आपल्या राजस्थानातली गवार मोठय़ा प्रमाणात विकली गेली.. तिला मागणी वाढली. म्हणजे इतकी की, पुढल्या काही वर्षांसाठी गवारीचे सौदे ठरलेले आहेत..
एवढं काय गवारीचं, असं विचारायचं नाही.. ती फक्त भाजी नाही.. तिच्यात रासायनिक द्रव्यं आहेत..
तेल उत्खननासाठी उपयोगी पडणारी!
म्हणजे आपल्याला तशा बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. याचा अर्थ आपली बुद्धी कमी असते असं नाही, पण आपण विचारच करत नाही त्या दिशेनं. त्यामुळे काही काही गोष्टी सुचतच नाहीत आणि सुचत नाहीत म्हणून दिसत नाहीत आणि म्हणून कळतही नाहीत. उदाहरणार्थ कुठे कळलं होतं आपल्याला की मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री म्हणून आपली बाजारपेठ खुली केली, परदेशी सौंदर्य कंपन्या आपली नवनवी उत्पादनं घेऊन भारतात आल्या आणि भारतीय मुली भसाभस अशा मिस वर्ल्ड किंवा मिस युनिव्हर्स वगैरे म्हणून निवडल्या जायला लागल्या. १९९१ साली नरसिंह राव यांच्या सरकारात मनमोहन सिंग अर्थमंत्री झाले. १९९१ साली त्यांनी आपला पहिला अर्थसंकल्प मांडला. एरवी अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्यात असतो, पण निवडणुका, त्यात राजीव गांधी यांची हत्या वगैरेमुळे तो मांडायला जुलै महिना उजाडला. तरीही तो अर्धवटच होता, म्हणजे ज्याला लेखानुदान म्हणतात तसा. त्यांचा खरा अर्थसंकल्प १९९२ सालचा. त्या अर्थसंकल्पात भारतीय बाजारपेठ अनेकांसाठी खुली करून देण्यात आली. परदेशी कंपन्यांना हपापलेल्या मध्यमवर्गाची एकदम ३५ कोटींची तयार बाजारपेठ मिळाली. मोठमोठय़ा सौंदर्यप्रसाधन कंपन्यांनी भारतीय चेहरे फुलू लागले.
पुढच्याच वर्षी ऐश्वर्या राय मिस वर्ल्ड झाली. जागतिक कंपन्या इतक्या भारतावर खूश होत्या की, त्याच वर्षी सुष्मिता सेनसुद्धा मिस युनिव्हर्स की काय झाली. मग सपाटाच लागला भारतीय मुलींचा. नवा बाजार मिळाल्यानं या कंपन्या इतक्या फिदा होत्या भारतावर की, त्यांना युक्ता मुखीसुद्धा चालली अशाच कोणत्या तरी मिस पदासाठी.
तेव्हा कुठे आपल्याला हे कळलं होतं की, बाजारपेठा खुल्या करण्याचा आणि या स्पर्धाचा संबंध असतो ते.
हे झालं एक उदाहरण. अशी अनेक सापडतील. ताजंच घ्या. गवार या तशा एरवी दुर्लक्षित म्हणता येईल अशा भाजीचं. आता गवार ही काही अशी भाजी नाही की ती सणासुदीला, लग्नात वगैरे करायची असते. तशी ती दुर्लक्षित. मिळाली तर फार काही आनंद होईल अशी नाही आणि नाही मिळाली तर दु:ख व्हावं असंही काही नाही तिच्यात, पण सध्या जगात गवारीचा जितका बोलबाला आहे तितका कोणत्याच भाजीचा नाही. मग ते अळूचे फदफदे असो की भरली वांगी.
झालंय असं की, गवारीच्या शेंगेपासून एक प्रकारचा चिकट द्राव निघतो तो फार महत्त्वाचा घटक असतो अनेक प्रक्रियांसाठी. या शेंगा बियांसकट कुस्करून तो काढतात. द्रव पदार्थ घट्ट करण्यासाठी तो प्राधान्याने वापरला जातो, म्हणजे अनेक चांगल्या आइस्क्रीम्समध्ये गवार असते हे आपल्याला माहीत नसेल किंवा दात स्वच्छ करण्याची हमी देणाऱ्या टूथपेस्ट्समध्येही हा गवारीचा चीक असतो. त्यामुळेही गवारीला मोठीच मागणी असते बाराही महिने, कारण बाराही महिने जगात कुठे ना कुठे उकाडा असतोच तेव्हा आइस्क्रीमला मागणी असतेच तिकडे आणि टूथपेस्ट तर काय बाराही महिने लागतेच. तेव्हा गवारीला काही तसं मरण नाही.
पण हे दोन्ही उपयोग काही आताच आढळले आहेत असं नाही. कित्येक वर्षांपासून गवार या कामांसाठी वापरली जातीये. मग आताच असं काय घडलंय की गवारीच्या भावात प्रचंड चढउतार होतायत?
गवारीच्या आयुष्यात आलेला हा नवा घटक आहे तेल. म्हणजे खायचं तेल नाही, तर मोटारी, विमानांत वगैरेत इंधन म्हणून वापरतात ते तेल. आता हे तेलाचे साठे पश्चिम आशियाच्या आखातात मोठय़ा प्रमाणावर आहेत हे आपल्याला माहीत असतंच. शिवाय नायजेरिया, व्हेनेझुएला अशा अनेक देशांतही ते आहेत. हे तेल म्हणजे जगाचं इंधनच. त्यामुळे त्याला मोठी मागणी असतेच असते. अगदी बाराही महिने. यातला सर्वात मोठा मागणीवाला देश म्हणजे अमेरिका. जगात रोजच्या रोज जे काही तेल जमिनीतनं निघतं त्यातलं २६ टक्के त्या एकटय़ाच देशाला लागतं. त्यामुळे अमेरिका पाण्यापेक्षा तेलावरच जगते, असं म्हणतात ते काही खोटं नाही. हा तेलाचा पुरवठा जगभरातून.. त्यातही प. आशियाच्या वाळवंटी देशांतून.. अगदी सुरळीत सुरू असतो अमेरिकेला.
पण २००१ सालच्या ११ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये जे काही घडलं त्यामुळे अमेरिकेला धक्का बसला. सौदी अरेबिया या तेलसंपन्न देशातल्या अतिरेक्यांनी विमानं पळवली आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर ते पेंटॅगॉन अशा ठिकठिकाणी आपटवत प्रचंड मोठा हादरा दिला अमेरिकेला. तेलसंपन्न इस्लामी देशात जन्मलेल्या या हिंसाचारानं अमेरिकेला एक धडा दिला.
तो म्हणजे आता तेलासाठी या अरबांवर अवलंबून राहायचं नाही.
तेव्हापासून अमेरिकेनं अथक प्रयत्न सुरू केले आणि जमिनीतून मिळेल त्या मार्गानं तेल काढायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढले. त्यातला एक म्हणजे शेल ऑइल. यात समुद्र, जमीन जिथे कुठे कितीही खोलवर तेलाचा अंश जरी असेल तरी तो बाहेर काढला जातो. भयंकर जिकिरीचं असतं ते. म्हणजे आधी समुद्राचा तळ गाठायचा.. आणि मग तिथपासनं खोलवर खणायला सुरुवात करायची आणि हे खणणं वरनं खाली याच दिशेनं असतं असं नाही, तर आडवंही असतं. म्हणजे जमिनीत थोडं खाली जायचं आणि मग आडवं खणायला सुरुवात करायची. जिथे कुठे तेल आहे तिथे पोचायचं.
आपली गरीब गवार तिथे कामाला येते. तेल आढळलं की पाणी, मीठ आणि गवारीचा चीक यांचा प्रचंड मोठा झोत तिथं सोडला जातो. तसं केलं की, हा तेलांश ज्याला कशाला चिकटून असेल त्याच्यापासून सुटतो. मग तो गोळा करून बाहेर काढला जातो. यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका असते गवारीच्या चिकाची. एरवी सगळे चीक काही तरी चिकटवतात. गवारीचा चीक तेलाला सोडवतो.
गवारीचा हा गुण लक्षात आल्यापासून प्रचंड प्रमाणावर मागणी वाढलीये तिची जगभरात आणि त्यात आपली छाती अभिमानाने गवारभर तरी फुलावी अशी गोष्ट म्हणजे जगात सगळ्यात जास्त गवार भारतात पिकते. जगाच्या बाजारपेठेतली ८० टक्के गवार ही या भारतवर्षांतली असते. त्यामुळे या गवारीला प्रचंड मागणी आली. इतकी की तिचे दर गेले १६८० डॉलर प्रतिक्विंटल इतके. म्हणजे साधारण ९२ हजार ४०० रुपये इतके. याचा अर्थ किलोला ९२ रुपये इतकी दराची उंची या शेलाटय़ा शेंगेने गाठली. गवारीचा हा चीक त्या काळात २७,००० डॉलर्स प्रतिटन या इतक्या प्रचंड दराने विकला जात होता. त्या काळात.. म्हणजे यंदाच्या मार्च महिन्यात.. भारतात धान्य, भाज्यांच्या वायदा बाजारात गवारीची तुफान नोंदणी झाली. इतकी की राजस्थानातली सर्वच्या सर्व गवार पुढच्या काही वर्षांसाठी नोंदलीदेखील गेली. राजस्थान का? तर आपल्या देशातली ८० टक्के गवार या वाळवंटी राज्यात पिकते. भारतातून निर्यात होणाऱ्या गवारीतही त्यामुळे ६० टक्क्यांपेक्षाही अधिक वाढ झाली.
तर त्या काळात हॅलिबर्टन या मोठय़ा तेल कंपनीनं चार महिने पुरेल इतकी गवार साठवून ठेवली. तेव्हा गवारीचा आंतरराष्ट्रीय बाजारातला दर होता किलोला ७०० रुपये इतका. नंतर मग या गवारीची साठेबाजी इतकी झाली की १४ डॉलर प्रतिकिलोवरनं दर एकदम पाच डॉलर प्रतिकिलो इतके पाडले गेले. या गवार खेळातला सगळ्यात मोठा खेळाडू म्हणजे ही हॅलिबर्टन कंपनी. अनेकांना माहीतही नसेल, अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष डिक चेनी यांची ही कंपनी. आता या कंपनीकडे गवारीचे सगळ्यात मोठे साठे आहेत.
कोणाचं नशीब कशानं आणि कधी उजळेल सांगता येत नाही. तेव्हा तात्पर्य हे की, मंडईत कधी गेलात तर गवारीकडे पाहून तोंड वेंगाडू नका. महाग झाली असेल तर तिचा बिचारीचा दोष नाही तो, हे आता कळलंच असेल.
त्यासाठीच ही गवारगाथा आपण समजून घ्यायला हवी.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा