या वर्षांतला बॉलिवुडमधला सर्वात मोठा एव्हेन्ट कुठला असेल? काही सिनेमाप्रेमी म्हणतील अजून नक्की सांगता येणार नाही, काही म्हणतील अजून र्वष संपायचं आहे हो, आत्ताच घाई कशाला! पण परवा म्हणजे सोमवारी बॉलिवुडमधील सर्वात मोठा कार्यक्रम होऊ घातला आहे. अमिताभ बच्चन आणि आमिर खान हे दोन दिग्गज अभिनेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. या दोघांच्या हस्ते होणार आहे साक्षात यूसुफखान ऊर्फ दिलीपकुमार यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन. त्याचं नाव आहे – ‘द सबस्टन्स अँड द श्ॉडो’. स्थळ अर्थातच मध्य मुंबईतलं फाइव्ह स्टार हॉटेल असेल. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचीही या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. दिलीपकुमार म्हणजे खानदानीपणा, अभिनयातली अभिजात नजाकत आणि उर्दू तहज़्‍ाीब. बॉलिवुडमध्ये श्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या या कलाकाराचं बालपणापासूनचं आयुष्य या पुस्तकातून जाणून घेता येणार आहे. तब्बल सहा दशकांची चित्रपटीय कारकीर्द, त्यातील संस्मरणीय चित्रपट, राजकारणाशी आलेला संबंध, सायराबानू आणि मधुबाला यांच्याशी असलेलं नातं, देविका राणी यांनी ‘ज्वार भाटा’ (१९४४) मध्ये दिलेली पहिली संधी, सायराबानूला अंधारात ठेवून त्यांनी केलेलं दुसरं लग्न, त्यांची खेळांविषयीची आवड या गोष्टीही या आत्मचरित्रातून उलगडतील अशी आशा आहे. चित्रपटीय कारकीर्द लखलखीत, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र विसंगत वर्तन, हेही दिलीपकुमार यांच्या बाबतीत पाहायला मिळालेले आहे. मात्र असे असले तरी प्रसिद्ध लेखक लॉर्ड मेघनाद देसाई हे दिलीपकुमार यांना नेहरूविन हिरो मानतात. ‘नेहरूज हिरो – दिलीपकुमार इन द लाइफ ऑफ इंडिया’ असं पुस्तकच त्यांनी लिहिलं आहे. त्याची प्रचीती नेहरूंच्या नायकाच्या या आत्मचरित्रातून निदान काही प्रमाणात तरी यायला हरकत नाही.

Story img Loader