दरवर्षी २० मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘चिमणी दिना’बद्दलची ‘चिमणे चिमणे येशील का परतून’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मार्च) वाचली. शहरांतील चिमण्या हद्दपार झाल्यामुळे ‘चिमणी दिन’ साजरा करण्याची वेळ आली आहे.
खरं म्हणजे आधुनिक वास्तुरचनांमुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट झाला. सिमेंट काँक्रीटच्या इमारतींमध्ये चिमण्यांना घरटी बांधणे अवघड झाले. तसेच शहरांतील गल्लीबोळांपासून सर्व रस्त्यांचे झालेले डांबरीकरण, इमारतींमधील वाहनतळ व घरे-बागांमध्ये बसवलेले पेव्हर-ब्लॉक्स यांमुळे मातीचे दर्शन दुर्लभ झाले. चिमण्यांना धुलिस्नान (डस्ट बाथ) करणे अशक्य झाले. चिमण्या धान्यकणाहारी (ग्रॅनिव्होरस) असल्यामुळे शहरांत खाद्यही मिळेनासे झाले. या मुख्य कारणांमुळे शहरातील त्यांची संख्या घटली.
परंतु चिमण्यांपेक्षाही माणसांना अतिशय उपयुक्त असणारे, इंडिअन पिपिस्ट्रील (Indian Pipistrelle) किंवा वाघूळ हा सस्तन प्राणी आणि कोठीचे घुबड (Barn Owl) हा पक्षी, हे दोन सजीवही शहरातून हद्दपार झाले आहेत या गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो.
वाघूळ (किंवा अनेकांच्या अंगवळणी पडलेला शब्द : पाकोळी) जुन्या घरांच्या वळचणीत, छपराखाली समूहाने राहते. निशाचर असल्यामुळे अंधार पडला की ही वाघळे चरायला बाहेर पडतात. ती कीटकभक्षी असून माशा, डास असे कीटक खातात. त्यामुळे या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहते. कोठीचे घुबडही जुन्या घरांच्या माळ्यावर, वापरात नसलेल्या खोल्यांमध्ये राहते. हेही निशाचर असून रात्री उंदीर, घूस यांची शिकार करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते. आधुनिक वास्तुरचनेमध्ये यांनाही निवास करता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरांतील त्यांचीही संख्या घटली.  येथे आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. शहरातील चिमण्यांची संख्या घटली असली तरी पारव्यांची संख्या मात्र वाढली आहे. माणसाची आधुनिक जीवनशैली हानिकारक ठरल्यामुळे चिमण्यांची संख्या घटली तर तीच जीवनशैली पारव्यांना फायदेशीर ठरल्यामुळे त्यांची संख्या वाढली.
 निसर्ग-साखळीतील कोणताही जीव समूळ नष्ट होता कामा नये हे मान्य. त्यामुळे गेली शेकडो वष्रे माणसाच्या सहवासात राहणारा चिमणीसारखा पक्षी शहरातून नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत हे खरे, पण हे प्रयत्न केवळ चिमणीपुरतेच मर्यादित न ठेवता वाघूळ, घुबड यांसारख्या माणसाला (चिमणीपेक्षा खूप जास्त) उपयोगी असणाऱ्या सजीवांच्या अस्तित्वासाठी विशेषकरून करायला हवेत. खरं म्हणजे यांचेही ‘दिन’ साजरे करण्याची वेळ आली आहे.
डॉ.उमेश करंबेळकर, सातारा

मूल्यांवर पदोपदी अ‍ॅसिड फेकले जाते
‘तू माझ्या स्वप्नांवर अ‍ॅसिड फेकले आहेस’ असे अख्ख्या जगाला निर्भीडपणे सांगणाऱ्या लक्ष्मी अगरवालचा धर्य पुरस्कार देऊन गौरव झाला, तो स्वाभिमानासाठी अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या महिलांना प्रेरणादायक आहे. ‘तुझ्या हृदयात प्रेम नाही तर अ‍ॅसिड आहे’ असे अमेरिकेतील पुरस्कार सोहळय़ात वाचलेल्या स्वरचित कवितेत लक्ष्मी म्हणते, तेव्हा या प्रेमावरही प्रश्न उभे होतात आणि प्रेमाची व्याख्या तपासणे भाग पडते. मग खऱ्या अर्थाने आपण या समाजात माणूस म्हणून जगतो का, असाही प्रश्न पडतो.
आज अशा कितीतरी लक्ष्मींना याच समाजाने नाकारले आहे. आजही जगण्याचे अधिकार त्यांच्यापासून दूरच आहेत. त्यांना हीन वागणूक दिली जाते. म्हणजेच, मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती आपण करू शकलो नाही; उलट जहाल मतवाद वाढला, हेच या एकविसाव्या शतकातले मोठे अपयश आहे. येथे मूल्यांवर पदोपदी आपल्या वागणुकीतून अ‍ॅसिडच फेकणारे वाढत असताना याची जबाबदारी कोणी घ्यायची हा या लोकाशाहीपुढे सर्वात मोठा प्रश्न आहे.
सुशील डोंगरे, सर्कसपूर (वर्धा)

भारतीय दळणवळणाची धीमी गती
सी. राजा मोहन यांचा ‘बंगालच्या उपसागराचे कोंडपाणी?’ या लेखातून (५ मार्च) पूर्व आशियातील दळणवळणाचे महत्त्व सांगून दळणवळणाच्या वृद्धीची अपेक्षा केली गेली आहे. ट्रान्स आशियाई रेल्वे प्रकल्प UNESCAP,  संघातर्फे राबविला जात आहे. भारतातून जाणारा हा मार्ग पश्चिमेकडे इस्तंबूलपर्यंत पूर्ण असून पूर्वेस म्यानमारमाग्रे सिंगापूपर्यंत जाणार आहे. UNESCAP, आसियान, यूआयसी या संस्था वेळोवेळी या प्रकल्पाचा आढावा घेत असतात. या मार्गावर म्यानमारमध्ये भारताच्या सीमेपासून केवळ १०० किलोमीटरवर कलायपर्यंत रेल्वेमार्ग आला आहे त्याचा भारताच्या दिशेने विस्तार होणे स्वाभाविक आहे. तिकडे चीनचा म्यानमार सीमेवर लॅशिओपर्यंतचा रेल्वेमार्ग २०१६ पर्यंत निश्चित पूर्ण होईल. ब्रिटिशांनंतर भारतीय रेल्वेनेही मोरेह्पर्यंत सर्वेक्षण पूर्ण केले आहे व इंफाळपर्यंत कामही सुरू आहे. त्याची गती मात्र संथ आहे. त्यास योग्य वेग आल्यास हा आंतरराष्ट्रीय रेल्वे मार्ग नियोजित वेळी पूर्ण होईल व चीनच्या बरोबरीने भारतातूनही पूर्व आशियाई देशांकडे माल व प्रवासी वाहतूक होऊ लागेल.
रमाकांत वाडकर, वरळी गाव (मुंबई)

रेल्वेने प्रस्ताव गुंडाळावा
लोकलला स्वयंचलित दरवाजे लावल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढणार की कमी होणार याचा रेल्वे प्रशासनाने सूक्ष्म विचार केलेला दिसत नाही.  गाडी थांबल्यानंतर दरवाजे उघडले की प्रवाशांचा लोंढा एकाच वेळी आत घुसायचा प्रयत्न करतो आणि दारातच अडकून पडतो. दरवाजे उघडे असतानाही आत घुसमटणारे प्रवासी, बंद दरवाजांमुळे कोणत्या परिस्थितीत सापडतील याची कल्पनाच न केलेली बरी.  रोगापेक्षा उपाय जालीम असू नये हे लक्षात घेऊन रेल्वेने हा प्रस्ताव गुंडाळावा.
-आशुतोष सावे, जुहू

विधिनिषेधशून्य आणि वेळकाढू
तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी डाव्या पक्षाची जयललिता यांच्या बरोबर होणारी युती फिसकटली हे चांगलेच झाले. मुळात प्रचंड भ्रष्टाचार करून, अमाप संपत्ती जमा करून दडवून ठेवलेल्या जयललिता आणि साम्यवादी पक्ष यांच्यामधली ही प्रस्तावित युती पूर्णत: भिन्न विचारसरणीच्या पक्षांची असल्यामुळे ही विसंगती कोणाही सुबुद्ध मतदाराला मान्य झालीच  नसती. डाव्या पक्षांच्या प्रतिमेला तडा देणारी ही युती मोडली याचे कारण मात्र ही विसंगती नव्हे तर अम्मांची वेळकाढू भूमिका हे होते याची खंत आहे.  
– प्रमोद तावडे, डोंबिवली

Story img Loader