प्रदीप रावत pradiprawat55@gmail.com

जीवसृष्टीचे कोडे उलगडण्याच्या माणसाच्या प्रयत्नांमधून उत्क्रांतीचा सिद्धांत पुढे आला. पण त्यातले तर्क पुढे कसे न्यायचे, त्यांना काय आधार असेल याचे उत्तर सापडते ते जीवाश्मांच्या निसर्गाने लिहून ठेवलेल्या नोंदवहीतून.

Fossil footprints show life on earth
कुतूहल : खडकांवरच्या पाऊलखुणा
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
From Jack the Penguin to Volcano Rabbit This 10 creatures that thrive in volcanic environments
जॅक्स पेंग्विन ते व्होल्कॅनो रॅबिट; धगधगत्या ज्वालामुखीच्या प्रदेशात जगतात हे १० प्राणी
loksatta kutuhal interesting facts about the first dinosaur of india
कुतूहल : भारतातील पहिलावहिला डायनोसॉर
monolith monuments found in kumbhavade village,
राजापूरातील कुंभवडे येथे जांभ्या दगडात आढळली सात एकाश्मस्तंभ स्मारके
dinasorus highway
१६ कोटी वर्ष जुना ‘डायनासोर हायवे’ काय आहे? शास्त्रज्ञांना याचा शोध कसा लागला?
Loksatta kutuhal Founder of the Paleontological Institute
कुतूहल: पुराजीवविज्ञान संस्थेचे संस्थापक

डार्विनच्या काळात मिळालेले जीवाश्म तुरळक होते. आता एकूण उपलब्ध जीवाश्म मुबलक आहेत. जवळपास हरेक लक्षणीय जीवाश्म अद्भुत वाटावे अशी भूतकाळाची छबी रेखतात. भूचरांना पंख येणे, एके काळचे भूचर पुनश्च जलचर होणे यासारख्या कितीतरी विस्मय वाटणाऱ्या कथा या दगडी नोंदवहीत आहेत. उदाहरणार्थ आज आपण मोठय़ा कौतुकाने पाहतो आणि वापरत आलो त्याचे पूर्वज कसे होते? वर्तमान घोडय़ांना दोन खूर आहेत. त्याच्या पूर्वजांना पाच बोटे असावीत असे खूर होते आणि ते बरेच बुटकेसे होते. आज आपल्या परिचयाची मुंगी घ्या. एकेकाळच्या सामाजिक नसलेल्या गांधीलमाशा हा तिचा पूर्वज आहे. कीटकशास्त्रज्ञांना याचा फार पूर्वीपासून सुगावा होता. त्यांचे हे अनुमान गांधीलमाश्या आणि मुंग्या यांच्या शारीररचनेतील साम्यावर बेतले होते. पण उत्क्रांती विज्ञान तेवढय़ावर थांबत नाही. गांधीलमाशी ते मुंगी या स्थित्यंतरामधल्या अवस्थेचा साक्षीदार असा जीवाश्म पाहिजे! १९६७ साली ई . ओ. विल्सन या वैज्ञानिकाला अंबर द्रव्यात अश्मीभूत झालेली ही संक्रमण अवस्था गवसली.(अंबर म्हणजे एक प्रकारची तैलस्फटिकी राळ) सापांची कूळकथा तशीच मनोरंजक आहे. जीवाश्मांच्या नोंदमाळेत पाय असलेले सरपटे सापांच्या बराच काळ आधी विपुल प्रमाणात आढळतात. त्यावरून सापांची उपज करणारे स्थित्यंतर या सरपटय़ांपासून घडले हे भाकीत केले गेले होते. पॅट्रोनिया येथे झालेल्या उत्खननामध्ये पुराजीव शास्त्राज्ञांना नऊ कोटी वर्षांपूर्वीचा अतिप्राचीन सर्पवंशी जीवाश्म सापडला. शास्त्रज्ञांनी केलेल्या भाकितानुसार त्याची ठेवण होती. त्या प्राण्याची ओटीपोटाची कंबर लहान होती. मागचे पाय आखूड होते.

त्याहूनही आणखी रोमांचकारी जीवाश्म सापडला तो चीनमध्ये. त्याचे नाव हैक्योला लान्सेओलाटा. त्याचे अदमासलेले वय ५३ कोटी वर्षे! चुणीदार पृष्ठपर असलेल्या या प्राण्याचे छोटय़ा वाम माशाशी साम्य आहे. त्या जीवाश्मामध्ये डोके, हृदय आणि मेंदू तर आहेतच, पण विशेष म्हणजे पाठीच्या भागात मेरुदंड ऊर्फ पृष्ठरज्जू आहे. या शारीररचनेच्या वैशिष्टय़ावरून हा प्राणी रज्जूयुक्त वर्गातला आरंभीचा प्राणी असावा. सगळे पृष्ठवंशीय प्राणी (अगदी आपल्यासकट! ) या वर्गातून उदयाला आले. या एक इंचभर लांब असलेल्या प्राण्यामध्ये आपल्या मानवजातीच्या उत्क्रांतीची मुळे आहेत.

जीवाश्म, त्यातून स्वभावत: दिसणारे कालखंड आणि निरनिराळे जीव सापडण्यातला कालानुक्रम याचा एवढा विस्तृत ऊहापोह कशासाठी, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. उत्क्रांती ही ऐतिहासिक प्रक्रिया आहे. तिची प्रयोगशाळेत सर्वंकष पुनरावृत्ती करून बघणे तर अशक्यच आहे. काय घडून गेले? जे घडले त्यात काही विशिष्ट क्रम होता का? त्या आढळलेल्या क्रमाकडे बघून, त्याच्या गुणवैशिष्टय़ांकडे पाहून काय कयास करता येतो? त्यात नजरेत भरणारे सूत्र आहे का? जीवाश्म या प्रश्नांचा छडा लावण्याची प्रत्यक्ष उदाहरणे पुरवितात. जीवसृष्टीच्या घडामोडीत दडलेले सूत्र त्यातून व्यक्त होते. जीवसृष्टीतल्या वैविध्याचा उगम कशात आहे? त्यामागे काय कारणपरंपरा आहे? आढळलेले क्रम आणि त्याचे उदयास्त यांच्या आकलनातून काय निष्कर्ष शक्य आहेत, हे शोधत उत्क्रांतीचा सिद्धांत उपजला. पण ही तर्काची गाडी चालणार कुठल्या दिशेने आणि कशाच्या आधारावर? जीवाश्मांच्या नोंदवहीवर हा सगळा भार पेललेला आहे.

जीवाश्मांच्या नोंदवहीमुळे आपल्याला काही मोलाचे बोध होतात. पहिली गोष्ट म्हणजे जीवाश्मांचे अस्तित्व उत्क्रांतीच्या बाजूने नि:संदिग्ध कौल देते. उत्क्रांती ही निव्वळ कल्पना किंवा सिद्धांत नव्हे. उत्क्रांती ही ‘तथ्य’ गोष्ट आहे. वंशावळीमध्ये अतोनात धिम्या गतीने बदल होत गेले. वंशावळींना फाटे फुटले. त्यांच्यातले भेद वाढत वाढत गेले. पण तरीही त्यांच्यामध्ये काही साम्यस्थळे तगून राहिली. एका धाटणीतून दुसऱ्या धाटणीत रूपांतर होताना त्या रूपांतरांच्या दरम्यान असलेल्या संक्रमणावस्थादेखील जीवाश्मांनी जपून ठेवल्या आहेत! भिन्न अवस्थांमधलं नातं त्यांनी राखून ठेवलं आहे. शरीररचना आणि अन्य बाह्य साधम्र्यावरून केलेले कयास याची खातरजमाही या जीवाश्मांमुळे होते. जीवाश्मांच्या या साक्षी पुराव्यांकडे डोळेझाक करणे किंवा दुर्लक्ष करणे आता शक्य नाही. तथ्य ऊर्फ वस्तुस्थिती महणून उत्क्रांती विचार अटळपणे पत्करावा लागतो.

संक्रमण अवस्थांमधले जीव ज्या अनुक्रमाने सापडतात तो अनुक्रमही तेवढाच मोलाचा आणि लक्षणीय आहे. उदा. अगोदर सांगितल्याप्रमाणे आरंभीच्या काळातले पक्षी डायनासोरच्या नंतर, परंतु आधुनिक पक्ष्यांच्या अगोदरच आढळून येतात. सागरी जीवनाशी अगदी अनभिज्ञ असलेले भूचर आणि देवमासे यांच्यामधल्या स्थित्यंतराच्या साक्षी देणारे दरम्यानचे जीवाश्म या संक्रमणाची ग्वाही देतात. उत्क्रांती हे सत्य नसेल तर जीवाश्म विशिष्ट अनुक्रमाने आढळणार नाहीत. उलटपक्षी जीवाश्मांच्या साक्षीने उभा राहणारा अनुक्रम केवळ उत्क्रांती सिद्धांतामुळेच अर्थवाही आणि अर्थपूर्ण ठरतो! जे. बी. एस. हाल्डेन नावाचा एक मोठा उत्क्रांती वैज्ञानिक होता. थोडक्यात, खोचक (आणि खवचटदेखील) हजरजबाबी असाही त्याचा लौकिक होता. त्याला एका जाहीर व्याख्यानामध्ये कुण्या श्रोत्याने विचारले, की ‘कोणत्या परिस्थितीमध्ये उत्क्रांती सिद्धांत असत्य ठरेल?’ प्रश्नाचा रोख लक्षात येऊन हाल्डेनने झटदिशी छोटे उत्तर दिले! ‘कँब्रिअनपूर्व काळामध्ये सशांचे जीवाश्म ( (कँब्रिअन पूर्वकाळ म्हणजे ५४.२ कोटी वर्षांपूर्वी) सापडले ना तर ठरेल हं उत्क्रांती असत्य!’ आजतागायत कँब्रिअनपूर्व काळामध्ये सशांचे जीवाश्म सापडलेले नाहीत, यातच सर्व काही आले. जे प्रचलित आहे किंवा अगोदर अस्तित्वात आले आहे त्याचीच घडामोड ( घडामोड म्हणजे मोडणे आणि घडणे) होत काही वेगळे उपजत जाणे म्हणजे उत्क्रांती प्रक्रिया होय. अगदी सूक्ष्म असो किंवा स्थूल असो; सगळय़ाच उत्क्रांती बदलांना या मर्यादेची चौकट लागू असते. सर्व बदलांना या मर्यादेतच वाव असतो. भूचरांना मत्स्यवर्गी पूर्वजांच्या मजबूत अवयवांचे निरनिराळय़ा पायांच्या प्रकारात रूपांतर होऊन पाय लाभले. सरपटय़ा पूर्वजांच्या जबडय़ातील हाडाची फेरजुळणी आणि बदल होऊन सस्तनांच्या मधल्या कानांतील मधल्या हाडांची रचना झाली आहे. देवमासे एका मर्यादित अर्थाने अजूनही भूचर असल्यागत आहेत. केवळ त्यांच्या पुढच्या पायांचे रूप बदलून ते वल्हे बनले आहेत. आणि नाकपुडय़ा सरकून डोक्यावर जाऊन बसल्या आहेत. नैसर्गिक निवडीला अशा घडामोडींच्या चौकटीतच बदल साधावे लागतात. एखादा अभियंता किंवा रचनाकार ज्या प्रकारे स्वैरपणे रचना करू शकतो तशा प्रकारच्या मुभा नैसर्गिक निवडीवर आधारलेल्या बदलांना नसतात. आपण पुराणकथांमध्ये बऱ्याचदा ऐकतो, की ऋषींच्या शापाने कुणा अपराधी मनुष्याचे सर्पात रूपांतर झाले आणि उ:शापाने तो पुन्हा मनुष्यरूपात आला. असे स्थित्यंतर प्रत्यक्षात संभवत नसते. विशाल कालपटावर उत्क्रांती प्रक्रियेने मात्र डाइनासॉरचे पक्षी आणि पक्ष्यांचे देवमासे घडवून दाखविले आहेत! पण त्याला शक्य आणि उपलब्ध मर्यादांची चौकट आहे.

एखाद्या जादूगाराने हवेत हात फिरवून नवीन वस्तू काढून दाखवावी असे सृष्टीच्या घडणीत घडत नाही. जीवाश्मांची नोंदवही या सत्य आणि तथ्य मर्यादेची धारदारपणे जाणीव करून देते. अगोदरच्या एका लेखामध्ये म्हटले होते, की आजवरचा जीवसृष्टीचा काल लक्षात घेतला तर माणूस नावाचा प्राणी अगदीच अलीकडे उदय पावलेला नवखा आहे! अर्थातच माणसाचा उदय त्याच्या उत्क्रांतीचा आलेख यामध्ये आपल्याला ‘माणूस’ म्हणून विशेष रस आहे आणि असणार. पण आपण ज्या दीर्घकाळ घडत आलेल्या घडामोडीचा छोटासा हिस्सा आहोत त्याची ही मूळ चौकट आणि बदलांच्या स्वरूपाचे इंगित नजरेआड करून काय उमगणार? आणि कसे उमगणार? यातच या जीवाश्म नोंदवहीची थोरवी आहे!!

लेखक माजी खासदार आणि ‘‘रावत’स नेचर अ‍ॅकॅडमीचे संस्थापक आहेत.

Story img Loader