क्रांती आणि त्यातून उपचारपद्धतीत झालेली वेगवान प्रगती अनुभवली. वैद्यकीय कौशल्याला माहिती आणि तंत्रज्ञानाची जोड देण्याची दुर्मीळ संधी डॉ. कार्लेकर यांना एस्कॉर्टस् हार्ट इन्स्टिटय़ूटमध्ये लाभली. रुग्णांची सुरक्षितता वाढविण्यासाठी एस्कॉर्टस्मध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात डॉ. कार्लेकर यांनी पुढाकार घेतला. सर्वसामान्यपणे डॉक्टरांना प्रत्येक औषधाचे वैशिष्टय़ आणि त्याचे फायदे-तोटे स्मरणात राहणे शक्यच नसते. पण ३५ ते ४० हजार औषधांची तमाम वैशिष्टय़े संगणकात साठवून ठेवल्यास दोन औषधे एकत्र दिल्याने काय तोटे होऊ शकतात, याचा इशारा मॉनिटरवर क्षणार्धात मिळतो. पूर्वी रुग्णाच्या चाचण्यांचे अहवाल यायला दोन-तीन दिवस लागायचे. आता चाचणीत एखादी अनियमित बाब निदर्शनास येताच डॉक्टरांच्या मोबाइलवर एसएमएस येतो, या बदलांकडे ते लक्ष वेधतात. गेल्या पंधरा वर्षांत क्रिटिकल केअर किंवा इंटेसिव्ह केअरमध्ये अॅनेस्थेशिया तज्ज्ञांचा सहभाग मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यांचे काम ऑपरेशन थिएटरमध्ये संपत नाही. शस्त्रक्रियेनंतरच्या शुश्रूषेतही त्यांची महत्त्वाची भूमिका असते. रुग्णाला जिवंत ठेवण्यासाठी अॅनेस्थेशियाचे पूर्ण नियंत्रण असावे लागते. या स्पेशालिटीमध्ये थिअरी आणि प्रॅक्टिकलमधील अंतर फार कमी असते. अन्य स्पेशालिटीमध्ये वाचन जास्त आणि कृती कमी असते. ३५ वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया करताना रुग्णाची नाडी धरून बसावे लागायचे. आता ईसीजी, ऑक्सिजन, रक्तदाब या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. इको कार्डिओग्राफीमुळे हृदयाची रचनाच नव्हे तर सर्व भागांच्या हालचालीही दिसतात. सकाळी शस्त्रक्रिया करून चार-पाच तासांनंतर रुग्ण चालू फिरू शकतात, एवढी वैद्यकीय देखरेखीत आणि संवादात प्रगती झाली आहे. हृदय शस्त्रक्रियेपूर्वी घाबरलेल्या, तणावग्रस्त रुग्णांना भेटून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याची आवश्यकता असते. या व्यक्तीच्या हाती आपले भविष्य सुरक्षित आहे, अशी रुग्णाची खात्री पटल्याचे त्याच्या १२० वरून ९० वर आलेल्या हृदयगतीवरून लगेच मॉनिटरवर दिसते. माहिती तंत्रज्ञानाचा वैद्यकीय क्षेत्रात असा प्रचंड वाव ते ३७ वर्षांच्या अनुभवातून उलगडून दाखवतात.
हिंदी चित्रपट संगीताची आवड असलेले डॉ. कार्लेकर साठीच्या दशकातील अनिल बिस्वास, नौशाद, एस. डी. बर्मन, रोशन, मदनमोहन यांच्या चित्रपट संगीतातून बाहेरच पडलेले नाहीत. अर्थात शस्त्रक्रियेच्या वेळी आपली आवड गुंडाळून ठेवत त्यांना सर्वाच्या पसंतीची गाणी ऐकावी लागतात. त्यांना दिल्लीची हिरवाई आवडते. लोधी गार्डनमध्ये चालण्यासाठी दहा-बारा किमीवरून येण्याचीही त्यांची तयारी असते. आठवडय़ात पाच दिवस ते ट्रेडमिल करतात. हृदय फिट ठेवण्यासाठी शरीराच्या हालचाली भरपूर असाव्यात, रोज किमान चार किलोमीटर असे आठवडय़ात पाच दिवस चालणे, आहारावर नियंत्रण ठेवून फायबर व सॅलडचे अधिक सेवन करणे तसेच आहारात ट्रान्स फॅटचे प्रमाण अत्यल्प ठेवणे आवश्यक आहे, असा सल्ला ते देतात. सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगणारा सामान्य मनुष्य असा ते स्वत:चा उल्लेख करतात. यश मिळविण्यासाठी कठोर परिश्रम, बुद्धिमत्ता, नशीब किंवा तिन्ही गोष्टी आवश्यक असतील. पण चांगला मनुष्य व्हायला यापैकी काहीही लागत नाही आणि मोबदल्यात मिळते ती अमर्याद मन:शांती, असा डॉ. कार्लेकर यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे.
अॅनेस्थेशियोलॉजीची तुलना अनेकदा विमानाच्या उड्डाणाशी केली जाते. जाणीव होणार नाही, इतक्या हळुवारपणे आकाशात झेपावल्यावर आठ-दहा हजार मीटर उंचीवर तरंगणारा प्रवास संपवून धावपट्टीवर अलगद विमान उतरविणाऱ्या निष्णात वैमानिकाचे कौशल्य डॉ. कार्लेकर यांनी आपल्या क्षेत्रात संपादन केले आहे. आज आपण जे काही साध्य केले ते बाबूजींची दूरदृष्टी आणि थोरले बंधू शरद व अरुण यांच्या पाठबळामुळे, अशा कृतज्ञतेतून उंच भरारी घेऊनही आपले पाय जमिनीवर असल्याची जाणीव ते सौम्यपणे करून देतात.
सौम्य आणि संवेदनशील
डॉक्टरी पेशात यशस्वी कारकीर्द करणारे, परंतु ‘सामान्यांप्रमाणेच जगणारा’ असा स्वत:चा आवर्जून उल्लेख करणारे डॉ. अनिल कार्लेकर हे अॅनेस्थेशियोलॉजीचे तज्ज्ञ. परंतु त्यांना भूल घालणारे वाटते ते आज सुधारलेले वैद्यकीय तंत्रज्ञान! या तंत्रज्ञानासोबतचा त्यांचा प्रवास जाणून घेताना, महाराष्ट्राबाहेरच्या दोन पिढय़ा अखेर ‘महाराष्ट्रवासी’ होण्याचे उपकथानकही उलगडते..
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-05-2013 at 12:42 IST
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soft and sensitive