समाजाची गत सांगणारे हे नवे पाक्षिक सदर.. गतशतकांतील सामाजिक प्रबोधनाशी आजच्या आपल्या समाजाचा काही संबंध उरला आहे का आणि नसल्यास तो का नाही, हा प्रश्न या सदरातील लेख वाचून वाचकांना पडला, तर भलेच!
ज्या भाषेमध्ये शब्दसंपत्ती विपुल आहे तिला समृद्ध म्हणता येते व या अर्थाने मराठी भाषा निश्चितच समृद्ध आहे, पण भाषासमृद्धीची आणखीही काही गमके आहेत. विचित्र वाटेल, परंतु एका शब्दांना अनेक अर्थ असणे हेसुद्धा भाषेच्या समृद्धीचेच लक्षण आहे. यामुळे एक प्रकारची बचत साधली जाते. वेगळ्या प्रकाराने सांगायचे झाल्यास भाषेत खूप शब्द असावेत, हे खरे असले तरी अनावश्यक शब्द असू नयेत व आहेत त्या शब्दांचे ओझेही होऊ नये.
गेल्या शतकाच्या सुरुवातीच्या काही तत्त्वज्ञांना भाषेतील एक शब्दाला एकापेक्षा अधिक अर्थ असणे (संदिग्धता) भाषेचा दोष वाटायचा, म्हणून त्यांनी ‘एक शब्द-एक अर्थ’ अशी काटेकोर व्यवस्था असलेल्या कृत्रिम आदर्श भाषेचा आग्रह धरला होता. पण नंतर या आग्रहातील अस्वाभाविकपणा त्यांच्या लक्षात आला व त्यांनी हा आग्रह सोडला.
मराठीतील ‘गत’ या शब्दालासुद्धा एकापेक्षा अधिक अर्थ आहेत. ‘गत’ शब्दाचा एक अर्थ गती हा होतो, पण दुसरा अर्थ विशिष्ट अवस्था किंवा त्या अवस्थेतील पर्यवसान असाही होतो. ‘एकादशी सोमवार न करिती व्रत। होईल याची गत काय नेणो।।’ या ओळीतील ‘गत’चा अर्थ विशिष्ट कृतीच्या परिणामाची अवस्था निर्देशित करतो. म्हणजे येथे नुसती गती अभिप्रेत नसून त्या गतीचा परिणामही अंतर्भूत झालेला आहे. नेहमीच्या वापरातले ‘प्रगती’, ‘अधोगती’ हे शब्द पाहिले तरी त्यातूनही अशाच प्रकारचा ध्वनी निघतो. ‘गती तेचि मुखी नामाचे स्मरण। अधोगती जाण विन्मुखता।।’ यातील ‘गती’ शब्द खरे तर प्रगतीचा वाचक आहे. गतीला किंवा हालचालीला काही एक उद्दिष्ट किंवा प्रयोजन असले पाहिजे. ते गाठण्यासाठी हालचाल करावी लागते. कृतिशील व्हावे लागते. थोडक्यात, गतीचीही एक गंतव्य अशी स्थिती असते.
उदाहरण संगीत क्षेत्रातील घेता येईल. सतारीसारखे वाद्य वाजवताना वादनाच्या विविध गती असतात. या संदर्भातील ‘गती’ शब्द ‘गत’ शब्दाचे अनेक वचन म्हणून वापरण्यात आलेला आहे. एक गत वाजवून झाल्यावर थोडं थांबणं असतं. स्थिती असते. तालचक्रातही लक्षणीय ठहराव येतो, त्याला आपण सम म्हणून दाद देतो. थोडक्यात, स्थितीगतीचे द्वंद्व हा निसर्गाचा जणू नियमच आहे.
निसर्गाचा हा नियम मानवी समाजाला लागू होतो का, या विषयी मतभेद आहेत.
कार्ल मार्क्‍सच्या समकालीन असलेला एकोणिसाव्या शतकातील फ्रेंच तत्त्ववेत्ता ऑगस्त कोंत याला असे वाटले की जसा निसर्ग तसाच मानवी समाज. नैसर्गिक विज्ञानामध्ये निसर्गातील वस्तू, प्रक्रिया, घटना यांचे नियमन करणारे नियम शोधून काढले जातात. तशाच प्रकारे सामाजिक विज्ञानाने समाजातील प्रक्रिया, घटना इ.चे नियमन करणारे नियम शोधून काढले पाहिजेत.
आता नैसर्गिक विज्ञानामध्ये पदार्थ विज्ञान सर्वात श्रेष्ठ मानले जाते. कारण पदार्थ विज्ञानातील नियम जास्तीत जास्त काटेकोर व अचूक असतात. पदार्थ विज्ञानातही वस्तूच्या स्थिर अवस्थेतील नियम व वस्तूच्या चल अवस्थेतील नियम असा भेद करता येतो. पहिल्या प्रकारच्या नियमांना स्टॅटिक्स आणि दुसऱ्या प्रकारच्या नियमांना डायनामिक्स म्हटले जाते.
अशाच प्रकारची स्थितिकी आणि गतिकी असा भेद समाज विद्वानाच्या बाबतीत करून कोंतने सोशल स्टॅटिक्स आणि सोशल डायनामिक्स अशा समाज विज्ञानाच्या दोन शाखा कल्पिल्या. स्थितिकी स्थिर समाजाचा अभ्यास करते तर गतिकी बदलत्या गतिमान समाजाचा अभ्यास करते.
पदार्थ विज्ञानावरून समाजशास्त्र ही ज्ञानशाखा बेतताना कोंतने त्याच्यासाठी सामाजिक पदार्थ विज्ञान (सोशल फिजिक्स) हाच शब्द वापरला होता व त्यानुसारच- म्हणजे पदार्थ विज्ञानाच्या अनुषंगाने त्याच्या सामाजिक स्थितिकी आणि सामाजिक गतिकी या दोन शाखाही मानल्या होत्या.
ऑगस्त कोंतचा परिचय भारतातील अभ्यासकांना अर्थातच इंग्रजीच्या द्वारे झाला. पण प्रबळ जिज्ञासा बुद्धी असलेल्या लोकमान्य टिळकांची मंडालेच्या बंदिवासात असताना त्याच्या दोन ग्रंथांची  फ्रेंच आवृत्ती मागवून घेतली होती. ‘गीतारहस्य’ या ग्रंथाच्या मांडणीची चौकट टिळकांनी कोंतच्या विचारांवरूनच बेतली होती.
त्याच दरम्यान इकडे महाराष्ट्रात इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे मराठी समाजाच्या इतिहासाची एकूणच सरणी कोंतच्या पद्धतीने लावण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांना महाराष्ट्रातील समाजाच्या स्थितीगतीमध्ये आस्था होती आणि या समाजाची चिंताही होती. राजवाडे महाराष्ट्राचे सोशल फिजिक्स सिद्ध करू इच्छित होते. त्यासाठी ते इतके ईरेस पेटले की समर्थ रामदास म्हणजे महाराष्ट्राचे ऑगस्त कोंत असे म्हणायलाही त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही.
साधारणपणे आशिया खंडातील आणि विशेषकरून भारतीय समाज हा स्थितिशील असल्याचा आक्षेप घेण्यात येतो. ग्रीकांपासून ते मोगलांपर्यंत वेगवेगळ्या वंशांचे व वेगवेगळ्या धर्माश्रद्धांचे परकीय लोक भारतात आक्रमक म्हणून आले. काहींनी तर भारतावर राज्यही केले. तथापि या ढिम्म समाजाला हलवून त्याच्यात हालचाल उत्पन्न करणे कोणालाच शक्य झाले नाही. ब्रिटिश राजवटीत मात्र परिस्थितीत गुणात्मक फरक पडला व या समाजात बदलाचे वारे वाहू लागले. या पारंपरिक स्थितिशील समाजात गती निर्माण झाली.
पण म्हणजे नेमके काय झाले?
भारताच्या प्राचीन समाजव्यवस्थेस धक्के बसू लागले. चिरेबंदी दिसणाऱ्या या वाडय़ाला जणू तडे जाऊ लागले.
पारंपरिक भारतीय समाजाच्या चिरेबंदी वाडय़ाच्या चार भिंती म्हणजेच चार वर्ण आणि वेगवेगळ्या जाती-उपजाती म्हणजे या भिंतींचे जणू चिरेच! भिंतीला तडे जातात, चिरे निखळून पडताहेत हे पाहून राजवाडे अस्वस्थ झाले.
या पडझडीच्या प्रक्रियेची सुरुवात जरी ब्रिटिश राजवटीमुळे झाली होती, तरी तिच्यात इथल्या लोकांचाही हातभार होता. दादोबा पांडुरंग, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, महात्मा जोतिराव फुले हे या पाडापाडीतील बिनीचे शिलेदार. तथापि त्यांना कुमक पुरवणारांमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांचा वाटा लक्षणीय होता.
आपल्याला या वसाहतकालीन विचारविश्वातील तपशिलांच्या खोल पाण्यात उतरायची गरज नाही. मुद्दा एवढाच आहे, की समाजाच्या स्थितिगतीची मीमांसा करायला वाव मिळाला तो ब्रिटिशांच्या काळात. राममोहन रॉय, दादोबा पांडुरंग, लोकहितवादी, फुले, आगरकर इ. समाजसुधारकांची चिंता अशी होती, की या समाजात योग्य ती परिवर्तने झाली नाहीत, तो बदलला नाही तर त्याचा सर्वनाश अटळ आहे. याउलट त्यांच्याविरोधातील म्हणजेच स्थितिवाद्यांना अशी भीती वाटत होती की यामुळे आपल्या समाजाची घडी विस्कटली. तो सैरभैर झाला तर त्याचा परिणाम काय होईल? वेगळ्या शब्दांत सांगायचे म्हणजे, या गतिमानतेमुळे आपल्या समाजाची गत काय होईल?
ब्रिटिशकालीन समाजचिंतकांनी आणि सुधारकांनी विचारलेले प्रश्न आज आपण जसेच्या तसे विचारत नसू कदाचित; पण आपल्या समाजाची आजची अवस्था काय आहे? तो वांछनीय आहे का? आणि त्याची गत काय होणार आहे, हे प्रश्न आज आपल्यालाही भेडसावत आहेत. हे प्रश्न जसे व्यापक पातळीवरून उपस्थित करता येतात, तसेच समाजात घडत असलेल्या घडामोडींची समीक्षाही त्यांच्या संदर्भात करता येते. त्याचाच प्रयत्न आपल्याला करायचा आहे.
*  लेखक पुणे विद्यापीठात तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असून संतसाहित्याचे व्यासंगी व विचारवंत आहेत. त्यांचा ई-मेल –  sadanand.more@rediff.com
* उद्याच्या अंकात गिरीश कुबेर यांचे ‘अन्यथा’ हे सदर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा