प्रदीप रावत pradiprawat55@gmail.com
मानवाचा उद्भव कपिकुळातून झाल्याचा कयास वर्तविला जातो. खास मानवात दिसणारी वैशिष्टय़े या कुळातील नेमक्या कोणत्या जातीतून, काळाच्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आणि जगाच्या कोणत्या भागात निर्माण झाली याविषयीच्या संशोधनांचा मागोवा..
जीवाश्मांच्या नोंदवहीमध्ये मनुष्यप्राण्याची हजेरी किती? त्यातून काय हाती लागते? अवघ्या प्राणीसृष्टीचा उद्भव आणि टिकाव लक्षात घेता माणसाची हजेरी भलतीच उशिरा लागली, हे आपण पाहिले आहे. मनुष्यप्राण्याचा जो काही उद्भव आणि वावर घडला त्याचा तगून राहिलेला अश्मरूप ठसा तुलनेने फार क्षीण आणि अलीकडे गवसलेला आहे. माणूस प्राण्याचे कपि (वानर) कोटीशी असलेले साधर्म्य आणि रूपात्मक जवळीक सहजी उमगणारी आहे. त्या साम्याचे गारूड बरीच दशके वेगवेगळय़ा रूपांमध्ये, वैज्ञानिकांमध्येदेखील चिवटपणे तगले आहे. कपिकुलाची प्रशाखा बरीच वैविध्यपूर्ण आहे. त्यामधल्या कोणत्या शाखेची फूट आणि उपफूट मनुष्यप्राण्याच्या उदयाला कारणीभूत ठरली, अवघ्या पृथ्वीतलावरील कोणत्या भागांमध्ये या उलाढाली घडामोडी घडल्या, हे प्रश्न सुरुवातीच्या म्हणजे खरेतर १८ व्या- १९व्या शतकांतील संशोधकांना भेडसावत होते. डार्विनच्या आधीदेखील ही वंशावळ रेखाटण्याचा प्रयत्न झाला होता. प्राणीसृष्टीचे वर्गीकरण करून त्याची शाखा-प्रशाखा रेखाटणारा कल्पक विद्वान म्हणजे कार्ल लिनिअस. त्याने या वानर- नर वर्गाची कल्पना मांडली होती. डार्विन आणि त्याचे समकालीन सहकारी या वानर ते नर स्थित्यंतराचे पाईक होते. परंतु त्यांच्या तर्काला पुष्टी देतील असे ‘हवे तसे’ आणि ‘हवे तेवढे’ पाठबळ पुराव्यांच्या रूपात लाभले नव्हते.
१९२५ साली रेमंड डार्ट या दक्षिण आफ्रिकेतील शरीरशास्त्रज्ञ प्राध्यापकाला एक सांगाडा मिळाला. त्याची कवटी मानेपर्यंत असावी इतकी पसरली होती. मेंदूचा आकार कपिपेक्षा मोठा होता. डार्विनने ‘द डिसेन्ट ऑफ मॅन’ मध्ये केलेल्या कयासानुसार ‘मनुष्य कुळाचे पूर्वज म्हणावे असे जवळचे नातलग हे कपिकुळातले असणार, तेही गोरिला, चिम्पांझीसारखे आणि त्यांचा पहिला आढळ आणि वावर आफ्रिकेत असणार.’ परंतु हा निखळ कयास होता. डार्विन म्हणतो ‘आपले पूर्वज केसाळ, चार पायांवर वावरणारे, टोकदार कानांचे, झाडाझुडुपात वसणारे, प्राचीन काळातले (कपि) असावेत.’ असा तर्क मांडल्यावर काय काहूर माजेल याची डार्विनला जाण होतीच! तो याच पुस्तकात पुढे म्हणतो की ‘हा तर्क अनेकांना धर्म-विचाराला हरताळ फासणारा वाटेल, पण ज्यांना ही कल्पना रुचत आणि पचत नाही त्यांनी हे पटवून द्यावे की, नेहमीच्या पुनरुत्पादन क्रियेला वेठीला धरून माणसाचे जीवन कसे उपजले?’ पण या कयासाला पुष्टी देणारे जीवाश्म मिळाले नव्हते. रेमंड डार्टच्या हाती आलेला जीवाश्म या कयासाला सार्थ ठरविणारे पहिले पाऊल होते. त्यानंतर हळहळू अनेक जीवाश्म आणि अवशेष मिळत गेले. मानववंश शास्त्रज्ञदेखील बराच काळ चिम्पांझी अथवा गोरिलाच्याच कोणत्या ना कोणत्या प्रकाराचा वेध घेत धुंडाळत होते. जसजसे निरनिराळे जीवाश्म उपलब्ध होत गेले तसतसे मनुष्यप्राण्यांमधील प्रकारांचे स्थळकाळानुसार विविध नमुने नजरेस येऊ लागले. त्यातून एक प्रश्न उपस्थित झाला, भले या ना त्या कपि वा वानराचा पूर्वज म्हणून विचार केला तरी खास माणसामध्ये निर्माण झालेली जी वैशिष्टय़े आहेत, त्यांचा उद्भव दर्शविणारे ‘अधलेमधले’ जीव कोणते? त्यांची वैशिष्टय़े कोणती? त्यांची रहिवासाची, आढळाची ठिकाणे कोणती? याचा धांडोळा घेता घेता आधुनिक मनुष्याशी अधिक जवळीक दर्शविणारे मनुष्य जाती-प्रकार सामोरे येऊ लागले.
आजच्या आपल्या अवस्थेतील मनुष्यप्राण्यांना होमोसेपिअन या नावाने ओळखले जाते. या नावाचा शब्दश: अर्थ सुज्ञ किंवा शहाणा मानव असा आहे. होमो/ होमिन या लॅटिन शब्दाचा अर्थ मानव असा आहे. उत्क्रांती विज्ञानामध्ये मनुष्याचे वर्गीकरण प्राणीवर्गात केले जाते. त्याचे शास्त्रीय वर्णन असे- प्राणीवर्ग ( मॅमेलिया): सस्तन/ गण: (ऑर्डर) प्रायमेट / कुल: ( फॅमिली) होमोनिडाई / उपकुल (ट्राइब ) : होमिनिनी/ प्रजाती (जेनस)/ ( स्पिशिज) : आधुनिक मानव ऊर्फ सुज्ञ मानव.
आजचा सुज्ञ मानव विकसित होत गेला तो त्या आधी असलेल्या जातींमध्ये घडत आलेल्या निरनिराळय़ा बदलांमधून. पण त्या आधी असणाऱ्या कुठल्या जातीमधून? ती अदमासे किती वर्षांपूर्वी आढळते? पृथ्वीवरच्या कोणत्या भूभागामध्ये आढळते? गेल्या शतकभरात किमान १९ मनुष्यसदृश जातींचे जीवाश्म सापडले आहेत. उदा. कळीचे मानावे असे- सर्वात जुना होमो इरेक्टस, होमो अन्टेसेसार, होमो हायडेलबर्गीनीस, होमो निआन्डरथेलनिस, होमो स्टाईनहाईमेन्सिस, डेनिसऑव्हन्स इत्यादी. यामधल्या कोणत्या जातीचे ‘सुज्ञ मानवाशी’ पूर्वज म्हणून अधिक घनिष्ठ नाते मानता येईल? अर्थात असा निवाडा अनेक गुणांच्या तारतम्याने करावा लागतो. अर्थातच सर्वाधिक प्राधान्य दिले जाते ते घटक असे-
१. मिळालेल्या जीवाश्मांचा काळ (म्हणजे किती वर्षांपूर्वीच्या थरात त्याचा वावर आढळतो)
२. त्यांच्या शारीरिक ठेवणीमधील साम्य आणि भेद ३. त्यांचा वावर असलेला अधिवास, तेथील त्या त्या काळातील भौगोलिक वैशिष्टय़े आणि वनस्पती आणि प्राणी यांची ठेवण.
मानवाची ओळख देणाऱ्या अनेक मोलाच्या खुणा आहेत. वानगीदाखल पाहू- चतुष्पादपण झडून द्विपाद होणे. सरासरी उंची, हातपायांतील हाडांची लांबी, मेंदूचा आणि तो बाळगणाऱ्या कवटीचा आकार, त्या कवटीतून मणका आणि मज्जातंतूंच्या जाळय़ाना जोडणारी खोबण कवटीपाशी कुठे आहे? बरोबर खालच्या बाजूला की वरच्या बाजूला जवळ आणि आडवी? दातांची आणि कवळीची ठेवण, भुवया आणि कपाळाचे चढउतार, डोळय़ांची खोबण, कानांची ठेवण आणि आकार. त्याच बरोबरीने दातांमध्ये अडकून राहिलेल्या वनस्पती किंवा मांसाचे ठसे, ओटीपोट आणि कटी प्रदेशाची पोकळी तेथील हाडांचे आकार आणि ठेवण इ. जीवाश्मांच्या अंगी दिसणाऱ्या या ‘कळा’ आणि लक्षणे, त्यांच्या वावराचे ठिकाण, भूगर्भाचा स्तर या सर्वावरून पूर्वजपणाची कुंडली जोखली जाते. पूर्वज निश्चितीची ही समस्या आजही पूर्णपणे सुटलेली नाही. तीन संभाव्य संक्रमणांची वाटचाल दर्शविणारे चित्र पाहा. त्यावरून यातल्या पूर्वज-पेचाची कल्पना येईल.
तुटपुंज्या पुराव्यांखेरीज आणखी एक घटक या पूर्वजशोधाला मोठी खीळ घालत होता. डार्विनने उत्क्रांती विचार मांडल्यावर ही खीळ आणखी बळकट आणि उत्क्रांती कल्पनांची घुसमट करणारी होत गेली. तो घटक म्हणजे उत्क्रांती विचाराला असलेला कडवा धार्मिक विरोध. १८७१ साली होमो नेआन्डरटालचे थोडे अवशेष सापडले होते. त्यानंतर १८९१ साली युजीन डय़ूब्वाँ नावाच्या डच वैद्यकाला जावा बेटांमध्ये आधुनिक मानवापेक्षा थोडा लहान मेंदू असणाऱ्या ‘संक्रमण दर्शक कपि- मानवां’ची कवटी, मांडीचे हाड आणि दात सापडले होते. पण धार्मिक छळ आणि विरोधाच्या धास्तीने त्याने ती सगळी सामग्री जमिनीत पुरून टाकली. त्यावेळी त्याचे नाव पिथेकअन्थ्रोपिकुस असे होते. तोच पुढे होमो इरेक्टस म्हणून ओळखला जाऊ लागला. एवढय़ा मोठय़ा मोलाच्या ठेव्याचा अभ्यास या धास्तीपोटी तीन दशके पुढे ढकलला गेला. डार्टला १९२४ साली जीवाश्म सांगाडा मिळाला. अमेरिकेतील तेव्हाचा एक खटला मोठा बोलका आहे. तो ‘मर्कट-खटला’ म्हणून प्रसिद्ध आहे. टेनेसी बटलर कायदा या नावाने एक कायदा प्रचलित होता. त्यात म्हटले होते की ‘ज्या शैक्षणिक संस्था उदा. शाळा महाविद्यालये विद्यापीठे टेनेसी राज्याच्या सार्वजनिक वित्तावर चालतात त्या संस्थांमध्ये बायबलमध्ये वर्णिलेली मनुष्यनिर्मितीची देवाची करणी आणि कथा शिकवणे सक्तीचे आहे खेरीज अन्य कोणत्याही हीन गणातील प्राण्यांपासून माणसाचा उद्भव झाला अशा आशयाचे सिद्धांत शिकविण्यास सक्त मनाई आहे.’ १९२५ साली जॉन स्कोपस या शिक्षकाला असे ‘अभद्र मनाई केलेले शिकविल्याबद्दल’ शिक्षा फर्माविली गेली!
(लेखक माजी खासदार आणि रावत’स नेचर अकॅडमीचे संस्थापक आहेत.)