कवी, गीतकार, चित्रपट दिग्दर्शक, संवादलेखक, अशी बहुआयामी प्रतिभा असलेल्या गुलज़ार यांची नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आणि ही गोष्ट ज्याला कळते त्याला गुलज़ारांच्या लेखणीच्या गुणवत्तेविषयीही सांगण्याची गरज नाही. त्याची आवश्यकताच नाही मुळी.
तेव्हा थेट सुरुवात करू. गुलज़ार यांनी मुलांसाठी लिहिलेल्या गोष्टींचे हे पुस्तक, ‘बोस्कीज पंचतंत्र’. खरं तर हे विधान थोडं दुरुस्त करून असं म्हणावं लागेल की, गुलज़ारांची एकुलती एक मुलगी, मेघना हिच्यासाठी त्यांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना दिलेलं हे नवं रूप आहे. मेघनाला गुलज़ारांनी लाडानं ‘बोस्की’ असं नाव ठेवलं, कारण तिचा पहिला स्पर्श मुलायम वस्त्रासारखा होता. आपल्या मुलांना कुणी वस्त्राचं नाव ठेवत नाही, पण गुलज़ारांसारख्या अलवार प्रतिभेच्या कवीनं ठेवलं!
बोस्की लहान असताना तिची आई, प्रसिद्ध अभिनेत्री राखी, तिला बंगाली बडबडगीते म्हणून दाखवत असे. आईची गीतं संपल्यावर बाबाची पाळी आली. बोस्कीला गोष्टी हव्या असत. गुलज़ार नवनव्या गोष्टी बनवून तिला सांगत, पण रोज मुलीला नवी गोष्ट देणार कुठून? मग गुलज़ारांनी पंचतंत्रातल्या गोष्टींना नवं रूप देऊन त्या सांगायला सुरुवात केली. म्हणजे गोष्टी पंचतंत्रातल्या पण गुलज़ारांनी सांगितलेल्या. त्यामुळे त्या काव्यमय झाल्या. मोठय़ाने वाचता येऊ लागल्या आणि त्यांचा आनंदही घेता येऊ लागला. शिवाय त्यात आजच्या काळानुसार बदल केल्याने त्यांची खुमारीही वाढली. म्हणून हे गुलज़ारनिर्मित बोस्कीसाठीचं पंचतंत्र आहे. म्हणजे लहानग्यांसाठीचं.
आचार्य विष्णू शर्मा यांनी लिहिलेल्या गोष्टी ‘पंचतंत्र’ या नावाने ओळखल्या जातात. या गोष्टींचे पाच आहेत, म्हणून त्यांना ‘पंचतंत्र’ असे म्हटले जाते. एका राजाची तिन्ही मुलं आळशी असतात. नादान आणि बेजबाबदार मुलांमुळे राजा चिंतेत असतो. एके दिवशी राजाकडे विष्णू शर्मा नावाचा ब्राह्मण जातो. तो या तीन मुलांना सुधारण्यासाठी गोष्ट सांगायला सुरुवात करतो. त्याच या गोष्टी.
भारतीय साहित्यातील नीतिकथा या जागतिक पातळीवर मान्यता पावलेल्या आहेत. त्यात पंचतंत्राचा समावेश केला जातो. अकराव्या शतकापर्यंत पंचतंत्र पाश्चात्त्य जगात पोहोचले. तिथेही त्याला मोठी लोकप्रियता मिळाली आणि ती आजही टिकून आहे. मठ्ठपणा आणि हुशारी, खोडकरपणा आणि शहाणपण, चातुर्य आणि कपट या मानवी नीतिमूल्यांची ओळख प्राण्यांच्या पात्रांद्वारे करून देण्याची कल्पकता अभिनव म्हणावी अशी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा