‘‘फाळणीची आठवणदेखील काढू नका पण ती विसरूही नका.’’  या कृष्णा सोबती यांच्या आर्जवापासून ‘‘मंटो आता आपल्याला नेऊन कोठल्या खड्डय़ात लोटणार’’ या जाणिवेपर्यंत नेणाऱ्या फाळणीविषयीच्या या संग्रहांतील अनेक कथा आपल्याला हलवून टाकतात. बधिर करतात आणि शरमवतातही.
इतिहास हा भूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यात सतत चालणारा संवाद असतो. तो तत्कालीन कागदपत्रे, नेत्यांची भाषणे वा कमिटय़ांचे आणि लष्कराचे रिपोर्ट यातून पूर्णपणे ऐकू येत नाही. त्या उलथापालथीच्या कालखंडात सापडलेल्या व्यक्ती कोणत्या मन:स्थितीतून जात होत्या याचा अंदाज येत नाही. इतिहास कोरडा वाटू लागतो. ज्या समाजगटांच्या राजकीय, धार्मिक हक्कांची किंवा आर्थिक स्थितीची भाषा त्यांचे नेते उच्चरवाने करत असतात, त्यांची बोच वर्तमानाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खाणाऱ्या जनतेला किती असते याचा शोध घेतल्यास इतिहासाचे अपूर्ण चित्र आणखी थोडे पूर्ण होते आणि त्याला चेहरा मिळतो. तो लोभस असतोच असे नाही पण मानवी असतो.
भारताच्या फाळणीतून जे साहित्य निर्माण झाले ते पाहता वरील गोष्ट पूर्णपणे खरी मानावी लागते. फाळणीतल्या अनुभवातून भरडून निघालेल्या अनेक भारतीय व पाकिस्तानी लेखकांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांतून त्या वेळच्या परिस्थितीचे चित्रण केले आहे. अलोक भल्ला यांनी संपादित केलेले ‘स्टोरीज अबाऊट द पार्टिशन ऑफ इंडिया’ या तीन खंडांतल्या ग्रंथाची आठ वर्षांतच दुसरी आवृत्ती आली आहे. याचा चौथा खंडही आता प्रसिद्ध झाला आहे. इंतज़ार हुसेन या प्रसिद्ध पाकिस्तानी लेखकापासून सलील चौधरी या बंगाली लेखकापर्यंत (जे नंतर संगीतकार म्हणून नावाला आले) अनेक कथाकार यात आहेत. तसेच नव्या आवृत्तीत महिला लेखकांचीही संख्या जास्त आहे. चारही खंडांत कर्रतुलन ऐनहैदर या भारतीय मुस्लीम लेखिकेपासून पोपटी हिरानंदानी या पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सिंधी लेखिकेपर्यंत महिला लेखिकांचाही समावेश यात आहे.
हिंदू आणि मुस्लीम यांचे संबंध कधीच सरळ नव्हते, पण १९३५ नंतर दुहीचे बीज वेगाने पसरत गेले आणि त्याचे द्वेषमूलक हिंसाचारात जे रूपांतर झाले ते अभूतपूर्व होते. समान परंपरेचा धागा जो दोन्ही धर्मातील विचारवंतांनी जोपासू पाहिला होता तो उद्ध्वस्त झाला याची अनेक उदाहरणे अलोक भल्ला यांनी प्रस्तावनेत दिली आहेत. त्या वेळच्या संवेदनशील मनांची तगमग मंटोने समर्थ शब्दांत दुसऱ्या एका ठिकाणी व्यक्त केली आहे- ‘‘समझ में नहीं आता था कि मैं कहाँ हूँ। बम्बई में हूँ या कराची में या लाहोर में हँू।.. तीन महिने तक मेरा दिमाग कोई फैसला नहीं कर सका। ऐसा मालूम होता था कि पर्देपर एक साथ कई फिल्में चल रहीं है। आपस में गडमड। सारा दिन कुर्सी पर बैठा ख्यालो में खोया रहता था।.. कोशिशों के बावजूद हिंदुस्तान से पाकिस्तान को और पाकिस्तान से हिंदुस्तान को अलग न कर सका। बार बार दिमाग में यह उलझन पैदा करनेवाला सवाल गँुजता.. वह सब जो अखंड हिंदुस्तान में लिखा गया है, उसका मालिक कौन होगा? क्या उसको भी बाँटा जायेगा?..’’
धार्मिक द्वेष दर्शवणाऱ्या कथा, राग आणि उपेक्षा प्रगट करणाऱ्या कथा, पश्चात्तापाच्या आणि सांत्वनाच्या कथा आणि जो प्रदेश सोडून यावे लागले त्याच्या रम्य आठवणी काढणाऱ्या कथा असे ढोबळ भाग या कथांचे संपादकाने पाडले आहेत. यातल्या जो प्रदेश सोडून यावे लागले त्याच्या स्मरणाच्या कथा गलबलून टाकणाऱ्या आहेत. सैद महम्मद अश्रफ या पाकिस्तानी लेखकाच्या ‘सेपरेटेड फ्रॉम द फ्लॉक’ म्हणजे ‘थव्यातून अलग पडलेले पक्षी’ या कथेतला पोलीस असलेला नायक आपल्या ड्रायव्हरला घेऊन स्थलांतरित पक्ष्यांची शिकार करायला गेला असताना त्याची जुन्या मित्राशी गाठ पडते. उत्तर प्रदेशातल्या एका छोटय़ा खेडय़ात त्या दोघांनी आपले बालपण आणि तारुण्य घालवलेले असते. तेथली झाडे, गल्ल्या, रस्ते, बाजार त्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या मुली या सर्वाच्या आठवणी निघतात. शेवटी नायक स्थलांतरित पक्ष्यांची शिकार न करताच परत येतो. त्याचा ड्रायव्हर गुलामअली त्याला प्रवासात विचारतो, ‘‘आता तुमचे नातेवाईक तेथे कोणी नाहीत का?’’ नायक म्हणतो, ‘‘नाही, कोणी नाही. सारे येथे पाकिस्तानात येऊन वसले. सगळे साले घाबरट होते. मीदेखील!’’ जेव्हा ड्रायव्हर त्या नातेवाईकांना घाबरट म्हणण्यावर सौम्य आक्षेप घेतो तेव्हा नायक म्हणतो, ‘‘गडय़ा, तुला न समजणाऱ्या तत्त्वज्ञानातला तो थोडा अवघड विषय आहे.’’ नायकाची असाह्यता स्पष्ट आहे. पण हे सारे    म. गांधींच्या विचाराशी अजाणतेपणाने किती जवळ येते! २० एप्रिल १९४७ला गांधी लिहितात, ‘‘आपण एवढी वर्षे गुलाम आणि भित्रे राहिलो आहोत की, धिक्कार करण्याजोगी कृत्ये करण्याची जराही लाज आपल्याला वाटत नाही.’’
असीफ अस्लम फारुकी या लेखकाची ‘लॅण्ड ऑफ मेमरिज’ ही कथा अतिशय भावगर्भ आहे. विशेष म्हणजे लेखकाचा जन्म फाळणीनंतर तब्बल आठ वर्षांनी पाकिस्तानात झालेला आहे. मुलांचा विरोध असताना त्यांना घेऊन वडील पाकिस्तानातून भारतात फत्तेगढला येतात. मुले चिकित्सक नजरेतून गाव बघत असतात तर वडिलांचा जीव त्या गावात गुंतलेला असतो. पाकिस्तानात जेव्हा वडील ऑल इंडिया रेडिओ ऐकताना फत्तेगढच्या बिपीनचे नाव ऐकतात तेव्हा म्हणतात, ‘‘गावात दोन बिपीन होते. हा कुठला आहे कोण जाणे!’’
प्रसिद्ध हिंदी लेखक मोहन राकेश यांची ‘ढिगाऱ्याचा मालक’ या कथेतला म्हातारा पाकिस्तानमधून अमृतसरच्या आपल्या जुन्या गल्लीत आपल्या घराची अवस्था पाहायला येतो. तो वर्षांनुवर्षे तेथे राहिलेला असतो, पण आता त्याला कोणी ओळखही दाखवत नाही. उलट संशयाने त्याच्याकडे बघितले जाते. जेथे त्या म्हाताऱ्याने नवीन घर बांधलेले असते तिथे केवळ ढिगारा आता उरलेला असतो. त्या घराची अशी अवस्था गल्लीतल्या ज्या गुंडाने केलेली असते त्यालाच तो निरागसपणे विचारतो, ‘‘रख्खा पहिलवान तू असताना असे कसे झाले?’’ आणि त्या बलदंड माणसाचे पार पाणी पाणी होते.
विशेष म्हणजे पाकिस्तानातून अनेक जण भारतात नंतर त्यांचे गाव पाहायला, मित्रांना आणि नातेवाईकांना भेटायला आल्याच्या कथा यात आहेत. पण एकही हिंदू पाकिस्तानात त्याच कारणासाठी गेल्याची कथा यात नाही. त्याचे कारण उघड आहे.
भारताची फाळणी धार्मिक आधारावर झाली होती. पुढे पाकिस्तानपासून बांगलादेश भाषेच्या निकषावर वेगळा झाला. उम इ उम्मरा या बंगाली लेखिकेच्या कथेत हा विषय तिने हाताळला आहे. पूर्व पाकिस्तान मुस्लीम प्रदेश म्हणून बिहारी मुस्लीम कुटुंबं तेथे स्थलांतरित होते. पण त्या ठिकाणची संस्कृती, भाषा बंगाली असते, त्यात या उर्दू बोलणाऱ्या कुटुंबाची फार ओढाताण होते. कथेतले एक पात्र म्हणते, ‘‘उर्दू भाषा म्हणून मला खूप आवडते, पण त्याचा उपयोग आमच्या संस्कृतीच्या खच्चीकरणासाठी होत असेल तर ते सहन केले जाणार नाही.’’ एकाच धर्माचे वा समान भाषिकांचे राज्य म्हणजे न्यायाचे राज्य नव्हे हे त्यांच्या लक्षात येईपर्यंत फार उशीर झालेला असतो. फाळणीत लाखो लोक स्थलांतरित झाले. साहजिकच संग्रहातल्या अनेक कथा रेल्वे फलाट वा गाडीत घडलेल्या आहेत. ‘द ट्रेन हॅज रिच्ड अमृतसर’ या भीष्म सहानीच्या कथेत साधी माणसेदेखील संधी मिळाली की सूड घ्यायला कशी उद्युक्त होतात ते पाहायला मिळते.
स्त्रिया आणि मुले यांना कोणत्याही दंगलीत सर्वाधिक झळ पोचते. त्यांच्या कथा विषण्ण करणाऱ्या आहेत. अहमद कासमी यांच्या कथेत दंगलीत मुलगा गमावलेला परमेश्वर सिंग शिखांच्या तावडीतून एका छोटय़ा मुसलमान मुलाला वाचवतो व त्यांच्या दबावाखातर त्याला शीख म्हणून वाढवण्याचा अयशस्वी प्रयत्न करतो. मुलाच्या मनातली शिखांबद्दलची घृणा जात नाही. शेवटी परमेश्वर सिंग मुलाला सीमेवर पोचवतो आणि तेथल्या सैनिकाला सांगतो, ‘‘मी त्याचा धर्म त्याला परत द्यायला आलेलो आहे.’’
कृष्णा सोबती या लेखिकेने संपादकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, पळवून नेलेल्या व मारल्या गेलेल्या स्त्रियांचा नंतर कुटुंबात कोणी उल्लेखही करत नसे. पळवून नेलेल्या काही मुस्लीम स्त्रिया नंतर भारतातून सोडविण्यात आल्या तेव्हा मुसलमान कुटुंबांनी त्या स्वीकारल्या. शिखांचा दृष्टिकोनही उदार होता, पण हिंदू परिवारात तसे घडणे सहज नसे. काही कथांमध्ये नवरा बेपत्ता झाल्यावर त्याच्या पत्नीने तो मेला आहे असे समजून दुसऱ्या व्यक्तीबरोबर घरोबा करावा आणि काही दिवसांनी पहिल्या नवऱ्याने हजर व्हावे! हे काही कथांमध्ये आलेले आहे.
मंटोच्या ‘मोझेल’, ‘तोबा टेकसिंग’, ‘थंडा गोश्त’, ‘खोल दो’ या गाजलेल्या कथांचा अंतर्भाव या संग्रहात आहे. जाणकारांना त्या माहीत आहेत. त्यांचे इतर कथांपेक्षा वेगळेपण हे की मंटोच्या संतापाचा स्फोट त्यात झालेला आहे. भावनांच्या एवढय़ा आवेगाने त्या वाचताना थकल्यासारखे होते आणि मंटो आता आपल्याला नेऊन कोठल्या खड्डय़ात लोटणार अशी भीती वाटत राहते. फाळणीच्या हिंसाचारात देखील एकमेकाला मदत करण्याच्या, स्वत:चा जीव धोक्यात घालून दुसऱ्याला वाचवण्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही कथा अशा प्रसंगांवर बेतलेल्या आहेत. काळ्याकुट्ट मेघांना जरतारी किनार कधी तरी का होईना पण दिसते. पण मंटो ती बघण्याचेच नाकारतो. मंटोबद्दल लिहिताना संपादकाने युरिपीडसचा आधार घेतला आहे- ‘‘मी भीषण आणि बीभत्स एवढे काही बघितले आहे की, आता काही चांगले आणि मंगल असे दिसले तरी मला ते ओळखता येत नाही.’’
कथासंग्रंह वाचल्यावर जावे आणि या साऱ्याचा कोणावर तरी सूड घ्यावा असे वाटत नाही. कमी ताकदीचे लेखक असते तर कदाचित तसे झाले असते. चूक आणि बरोबर, हिंदू आणि मुसलमान किंवा भारत आणि पाकिस्तान यांच्या पलीकडे जाऊन एकेकाळी सख्खे शेजारी असणाऱ्या माणसांच्या या कथा आहेत. ग्रंथाचे सारे सार इब्न इन्शा या पाकिस्तानी लेखकाच्या छोटय़ाशा कथेत आहे. तो विचारतो आहे, ‘‘पाकिस्तानात कोण राहते? तर पंजाबी, सिंधी आणि बंगाली! पण हे सर्व तर हिंदुस्तानातही राहतात. मग फाळणी कशासाठी?’’ तो पुढे म्हणतो, ‘‘ती चूक होती.’’ कृष्णा सोबतीनेही म्हटले आहे, ‘‘फाळणीची आठवणदेखील काढू नका पण ती विसरूही नका.’’ साऱ्या कथा वाचल्यावर या दोन्हींच्या मधले असे काही तरी आपल्याला वाटत राहते.
स्टोरीज अबाऊट द पार्टिशन ऑफ इंडिया (खंड १ ते ३) :
संपादक : अलोक भल्ला,
मनोहर पब्लिकेशन, नवी दिल्ली
पाने : ७४३, किंमत : १२९५ रुपये.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा