‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक एखाद्याच्या हाती लेखणी देतात, त्या लेखणीचाच पुढे कुऱ्हाडीचा दांडा होतो, पण यातून उगवते ते काय? अडचणीत सापडलेल्या आपल्याच माणसांची नड परक्याची वाटते. संधी मिळेल तर आपल्याच माणसांना लुटण्याचा बेदरकारपणा अंगात येतो. कधीकाळी आपणही त्यांच्यातलेच एक होतो, आपण येथवर पोहोचण्यासाठी आपल्यांनीच किती तरी सोसले आहे, त्याग केला आहे याचा सोयीस्कर विसर पडतो. फाटक्या माणसांच्या खिशातूनही काही तरी काढण्याचा लोभ सुटत नाही.
पेरणी आणि शाळा या दोन्हीही एकाच वेळी सुरू होतात. शेतकरी कुटुंबात तरी हा योगायोग विलक्षण असतो. अंकुरण्याचीच गोष्ट हा या दोन्हींतला समान धागा. बाजारातून बी-बियाणांची खरेदी करतानाच शाळेत जाणाऱ्या घरातल्या लेकरांची वह्य़ा-पुस्तकेही याच दिवसांत खरेदी केली जातात. बाहेर रस्त्यावर झालेला चिखल, घरात पेरणीसाठी येऊन पडलेले बियाणे आणि सोबतच आणलेल्या कोऱ्या करकरीत पुस्तकांचा वास असे चित्र आजही अनेकांना आठवत असणार. आज आकर्षक अशी दफ्तरे दिसतात. ‘डोरेमॉन’, ‘छोटा भीम’पासून ‘फेसबुक’पर्यंतची चित्रे त्यांच्यावर रंगवलेली. पूर्वी दफ्तरांऐवजी कापडी पिशव्या असत. आजच्यासारखे चकचकीत आणि गुळगुळीत अशा आकर्षक पाकिटात जेव्हा बियाणे आले नव्हते तेव्हा बियाणांसाठी कापडी पिशव्या असत. बाजारातून बियाणे घरी आणल्यानंतर या पिशवीचे काम संपायचे. अनेक विद्यार्थ्यांच्या हाती ही बियाणांची कापडी पिशवीच दफ्तर म्हणून असायची. सगळी पुस्तके आणि सगळ्या वह्य़ा एकाच दमात मिळण्याचा तो काळ नव्हता. अनेक कुटुंबांत पेरणीचे साहित्य आणि घरातल्या मुलांचे शैक्षणिक साहित्य एकाच वेळी घेण्याची ऐपतही नसायची. तरीही लेकरांची वह्य़ा-पुस्तके घेताना एक अपूर्व असा आनंद पालकांच्या चेहऱ्यावर झळकायचा. आपला जन्म राबण्यात गेला, लेकरांच्या नशिबी असे विवंचनेचे दिवस येऊ नयेत यासाठीची ही धडपड असायची. गावातले गुरुजी चिठ्ठीवर जी पुस्तके लिहून देतील तेवढी आणायची. ‘आपल्या जन्माचा उन्हाळा झाला, पण लेकरांना सावलीत बसलेलं पाहायचंय. आपण ज्या खस्ता खाल्ल्या त्या त्यांच्या वाटय़ाला येऊ नयेत,’ असे खेडय़ांतली माणसे आपसात बोलत. गेल्या पंधरा-वीस वर्षांत खेडय़ांत शिक्षणाचे प्रमाण वाढले आणि उन्हातून सावलीत येणाऱ्यांची संख्याही वाढली.
पेटत्या घरातून धडाधडा उडय़ा टाकून जीव वाचविण्यासाठी धावावे तसे शेतीधंद्यातून माणसे बाहेर पडू लागली. खात्रीच्या पगाराची नोकरी मिळविण्यासाठीची धडपड गेल्या वीस वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढली. मिळेल ती नोकरी पटकावून आपापला सुरक्षित निवारा शोधण्याकडे कल वाढला. नोकऱ्यांचे भावही ठरले. वेळप्रसंगी जमीन विकून नोकरीचा शोध सुरू झाला. जमीन, जागा काहीही विकले तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत नोकरी पटकवा, असा एक मार्गच बनला. या मार्गावर धावणाऱ्यांची संख्याही वाढली. आज अनेक अधिकारी, कर्मचारी वेगवेगळ्या हुद्दय़ांवर दिसतात. यातले कैक जण असे उन्हातल्या पूर्वजांचे सावलीत आलेले वारस आहेत.
..ज्यांनी पेटलेल्या लाक्षागृहातून उडय़ा टाकल्या त्यांना आज ज्या वर्गातून आपण आलो त्या माणसांविषयी आता काय वाटते? या लोकांशी आपले काहीतरी नाते आहे किंवा होते याची पुसटशी जाणीव तरी होते की नाही? गेल्या काही वर्षांत एक अत्यंत निर्दयी असे चित्र दिसते. सहजासहजी शेतकऱ्यांना सात-बाराचाही उतारा न देणारे, साखर कारखान्यांना लवकर ऊस जावा म्हणून तोडचिठ्ठीसाठी खेटे घालायला लावणारे, अडलेल्या कोणत्याही माणसाच्या कामासाठी विनासंकोच लाभाची मागणी करणारे आणि ज्याने हात ओले केले नाहीत अशा माणसाच्या कामात काहीतरी खोडसाळपणा करून त्याला त्रस्त करून सोडणारे हे कोणी दुसरे नाहीत. पीक कर्ज असो की नुकसानभरपाई, त्यातला आपला टक्का काढून घेतल्याशिवाय सहीच करायची नाही, हा जणू आता अलिखित करारच ठरवून गेलेला. गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक अशा कर्मचाऱ्यांनी या सगळ्या कामांसाठी आता मध्यस्थ नेमले आहेत. आपत्तीच्या काळात पंचनामे करण्यासाठी बांधावर जाण्याची गरज नाही. बसल्या जागीही ते होऊ शकतात.
अशाच एका उन्हातल्या पूर्वजाच्या सावलीतल्या वारसाला विचारले, ‘‘कसा काय पाऊस गावाकडे?’’ त्यांच्या चेहऱ्यावर काळजी दिसली. या वर्षी उन्हाळ्यातही खूपदा अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे आता पावसाळ्यात काही भरवसा देता येत नाही अशी खंत त्यांच्या बोलण्यातून जाणवत होती. ते म्हणाले, ‘‘अशात गावाकडं गेलो नाही, पण पाऊस चांगला झाला तर ठीक, नसत्या विनाकारण कटकटी लागतात मागे. मग दुबार पेरणी करायची झाली तर पुन्हा खर्च येतो. गावाकडून कधीही फोन येऊ शकतो. आपलं सांभाळून तिकडेही पसे पाठवावे लागतात. पाऊस बरा झाला आणि तिकडचं बरं चाललं तर ऊठसूट आपल्याला गावाकडं काही देण्याची गरज नाही.’ जरा कुठे काही पेटलेच तर आपल्याला आच लागू नये, अशी ही भावना. आपल्या ताटातले दुसऱ्याला अडचणीच्या काळातही काही काढून द्यावे लागू नये. एक पक्की संरक्षक िभतच स्वत:भोवती घालून घेतलेली. हे उदाहरण प्रातिनिधिक झाले, पण अशांची संख्या मोठी आहे. ही माणसे जेव्हा शिकत असतील तेव्हा अख्ख्या घरादाराने त्यांच्या पाठीशी उभे राहायचे ठरविलेले असेल. एखाद्या भावाला शाळेवर पाणी सोडावे लागले असेल. दोघांच्या शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून एखाद्याला शेतीत ढकलून एकालाच शाळेत पाठविले गेले असेल. ‘आम्ही आमचे राबत राहू, पण तू इकडचा ताण घेऊ नको, मन लावून अभ्यास कर’ असे बोलतच गावाकडची माणसे शिकणाऱ्याला धीर देत राहतात. शिक्षणाच्या काळात वेळप्रसंगी घरातले आजारपण बाजूला ठेवून, अडचण तशीच ठेवून गावाकडच्यांनी मदत केलेली असते. हळूहळू दिवस बदलतात. एकदा आपली जागा पटकावली की या सर्वच गोष्टींचा विसर पडतो. एक निर्ढावलेपणा येतो अंगात. ज्या माणसातून आपण येतो ती माणसेही मग परकी वाटायला लागतात. आज तळाच्या वर्गातून आलेले अनेक जण असा निर्ढावलेपणा अंगी मुरवत आपले काम करताना दिसतात. जी व्यवस्था सामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, वंचितांना जागोजागी नाडवते त्याच व्यवस्थेचा भाग होत अशी माणसे हळूहळू बेगुमान वागू लागतात.
‘जे भोग आमच्या वाटय़ाला आले ते तुमच्या येऊ नयेत’ असे म्हणून धुळाक्षरे गिरविण्यासाठी घरातले लोक हाती लेखणी देतात, त्या लेखणीचाच पुढे कुऱ्हाडीचा दांडा होतो. प्रश्नांनी गांजून गेलेल्या माणसांच्या गळ्याचे पाश सोडविण्याऐवजी अशा अडचणीत सापडलेल्या माणसांना लुटण्याचा बेदरकारपणा अंगात येतो. कधीकाळी आपणही त्यांच्यातलेच एक होतो याचा सोयीस्कर विसर पडतो. फाटक्या माणसांच्या खिशातूनही काही तरी काढण्याचा लोभ सुटत नाही.
..तर दिवस शाळा सुरू होण्याचे आले आहेत. अनेक घरांमध्ये बियाणांसोबतच वह्य़ा-पुस्तकांचीही खरेदी झाली असेल. नव्याकोऱ्या वह्य़ा-पुस्तकांचा वास कोवळ्या छातीत भरून घेत असतील लहान मुले. कुठे चिमुकल्या हातांनी अक्षरे गिरविली जात असतील. पुस्तकातल्या रंगीबेरंगी चित्रांवरून हात फिरत असतील. या सर्वाच्याच पापणीशी मोठे होण्याचे स्वप्न लगडून जावो. त्यांना सावलीही मिळो आयुष्यात मनासारखी, पण त्यांच्यापकी कोणातही असा निर्ढावलेपणा न शिरो. आयुष्यातला सगळा चांगुलपणा फेकून आपल्याच माणसांना लुटण्याचा बनचुकेपणा आणि सराव न येवो या धुळाक्षरे गिरविणाऱ्या हातांना..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा