विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भीमशक्तीचे मक्तेदार समजणाऱ्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षात मोठी फूट पडली. अर्जुन डांगळे, काकासाहेब खंबाळकर यांच्यासारखे आघाडीचे नेते पक्षातून बाहेर पडले. खरे म्हणजे रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा फुटीचाच आहे. या पक्षाचे गट किती, हा गुंतागुंतीचा आणि सखोल संशोधनाचा विषय आहे. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, साठच्या जवळपास गट-तट, उपगट-उपतट, अशा किती तरी ज्ञात-अज्ञात तटबंद्या आहेत. शिवाय दिवसागणिक नवा गट तयार होत आहे. या गटसंख्येपुढे एखादी चौकशी समितीदेखील हात टेकवेल आणि कितीही वेळा मुदतवाढ दिली, तरी अंतिम अहवाल हाती लागणार नाही. देशातील बहिष्कृत असलेल्या एका मोठय़ा वर्गामध्ये आत्मतेज, स्वाभिमान निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर संघर्ष केला, संपूर्ण जीवन दुबळ्या-वंचित समाजासाठी समर्पित केले. मानवी हक्काची लढाई लढत असतानाच, संपूर्ण भारतीय समाजाची विवेकावर, बुद्धिवादावर, विज्ञानवादावर आणि नीतिमत्तेवर पुनर्रचना करण्याचे तत्त्वज्ञान मांडले. त्यांनी स्वत: देव-धर्म या संकल्पना नाकारल्या; परंतु त्यांचे अनुयायी त्यांना देव्हाऱ्यात बसवून किंवा त्यांना देव करून आता त्यांच्या नावाने सत्तेची भीक मागू लागले आहेत. खरे म्हणजे, कोणतीही शक्ती कधीच विकाऊ नसते. ती लढाऊ असते. मग भीमशक्ती अशी अगतिक का झाली? कुणी केली? वास्तविक पाहता, बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची एक व्यापक व सर्वसमावेशक कल्पना मांडली होती. वंचित समाजाला सत्ताधारी बनण्याचे स्वप्न त्यांनी दिले. शिवाय त्यांनी समाजाला संघटित ठेवण्यासाठी बुद्धाच्या संघाची कल्पना मांडली. मात्र त्यांच्या बहाद्दर अनुयायांनी सत्ताधारी बना म्हणजे प्रस्थापित पक्षाच्या अडगळीत बसून सत्तेचे तुकडे चघळा असा त्याचा अर्थ काढला. चतकोर सत्तेसाठी गटा-गटातच स्पर्धा सुरू झाली. नामांतराच्या आंदोलनात लाखाचा लाँग मार्च काढणारे जोगेंद्र कवाडे, विधान परिषदेच्या एका आमदारकीसाठी काँग्रेस नेत्यांचे उंबरठे झिजवू लागले. काँग्रेसला कीव येऊन त्यांना आमदारकीची झूल चढविली गेली, तर त्यांनी ट्रकभर समर्थक जमवून सन्मान मेळावा भरवून आपली वाहवा करून घेतली. कुणी राजेंद्र गवई कोणीच विचारेना म्हणून मातोश्रीच्या पायरीवर जाऊन बसून आले, तर ठाणेकर इंदिसे राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेले. रामदास आठवले गट मोठा, त्यामुळे त्यांच्या सत्ताकांक्षाही मोठय़ा. २० वर्षे ते काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर राहिले, मस्त सत्ता भोगली. एका पराभवाचे निमित्त करून ते शिवसेनेच्या कळपात घुसले. बाळासाहेब ठाकरेंमध्ये त्यांना बाबासाहेबांचा साक्षात्कार झाला आणि त्यांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिला. एवढे करूनही हाती काहीच लागेना. सेनेने त्यांना झुलवले, हुशार भाजपने राज्यसभेची खासदारकी दिली. युती तुटली त्या वेळी आठवले भाजपच्या उपकाराला जागले आणि मंत्रिपदाचे गाजर न्याहाळत ते भाजपच्या कळपात शिरले. शिवशक्तीला सोडचिठ्ठी देऊन ते संघशक्तीला शरण गेले. जागा किती मिळणार, हा मुद्दाच मागे पडला. भाजपने रिपाइंला किती व कोणत्या जागा सोडल्या आहेत आणि त्यावर नेमके उमेदवार कोण आहेत, हे आठवलेंनाही मोठय़ा कष्टाने आठवावे लागत असेल. व्यक्तिकेंद्रित राजकारणामुळे रिपब्लिकन पक्ष फुटत गेला. अर्जुन डांगळे यांचे पक्षातून बाहेर जाणे हा एक त्याचा परिणाम आहे. प्रत्येक तुकडा कुणापुढे तरी हात पसरायला जातो. त्यामुळे या पुढे कितीही गट असले तरी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सत्ताभुकेले) असे एकच नाव सर्वानी मान्य करावे व स्वीकारावे. नाही तर सर्वच गटाधिपतींचे हेतू आणि आकांक्षा त्यापेक्षा वेगळ्या त्या काय आहेत?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा