कलांसमोर सतत उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीे कलावंत एकेकटय़ाने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतात. आपल्या पाठीशी कुणी आहे किंवा नाही, याची तमा न बाळगता ही स्वातंत्र्याची लढाई कलावंत करीत असतात. उस्ताद करीम खाँ, उस्ताद अल्लादिया खाँ  आदींनंतर  आणखी दूरवरचे पाहू शकणारे उस्ताद अमीर खाँ, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित रविशंकर, पंडिता किशोरी आमोणकर,  मल्लिकार्जुन मन्सूर असे किती तरी कलावंत आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सतत झगडत राहिले.
कलांच्या व्यवहारात कलावंताची प्रतिभा आणि प्रज्ञा याच गोष्टी केंद्रस्थानी असतात, असायला हव्यात. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाला आपल्या अंगच्या गुणांवर विश्वास असतो आणि तो सार्थ करण्याची त्याची धडपड असते. तहानभूक हरपून केवळ कलेच्या निर्मितीचा ध्यास घेऊन जगलेल्या हजारो कलावंतांनी पुढच्या पिढय़ांना विश्वासाचा हा वारसा दिला, म्हणूनच नवे काही करण्याची ऊर्मी घेऊन अनेक नवे कलावंत आपली सर्जनाची आस भागवण्यासाठी कलेच्या वाटेला लागतात. हाती काय लागेल याची तमा न बाळगता, हे सगळे कलावंत आपापल्या क्षेत्रात आपापले स्वातंत्र्य अबाधित राखण्याचा जो प्रयत्न करीत असतात, त्याला सलामच करायला हवा. कलांनी आपापली बेटे तयार करून हे स्वातंत्र्य सुरक्षित कसे राहील, याची काळजी केली, तरीही सामाजिक प्रवाहांपासून कलांना स्वतंत्र होता आले नाही. लाखातल्या एखाद्यालाच गळ्यातल्या सौंदर्याचा शोध लागतो किंवा कुंचल्यातील अफाट ताकदीचा अंदाज येतो. हातांच्या साहय़ाने तयार होणारे शिल्प काय किंवा देहाच्या कमनीयतेमधून व्यक्त होणारा आविष्कार काय, कलावंताला आपल्या मनातले सगळे उतरवण्याची गरज वाटत असते. त्यासाठी त्याला हवी असते, मुक्तता. या मुक्ततेलाही चौकटीचे बंधन असते, हे ठाऊक असले, तरीही कलावंत ती चौकट तोडण्याचा आणि मोडून फेकून देण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. या प्रयत्नातून आणखी एक नवी चौकट निर्माण होते आणि पुढच्या पिढय़ा त्याही मोडण्याच्या तयारीला लागतात. कलांचा हा प्रवास म्हणजे माणसाच्या आजवरच्या इतिहासातील स्वातंत्र्यलढय़ाचे देदीप्यमान दर्शन आहे.
