तारे स्वयंप्रकाशी असतात आणि ग्रह परप्रकाशित, हे शाळकरी वयापासून शिकवले जाते. तारे लुकलुकतात, चमकतात, ते त्यांच्या स्वयंप्रकाशी अस्तित्वामुळे. हे वैज्ञानिक सत्य आपल्याला भिडते, दररोज जाणवत राहते. मग ते केवळ वैज्ञानिक तथ्य राहत नाही. आपल्या जगण्याचा भाग बनते. स्वयंप्रकाशी अस्तित्व असलेल्या माणसांनाही मग ताऱ्याची उपमा दिली जाते. खगोलविज्ञानासारखी अवघड अभ्यासशाखा आणि सामान्यजनांचे भावविश्व यांची अनपेक्षित मोट बांधण्याचे सामथ्र्य आकाशातल्या ताऱ्यांकडे आज आहे. खगोलीय अभ्यासासाठी आज असलेली अत्याधुनिक साधने नव्हती, तेव्हाही ताऱ्यांचा अभ्यास करावा, असे माणसाला वाटलेच आणि नक्षत्रांची, त्यांच्या राशींची कल्पना मानवाने केली. त्याच सुमारास केव्हा तरी ‘पोर नक्षत्रावाणी’ असल्याचे म्हणण्याची सुरुवात झाली असेल. वैज्ञानिकांचा आधुनिक अभ्यास, त्यातून निघालेले निष्कर्ष आदींचे तपशील समजण्यास कितीही कठीण असतील, पण सामान्यजनांना त्याबद्दल कुतूहल असते किंवा निर्लेप, निरागस कौतुकही असते. हिग्ज बोसॉनच्या- म्हणजे ‘देव-कणा’च्या शोधामागे हेच कुतूहल आणि कौतुक होते. तितका खर्चिक आणि तितका गाजणारा नव्हे, पण शास्त्रीय निष्कर्षांचे सारे गुण असलेला आणि तरीही जनसामान्यांना रंजक वाटू शकणारा एक शोध पंधरवडय़ापूर्वीच ‘रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’ या संस्थेने स्वीकृत केला आहे. हा ताजा निष्कर्ष असा की, विश्वात तारे निर्माण होण्याची प्रक्रिया मंदावली आहे.. तारे निर्माण होण्याचा वेग ऐन भरात असतानाच्या काळाशी- म्हणजेच ११ अब्ज वर्षांपूर्वीच्या काळाशी- गेल्या एखाद अब्ज वर्षांची तुलना केली, तर ११ अब्ज वर्षांपूर्वी जितके तारे नव्याने निर्माण होत, त्यापेक्षा ९५ ते ९७ टक्क्यांनी कमी तारे गेल्या अब्ज वर्षांत निर्माण होताहेत.
एखाद्या कारखान्याचे उत्पादन घटते, मंदीच्या फटक्यामुळे एखाद्या देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन घटते, परंतु ते ९५ टक्क्यांनी घटणे ही चिंताजनकच बाब म्हणायला हवी. असे का झाले याचे उत्तर मिळेपर्यंत संबंधितांना चैन पडू नये, अशीच ही स्थिती. मात्र ताऱ्यांचा ‘उत्पादन-दर’ किंवा ‘जननदर’ घटला आहे, या निष्कर्षांमागे काही पूर्वसिद्ध ठोकताळे आणि सर्वमान्य निष्कर्ष यांचे पाठबळ होते. विश्वाच्या इतिहासाचा वेध आत्ताच्या प्रगत ज्ञान-साधनांनी घेण्याचा हा एक प्रयत्न होता. त्यामुळे, विश्वाची उत्पत्ती महास्फोटाद्वारे किंवा ‘बिग बँग’मुळे १३ अब्ज ४० कोटी वर्षांपूर्वी झाली आणि त्या वेळी आपल्या सूर्यमालेतील सूर्यापेक्षाही किती तरी अधिक मोठे तेज:पुंज ‘जन्मास’ आले, तेजाचे हे महापुंज आपल्याच अंगभूत भौतिकी व रासायनिक भारांमुळे फुटत गेले आणि त्यापासून लहान-मोठे तेजोमय तारे तयार होत गेले, त्यांपैकी मोठे तारेही फुटत जाऊन आणखी नवे तारे निर्माण होतच असतात, या साऱ्या निष्कर्षांचा आधार ताज्या निष्कर्षांला आहेच, पण नवे आहे ते, या साऱ्या प्रक्रियेच्या वेगाचा अंदाज घेणे. वेगात बदल होत गेले का, वेग मंदावला असेल तर कधी, या प्रश्नांचा वेध घेण्यासाठी जगभरातील आठ खगोलशास्त्रज्ञांचे पथक कामास लागले होते. या पथकाचे प्रमुख होते नेदरलँड्सच्या लेडन विद्यापीठातील खगोलवैज्ञानिक डॉ. डेव्हिड सोब्राल. या पोरसवदा दिसणाऱ्या तरुण शास्त्रज्ञाचा १९ पानी निबंध रॉयल अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीच्या संशोधनपत्रिकेत- म्हणजेच जर्नलमध्ये नोव्हेंबरात प्रसिद्ध झाला. त्याआधी सप्टेंबरातही असा निष्कर्ष आपल्या पथकाने काढला असल्याचे डेव्हिड सांगत होता, पण आता त्याला विद्वन्मान्यतेचे वलय आले आहे. तारे निर्माण होण्याचा वेग मोजण्याचे एकक काय? ताऱ्यांची संख्या मोजायची का? पण ती तर खगोलीय इतिहासात आधीच घडून गेलेली घटना आहे आणि किती तारे फुटले व त्यापासून आणखी किती निर्माण झाले हे मोजत राहणे अशक्य आहे. डेव्हिड व त्याच्या पथकाने या मोजणीसाठी जे नवे एकक किंवा माप वापरले ते, एका घन-प्रकाशवर्षांत किंवा क्युबिक लाइट इयरमध्ये ‘प्रति मिनिट किती टन तारे निर्माण होऊ शकत होते’ असे अनवट आहे! आजपासून १३.४ अब्ज वर्षे ते ११ अब्ज वर्षे, या काळात मिनिटागणिक ३५ ते ३२ टन तारे निर्माण होत, तर हे ‘उत्पादन’ ९.२ अब्ज वर्षे ते ७.६ अब्ज वर्षे या काळात निम्म्याहून खाली- म्हणजे मिनिटाला ताऱ्यांचे फक्त १५ ते १० टनच उत्पादन होऊ शकावे, इतके खाली आले. ही घसरणही लाजेल, असे आत्ताचे प्रमाण आहे : मिनिटाला एक टनाचा तारा निर्माण होण्याची मारामार, अशी विश्वाची आजची स्थिती आहे! टन म्हणजे हजार किलोग्रॅम, तर सध्या ३५० किलोग्रॅम एवढेच ताऱ्यांचे उत्पादन विश्वात होऊ शकते आहे.
‘तारे अपुला क्रम आचरतिल.. ..जन पळभर म्हणतिल हाय हाय, मी जाता राहिल कार्य काय’ ही राजकवी भा. रा. तांबे यांनी गीतबद्ध केलेली कल्पना आजवर अत्यंत व्यावहारिक वाटे, पण आता तारे आपला क्रम आचरताना दिसत नाहीत, म्हणून जनांनी हाय म्हणावे की काय, अशी ही स्थिती! असो. मुलांचीदेखील वाढ पहिल्या काही वर्षांत भरभर होत जाते आणि प्रौढपणी खालावूच लागते, तसे मानावे का ताऱ्यांच्या ‘उत्पादना’चे? की, महाराष्ट्रीय किंवा मराठी भाषकच नव्हे, तर एकंदर साऱ्या समाजात स्वयंप्रकाशी नेतेमंडळी कमी-कमी होऊ लागल्याचा जो निराशावाद अनेकांना अनेकदा खुणावतच असतो, त्याला विश्वाने दिलेली दाद म्हणायची ही?
कल्पान्त अशी कल्पना भारतीय शास्त्रांत आहे. पाश्चात्त्य वैज्ञानिक ज्या ‘बिग बँग’पासून विश्वाची उत्पत्ती मोजू पाहतात, ती कल्पान्ताची सुरुवात होती. तेजाच्या पुंजांचे फुटणे- विखरून जाणे अभद्रच, असा तेजोपासक भारतीयांचा विश्वास कल्पान्ताच्या कल्पनेने दुणावणार, यात नवल नाही. तेव्हा तारे जन्मण्याचा वेग हा कल्पान्ताकडे जाण्याचा वेग, असे एक विश्लेषण करता येते. परंतु याला आणखीही एक बाजू आहे. ताऱ्यांचा निर्मिती-वेग, म्हणजेच तेज-पुंजांतील फुटीचा वेग असाच राहिला असता, तर या अफाट विश्वातील जी आकाशगंगा आपली आहे आणि तिच्या सूर्याभोवती आपली पृथ्वी फिरते आहे, ती आकाशगंगादेखील स्थिर राहिली असती का, शंकाच आहे. अस्थैर्य माजलेलेच राहिले असते, तर सूर्यमालादेखील टिकू शकली असती का? ती टिकली, कारण विश्वातल्या घडामोडींचा वेग मंदावून स्थैर्याकडे झुकला. शिवाय, आपली मिल्की वे आकाशगंगा तर अवघ्या दीड अब्ज वर्षांपूर्वीची आहे. तिच्यात घडामोडींचे बाळसे कायम आहे आणि तिच्या एका कडेवर आपली सूर्यमाला असल्याने आपल्याला त्रास नाही, हेही समाधान आहेच.
त्याहीपेक्षा मोठे समाधान मानायचे ते, डेव्हिडच्या निष्कर्षांचे नाते अद्याप तरी जनसामान्यांच्या भावविश्वाशी जुळलेले नाही, याचे! देव-कण असल्याच्या अनुमानाइतका ताऱ्यांच्या उत्पादन-क्षमतेबद्दलचाही निष्कर्ष रंजक आहे खरा; पण तो सामान्यांना फार भिडला नाही, हे बरे झाले. एका स्वयंप्रकाशी ताऱ्याचे एकदा विभाजन झाले की पुन्हा आणखी स्वयंप्रकाशी तारे निर्माण होण्याची शक्यता मंदावते, हे कटुसत्य जाणवले असते, तर आज आपल्याभोवती असलेले सारे तारे म्हातारे आहेत किंवा होणार आहेत, हेही डाचत राहिले असत्

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा