दरवर्षी २० मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘चिमणी दिना’बद्दलची ‘चिमणे चिमणे येशील का परतून’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मार्च) वाचली. शहरांतील चिमण्या हद्दपार झाल्यामुळे ‘चिमणी दिन’ साजरा करण्याची वेळ आली आहे.
खरं म्हणजे आधुनिक वास्तुरचनांमुळे चिमण्यांचा अधिवास नष्ट झाला. सिमेंट काँक्रीटच्या इमारतींमध्ये चिमण्यांना घरटी बांधणे अवघड झाले. तसेच शहरांतील गल्लीबोळांपासून सर्व रस्त्यांचे झालेले डांबरीकरण, इमारतींमधील वाहनतळ व घरे-बागांमध्ये बसवलेले पेव्हर-ब्लॉक्स यांमुळे मातीचे दर्शन दुर्लभ झाले. चिमण्यांना धुलिस्नान (डस्ट बाथ) करणे अशक्य झाले. चिमण्या धान्यकणाहारी (ग्रॅनिव्होरस) असल्यामुळे शहरांत खाद्यही मिळेनासे झाले. या मुख्य कारणांमुळे शहरातील त्यांची संख्या घटली.
परंतु चिमण्यांपेक्षाही माणसांना अतिशय उपयुक्त असणारे, इंडिअन पिपिस्ट्रील (Indian Pipistrelle) किंवा वाघूळ हा सस्तन प्राणी आणि कोठीचे घुबड (Barn Owl) हा पक्षी, हे दोन सजीवही शहरातून हद्दपार झाले आहेत या गोष्टीकडे मी लक्ष वेधू इच्छितो.
वाघूळ (किंवा अनेकांच्या अंगवळणी पडलेला शब्द : पाकोळी) जुन्या घरांच्या वळचणीत, छपराखाली समूहाने राहते. निशाचर असल्यामुळे अंधार पडला की ही वाघळे चरायला बाहेर पडतात. ती कीटकभक्षी असून माशा, डास असे कीटक खातात. त्यामुळे या कीटकांच्या संख्येवर नियंत्रण राहते. कोठीचे घुबडही जुन्या घरांच्या माळ्यावर, वापरात नसलेल्या खोल्यांमध्ये राहते. हेही निशाचर असून रात्री उंदीर, घूस यांची शिकार करून त्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवते. आधुनिक वास्तुरचनेमध्ये यांनाही निवास करता येणे अशक्य झाले आहे. त्यामुळे शहरांतील त्यांचीही संख्या घटली. येथे आणखी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. शहरातील चिमण्यांची संख्या घटली असली तरी पारव्यांची संख्या मात्र वाढली आहे. माणसाची आधुनिक जीवनशैली हानिकारक ठरल्यामुळे चिमण्यांची संख्या घटली तर तीच जीवनशैली पारव्यांना फायदेशीर ठरल्यामुळे त्यांची संख्या वाढली.
निसर्ग-साखळीतील कोणताही जीव समूळ नष्ट होता कामा नये हे मान्य. त्यामुळे गेली शेकडो वष्रे माणसाच्या सहवासात राहणारा चिमणीसारखा पक्षी शहरातून नष्ट होऊ नये यासाठी प्रयत्न करायला हवेत हे खरे, पण हे प्रयत्न केवळ चिमणीपुरतेच मर्यादित न ठेवता वाघूळ, घुबड यांसारख्या माणसाला (चिमणीपेक्षा खूप जास्त) उपयोगी असणाऱ्या सजीवांच्या अस्तित्वासाठी विशेषकरून करायला हवेत. खरं म्हणजे यांचेही ‘दिन’ साजरे करण्याची वेळ आली आहे.
डॉ.उमेश करंबेळकर, सातारा
यांचेही ‘दिन’ साजरे करायला हवेत..
दरवर्षी २० मार्च रोजी साजरा होणाऱ्या ‘चिमणी दिना’बद्दलची ‘चिमणे चिमणे येशील का परतून’ ही बातमी (लोकसत्ता, ३ मार्च) वाचली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-03-2014 at 12:31 IST
मराठीतील सर्व लोकमानस बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sparrow day should be celebrated