भारतीय अभिजात संगीतात गेल्या काही हजार वर्षांत कलात्मक स्वातंत्र्याच्या ज्या लढाया लढल्या गेल्या, त्याची तपशीलवार नोंद आपल्याला सापडणार नाही. समाजातील चालीरीतींपासून ते जगण्याच्या पद्धतींपर्यंत अनेक गोष्टींपासून कलावंतांनी हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सर्वस्वाची बाजी लावली. काही वेळा ते यशस्वी झाले.. अनेकदा पराभूतही झाले. पण तरीही प्रयत्न सुरूच राहिले. आजही सुरू आहेत. कलांचे हे युद्ध बहुतेक वेळा माणसाने स्थापन केलेल्या संस्कृतीनामक घटनेशी झाले. समाजाने मान्य केलेल्या गोष्टींपासून फारकत घेण्याची गरज अनेकदा व्यक्त होते. त्यासाठी प्रस्थापितांकडून प्रतिकार होतो आणि त्यातून पुन्हा नव्या संस्कृतीचा जन्म होतो. पण हे बदल सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य कलांमधून अधिक प्रभावशाली होते. त्याचे कारण कलांचा पोहोच अन्य कोणत्याही माध्यमापेक्षा अधिक असतो. बदल घडवून आणण्यासाठी प्रत्येकाकडे लढण्याचे सामथ्र्य असतेच असे नाही. मोठय़ा प्रमाणात समाज त्याबाबतीत सुस्त असतो. बदल स्वीकारून सतत नवे काही शोधत राहण्यापेक्षा आहे तेच पुढे चालू ठेवण्यात त्याची सोय असते. पण हे बदल समाजाच्या गळी उतरवण्यासाठी कलांच्या क्षेत्रात जे काम झाले, ते कधीच अधोरेखित झाले नाही. त्याचे एक कारण असे असू शकेल, की समाजातील नेतृत्वाला कलांकडे गांभीर्याने पाहण्याची कधीच आवश्यकता वाटली नाही. हे एक निरुपद्रवी क्षेत्र आहे, अशीच कलांची संभावना करण्यात आली. करमणूक, मनोरंजन यापलीकडे त्याला फारसे महत्त्व नसते, अशा समजातून कलांच्या व्यवहाराकडे पाहिले गेल्यामुळे त्यांच्या परिणामांकडेही लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे कलांमधून वेगवेगळ्या पातळ्यांवर जी ‘क्रांती’ झाली, ती कुणाच्या लक्षातच आली नाही.
ही क्रांती कधी बंडाच्या रूपात दिसली तर कधी थेट परंपरांना नाकारत संपूर्ण नव्याच्या शोधात उभी राहिली. परंपरा निर्माण होत असतानाच तिला आव्हान उभे करण्याची जी अंगभूत क्षमता असते, ती सर्जनाची असते. ही ऊर्मी परंपरेच्या विरोधात उभे राहण्याची शक्ती देते. नुसते बंड म्हणून कलांच्या क्षेत्रात अनेक नवे प्रयोग झाले. ज्यांच्यामध्ये नवी परंपरा निर्माण करण्याची ताकद होती, त्यांना अल्प किंवा दीर्घ काळापुरते स्थैर्य आले. स्थैर्याच्या या काळात नवे काही करण्याची हिंमत गोळा करणारे अनेकदा पराभूत होतात.. पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करतात. या सगळ्या प्रयोगात महत्त्वाची असते ती सर्जनाची शक्ती. कलावंताला ती स्वस्थ बसू देत नाही. त्याला सतत नव्याचा शोध घ्यायला भाग पाडते. भारतीय संगीतात आपल्याला माहीत असलेल्या प्रबंध गायकीपासून ते आज प्रचलित असलेल्या ख्याल गायकीपर्यंतचे सगळे बदल हे कलावंतांच्या सर्जक शक्तीचे प्रतीक ठरले. ध्रुपदानंतर येऊ घातलेल्या ख्याल गायकीमध्ये सदारंग आणि अदारंग या नायकांनी रचलेल्या अनेक बंदिशी आजही बहुतेक कलावंत सादर करीत असतात. सदारंगाने स्वत: मात्र ध्रुपद शैलीतच गायन केले. आपल्या ख्यालातल्या नव्या रचनांना रसिकप्रियता मिळणे ही कलावंत म्हणून त्याची गरज होती. त्याने मग आपल्या शिष्यांच्या गळ्यात त्या बंदिशी उतरवल्या आणि नाना खटपटी करून त्या थेट बादशहा महंमद शहाच्या दरबारापर्यंत पोहोचवल्या. (मिया मल्हार रागात सदारंगाने ‘महमद शाह रंगीले’ अशी एक अप्रतिम बंदिशही तयार केली, जी आजही गायली जाते.) ख्याल गायकी ध्रुपदाच्या तुलनेत उच्छृंखल म्हणता येईल, अशी. पण त्यामध्येही नवा सांगीतिक विचार उतरवण्याची प्रज्ञा त्या काळातील अनेक कलावंतांमध्ये होती. त्यामुळे ख्याल गायकीलाही समृद्ध वैचारिक बैठक प्राप्त होऊ शकली. ध्रुपदापासून ख्यालापर्यंतच्या बदलाच्या काळात ठुमरी, होरी, कजरी, टप्पा, तराणा यांसारखे नवे संगीत प्रकारही उदयाला आले आणि त्यांना दरबारापासून ते रसिकांपर्यंत सगळ्यांनी मनापासून दाद दिली. लोकसंगीतापासून उंच जात अभिजाततेच्या पातळीवर जाणाऱ्या या सगळ्या संगीत प्रकारांना स्थितिशील असलेल्या तेव्हाच्या समाजाकडून दाद मिळवणे ही तशी सोपी गोष्ट नव्हती.
