चिपळूण येथे भरलेल्या ८६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले  यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश..
कलांच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेबद्दल चर्चा न करता असे म्हणता येईल की साहित्य हे जीवनाचे, समाजाचे एक अपरिहार्य अंग असते. जीवनातूनच ते व्यक्त होते आणि त्यामध्ये असलेला सारा ऐवज जीवनासंबंधीच असतो. एवढेच नाही तर एका नव्या जीवनाचे ते संकल्पनाचित्रही रेखाटत असते.
साहित्याचा गंभीरपणे विचार करणाऱ्या आणि त्यादृष्टीने आविष्कार करणाऱ्या लेखकाजवळ जीवनासंबंधीचे – म्हणजे चांगल्या जीवनासंबंधीचे एक संकल्पना -चित्र असतेच. संत ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? टॉलस्टॉय किंवा डोस्टोव्हस्की यांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? संत तुकारामांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? अगदी आज लिहिणाऱ्या एखाद्या लेखकाचे निराळेपण आपण कशाच्या आधारे स्पष्ट करू शकतो? याचा अर्थ उघड आहे. लेखक भोवतीचे जीवन पाहतो. हे जीवन कसे आहे, ते सौख्यकारक आहे का, ते तसे असेल तर कोणासाठी सौख्यकारक आहे आणि कोणाची दडपणूक होत आहे याचा ताळेबंद कलावंत मन मांडत असते.
हा ताळेबंद कसा मांडता येतो? तर आपल्या मनामध्ये जीवनासंबंधी असलेल्या संकल्पनाचित्राशी तो ते ताडून पाहतो. त्याच्या मनातील संकल्पनाचित्र एकूण समाजाच्या सुखासाठी उपयोगी पडेल असे त्यास वाटत असते. एकप्रकारे कलावंतांच्या अंतरीचे संकल्पनाचित्र आणि भोवतीचे वास्तव यांच्या ताणातूनच कलाकृतीचा जन्म होत असतो.
जीवनमुक्त होणे ही प्राथमिक अट असली तरी लेखकासाठी इतरही अनेक गोष्टी आवश्यक असतातच. त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी धडपडावे लागते. विविध ज्ञान -शाखांबद्दलची एक अपार उत्सुकता त्याच्याजवळ असावी लागते. भोवतीच्या चळवळींकडे त्याला नीटपणे पाहता यावे लागते. शिवाय आपली जीवनदृष्टी सिद्ध करण्यासाठी प्रयासही करावे लागतात. शेवटी लेखकाचे वेगळेपण आपण अधोरेखित करतो ते जीवन दृष्टीच्या अनुषंगाने, कारण जीवनाचे संकल्पनाचित्र साकारण्यामध्ये या जीवनदृष्टीचा फार मोठा वाटा असतो.
एकंदरीत काय की भोवतीचे जीवन आणि मनाशी रेखाटलेले उन्नत जीवनासंबंधीचे संकल्पनाचित्र यांच्या तीव्र संघर्षांतून श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. तो होत असताना पुष्कळ घटक त्यात सामील झालेले असतात.
लेखक ज्या भाषेत लिहीत असतो, त्या भाषेचा संबंध लेखनाशी असणे हे उघडच आहे. परंतु त्या भाषेची सांस्कृतिक पाश्र्वभूमी, ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या परंपरा, इतिहास आणि एकूण मनाची ठेवण या साऱ्याच गोष्टी लेखनामध्ये आपापत:च विरघळलेल्या असतात. त्या इतक्या एकरूप झालेल्या असतात की त्या वेगळ्यासुद्धा करता येणार नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या त्या भाषेतील एकूण वाङ्मयीन परंपरा, त्या साहित्यप्रकाराच्या परंपरा आणि आतापर्यंत झालेली त्या साहित्यप्रकाराची सारीच जडणघडण या गोष्टीही लेखनामध्ये मुरून गेलेल्या असतात. कुठल्याही लेखनाचे वेगळेपण पाहताना या सगळ्याच गोष्टी त्यातून ध्वनित होत जातात. साहित्यातला शब्द नेहमीच्या वापरातला असतो. परंतु आपण वाचायला लागलो की त्या शब्दामध्ये निद्रिस्त असणाऱ्या असंख्य गोष्टी जाग्या होऊन आपल्याशी संवाद करायला लागतात. हा संवाद वाचकांच्या व्यक्तिमत्त्वावरही पुष्कळच अवलंबून असतो. तरीही कलाकृती ही कलाकृती म्हणून जेव्हा सिद्ध होते, तेव्हा या साऱ्याच गोष्टी जाणवायला लागतात. लेखकाने पचवलेल्या असंख्य गोष्टींमधून लेखकाच्या वेगळेपणाची जाणीव व्हायला लागते. विशेष म्हणजे प्रबोधनाच्या चळवळी लेखकावर खोलवर परिणाम करत असतात. त्याचीही जाणीव व्हायला लागते.
अशा असंख्य गोष्टींमधून कलाकृती सिद्ध होत जाते. अनेक रूपांत आणि आशयाच्या असंख्य परी असणाऱ्या कलाकृती निर्माण होत जातात.  
काही कलाकृती या समाजव्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेणाऱ्या असतात. प्रस्थापित व्यवस्थेचे गुणगान करणाऱ्या असतात. त्या व्यवस्थेतील जो काही चांगूलपणा असेल तो दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात. व्यवस्थेशी संघर्ष न करता, त्या व्यवस्थेमध्येच कसा कल्याणार्थ दडलेला आहे हे सांगणाऱ्या असतात. त्या व्यवस्थेतील आंतर्विरोधाकडे दुर्लक्ष करणाऱ्या असतात. आम्ही लेखक आहोत, समाजाशी आमचे काही देणेघेणे नाही, आम्ही स्वायत्त व स्वतंत्र आहोत अशी भूमिका घेतात. त्या व्यवस्थेतील जो कुरूपपणा असेल, त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कळत-नकळत व्यवस्थेचे समर्थनच करतात.
प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य हे त्या त्या काळातील रसिकतेकडून अव्हेरले जाण्याची मोठी शक्यता असते. प्राचीन काळापासूनची या संदर्भातील खूपच उदाहरणे देता येतील.
जगातले टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते. वास्तवाचे झडझडून भान देणारे, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारे असते. एका प्रकारे येथे लेखक जीवनाबरोबर तर असतोच, पण व्यवस्थेवर आघातही करीत असतो. त्यातून तो व्यवस्थेने ज्यांचे दमन केलेले असते, त्यांचा आवाज मुखर करण्याचा प्रयत्न करीत असतो. हे साहित्य लोकप्रिय नसेल, त्याची काही काळ उपेक्षाही होऊ शकेल. परंतु या प्रकारचे साहित्य मग ते कुठल्याही वाङ्मय प्रकारातील असेल अगर कुठल्याही काळातील असेल अगर कुठल्याही देशातील, भाषेतील असेल; अशा प्रकारचे साहित्य थोडेच असेल; हेच साहित्य टिकते आणि संस्कृतीमध्ये भर घालत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील, प्रस्थापित संस्कृतीमधील कुरूपता अधोरेखित करण्याचे कार्य हे साहित्य करत असते. नुसती कुरूपता अधोरेखित करते असे नाही तर जीवनाचे खरेखुरे सौंदर्य कोठे आहे आणि कसे असते तेही ते ध्वनित करत असते. त्याचा आविष्कार इतक्या जोरकसपणे झालेला असतो की, तेथे विचारांना चालना देण्याचे सामथ्र्यही असते आणि साहित्यकृतीला अपेक्षित असणारे सौंदर्यही तेथे निर्माण झालेले असते.
मध्येमध्ये साचून राहिलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जसे जंतू निर्माण होतात, तसेच संस्कृतीमध्येही कधीकधी विषारी जंतू निर्माण होतात. हे विषारी जंतू मारणे हे सर्वच समाजाचे महत्त्वाचे कार्य असते. असे एक महत्त्वाचे कार्य कवी,  लेखक व इतर कलावंत करत असतात. याचा अर्थ असा की साहित्य केवळ विरेचनाचे  (ढ४१ॠं३्रल्ल) कार्य करीत नाही तर ते शुद्धीकरणाचेही (ढ४१्रऋ्रूं३्रल्ल) कार्य करत असते. त्यातून संस्कृती विकृतीपासून वेगळी होते. माणसांना मुक्त श्वास घेण्यासारखे वातावरण या सगळ्या प्रक्रियेतून निर्माण होते. म्हणूनच साहित्याला संस्कृतीच्या शुद्धीकरणामध्ये मोठे स्थान प्राप्त होते.
हे कार्य करत असताना पुष्कळदा साहित्याला प्रस्थापित समाजव्यवस्थेशी जसा संघर्ष करावा लागतो, तसा तो धर्मव्यवस्थेतील काही कल्पनांशीही करावा लागतो. अशा वेळी जगभर स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचा उदय होत असतो. कधी कधी साहित्य हे धर्मसदृश असल्याची भूमिका मांडली जाते. ही बाब मात्र तितकीशी मान्य करता येऊ शकेल असे वाटत नाही. कारण कधीकधी साहित्याला प्रचलित धर्माचेही संकेत अमान्य करावे लागतात. संत ज्ञानेश्वर, चक्रधर आणि संत तुकारामांसारख्या महात्मा कलावंतांनी ते इतिहासामध्ये केले आहेच. याचा अर्थ असा की साहित्य हे संस्कृतीच्या परिघातील अनेक गोष्टींबरोबर संवाद साधतसाधत त्या संस्कृतीच्या प्रवाहीपणासाठी संघर्ष करत असते.
जात वास्तवाकडे आणि जातिव्यवस्थेच्या अस्वाभाविक आणि अन्याय्य रूपाकडे दलित साहित्याने आपले लक्ष प्रथमत:च तीव्रपणे खेचून घेतले. नव्हे व्यवस्थेशी संघर्ष म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे उडवणे नव्हे तर ठोसपणे जातीव्यवस्थेशी टक्कर घेणे होय हे दाखवून दिले. जणू याला विरोध म्हणून की काय आता लेखकही जातिव्यवस्थेचे समर्थन करू लागले आहेत. त्याला कसले कसले ‘वाद’ म्हणू लागले आहेत. त्यांच्यापासून तरुण लेखक जेवढे दूर राहतील तेवढे ते चांगले लिहू शकणार आहेत. असो. ज्याचे त्याने उमजून घ्यावे.

साहित्याचे क्षेत्र ही एक रणभूमीच आहे. आपापल्या भूमिका घेऊन लेखक या रणभूमीवर येत असतात. भूमिका नसलेल्या लेखकांना या रणभूमीवर  प्रवेश नसतो आणि जीवनाला मध्ययुगाकडे नेणाऱ्या, दमनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लेखकांचा काळाच्या ओघात, मग त्यांनी कितीही शब्दांचे फुलोरे का फुलवलेले असोत  समाजधारणेसाठी, एकूण समाजसौख्यासाठी त्यांचा कवडीचाही उपयोग असत नाही.

व्यवस्थेशी संघर्ष करण्याचा पवित्रा ग्रामीण साहित्यानेही घेण्याचा प्रयत्न केला आहे. येथील संघर्ष अधिक गुंतागुंतीचा आहे. शेतकरी आणि ग्रामीण माणूस अजूनही मनाने मध्ययुगात आणि सरंजामी परंपरांमध्ये अडकून पडला आहे. त्याहीपेक्षा गुंतागुंतीची परिस्थिती अशी की ग्रामीण माणूस हा निर्माता आहे व त्यावर त्याची उपजीविकाही आहे. त्यामुळे त्याला निर्मितीचे क्षेत्र सोडताही येत नाही आणि आणि तेथे उभेही राहता येत नाही. ग्रामीण माणसाची ही अशी सर्वागीण कुचंबणा सर्वार्थाने मराठीमध्ये व्यक्त झाली नाही. ही कुचंबणा व्यक्त करण्यासाठी वैचारिक चौकट लेखकाला उपलब्ध आहे. म. फुले यांच्यापासून यशवंतराव चव्हाण, शरद जोशी यांच्यापर्यंतच्या विचारवंतांनी ग्रामीण भागासंबंधी मोठे चिंतन केले आहे. परंतु येथेही जातींच्या िभती पाडल्याशिवाय शेतकरी आणि ग्रामीणांच्या वाटय़ाचे तीव्रतर दु:ख दिसणार नाही. तरीही ग्रामीण साहित्याच्या चळवळीने व्यवस्थेशी संघर्ष मांडला आहे. त्यातून भास्कर चंदनशीव, राजन गवस, वासुदेव मुलाटे, कृष्णात खोत, सदानंद देशमुख, भारत काळे, जगदीश कदम, शेषराव मोहिते, श्रीराम गुंदेकर, गणेश आवटे असे अलीकडच्या काळातील लेखक व्यवस्थेशी वेगवेगळ्या प्रकारचे संघर्ष मांडत आहेत. तरीही मराठीतील समृद्ध अशा सत्यशोधक  साहित्याच्या परंपरेशी ग्रामीण साहित्याच्या चळवळीने स्वत:ला जोडून घेण्याची आवश्यकता आहे. हे मात्र आवर्जून नोंदवावेसे वाटते.

माणूस जन्माला आला म्हणजे तो माणूस होतोच असे नाही. माणसाला ‘माणूस’ होण्यासाठी साधना करावी लागते. आपल्या विकारांवर, स्वार्थावर मात करीत  विश्वाशी तद्रूप होण्यातच त्याचे माणूसपण असते. त्यासाठी साधना करावी लागते ती जीवनातील श्रेष्ठतर मूल्यांची. त्यासाठी त्याला प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करावा लागतो. त्यातून मुक्तही व्हावे लागते.

स्त्रीवादी साहित्यानेही पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्ध संघर्षांची भूमिका घेतली आहे. त्यामुळे स्त्रीवादी लेखनाची मोठी चळवळच मराठीमध्ये १९७४ नंतर उभी राहिली आहे. स्त्रीवादी चळवळीच्या दृष्टीने विचार करताना एक गोष्ट मात्र आवर्जून नोंदवली पाहिजे.
स्त्रीवादी दृिष्टकोनामधून मानवी जीवनाचा अर्थ लावू पाहणाऱ्या आणि प्रस्थापित व्यवस्थेशी झोंबी घेणाऱ्या स्त्रीवादी लेखनाची चळवळ अतिशय सशक्तपणे आकाराला आलेली आहे. विशेषत: या चळवळीतील लेखिकांनी प्रस्थापित व्यवस्था आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या मागे असणाऱ्या मूल्यसरणीच्या विरोधात वैचारिक भूमिका घेऊन बंडखोरी केली आहे. त्यातून गौरी देशपांडे यांच्यापासून मेघना पेठे, प्रज्ञा पवार, नीरजा, प्रतिमा जोशी, कविता महाजन यांच्यापर्यंतच्या लेखिकांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातली आहे.
स्त्रीवादी चळवळीने व्यवस्थेशी संघर्ष मांडला आहे. परंतु पुरुषसत्ताक जीवनपद्धतीच्यामागे ठामपणे उभ्या असलेल्या जातव्यवस्थेला समजून घेतल्याशिवाय खरा लढा पूर्णत्वास जाणार नाही याचेही भान स्त्रीवादी चळवळींनी बाळगले पाहिजे. शिवाय जागतिकीकरणामध्ये अर्थकारण केंद्रस्थानी आले आहे आणि ते स्त्रियांची गुलामी अधिक घट्ट करू पाहते आहे. त्याचेही भान स्त्रीवादी चळवळीला आले तर या चळवळीने व्यवस्थेशी मांडलेला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकेल.
या चळवळींच्या पाठोपाठ किंवा आगेमागेच आदिवासी साहित्याची चळवळ मराठीमध्ये सुरू झाली. या चळवळीनेही प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष सुरू केला. वाहरू सोनवणे, भुजंग मेश्राम, विनायक तुमराम, उषा किरण अत्राम, दिनकर मनवर अशा कवी लेखकांनी आदिवासींच्या जगण्याचे वेगळेपण मांडत असतानाच भोवतीच्या व्यवस्थेने आपले दमन कसे केले आहे याची जाणीवही प्रकट करावयास सुरुवात केली. एका प्रकारे या चळवळीनेही प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंडाचे निशाण उभे केले आहे. व्यवस्थेशी संघर्ष करणाऱ्या साहित्य प्रवाहांमध्ये मुस्लीम मराठी साहित्याचाही आवर्जून निर्देश करावा लागेल. हे साहित्य भोवतीच्या प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध झोंबी घेण्याचा प्रयत्न करत आहे. ते जेव्हा धर्म कल्पनांशी झोंबी घ्यायला लागेल, तेव्हा ते अधिक समर्थ आणि समृद्ध होईल.
कुठल्याही काळातील साहित्य असो की कुठल्याही वाङ्मय प्रकारातील साहित्य असो ते दोनच प्रकारांनी व्यक्त होते. एकतर ते प्रस्थापित व्यवस्था-समर्थक तरी असते किंवा व्यवस्थेशी संघर्ष घेणारे तरी असते. आजचे मार्क्‍सवादी साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, स्त्रीवादी साहित्य आणि आदिवासी साहित्य हे प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारे साहित्य आहे. प्रस्थापित व्यवस्थेने ज्यांची गळचेपी होते, त्यांचे दु:ख आणि घुसमट, वेदना आणि शोषण यांचे चित्रण करू पाहते. प्रस्थापित व्यवस्थेतील शोषण करणाऱ्या घटकांच्या विरुद्ध बंड करू पाहणारे हे साहित्य आहे. हे साहित्य नव्या जीवनाचे स्वप्न पाहणारे साहित्य आहे. सामूहिक जीवनाला उन्नत करू पाहणारे साहित्य आहे. किंबहुना त्यामुळेच ते प्रस्थापित व्यवस्थेला प्राणपणाने विरोध करत आहे.
प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करू पाहणारे साहित्य हेच साहित्याच्या आणि संस्कृतीच्या समृद्धीमध्ये भर घालत असते. हेच साहित्य नव्या उन्नत जीवनाची स्वप्ने पाहात असते. स्वातंत्र्याच्या, नव्या राज्यघटनेच्या आणि माणूसपणाच्या प्रकाशात एकूण समाजाकडे आणि मानवी जीवनाकडे स्वातंत्र्यानंतर जन्मलेला लेखक पाहू लागला, तेव्हा त्याला काय दिसले? भोवती जन्मजात आणि आíथक विषमतेचा घोर अंधार पसरलेला आहे. हा अंधार कसा दूर करायचा हा त्याच्यापुढचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता. तेव्हा १९७० नंतर साहित्यात आलेल्या लेखकांनी आणि चळवळींनी व्यवस्थेची चिरफाड केली आणि व्यापक अशा भूमिका स्वीकारल्या. खरे म्हणजे या भूमिकांमुळेच त्याला व्यवस्थेची चिरफाड करता येऊ शकली. ही चिरफाड करताना आणि नवी मूल्ये मांडताना त्याला मग मार्क्‍सवाद जवळचा वाटला असेल किंवा आंबेडकरवाद जवळचा वाटला असेल. स्त्रीवाद्यांना जगभरातील स्त्री मुक्तीच्या भूमिका मांडणारे कलावंत आणि विचारवंत जवळचे वाटले असतील. शेवटी हे सारे वाद म्हणजे तरी काय आहेत? तर जीवनाकडे अधिक व्यापकपणे पाहण्याचे, शोषणमुक्त जीवन जगण्यासाठीचे दृष्टिकोन आहेत. या दृष्टिकोनातून मानवी जीवनाला उन्नत करणाऱ्या मूल्यांचा स्वीकार झालेला दिसेल. स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवता, सामाजिक न्याय या त्या भूमिका होत. संस्कृतीच्या उदयापासून सर्वत्र या भूमिका आणि प्रस्थापित व्यवस्थेमागील भूमिका यांचा संघर्ष चालू आहे असे दिसेल. बौद्धकाळ असो की मध्ययुगातील संतांच्या चळवळीचा काळ असेल, किंवा फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा कालखंड असेल. त्या सर्वच कालखंडात प्रस्थापित व्यवस्था आणि त्या विरुद्धचा सुप्त प्रकट संघर्ष असेल. हा संघर्ष वेगवेगळ्या रूपात व्यक्त होतो. साहित्यादी कलांमधूनही तो व्यक्त होतो. तेव्हा मुख्य मुद्दा असतो, भूमिकांचा. लेखक कोणत्या भूमिका घेतात हेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच लेखकांच्या जीवनदृष्टीला, विश्वभानाला साहित्यामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. ती किती व्यापक आहे याला महत्त्व प्राप्त होते.
प्रत्येक साहित्यकृती तिच्याही नकळत एक संदेश देतच असते. हा संदेश, ही भूमिका म्हणजे लेखकाने केलेला उपदेश नसतो की बोधही नसतो. तो प्रचारही नसतो. तर तुमचे जगण्याचे भान विकसित करणारे, माणूसपण अधोरेखित करणारे काहीतरी अमाौलिक अशी मूल्यात्मक स्वरूपाची जाण असते आणि ही जाण रुजवण्याचे कार्य लेखक कलावंत करत असतात. थोडेसे अलंकारिक भाषेत बोलायचे तर लेखक हा शेतकऱ्यासारखाच असतो. शेतकरी भूमीची मशागत करून, योग्य वेळ येताच त्यात बीजाचे रोपण करतो. कलावंत लेखकही वाचकांच्या मनाची मशागत होईल अशा सगळ्या गोष्टी करतो. भाषा, भावना, संवेदना, घटना, प्रसंग हे सारे रंगवत नेऊन शेवटी हळूवारपणे त्यात जाणिवेचे एक बीज पेरतो. हे बीज फार महत्त्वाचे असते. ती त्याची भूमिका असते. ती तो सरळपणे सांगत नाही. खडकातून पाणी पाझरत जावे तशी ती कलाकृतीच्या प्रत्येक घटकातून पाझरत राहते. या पाझरामधून रसिक वाचकांना जगण्यासंबंधीचे नवे भान येते. माणुसकीसंबंधीची नवी जाण देते. आणि ही जाणच नि:शस्त्र असलेल्या सामान्य माणसाला जगण्याचे बळ देत असते. म्हणूनच आपण साहित्य समजून घेत असताना, लेखक समजून घेत असताना त्याची भूमिका काय आहे ते लक्षपूर्वक पाहत असतो.

मध्ययुगामध्ये वारकरी महानुभाव सोडून इतर लेखकांच्याही काही भूमिका आहेतच. आधुनिक काळामध्ये हळबेशास्त्री आणि महाजनी यांच्यासारख्या लेखकांच्याही भूमिका होत्याच. आज लिहिणाऱ्या अनेक लेखकांच्या भूमिका आहेतच. पुष्कळ लेखक प्रस्थापित व्यवस्थेचे गोडवे गात नसले तर प्रस्थापित व्यवस्थेने निर्माण केलेले प्रश्न ते सहजपणे नजरेआड करतात किंवा व्यवस्थेने केलेले शोषण, दमन त्यांना दिसतच नाही. यातील पुष्कळसे लेखक इतिहासाच्या, भूतकाळाच्या आणि स्वप्नरंजनाच्याही आश्रयाला जात असतात. तेथेही जे जीवनाला नवी दिशा देणारे असते, ते ते मांडतीलच असेही घडत नाही. असे साहित्य लोकप्रिय होईल. वाचकांच्या भावनांना कुरवाळेल. त्यातून लौकिक फायदेही मिळू शकतील. परंतु एकूण जीवनाच्या उन्नयनाच्या दृष्टीने मात्र ते फार अर्थपूर्ण असते, असे मात्र दिसत नाही.
सारांश रूपाने असे सांगता येईल की, साहित्य आणि कलांची निर्मिती ही सांस्कृतिक परिघातच होत असते. परंतु  प्रस्थापित व्यवस्थेशी जे साहित्य संघर्ष मांडते, तेच साहित्य संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. अशी सांस्कृतिक समृद्धी करण्यासाठी उपदेश नाही, प्रचार नाही आणि बोधही नाही तर मानवी जाणिवांचा स्तर उंचावण्यासाठी लेखकांना भूमिका घ्याव्या लागतात. अर्थात या भूमिका एक तर व्यवस्थेच्या बाजूने तरी असतात किंवा व्यवस्थेशी संघर्ष घेणाऱ्या तरी असतात. व्यवस्थेशी संघर्ष घेणाऱ्या भूमिका समाजाला पुढे नेणाऱ्या असतात. सामान्य आणि शोषित माणसाला जगण्याचे बळ देणाऱ्या असतात आणि व्यापक अर्थाने दुरितांचे तिमीर जावे यासाठी प्रार्थना करणाऱ्या असतात. सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश व्हावा आणि ‘सर्वे सुखिन: संतू’ अशी भूमिका घेणाऱ्या असतात.
कोणती का होईना लेखक भूमिका घेत असतो. भूमिकेशिवाय साहित्य म्हणजे दोर कापलेल्या पतंगासारखे असते. ललित साहित्य मग ते कविता असो की कथा, कादंबरी असो की नाटक एका व्यापक अर्थाने ते भूमिकेचे ललितरम्य रूप असते. भूमिकेशिवाय ललित साहित्य असूच शकत नाही. म्हणूनच असे म्हणता येईल की साहित्याचे क्षेत्र हेही एक रणांगणच असते. आपापल्या भूमिका मांडण्याचे ते एक समरांगण असते. पुष्कळदा साहित्याचे क्षेत्र हे भाबडेपणाने करमणुकीचे, रंजनाचे आणि निरूपद्रवी क्षेत्र आहे असे म्हटले जाते, ते मात्र खरे नाही. साहित्यातून रंजन होत असेल, करमणूकही होत असेल, पण साहित्याचे क्षेत्र ही एक रणभूमीच आहे. आपापल्या भूमिका घेऊन लेखक या रणभूमीवर येत असतात. भूमिका नसलेल्या लेखकांना या रणभूमीवर  प्रवेश नसतो आणि जीवनाला मध्ययुगाकडे नेणाऱ्या, दमनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या लेखकांचा काळाच्या ओघात, मग त्यांनी कितीही शब्दांचे फुलोरे का फुलवलेले असोत,  समाजधारणेसाठी, एकूण समाजसौख्यासाठी त्यांचा कवडीचाही उपयोग असत नाही.  जे लेखक याचे भान ठेवतील, त्यांच्या गाथा इंद्रायणीमध्ये कितीही बुडवल्या तरी त्या तरूनच वर येतील आणि कितीही काळ गेला तरी त्या वाचकांना उन्नतच करत राहतील.