शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला शिक्षा होता कामा नये, असे आपल्या न्यायाचे तत्त्व आहे. माणसांच्या जगात अजूनही या न्यायाला मोल असताना निसर्गाने मात्र हा न्याय पायदळी तुडवावा, हे अनाकलनीय आहे. पुणे जिल्ह्य़ाच्या आंबेगाव तालुक्यात भीमाशंकराच्या सावलीत वसलेल्या जेमतेम पाऊणशे उंबरठय़ांच्या निरपराध माळीण गावाला एवढी जबर शिक्षा देताना निसर्गाने माणसांच्या या न्यायाला का जुमानले नाही?.. या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल येथे एक हसतेखेळते गाव होते. सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेल्या, हिरवाईने वेढलेल्या आणि साक्षात भीमाशंकर आपल्या पाठीशी आहे, या जाणिवेने आश्वस्त असलेल्या या गावाला निसर्गाने नाहक जबर शिक्षा दिली. डोंगरात सुरू असलेल्या सपाटीकरणामुळे, झाडांच्या कत्तलीमुळे डोंगर भुसभुशीत झाला आणि उभा डोंगरकडा संकटाचे रूप घेऊन या निष्पाप गावावर कोसळला. साखरझोपेतले सारे गाव चिखलमातीच्या ढिगाऱ्याखाली गेले. शेकडो माणसे, मुकी जनावरे, लहान मुले दुसऱ्या दिवशीही ढिगाऱ्याखाली अडकलेली आहेत. अशा कोणत्या, कोणी केलेल्या गुन्ह्य़ाची शिक्षा निसर्गाने या निष्पाप गावाला का द्यावी, असा प्रश्न आज शोकाकुल महाराष्ट्राच्या मनामनांत दाटला आहे. माणसांचे जग स्वार्थी झाले आहे, निसर्गाचे नियम माणसांच्या जगात बेमुर्वतखोरपणे पायदळी तुडविले जात आहेत, अशी खंत वारंवार व्यक्त होते. हे खरे असले तरी एकाही निरपराध्याला शिक्षा होऊ नये या न्यायाचा माणसांच्या जगात आदरच केला जातो. मग निरपराध माळीण गावावर संकट लादताना निसर्गाला या न्यायाचा विसर का पडला असेल?.. त्या डोंगराच्या माथ्यावर कुठे सपाटीकरण सुरूही असेल, हिरवाईची कत्तलही झाली असेल, पण गावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या असलेल्या आणि त्याच्या आधारावरच आश्वस्त असलेल्या या गावाला त्या डोंगरानेच अशी शिक्षा का द्यावी, या प्रश्नाचे काहूरही आज मनामनांत दाटले आहे. ‘इथे एक गाव होते’, असे सांगताना मनाला होणाऱ्या वेदना असह्य़च असतात. दु:खाचे कढ गिळतच ही शोकवार्ता सर्वदूर पोहोचविण्याचे अप्रिय काम माध्यमांना करावे लागले. या भयाण दुर्घटनेत अनेक कुटुंबे काळाच्या उदरात अदृश्य झाली. काही मोजके जीव केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावलेही. पण या संकटाची वेदना एवढी तीव्र आहे, की आपण वाचलो याचा आनंद मानावा अशी स्थिती नाही. निसर्गाचा न्याय अनाकलनीय असतो. माणसांच्या जगातील न्यायाचे नियम कदाचित त्याला लागू होत नसतील, पण माळीण गाव आज तेथे नाही हे वर्तमान शाश्वत काळासाठी वास्तवात राहणार नाही. आपत्तीच्या वेदना पुसून पुन्हा हे गाव उमेदीने उभे राहिले पाहिजे. इतिहासातून आणि भूगोलाच्या नकाशावरूनही, सहजासहजी पुसला जावा, इतका वर्तमानकाळ तकलादू राहता कामा नये. या संकटातून बचावलेल्यांच्या व्यथा, आपली माणसे आणि आपल्या जिव्हाळ्याचे सारे काही गमावल्याच्या वेदना आणि दु:खात प्रत्येक संवेदनशील मन सहभागी आहे. आता या गावाचे अश्रू पुसून, मागे राहिलेल्यांच्या भविष्याला साथ देण्यासाठी, ते घडविण्यासाठी पुढे येण्याचीही गरज आहे. निसर्गासोबत झालेल्या कोणत्या तरी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुन्ह्य़ाची माळीण गावाला भोगावी लागलेली ही शिक्षा आहे, एक प्रकारे हे जगासाठी भोगलेले प्रायश्चित्त आहे, याची जाणीव ठेवून निसर्गाच्या न्यायाचा आदर करण्याचा धडा घेतला तरी या गावातील निरपराध्यांना ती आदरांजली ठरेल. उद्या पुन्हा तेथे ते गाव उभे असेल, अशी उमेद जागविण्यासाठी तेथील उदास मनांना आधार देण्याची गरज आहे.
अश्रू पुसायचेत, उमेदीसाठी..
या गावाकडून असा काय भयंकर गुन्हा घडला होता, की ज्याची शिक्षा म्हणून हे संपूर्ण गावच क्षणात होत्याचे नव्हते व्हावे?.. काल येथे एक हसतेखेळते गाव होते.
First published on: 01-08-2014 at 02:02 IST
मराठीतील सर्व अन्वयार्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stand up with malin