सर्जनाची ही लढाई प्रत्येक कलावंताला एकेकटय़ाने लढावी लागली. बदल हा जरी कोणत्याही समाजाचा स्थायीभाव असला, तरी तो पचनी पडणे, ही तेवढी साधीसुधी गोष्ट नसते. बहुतेक वेळा अशा बदलांना सुरुवातीच्या काळात नाकेच मुरडली जातात. समाजाच्या एकूण बदलांशी जर कलांमधील बदल सुसंगत राहिले, तर ते चटकन स्वीकारलेही जातात, पण त्यासाठी अनेक कलावंतांना आपले सारे आयुष्य खर्ची घालावे लागते. यशाची हमी नाही आणि कलाकार म्हणून जिवंत राहण्याची शाश्वती नाही, अशा अवस्थेतही कलावंत ही धडपड करीत राहतो, याचे कारण त्याला सतत स्वतंत्र व्हायचे असते. हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जे जे काही करावे लागेल, ते करण्याची त्याची तयारी असते. प्रतिभेच्या जोरावर त्याला ते करताही येते. पण काळाच्या कसोटीवर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारे सातत्याचे गुणधर्म त्या शैलीत असावे लागतात. ख्यालाच्या शैलीत ते होते, म्हणून ती गेली काही शतके टिकून राहिली. या काळात प्रत्येकाने आपापल्या परीने त्यात भर घातली, पण मूळ शैलीला त्यामुळे बाधा पोहोचली नाही. गुरुमुखातून शिकलेली ही कला स्वत:च्या ताकदीवर सादर करताना, त्यामध्ये स्वत:चे गुणविशेष सिद्ध करणारे जे थोडे कलावंत असतात, त्यांनाच या स्वातंत्र्याची खरी किंमत कळलेली असते. कलांसमोर सतत उभ्या राहणाऱ्या वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी असे कलावंत एकेकटय़ाने नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतात. आपल्या पाठीशी कुणी आहे किंवा नाही, याची तमा न बाळगता ही स्वातंत्र्याची लढाई कलावंत करीत असतात. संगीतातील कलात्मक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अशी धडपड करून प्रचंड कामगिरी करू शकलेल्या उस्ताद हद्दू-हस्सू खाँ, उस्ताद करीम खाँ, उस्ताद अल्लादिया खाँ, अमान अली खाँ, उस्ताद अल्लादिन खाँ यांच्यासारख्या दिग्गजांच्या खांद्यावर उभे राहून आणखी दूरवरचे पाहू शकणारे, उस्ताद अमीर खाँ, पंडित भीमसेन जोशी, पंडित कुमार गंधर्व, पंडित रविशंकर, पंडिता किशोरी आमोणकर, पंडित मल्लिकार्जुन मन्सूर असे किती तरी कलावंत आपले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सतत झगडत राहिले.
मळलेली पायवाट सोडून नवी वाट तयार करायला धाडस लागते. त्यासाठी बुद्धीच्या अचाट क्षमतांबरोबर कल्पकता आणि सर्जनाची आस लागते. परंपरेच्या साखळदंडातून बाहेर पडण्यासाठीचे आत्मिक बळ लागते. स्वातंत्र्य कुणी आपणहून बहाल करीत नाही. ते मिळवावेच लागते. ते सहज आणि आयते मिळत नाही, त्यासाठी झगडावेच लागते. स्वातंत्र्याची अशी किंमत मोजणाऱ्या नव्या प्रतिभासंपन्न कलावंतांची प्रतीक्षा सध्याचे अभिजात संगीत करते आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा