केतन पारिखने मार्च १९९९ ते मार्च २००१ या दोन वर्षांत २९०० कोटी रुपये देशाबाहेर पाठवले.. संगणकाच्या जमान्यातही, एकाच वेळी कळ दाबण्यासारख्या युक्त्या शोधून हे व्यवहार सुखेनैव पार पडले; त्यात ‘क्रेडिट स्विस फर्स्ट बॉस्टन’ (सीएसएफबी) ही कंपनी धनप्रवाह सुरू ठेवण्यासाठी नियम वाकवत होती!
हर्षद मेहता आणि केतन पारिख या दोन्हीही बाजारसांडांची कथा अनेक बाबतींत मिळतीजुळती आहे. त्यांच्या कारवायांबद्दल जागरूक व्हावे अशा कितीतरी गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. पण नियामक (रेग्युलेटरी) संस्थांनी त्याची गंभीर दखल घेतली नाही. हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आल्यानंतर अनेक चौकशी अहवालातले तपशील उपलब्ध होते. परंतु कुणावरच फार गंभीर कारवाई झाली नाही. हर्षदछाप घोटाळ्यामधले परकीय व स्वदेशी सरकारी बँकांचे बहुतेक अधिकारी फार ओरखडासुद्धा न येता मोकळे राहिले. बँका, शेअर बाजार, उद्योगपती यांच्यामधले साटेलोटे उघडकीला आले तरी कुणा उद्योगपतीला कधी कारवाईची झळ पोहोचली नाही. उदा. रिलायन्स इंडस्ट्रीज, अपोलो टायर्स, युनायटेड ब्रुअरिज, व्हिडीओकॉन, स्टरलाइट. त्यामुळे असे उद्योग करणाऱ्या उद्योजकांचे धाडस बळावले. केतन पारिख घोटाळ्यामध्ये नवी भर पडली. उदा. झी, एचएफसीएल, रणबक्षी, कोप्रान निरमा.
हर्षद/केतन वा त्यासारख्या अनेक छोटय़ामोठय़ा सांडांचा हैदोस उपजण्या/ सुरू राहण्यासाठी ‘लक्ष्मी प्रसादा’चा ओघ लागतो. हर्षद व अन्य सांडभैरवांना विदेशी-देशी बँकांच्या सरकारी रोखे हाताळणाऱ्यांनी हा ओघ पुरवला. केतन पारिखच्या काळात एका नवीन कारंज्याची करामत नजरेस आली. हे कारंजे ‘विदेशी वित्तीय गुंतवणूकदार’ या वर्गात लपले होते. वित्तीय गुंतवणूक करणाऱ्या परकीय कंपन्यांवर काही निराळे र्निबध असतात. या विदेशी गुंतवणूकदार कंपन्या देशोदेशीच्या वित्तीय बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात. अन्य देशातल्या बचतदारांची गुंतवण्याजोगी वित्तीय बचत त्यांच्यामार्फत जगभर फैलावते. असे विदेशी बचतदार आपली गुंतवणूक करण्याजोगती वित्तीय बचत या विदेशी गुंतवणूक कंपन्यांकडे सोपवतात. कंपन्यांचे काम काय तर ही रक्कम त्यांनी आपली जाण व अक्कलहुशारी वापरून योग्य त्या देशातल्या शेअर किंवा रोखे बाजारांत गुंतवावी, जेणेकरून मूळ देशात मिळाला असता त्यापेक्षा चढा परतावा मिळावा. असे परकी बचतदार थेट गुंतवणूक करू शकत नाहीत, कारण त्यांना तशी परवानगी नसते. दुसरे कारण : प्रत्येक गुंतवणूकदाराची वैयक्तिक गुंतवणूक तुलनेने छोटी असते. अशा अनेक बचतदारांची मोट बांधून त्यातून लठ्ठ गुंतवणूक साकारण्यासाठीचे मध्यस्थ म्हणजे वित्तीय कंपन्या. या कंपन्यांच्या बचतदारांना सबअकौंटंट म्हणतात.
या (विदेशी गुंतवणूक) कंपन्यांमार्फत होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ बराच आहे. त्या लोंढय़ांमध्ये एक प्रवाह स्वदेशी गुंतवणूकदारांचा आहे. कारण काही स्वदेशी उद्योगकर्त्यांची अनुच्चारित मालमत्ता व उत्पन्न छुपेपणाने परदेशात हस्तांतरित होते. असे करण्याचे अनेक मार्ग आहेत. उत्पन्न लपविणे, त्यावरील कर चुकविणे आणि संपत्ती नजरेस पडू न देणे हेच या हस्तांतरामागचे प्रमुख हेतू, परंतु परदेशात नेऊन तिथे ती काय पाडून ठेवायची? तिथेच गुंतवणूक करण्याचा मार्ग सुकर नसल्यास ती परत इथे आणण्याचा खटाटोप करावा लागतो. त्यासाठी विदेशी गुंतवणूक कंपन्यांचा राजमार्ग उपयोगी पडतो. परदेशात दुसरी कंपनी काढायची. त्या कंपनीने विदेशी गुंतवणूकदार कंपनीकडे आपली वित्तीय मत्ता गुंतवणुकीसाठी सुपूर्द करायची. अशा कंपन्यांना ओव्हरसीज कॉर्पोरेट बॉडीज (ओसीबी) म्हणतात. व्यक्तींच्या वा खासगी मंडळींच्या नावेदेखील विदेशी गुंतवणूक कंपन्या गुंतवणूक पत्करतात. या पत्करण्याला सहभागपत्रे (पार्टिसिपेटरी नोट्स) म्हणतात.
अशी सहभागपत्रे व ओसीबी ही परदेशांत बेहिशेबी मत्ता व उत्पन्न असणाऱ्यांचा बुरखा आहे असा प्रवाद गेली अनेक वर्षे आहे. केतन पारिख घोटाळ्यात हा छुपा प्रवाह वाहात होता. तो प्रवाह ‘क्रेडिट स्विस फर्स्ट बॉस्टन’ या विदेशी गुंतवणूक कंपनीमार्फत येत होता. केतन पारिखच्या पाच कंपन्या मॉरिशसमध्ये होत्या. ब्रेन्टफील्ड होल्डिंग लिमिटेड केन्सिंग्टन इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड’, ‘वेकफील्ड होल्डिंग्ज युरोपियन इन्व्हेस्टमेंट’ आणि ‘फार ईस्ट इन्व्हेस्टमेंट’. यापैकी ‘युरोपियन..’ व ‘फार ईस्ट..’ या कंपन्यांचे भांडवल होते अवघे दहा डॉलर! पहिल्या तीन कंपन्यांची बँक ओळख करून देणारी कंपनी होती केतन पारिखची ‘ट्रायम्फ इंटरनॅशनल.’
या कंपन्यांच्या गुंतवणूक प्रवाहाची ये-जा क्रेडिट स्विस फर्स्ट बॉस्टन (सीएसएफबी) मार्फत चाले. विदेशी गुंतवणूक कंपन्यांवर अशा प्रकारचा व्यवहार करण्यास बंधने होती. पण नैतिकतेचा टेंभा मिरवणरी सीएसएफबी ते सर्व धाब्यावर बसवून उलाढाल करीत होती. सेबीने केतन पारिख प्रकरणाची चौकशी केली तेव्हा या व अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीला आल्या.
केतन पारिख, त्याच्या मॉरिशसमधल्या नामधारी कंपन्या याचे खूपसे व्यवहार सीएसएफबीमार्फत वाहत होतेच. पण विशेष म्हणजे विक्री झाली की शेअर पदरी पडण्याआधीच सीएसएफबी त्याचे पैसे देऊन मोकळी होत असे. उदा., आता अलीकडे बोलबाला झालेल्या अदानी एक्सपोर्ट्सच्या तीन लाख शेअरची विक्री तेव्हा रु. २५ कोटींना झाली. शेअर्स दुसऱ्या दिवशी दाखल होणार होते, पण त्याचे पैसे एक दिवस आधीच चुकते झाले होते. या व्यवहारांची छाननी करताना सेबीच्या लक्षात आले, की सीएसएफबीमार्फत केतनला ७ ते १४ दिवसांच्या मुदतीचा कर्जपुरवठा होत होता. प्रत्येक व्यवहारात वरपांगी दिसणारी दलालीरक्कम वेगवेगळ्या दराने आकारली होती. कारण ही दलाली नसून कर्जावरचे व्याज दलालीच्या बुरख्याआड दिले जात होते.
