आगारांचे बळकटीकरण, गाव तेथे एसटी, खासगी वाहतुकीशी सक्षम स्पर्धा, अशी अनेक ध्येये उराशी घेऊन १९४८ पासून आजपर्यंतच्या ६६ वर्षांत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने अलीकडे आपला वेग बहुधा कमी केला असावा. महाराष्ट्राच्या लाल-काळ्या मातीतून गावोगावी पोहोचलेली एसटीची लालपिवळी बसगाडी ही खरे म्हणजे, प्रवासी वाहतूक करणारी केवळ एक परिवहन सेवा नव्हती. महाराष्ट्राच्या जनजीवनाशी या सेवेची नाळ जोडली गेली होती. कालांतराने तर एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी बनून गेली. ग्रामीण महाराष्ट्राशी जडलेल्या नात्यामुळे, संस्कृतीची देवाणघेवाण करणाऱ्या सांस्कृतिक दूताची भूमिकाही या एसटीने कळतनकळत बजावली. पण काळावर विकासाचे ठसे उमटू लागले, तेव्हा मात्र एसटीने अंग चोरून घेतल्याचे जाणवू लागले. प्रवाशांना आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासाची आमिषे दाखवत खासगी वाहतूकदारांनी एसटीच्या मक्तेदारीला आव्हान देण्यास सुरुवात केली आणि ग्रामीण संस्कृतीशी जवळीक असलेली ही एसटी, बहुधा या झगमगाटी स्पर्धेच्या केवळ जाणिवेनेच गांगरून गेली. राज्यातील एसटी महामंडळावर सरकारचे नियंत्रण आहे. म्हणजे या महामंडळाच्या पाठीशी सरकार उभे आहे. तरीही आव्हानांना तोंड देण्याची महामंडळाची ताकदच जणू दिवसागणिक क्षीण होत चालली आहे. महामंडळाच्या कोणत्याही स्थानकावर या पराभूत भावनेच्याच छटा उमटलेल्या दिसतात. कळकटपणा आणि अस्वच्छता हीच जणू एसटीच्या गावोगावीच्या स्थानकांची ओळख होऊन राहिली आहे. शहरांमधील झगमगाटाच्याच आडोशाला उभी असलेली ही एसटीची स्थानके त्यामुळेच गर्दी असूनही एकाकी वाटू लागतात आणि साहजिकच नव्याची सवय झालेला प्रवासी नाइलाजाने तिकडे पाठ फिरवू लागतो. एसटीच्या डोलाऱ्याला गेल्या काही वर्षांत सुरू झालेल्या डळमळीतपणामागे हेही एक कारण आहे. नव्या स्पर्धेत उतरण्याच्या क्षमतेचे खच्चीकरण करण्याचे जणू ठरविलेलेच असावे अशा थंडपणाने हे सारे सुरू असल्याचे प्रवाशांनाही जाणवू लागले आहे. आता त्यामागील कारणांचाही सुगावा लागण्यास सुरुवात झाली आहे. गावोगावी सार्वजनिक वाहतुकीला खासगी आणि आरामदायी पर्याय उपलब्ध होऊ लागल्यानंतर हा डळमळता डोलारा व्रताच्या भावनेने सावरत राहणे आता बहुधा अवघड होऊ लागले आहे. दुकान फारसे चालत नसेल, तर मनुष्यबळ आणि पैसा गुंतवून ते रडतखडत सुरू ठेवण्यापेक्षा, ती जागा एखाद्या व्यवसायाला भाडय़ाने देण्यात किंवा जागेचे व्यापारीकरण करण्यात अधिक व्यवहारीपणा असतो, हा आजच्या व्यापारयुगाचा मंत्र आहे. एसटीलाही आता याच व्यापारीपणाचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. गावापासून तालुक्यापर्यंत आणि जिल्ह्य़ापासून राजधानीपर्यंत सर्वत्र मालमत्तेचे जाळे असलेल्या या महामंडळाच्या जागांना आता व्यापारीकरणाची स्वप्ने पडू लागली आहेत. राज्यातील सुमारे अडीचशे आगारांपैकी सव्वादोनशे आगारे तोटय़ात चालल्याची बाब आज उघडकीस आली असली, तरी महामंडळाला याची जाणीवच नव्हती असे समजणे योग्य ठरणार नाही. कारण यापैकी काही आगारे तर गेल्या दहा वर्षांपासूनच तोटय़ात आहेत. ही आगारे बंद झाली, तर कालांतराने या जागांचे व्यापारीकरण करता येईल आणि जुनाट, लालपिवळ्या गाडय़ा पळविण्यापेक्षा केवळ जागेच्या व्यापारीकरणातूनच पैसा कमावता येईल, असा व्यवहारी विचार भविष्यात कधी आकाराला येताना दिसलाच, तर ते आश्चर्य ठरणार नाही. असे झाले, तर वाहतूक क्षेत्राच्या एखाद्या कोपऱ्यात भविष्यात कुठेतरी एसटीची बस एकाकीपणाने धावताना दिसेल, पण तोवर तिचा ‘जीवनवाहिनी’चा तोरा मात्र संपलेलाच असेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा