प्रदीप रावत pradiprawat55@gmail.com
मानवी उत्क्रांतीचा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. आधुनिक मानवाचे थेट पूर्वज मानावेत असे होमो-सेपियन आफ्रिकेत दोनेक लाख वर्षांपूर्वी अवतरले. त्यांचेच वंशज पृथ्वीवरील निरनिराळय़ा भूभागांत विखुरले आणि विस्तारले असा कयास आहे.
उत्क्रांतीचे विज्ञान अनेक प्रश्नांच्या ध्यासामुळे बहरत गेले. त्यातील काही प्रश्न फार प्राचीन घडामोडींशी निगडित आहेत. अतिप्राचीन काळात या जैविक घडामोडींना साकारणारी भौतिक प्रक्रिया काय ठेवणीची होती, याबद्दल फार त्रोटक माहिती उपलब्ध असते. आज दिसणारी सृष्टी निर्माण होण्यासाठी सर्वाधिक संभाव्य स्थिती काय असेल, याचे कयास बांधावे लागतात. प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षणे तर्काच्या कसोटीवर पारखावी लागतात.
जीवसृष्टी कशी उद्भवली? अन्य ग्रहांवरही तशाच घडामोडी झाल्या का? उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर मनुष्य नावाचा जीव अवतरला? कोणत्या जीवांचे रूप बदलत तो निर्माण होत गेला? पृथ्वीवरच्या कोणत्या भागात तो प्रथम अवतरला? कुठे आढळला, त्याचा वावर कुठे झाला? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.
जीवाश्मांची नोंदवही न्याहाळली तर मनुष्यप्राणी अगदी अलीकडे उपजला, हे स्पष्ट आहे. परंतु मनुष्य वर्गातील प्राण्यांचे अवशेष आणि त्रोटक सांगाडे तुलनेने अलीकडे म्हणजे १९२४ नंतर सापडू लागले. यानंतर मात्र अनेक ठिकाणी आढळले. परंतु द्विपाद मानवाच्या कोणत्या एका शाखेतून आधुनिक मानवाचा वंशवेल बहरत आणि बदलत गेला, त्यांच्यात संकरी संपर्क किती घडला, अशा अनेक प्रश्नांबद्दल नि:संदेह उत्तरेही नव्हती. आपण त्याचा धावता आढावा मागील लेखात घेतला. आता या अवशेषांची आणि त्रोटक सांगाडय़ांची संख्या वाढली आहे. ते आढळणाऱ्या स्थळांची संख्यादेखील वाढली. जे अवशेष गवसले त्यांचे अंदाजित काळ एकसारखे नाहीत. त्यांची अंदाजित ठेवण आणि रूप यात भले नजरेत भरावे असे साम्य आहे, पण तेदेखील तंतोतंत एकसारखे नाहीत. या अवशेषांपैकी सर्वाधिक पुरातन कोणता, याचा अंदाज बांधणे तुलनेने सोपे होते, पण त्यात आणखी एक छुपा प्रश्न होता.
हे सगळे एकाच पूर्वजवेलाचे भाऊबंद मानले, तर ते पृथ्वीवरच्या इतक्या मोठय़ा अंतरावर वेगवेगळय़ा ठिकाणी पसरले असे मानावे लागेल. त्यांच्यातील सूक्ष्म फरक किंवा ठळक बदल नैसर्गिक निवडीसारख्या अंगभूत घडामोडींमुळे झाले, असेही मानावे लागेल. वेगळय़ा शब्दांत, ते सगळे एकाच मूळ थोराड पूर्वजवेलाचे वंशज आहेत. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने अन्य भूभागांत स्थलांतरित झाले. पण ही धारणा योग्य नसेल तर? पर्यायी चित्र काय? याचे एक तर्कदृष्टय़ा उत्तर शक्य आहे. वानरवंश ते मानववंश हे स्थित्यंतर वेगवेगळय़ा भूभागांत वेगवेगळय़ा काळांत घडले आणि ते एकमेकांशी भलतेच साधम्र्य राखणारे होते. (आकृती पाहा)
हा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. त्याचा काळदेखील फार अवाढव्य आहे. होमो नेआन्डरथेलिस, होमो हायडेलबर्गजेनसिस, होमो इंटेसेसोर, होमो इरेक्टस, होमो फ्लोरेनसेसिस या नर वा-नरवर्गीयांची हजेरी १० लाख वर्षांपूर्वी लागली होती. (इंग्रजीत ‘होमो’ म्हणजे मनुष्य आणि साधारण मनुष्यासारखा यासाठी ‘होमिन’ असा शब्द वापरला जातो. त्याला आपण ‘वा-नर’ म्हणू!) ढोबळमानाने होमो इरेक्टसने १० लाख वर्षांपूर्वी जावा बेटे आणि चीनमध्ये हजेरी लावल्याचे दिसते. सुमारे आठ लाख वर्षांपूर्वी होमो हायडेलबर्गजेनसिसची आफ्रिका आणि युरोपात वस्ती होती. त्याचीच एक युरोपीय फांदीफूट म्हणजे तीन लाख वर्षांपूर्वीचे नेआन्डरथालिस. ज्याला आधुनिक मानवाचे थेट पूर्वज मानावेत असे होमो-सेपियन ऊर्फ शहाणा किंवा सुज्ञ मानव आफ्रिकेत दोनेक लाख वर्षांपूर्वी अवतरला. त्याचेच वंशज निरनिराळय़ा भूभागांत विखुरले आणि विस्तारले असा कयास आहे. खुद्द डार्विन त्याचा एक लक्षणीय प्रवर्तक आहे. त्याच्या काळात एकही मानवी जीवाश्म गवसला नव्हता! तरीदेखील अन्य निरीक्षणांच्या आधारावर त्याने ‘डिसेन्ट ऑफ मॅन’ (१८७१) या ग्रंथात म्हटले आहे, ‘सगळय़ा मोठय़ा भूभागांमध्ये प्रचलित वा हयात जीव प्रकारांची तेथील नष्टप्राय झालेल्या जीव प्रकारांबरोबर घनिष्ठ जवळीक असते. आफ्रिकेत गोरिला, चिम्पांझी यांच्याशी जवळीक असणारे पण आता नष्ट पावलेले जवळचे पूर्वज नातेवाईक असण्याचा मोठा संभव आहे. आपले त्यांच्याशी असलेले घनिष्ठ साम्य पाहता आपले मूळ पूर्वजदेखील आफ्रिकेतच असण्याचा दाट संभव आहे.’
उत्क्रांती विज्ञान आता अनेक ज्ञानशाखांच्या दिंडय़ांनी गजबजलेली पंढरी झाले आहे. त्यामध्ये एकीकडे भूगर्भातील विज्ञान आणि पुरातत्त्वशास्त्र आहे. पुरातन काळात वातावरण आणि हवामान कसे होते, ते कसे, केव्हा आणि का बदलले याचा वेध घेणारे हवामान विज्ञान आहे. जीवांची मूळ रासायनिक घडण आणि त्याचा दुपदरी गोल जिन्यांचा डीएनए नामक जनुकक्रम पारखणारे जनुक विज्ञान आहे. या प्रत्येक विज्ञानशाखेमुळे पूर्वजशोधाचे निरनिराळे पैलू आणि शक्यता पारखता येतात. मानववंशाचा उदय होऊन तो निरनिराळय़ा भूभागांवर पसरू लागला तो काळ प्लायस्टोसिन या नावाने ओळखला जातो. सध्या सुरू असलेला कालखंड आहे, होलोसिन! या प्लायस्टोसिन पर्वाच्या दीर्घकाळात हवामान बदलत होते. त्याचे हेलकावे प्रखर वाळवंटी उष्णता ते सर्व काही गोठल्या अवस्थेतील हिमयुगी बर्फाळ थंडी इतके टोकाचे होते. त्याच्याच शेवटच्या टप्प्यात घडलेल्या काळाला हिमयुग म्हटले जाते. अशा टोकाच्या हेलकाव्यांमुळे वनस्पती, पाणी, सरासरी तापमान इत्यादी घटकांची आधीची चक्रे आणि घडी पालटली जाते. अन्नाची वानवा, बदलत्या तापमानात शरीर तगण्याची क्षमता अशा जिवावर बेतणाऱ्या संकटांना तोंड द्यावे लागते. हे संकट पेलण्यासाठी प्राणीसृष्टी स्थलांतराचा पर्याय अवलंबते. मूळ अधिवास प्रतिकूल होऊ लागला, की तेथून उठून अन्यत्र जाण्याखेरीज पर्याय उरत नाही. मनुष्याचा पूर्वज असो वा कुणीही जीवमात्र सर्व परस्परावलंबी असतात. अन्नाची उपलब्धता डळमळली तर जिथे उपलब्धता गवसेल तिकडे वाट धरावी लागते. मनुष्यासह सगळीच जीवसृष्टी अशा बदलांमुळे अन्य भागात वाहत फरफटू शकते. एका भूभागात उत्क्रांत होत गेलेला प्राणिमात्रांचा कळप अन्यत्र विखुरण्याचे, हे सबळ कारण आहे.
पण अशा स्थित्यंतरांची तीव्रता सर्वाना एकसमान भेडसावणारी असते, असेही नाही. हत्ती, हरिण स्थलांतरित झाले, तरी काही प्राण्यांत स्थलांतर न झालेल्या अन्य प्राण्यांची शिकार करून तगून राहण्याची क्षमता असेल, तर स्थलांतराचा ओघ वेगळा असेल. या कालखंडातील माणसाच्या पूर्वजाला शिकार करण्यासाठी कोणत्या दर्जाची आणि प्रकारची हत्यारे वा तंत्रज्ञान उपलब्ध होते, हा घटकदेखील स्थलांतराचा झपाटा आणि दिशा वळवू शकतो. मानववंशशास्त्रज्ञांनी त्या काळच्या हत्यारांची घडण आणि उपयोग यांचे बरेच स-प्रयोग अध्ययन केले आहे. त्यामुळे आफ्रिकेतून युरोपात किंवा आशियात स्थलांतर झालेल्यांच्या तंत्रज्ञान-ठेवणीशी सांगड घालायचे खटाटोप त्यांनी केल्याचे आढळते. एकुणात उपलब्ध पुरावा आणि तथ्ये पाहता ‘सुज्ञ-मनुष्य’ प्रथम आफ्रिकेत उपजला आणि त्याच्या अनेक टप्प्यांवरच्या शाखा- उपशाखा निरनिराळय़ा दिशांनी विखुरल्या याला अधिक पाठबळ मिळते.
स्थित्यंतर आणि स्थलांतरातील खरा थरार अनुभवायचा तर या विखुरण्याचा भूगोल आणि त्यातल्या अंतरांचा पल्ला पाहिला पाहिजे. आज होकायंत्र नसलेली शिडाची जहाजे हाकारणाऱ्या दर्यावर्दीचे आपल्याला अप्रूप वाटते. दोन लाख वर्षांपूर्वी ना शिडाचे जहाज होते ना होकायंत्र, तरी शब्दश: सात समुद्र ओलांडण्याचा विक्रम निव्वळ धारदार दगड आणि हाडे बाळगणाऱ्या मनुष्य पूर्वजांनी केला? यातला थरार अधिक अद्भुत आणि चक्रावणारा आहे.
(लेखक माजी खासदार आणि रावत’स नेचर अकॅडमीचे संस्थापक आहेत.)