सेबीने उलाढालींचे तपशील ताडून पाहिले तेव्हा ध्यानात आले, की हे कर्ज देवघेवीचे व्यवहार बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर नोंदवलेल्या खरेदी व्यवहारात लपले आहेत. उलाढालीच्या दुसऱ्या बाजूला ट्रायम्फ इंटरनॅशनल, मीलन महेंद्र हेम सिक्युरिटीज, विसारिया सिक्युरिटीज हे केतनचेच दलाल होते. म्हणजे केतन सीएसएफबीच्या सबअकौंटच्या बुरख्याखाली विक्री करत होता व भारतीय गुंतवणूकदार म्हणून स्वत:च खरेदी आणि विक्रीदेखील करत होता. तात्पर्य, सीएसएफबीच्या आडून पैसे येत होते आणि बाहेरही जात होते. सेबीच्या एप्रिल २००१च्या पडताळणीनुसार, मार्च १९९९ ते मार्च २००१ या दोन वर्षांत सीएसएफबीमार्फत रु. २९०० कोटी एवढी रक्कम बाहेर पाठविली गेली होती.
या छाननीत आणखी एक तपशील उघड झाला. एवढय़ा मोठय़ा आकाराची उलाढाल होते तीदेखील संगणकीकृत व्यवस्थेमार्फत. ही व्यवस्था तर व्यक्तिनिरपेक्षपणे खरेदीदार आणि विक्रीदाराचे ‘लग्न’ लावून देत असते. मग ही स्वत:च वधू+वरपक्ष दोन्ही असणारी मंडळी नेमकी किंमत व ऑर्डर याचा मेळ साधतात तरी कशी? तर दोन्ही बाजूंनी अगोदर संगणकात कोणता शेअर, किंमत, शेअरसंख्या असे तपशील भरले जात, पण कोणीच कळ दाबत नसे. दोन्ही बाजूंनी हे तपशील भरले, की हे ‘दुतर्फा’ दलाल एकमेकांशी फोनवर संपर्क करायचे आणि म्हणायचे रेडी एक-दोन-तीन! असे म्हणून एकदमच कळ दाबायचे. या व्यवहाराला लागणारा वित्तपुरवठा सीएसएफबीमार्फत व्हायचा व त्याची जुळणी/देवघेव याच बीएसई, एनएसईच्या संगणकी अंगणात व्हायची! या व्यवहारात सीएसएफबीच्या बाजूच्या केतनच्याच ओसीबी विकत होत्या व केतनचे दलाल खरेदी करीत होते; त्याचे व्यवहार एकदम बरोबर जुळत होते. या भानगडीबद्दल सीएसएफबीला सवाल केला तर त्यांनी उत्तर दिले, की केतनच्या ऑर्डर मोठय़ा असायच्या म्हणून त्यांनी आपला अनुरूप खरेदीदार शोधावा अशी खबरदारी आम्ही घ्यायचो. वस्तुस्थिती अशी होती की केतनला अल्पावधीसाठी वित्त दिले जायचेच, पण जर त्याच्याकडून परतफेडीत हलगर्जी झाली तर स्टॉक एक्स्चेंजच्या सेटलमेंट गॅरंटी फंडातून त्या रकमेची फेड निश्चित व्हायची. याशिवाय ‘काल्लार काहार’ नामक एका कंपनीच्या सोंगाआड सीएसएफबी स्वत:च्या खातर पैसे गुंतवत होती, कमवत होती व अन्य सहभागपत्राच्या बुरख्याआड असे अनेक व्यवहार करीत होती. तात्पर्य, केतन पारिखच्या निमित्ताने आणखी एक लक्ष्मीप्रवाह मंदिर उघडकीला आले.
*  लेखक अर्थतज्ज्ञ असून नियोजन मंडळासह अन्य ठिकाणी ते सल्लागार होते.  त्यांचा ईमेल: pradeepapte1687 @gmail.com
=========

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा