चिपळूण येथे भरलेल्या ८६ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश..
कलांच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेबद्दल चर्चा न करता असे म्हणता येईल की साहित्य हे जीवनाचे, समाजाचे एक अपरिहार्य अंग असते. जीवनातूनच ते व्यक्त होते आणि त्यामध्ये असलेला सारा ऐवज जीवनासंबंधीच असतो. एवढेच नाही तर एका नव्या जीवनाचे ते संकल्पनाचित्रही रेखाटत असते.
साहित्याचा गंभीरपणे विचार करणाऱ्या आणि त्यादृष्टीने आविष्कार करणाऱ्या लेखकाजवळ जीवनासंबंधीचे – म्हणजे चांगल्या जीवनासंबंधीचे एक संकल्पना -चित्र असतेच. संत ज्ञानेश्वर आणि चक्रधर यांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? टॉलस्टॉय किंवा डोस्टोव्हस्की यांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? संत तुकारामांच्या साहित्याचे निराळेपण कोणते? अगदी आज लिहिणाऱ्या एखाद्या लेखकाचे निराळेपण आपण कशाच्या आधारे स्पष्ट करू शकतो? याचा अर्थ उघड आहे. लेखक भोवतीचे जीवन पाहतो. हे जीवन कसे आहे, ते सौख्यकारक आहे का, ते तसे असेल तर कोणासाठी सौख्यकारक आहे आणि कोणाची दडपणूक होत आहे याचा ताळेबंद कलावंत मन मांडत असते.
हा ताळेबंद कसा मांडता येतो? तर आपल्या मनामध्ये जीवनासंबंधी असलेल्या संकल्पनाचित्राशी तो ते ताडून पाहतो. त्याच्या मनातील संकल्पनाचित्र एकूण समाजाच्या सुखासाठी उपयोगी पडेल असे त्यास वाटत असते. एकप्रकारे कलावंतांच्या अंतरीचे संकल्पनाचित्र आणि भोवतीचे वास्तव यांच्या ताणातूनच कलाकृतीचा जन्म होत असतो.
जीवनमुक्त होणे ही प्राथमिक अट असली तरी लेखकासाठी इतरही अनेक गोष्टी आवश्यक असतातच. त्याला त्याचे व्यक्तिमत्त्व समृद्ध होण्यासाठी धडपडावे लागते. विविध ज्ञान -शाखांबद्दलची एक अपार उत्सुकता त्याच्याजवळ असावी लागते. भोवतीच्या चळवळींकडे त्याला नीटपणे पाहता यावे लागते. शिवाय आपली जीवनदृष्टी सिद्ध करण्यासाठी प्रयासही करावे लागतात. शेवटी लेखकाचे वेगळेपण आपण अधोरेखित करतो ते जीवन दृष्टीच्या अनुषंगाने, कारण जीवनाचे संकल्पनाचित्र साकारण्यामध्ये या जीवनदृष्टीचा फार मोठा वाटा असतो.
एकंदरीत काय की भोवतीचे जीवन आणि मनाशी रेखाटलेले उन्नत जीवनासंबंधीचे संकल्पनाचित्र यांच्या तीव्र संघर्षांतून श्रेष्ठ कलाकृतीचा जन्म होतो. तो होत असताना पुष्कळ घटक त्यात सामील झालेले असतात.
लेखक ज्या भाषेत लिहीत असतो, त्या भाषेचा संबंध लेखनाशी असणे हे उघडच आहे. परंतु त्या भाषेची सांस्कृतिक पाश्र्वभूमी, ती भाषा बोलणाऱ्या समाजाच्या परंपरा, इतिहास आणि एकूण मनाची ठेवण या साऱ्याच गोष्टी लेखनामध्ये आपापत:च विरघळलेल्या असतात. त्या इतक्या एकरूप झालेल्या असतात की त्या वेगळ्यासुद्धा करता येणार नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या त्या भाषेतील एकूण वाङ्मयीन परंपरा, त्या साहित्यप्रकाराच्या परंपरा आणि आतापर्यंत झालेली त्या साहित्यप्रकाराची सारीच जडणघडण या गोष्टीही लेखनामध्ये मुरून गेलेल्या असतात. कुठल्याही लेखनाचे वेगळेपण पाहताना या सगळ्याच गोष्टी त्यातून ध्वनित होत जातात. साहित्यातला शब्द नेहमीच्या वापरातला असतो. परंतु आपण वाचायला लागलो की त्या शब्दामध्ये निद्रिस्त असणाऱ्या असंख्य गोष्टी जाग्या होऊन आपल्याशी संवाद करायला लागतात. हा संवाद वाचकांच्या व्यक्तिमत्त्वावरही पुष्कळच अवलंबून असतो. तरीही कलाकृती ही कलाकृती म्हणून जेव्हा सिद्ध होते, तेव्हा या साऱ्याच गोष्टी जाणवायला लागतात. लेखकाने पचवलेल्या असंख्य गोष्टींमधून लेखकाच्या वेगळेपणाची जाणीव व्हायला लागते. विशेष म्हणजे प्रबोधनाच्या चळवळी लेखकावर खोलवर परिणाम करत असतात. त्याचीही जाणीव व्हायला लागते.
अशा असंख्य गोष्टींमधून कलाकृती सिद्ध होत जाते. अनेक रूपांत आणि आशयाच्या असंख्य परी असणाऱ्या कलाकृती निर्माण होत जातात.
काही कलाकृती या समाजव्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेणाऱ्या असतात. प्रस्थापित व्यवस्थेचे गुणगान करणाऱ्या असतात. त्या व्यवस्थेतील जो काही चांगूलपणा असेल तो दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या असतात. व्यवस्थेशी संघर्ष न करता, त्या व्यवस्थेमध्येच कसा कल्याणार्थ दडलेला आहे हे सांगणाऱ्या असतात. त्या व्यवस्थेतील आंतर्विरोधाकडे दुर्लक्ष करणाऱ्या असतात. आम्ही लेखक आहोत, समाजाशी आमचे काही देणेघेणे नाही, आम्ही स्वायत्त व स्वतंत्र आहोत अशी भूमिका घेतात. त्या व्यवस्थेतील जो कुरूपपणा असेल, त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कळत-नकळत व्यवस्थेचे समर्थनच करतात.
प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य हे त्या त्या काळातील रसिकतेकडून अव्हेरले जाण्याची मोठी शक्यता असते. प्राचीन काळापासूनची या संदर्भातील खूपच उदाहरणे देता येतील.
जगातले टिकून राहिलेले आणि लक्षणीय ठरलेले साहित्य हे व्यवस्थेशी झोंबी घेणारे असते. वास्तवाचे झडझडून भान देणारे, जागे करणारे, नव्या मूल्यांची आणि विवेकाची लावणी करणारे असते. एका प्रकारे येथे लेखक जीवनाबरोबर तर असतोच, पण व्यवस्थेवर आघातही करीत असतो. त्यातून तो व्यवस्थेने ज्यांचे दमन केलेले असते, त्यांचा आवाज मुखर करण्याचा प्रयत्न करीत असतो. हे साहित्य लोकप्रिय नसेल, त्याची काही काळ उपेक्षाही होऊ शकेल. परंतु या प्रकारचे साहित्य मग ते कुठल्याही वाङ्मय प्रकारातील असेल अगर कुठल्याही काळातील असेल अगर कुठल्याही देशातील, भाषेतील असेल; अशा प्रकारचे साहित्य थोडेच असेल; हेच साहित्य टिकते आणि संस्कृतीमध्ये भर घालत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील, प्रस्थापित संस्कृतीमधील कुरूपता अधोरेखित करण्याचे कार्य हे साहित्य करत असते. नुसती कुरूपता अधोरेखित करते असे नाही तर जीवनाचे खरेखुरे सौंदर्य कोठे आहे आणि कसे असते तेही ते ध्वनित करत असते. त्याचा आविष्कार इतक्या जोरकसपणे झालेला असतो की, तेथे विचारांना चालना देण्याचे सामथ्र्यही असते आणि साहित्यकृतीला अपेक्षित असणारे सौंदर्यही तेथे निर्माण झालेले असते.
मध्येमध्ये साचून राहिलेल्या पाण्याच्या प्रवाहामध्ये जसे जंतू निर्माण होतात, तसेच संस्कृतीमध्येही कधीकधी विषारी जंतू निर्माण होतात. हे विषारी जंतू मारणे हे सर्वच समाजाचे महत्त्वाचे कार्य असते. असे एक महत्त्वाचे कार्य कवी, लेखक व इतर कलावंत करत असतात. याचा अर्थ असा की साहित्य केवळ विरेचनाचे (ढ४१ॠं३्रल्ल) कार्य करीत नाही तर ते शुद्धीकरणाचेही (ढ४१्रऋ्रूं३्रल्ल) कार्य करत असते. त्यातून संस्कृती विकृतीपासून वेगळी होते. माणसांना मुक्त श्वास घेण्यासारखे वातावरण या सगळ्या प्रक्रियेतून निर्माण होते. म्हणूनच साहित्याला संस्कृतीच्या शुद्धीकरणामध्ये मोठे स्थान प्राप्त होते.
हे कार्य करत असताना पुष्कळदा साहित्याला प्रस्थापित समाजव्यवस्थेशी जसा संघर्ष करावा लागतो, तसा तो धर्मव्यवस्थेतील काही कल्पनांशीही करावा लागतो. अशा वेळी जगभर स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचा उदय होत असतो. कधी कधी साहित्य हे धर्मसदृश असल्याची भूमिका मांडली जाते. ही बाब मात्र तितकीशी मान्य करता येऊ शकेल असे वाटत नाही. कारण कधीकधी साहित्याला प्रचलित धर्माचेही संकेत अमान्य करावे लागतात. संत ज्ञानेश्वर, चक्रधर आणि संत तुकारामांसारख्या महात्मा कलावंतांनी ते इतिहासामध्ये केले आहेच. याचा अर्थ असा की साहित्य हे संस्कृतीच्या परिघातील अनेक गोष्टींबरोबर संवाद साधतसाधत त्या संस्कृतीच्या प्रवाहीपणासाठी संघर्ष करत असते.
जात वास्तवाकडे आणि जातिव्यवस्थेच्या अस्वाभाविक आणि अन्याय्य रूपाकडे दलित साहित्याने आपले लक्ष प्रथमत:च तीव्रपणे खेचून घेतले. नव्हे व्यवस्थेशी संघर्ष म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडे उडवणे नव्हे तर ठोसपणे जातीव्यवस्थेशी टक्कर घेणे होय हे दाखवून दिले. जणू याला विरोध म्हणून की काय आता लेखकही जातिव्यवस्थेचे समर्थन करू लागले आहेत. त्याला कसले कसले ‘वाद’ म्हणू लागले आहेत. त्यांच्यापासून तरुण लेखक जेवढे दूर राहतील तेवढे ते चांगले लिहू शकणार आहेत. असो. ज्याचे त्याने उमजून घ्यावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा