भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांच्यावर मध्यंतरी आलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे लगोलग त्यांचे आत्मचरित्रही प्रकाशित झाले. त्यानंतर लगेचच भारतीय महिला मुष्टियोद्धापटू मेरी कोम यांच्यावरील चित्रपटाची घोषणा झाली. प्रियंका चोप्रा ही अभिनेत्री मेरी कोमची भूमिका करणार असल्याच्या बातम्याही प्रकाशित झाल्या. चित्रपटाला अजून सुरुवात झाली की नाही माहीत नाही, पण कोमचे आत्मचरित्र मात्र पुढील आठवडय़ात प्रकाशित होत आहे.
मेरी कोमचे आयुष्य ही संघर्षांची आणि मेहनतीची नारीगाथा आहे. त्यामुळे त्यातून उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा मिळेल.. अपयशाने खचून गेलेल्यांना उभारी येईल.. आणि जनसामान्यांना अविरत मेहनत-कष्ट करत राहिलो तर यश मिळतंच, याची साक्ष पटेल.
ईशान्य भारतातील मणिपूर येथे एका सामान्य शेतमजुरांच्या कुटुंबात जन्मलेल्या कोम यांनी पुरुषांची मक्तेदारी मानल्या गेलेल्या मुष्टियुद्ध या खेळात गौरवास्पद अशी कामगिरी केलेली आहे. त्यांनी महिला मुष्टियुद्धात आतापर्यंत चार वेळा जागतिक विजेतेपद मिळवले आहे. जागतिक क्रमवारीत त्या चौथ्या स्थानावर आहेत.
जुळ्या मुलांची आई झाल्यावरही त्यांनी चीनमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत त्यांच्या कारकिर्दीतील चौथे विजेतेपद मिळवले होते, हे विशेष.
मेरी कोमच्या या आत्मचरित्राचे नाव ‘अनब्रेकेबल’ असे आहे. या शीर्षकाप्रमाणेच कोम यांची कारकीर्दही राहिली आहे. पदकांमागून पदके आणि पुरस्कारांमागून पुरस्कार जिंकत असतानाही त्यांनी मुष्टियुद्धात मुली पुढे याव्या म्हणून त्यांच्या प्रशिक्षणासाठी स्वतंत्र अकादमी काढली आहे.
या त्यांच्या आत्मचरित्रातून भारतीय मुलींसाठी एक कणखर व दमदार वास्तव समोर येते. ते अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे, हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा