विरोधकास काळ्या रंगात रंगवून आपण उजळ होत नाही, याचे भान बिहारमधील सभेत लालूप्रसाद, सोनिया गांधी, नितीशकुमार या साऱ्यांनीच सोडले. काँग्रेसविरोधासाठी भ्रष्टाचार हा मुद्दा ज्यांनी घेतला, तेच आता एकत्र येऊन निधर्मीवाद सांगू लागले. हा राजकीय संधिसाधूपणाच..
एखाद्या हिंदकेसरीस आसमान दाखवण्याच्या मिषाने चार-पाच गल्लीकेसरी एकत्र यावेत तसे पाटणा येथे रविवारी घडले. बिहारश्री लालूप्रसाद यादव, दुसरे बिहारश्री कुमार नितीश, उत्तर प्रदेशश्री यादव आणि काँग्रेसच्या सोनिया गांधी यांनी एकाच व्यासपीठावर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. निमित्त होते आगामी बिहार विधानसभा निवडणुका, हे. या निवडणुका नितीश, लालू, मुलायम वा सोनिया गांधी यांच्यापेक्षाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण यांतील नितीश सोडले तर अन्यांकडे गमावण्यासारखे काही नाही. नितीशकुमार यांच्याकडे जे आहे ते त्यांनी गमावलेले खरे तर लालूप्रसाद यांना आवडेल. परंतु नितीश यांनी मुख्यमंत्रिपद गमावले तरी लालूंच्या वतीने घेणार कोण, हा प्रश्न आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार लालूंना काहीही घेण्यास मनाई आहे, पत्नी राबडीदेवी ते घेऊ शकत नाहीत आणि चिरंजीव ते घेण्याइतके सज्ञान आणि सक्षम नाहीत. ते तसे होईपर्यंत वाट पाहत बसणे याखेरीज दुसरा उत्तम पर्याय त्यांच्याकडे एकच होता. तो म्हणजे सत्ता नितीशकुमार यांच्याच हाती राहील अशी व्यवस्था करून आपल्या चिरंजीवांच्या सत्तारोहणासाठी वाट पाहणे. भाजपच्या हाती सत्ता जाण्यापेक्षा ती नितीशकुमार यांच्या हाती असणे हे लालूंसाठी अधिक लाभदायक आहे. त्यामुळे त्यांनी आपले वजन नितीश यांच्या पारडय़ात टाकले. यांपैकी एक काँग्रेस हा बिहारच्या राजकारणात कोणाच्या खिसगणतीतही नाही. गत निवडणुकांत सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल यांनी बिहार काँग्रेसचे नेतृत्व केले. याचा परिणाम असा झाला की काँग्रेसची जी काही मते होती तीही घटली आणि पक्षास अत्यंत अपमानास्पद पराभव पत्करावा लागला. याही वेळी चि. राहुलबाबाकडे काँग्रेसची दोरी दिल्यास परिस्थितीत फार काही बदल होईल असे नाही. तेव्हा नाही तरी पाटी कोरी राहणारच आहे तर निदान यादवांशी कुमारांच्या बरोबरीने हातमिळवणी केलेली काय वाईट, असा विचार काँग्रेसधुरिणांनी केला नसेलच असे नाही. त्यामुळे त्याही या मेळाव्यात होत्या. उत्तर प्रदेश हे आपल्याला आंदण दिलेले आहे, असा समज बाळगून राज्य हाकणारे मुलायम, अखिलेश आदी यादव यांनीही या भाजपविरोधात आपला सूर मिसळला. त्यांना तसे करणे भाग आहे. कारण पुढील सार्वत्रिक निवडणुकांच्या आधी एक वर्ष – २०१८ साली- उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत. गेल्या सार्वत्रिक निवडणुकांत भाजपने उत्तर प्रदेशातील ८० पकी ७२ जागी भगवा ध्वज फडकावला. पुढील निवडणुकांत भाजपचा इतका जोर राहणार नाही, हे मान्य. परंतु तो काही अंशाने जरी राहिला तरी समाजवादी पक्षावर त्या राज्यातून सत्ताच्युत होण्याची वेळ येईल. त्यात पुन्हा मायावती यांचे बहुजन आव्हान आहेच. तेव्हा या दुहेरी आघाडय़ांवर तोंड देताना एक तरी आधार असावा या हेतूने या उत्तर प्रदेशी यादवांनी बिहारातील यादव आणि कुमारांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला. अशा तऱ्हेने आपापल्या स्वार्थासाठी हे सर्व एकत्र झाले आणि त्यांनी पाटण्यातून मोदीविरोधाचे रणिशग फुंकले.
बिहारच्या बाहेर पोहोचेपर्यंत त्याची पिप्पाणी झाली. याचे कारण या स्वाभिमान सभेत जी काही भाषणे झाली त्या सगळ्याचा सूर एकच होता. तो म्हणजे मोदीविरोध. राजकीय विचार करता तसे होणे अपरिहार्य असले तरी केवळ विरोधकास वाईट ठरवण्याच्या एककलमी कार्यक्रमावर स्वत:स चांगले सिद्ध करता येत नाही. त्या मार्गाने यश मिळते. परंतु ते अगदीच तात्पुरते असते. याचे उदाहरण या मंडळींना खुद्द मोदी यांच्यातच पाहता आले असते. मनमोहन सिंग यांच्या अकार्यक्षमतेच्या मुद्दय़ावर मोदी निवडून आले. परंतु त्यांना अद्याप स्वत:च्या कार्यक्षमतेची दुंदुभी वाजवता आलेली नाही. तेव्हा विरोधकास काळ्या रंगात रंगवून आपण उजळ होत नाही, हा यातील पहिला धडा. दुसरा मुद्दा बिहारचे वर्णन जंगलराज वगरे शेलक्या विशेषणांनी होते, त्याचा. पंतप्रधान मोदी यांनी अलीकडे बिहारचे वर्णन हे असे केले होते. त्याचा नितीशकुमार आणि लालू यांना संताप आला. परंतु याच नितीशकुमार यांनी लालूंच्या राजवटीत बिहारसाठी हाच शब्दप्रयोग केला होता. वर्तमानात लालू नितीश यांच्या समवेत आहेत. पण म्हणून इतिहास कसा बदलणार? पंतप्रधान मोदी आणि भाजप संधिसाधू, हडेलहप्पी आहेत, असेही नितीश यांना वाटते. परंतु हेच नितीश भाजपचे बोट धरून सत्ता राबवत होते त्या वेळी त्यांना मोदी यांच्याविषयी काहीही आक्षेप नव्हता. त्या वेळी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. तेथून थेट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत उडी घेतल्यावर नितीश यांच्या सेक्युलर जाणिवा जाग्या झाल्या आणि तोपर्यंत भ्रष्टाचाराचे आगर असलेले लालू त्यांना भाजपपेक्षा अधिक प्रिय झाले. तेव्हा मोदी जर संधिसाधू असतील तर नितीश हे तसे नाहीत असे म्हणता येणार नाही.
या सभेच्या निमित्ताने एका विचित्र इतिहासाची पुनरावृत्ती झाली. ही सभा ज्या ठिकाणी झाली त्याच ठिकाणाहून कै. जयप्रकाश नारायण यांनी चार दशकांपूर्वी संपूर्ण क्रांतीची हाक दिली होती. त्या वेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या समग्र विरोधकांचे लक्ष्य होत्या आणि काँग्रेसला एकाकी पाडणे हे त्यामागील उद्दिष्ट होते. आज काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. त्या वेळी काँग्रेसविरोध होता. आज भाजपविरोध आहे. समस्त काँग्रेस विरोधकांनी एकत्र यायला हवे हा कै. राम मनोहर लोहिया यांचा सिद्धान्त. मुलायमसिंग, लालूप्रसाद, शरद हे सर्व यादव ही या सिद्धांतालाच लागलेली गणंगफळे. या मंडळींनी फक्त स्वार्थी आणि संकुचित राजकारण तेवढे केले. हे सर्व स्वत:ला निधर्मी वगरे म्हणवून घेतात. परंतु तरीही सत्तेसाठी भाजपच्या मांडीस मांडी लावून बसण्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. तेव्हा त्यांनी कारण दिले भ्रष्ट राजीव गांधी सरकारचे. ते किती दांभिक होते, हे पुढे इतिहासाने सिद्ध केले. आता तशाच स्वरूपाचा युक्तिवाद ही मंडळी भाजपविरोधासाठी पुढे करीत आहेत. तेव्हा काँग्रेस हा मध्यवर्ती पक्ष होता. आता त्याची जागा भाजपने घेतली आहे. तेव्हा काँग्रेसला विरोध करताना या मंडळींचा भ्रष्टाचारविरोध बेगडी होता आणि आता भाजपविरोधात त्यांचा निधर्मीवाद तितकाच बेगडी आहे. तेव्हा या मंडळींनी भले आघाडी वगरे स्थापन केली असेल. परंतु त्यांचे संधिसाधुत्व लक्षात घेता स्वार्थ साध्य होत असेल तर ती आघाडी सोडून जाण्यात यातील कोणीही क्षणाचाही विलंब लावणार नाही. या भाजपविरोधी आघाडीच्या सभेत सर्वात जास्त झेंडे लालूप्रसाद यांच्या राजदचे होते आणि सभेचे केंद्र आपणच राहू असाच त्यांचा प्रयत्न होता यातच काय ते आले. तेव्हा या अशा सोयीच्या आघाडीकडून एरवी फार काही अपेक्षा ठेवण्याची गरज नव्हती.
परंतु पंतप्रधान मोदी यांचा कारभार या आघाडीच्या अपेक्षा चेतवू शकतो. ही सभा झाली त्याच दिवशी मोदी यांना जमीन अधिग्रहण विधेयक मागे घ्यावे लागले, हा योगायोग बरेच काही सूचित करतो. तेव्हा मोदी यांनी फुगवलेल्या आश्वासन फुग्यांतील हवा अशीच जात राहिली तर हे गल्लीकेसरी बाळसे धरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास अण्णासाहेब किर्लोस्करांच्या वद जाऊ कुणाला.. गाजलेल्या पदांतील
जे कर जोडुनि मजपुढें नाचले थवे यादवांचे। प्रतिकूल होती साचे.. अशा परिस्थितीचा अनुभव भाजपला येईल.