मराठी वाङ्मयला भालचंद्र नेमाडे यांनी पेंगताना पकडले, असे उद्गार पु. ल. देशपांडे यांनी नेमाडे यांची ‘कोसला’ प्रकाशित झाल्यानंतर काढले होते. मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरलेल्या ‘कोसला’ या कादंबरीचे लेखक नेमाडे यांना आज जाहीर झालेल्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने मराठी साहित्यविश्वाला असेच पेंगताना पकडले आहे. याचे कारण वाङ्मय विचार आणि अभिव्यक्ती ही पूर्णपणे प्रामाणिक हवी असेल, तर तिचा उद्गार मातृभाषेतूनच यायला हवा, अशी स्वच्छ भूमिका घेणारे नेमाडे हे प्रचलित साहित्यविश्वात आपल्या या मांडणीने तळपताना दिसतात. मराठी वाङ्मय आणि साहित्यविचार हा इंग्रजी भाषेच्या आणि परकीय सांस्कृतिक संकल्पनांच्या ओझ्याखाली दबलेला असताना नेमाडे यांचे ‘ज्ञानपीठ’ हे अत्यंत दिलासा आणि त्याचवेळी मराठी साहित्यविश्वास चेतना देणारे आहे. नेमाडे यांनी जे काही लिखाण केले, ते पूर्णपणे आपल्या मातीशी आणि देशी जाणिवांशी प्रामाणिक असलेले आहे. एमिल झोला हा ज्या पातळीवरती जाऊन देशीवादाचा आग्रह धरतो, त्याच पातळीवरती नेमाडे मराठी साहित्यविश्वाला देशीवादाची जाणीव करून देतात. पाश्चात्त्य जगाने आपल्याला मान्यता द्यावी, मराठी साहित्याला नोबेल मिळावे, म्हणून आपले वाङ्मय परकीय धार्जिणे न करता पूर्णपणे मराठी भाषक संस्कृतीशी प्रामाणिक राहून करणे, हे नेमाडे यांचे विलक्षण मोठेपण. त्या मोठेपणावरतीच आज ‘ज्ञानपीठ’ची मोहोर उमटली. वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर आणि आता भालचंद्र नेमाडे यांच्या रुपाने चौथे ‘ज्ञानपीठ’ मराठीच्या वाट्याला आले. या चौघांचेही वाङ्मय हे मराठी भाषेशी आणि संस्कृतीशी इमान राखणारे आहे. आजच्या आंग्लाळलेल्या वातावरणात म्हणूनच ते अधिकच कौतुकास्पद आणि अनुकरणीय ठरते. या ‘ज्ञानपीठ’च्या निमित्ताने तुकारामांच्या मराठीचा गौरव झाला, असे म्हणावे लागेल. मराठी भाषा आणि संस्कृतीविषयी जाणीवपूर्वक आग्रही असलेल्या दैनिक ‘लोकसत्ता’तर्फे भालचंद्र नेमाडे यांचे त्रिवार अभिनंदन!
भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा