परिस्थितीचे अन् भोवतालाचे आकलन होण्यासाठी आपल्या चित्ताने त्याला व्यापून टाकण्याची किमया आत्मसात व्हायला हवी. भलत्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित झाल्याने आत्मभान सुटते आणि आपला प्रतिसाद चुकीचा उमटतो. योगातील उपरागाने हे टाळता येते..
कॉलेजमध्ये वर्गापेक्षा जास्त वेळ जिममध्ये पोहण्याच्या तलावावर किंवा आमचे स्पोर्ट्स डायरेक्टर गौस महंमद यांच्या ऑफिसमध्ये गप्पा मारण्यात/ ऐकण्यात जायचा. दुपारची जेवणाची वेळ झाली की आपापले डबे उघडून आम्ही जेवायला बसायचो. आमचा एक मित्र खूपच धनाढय़ घरातला होता. त्याचा नोकर भलाथोरला डबा घेऊन येत असे. मित्राचे जेवण झाल्यावर तो त्याच्या हातावर पाणी घालत असे आणि अदबीने हात पुसायला पुढे टॉवेल धरीत असे. एक दिवस त्याचा नोकर सायकलवरून पडला आणि त्याला दवाखान्यात न्यावे लागले. आमचा दोस्त आपला वाट पाहात राहिला. आम्ही त्याला आमच्याबरोबर डबा खायला बसविले. माझ्या डब्यातली गवारीची भाजी आणि पोळी खाऊन त्याने मत दिले की, माझ्या डब्यातले जेवण सर्वात चविष्ट लागते आहे.
तो बॉक्सिंग उत्तम खेळत असे. माझे खेळ म्हणजे पोहणे आणि जिम्नॅस्टिक्स. त्याच्यामुळे मीही बॉक्सिंग खेळायला शिकलो. स्पर्धामध्ये भाग घेतला नाही तरी त्याच्यासारख्या चांगल्या खेळाडूंना सराव देण्याइतपत प्रगती झाली. त्या खेळात लढवय्या योद्धय़ाचीच मानसिकता लागते. ती निर्माण झाल्यामुळे पुढे पोलीस खात्यातल्या नोकरीला चांगलाच उपयोग झाला. माझ्या दोस्ताने राष्ट्रीय पातळीवरही कर्तृत्व गाजविले, पण शिक्षण संपल्यावर त्याने खेळही संपविला आणि वडिलांच्या व्यवसायात लक्ष घातले. बरेच चढ-उतार झाले तरी तो आपल्या व्यवसायात आब राखून आहे. कठीण आर्थिक परिस्थितीतून वर आलेल्या व्यक्तींचे कौतुक वाटते तसेच मला माझ्या या मित्राच्या कर्तबगारीचेही कौतुक वाटते.
सत्ता आणि संपत्ती लाभलेल्या व्यक्तींना प्रलोभनेही भरपूर असतात. त्यांच्याभोवती तोंडपूजकांचे कोंडाळे जमते. ही सारीच मंडळी संधिसाधू असतात. त्यांच्याच सल्ल्याने वागायला सुरुवात केल्यावर सत्ता आणि संपत्ती दोन्ही टिकत नाहीत आणि मग लोभी मित्रमंडळीही सोडून जातात. अशी असंख्य उदाहरणे मी पाहिलेली आहेत. हिताच्या गोष्टी सांगणाऱ्या, जवळच्या व्यक्तींपेक्षा तज्ज्ञ आणि विद्वान माणसांचा सल्ला पटण्याऐवजी स्तुतिपाठकांचा सल्ला आणि सहवास आवडायला लागला की त्या माणसाचे भवितव्य धोक्यात आले, असे पक्के समजावे.
राजेमहाराजे, लोकनेते, प्रथितयश कलाकार आणि खेळाडू अशा साऱ्याच समाजधुरिणांना हा धोका असतो, त्यापासून फार सांभाळून राहणे आवश्यक आहे. ज्याच्याजवळ उत्तम गुणवत्ता असेल त्याने कोणाचा सल्ला घेताना अतिशय काळजीपूर्वक घ्यायला हवा. खेळाडूंच्या बाबतीत सांगायचे झाले तर हा सुजाणपणा अनेकदा त्यांच्या पालकांमध्येही दिसत नाही. मग त्या खेळाडूंना कटू अनुभवाला सामोरे जायची पाळी येते. शेवटी कोणत्याही क्षेत्रातली कर्तबगारी ही स्वत:च्या निर्णयशक्तीवरच अवलंबून असते. ही निर्णयशक्ती खेळाच्या मैदानावरच उत्तम तयार होते. ती जोपासायची सवय लावून घ्यायला हवी.
दुसऱ्यांच्या सल्ल्याची बाब एकवेळ बाजूला ठेवू, पण आपणच जे निर्णय घेतो तेच अनेकदा गैरसमजावर आधारित असतात. समोर घडत असलेल्या घटना पूर्वग्रहामुळे आपल्याला नीटशा समजत नाहीत किंवा आपले लक्षच चुकीच्या गोष्टींवर किंवा भलत्याच विचारांत गुंतलेले असले तरी हा धोका राहतो. एखाद्या वस्तूचे, व्यक्तीचे, घटनेचे वास्तविक स्वरूप काय आहे त्याचे आकलन होण्यासाठी आपल्या चित्ताने त्याला व्यापून टाकणे गरजेचे आहे. याला योगामध्ये उपराग असे म्हणतात. ज्या वस्तूशी चित्ताचा उपराग होत नाही ती अज्ञातच राहते. मग आपल्या साऱ्या क्लिष्ट वृत्ती म्हणजे वाईट सवयी गोंधळ घालायला लागतात. समोर घडणाऱ्या गोष्टी समजत नाहीत, भलत्याच बाबींवर लक्ष केंद्रित होते, विपर्यास होतात, गैरसमज होतात आणि प्रतिसाद चुकीचे यायला लागतात. भूतकाळाचा शोक, भविष्याचे भय मनात थैमान घालतात. आत्मविश्वास नाहीसा होतो. कित्येकदा तर यशाच्या शिखरावरून अपयशाच्या खोल दरीत कोसळायला होते.
कर्तबगार व्यक्तीत आणि सर्वसाधारण व्यक्तीत हाच मोठा फरक असतो. प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा जो आपल्या अंत:करणावर ताबा ठेवू शकेल, आपले लक्ष कशावर राहायला हवे याचे भान राखून प्रतिसादावर नियंत्रण ठेवील तोच विजयी होत राहतो. नियमित योगाभ्यास करीत राहणाऱ्याला हे साधते, असा अनुभव आहे. कारण चित्ताच्या वृत्ती म्हणजे आपल्या सवयीचं आलंबन म्हणजे ज्यावर एकाग्र व्हायचे त्याऐवजी प्रलोभनांकडे खेचतात. वर्तमानात मन स्थिर होऊ न देता त्याला भूतकाळ आणि भविष्यकाळात भिरभिरत ठेवतात आणि ते प्रयत्नाने वर्तमानात आणले तरी एकाग्र होऊ न देता भलतेच निर्णय घ्यायला लावतात. या सवयींचा निरोध हा क्रियायोग आणि नंतर अष्टांग योगानेच शक्य व्हायला लागतो.
मी एका योगीराजांना प्रश्न विचारला की, योगसाधना करायला अधिकारी व्यक्ती कोण आणि त्याला सुरुवात केव्हा करता येते. त्यावर त्यांनी सांगितले की, २४ वर्षे वयापर्यंत नैसर्गिक शक्ती जास्त असते त्या वयात सुरुवात करण्याने सर्वात जास्त फायदा होतो. ५० वर्षे वयापर्यंत शक्ती कमी होत गेलेल्या असल्या तरी काही प्रमाणात शाबूत असतात त्यामुळे त्या वयात सुरुवात केली तरी बराच फायदा होतो. मी विचारले, त्यानंतरच्या लोकांचे काय? यावर ते म्हणाले की, नंतर नंतर योगाभ्यास करण्याची क्षमता खूपच कमी झालेली असते. साऱ्याच योगिक उपासना करणे शक्य होत नाही, पण शरीरात जोपर्यंत श्वसनक्रिया चालू आहे आणि भूक लागून अन्नग्रहण होत आहे तोपर्यंत योगसाधन सुरू करून ते चालू ठेवता येते आणि त्यानेही इतर कोणत्याही औषध इलाजापेक्षा जास्त उपयोग होतो. पण मग योगाच्या इतर अंगांपेक्षा दीर्घश्वसनाचे प्राणायाम व मंत्र जप यावर भर द्यावा. मानसपूजेचे सोपे ध्यान आणि श्वासासोबत करायचा सोहं जप यांचा खूप उपयोग होऊ शकतो.
सत्ता, संपत्ती, कीर्ती, ज्ञान, कौशल्य, सेवा करण्याची ओढ या साऱ्या गोष्टी जवळ असल्या तर उत्तमच आहे; पण हे सारे जरी नसले तरी आरोग्य उत्तम राखता येणे महत्त्वाचे आहे. सरत्या काळात व्याधींनी पछाडून इतरांना काळजीत पाडण्यापेक्षा आपण आपले पाहू शकावे आणि वय वाढेल तसे इतरांना आशीर्वाद देण्याची शक्ती ज्येष्ठतेने आपल्यात येत राहते ती वापरीत इतरांचे भलेच चिंतीत जगावे. आतापर्यंत जे जमले नाही त्याबद्दल शोक करीत न बसता जमेल तसे योगसाधन करावे.
आता आशीर्वादासारखीच शाप देण्याची शक्तीसुद्धा वयाबरोबरच येत असते. ती वापरल्याने साऱ्यांचेच नुकसान होत असते. तसा मोह कोणाला होऊ नये आणि ज्यांना आशीर्वाद द्यावेत असे वाटेल अशाच व्यक्ती तुमच्या संपर्कात याव्यात, हीच शुभेच्छा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा