केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचे डावपेच एरवीही सुरू असतातच, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ रोजी ठरलेल्या नागपूरभेटीत काय होणार, याकडे लक्ष आहे..
लोकसभेतील यशाने हुरळलेल्या भाजपमध्ये जशी नेतृत्व व मुख्यमंत्रिपदावरून राज्यभरात उत्सुकता व चर्चा आहे तशीच प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यातील शीतयुद्धाचीही चर्चा रंगू लागली आहे. पक्षात महत्त्वाच्या स्थानी असलेले हे दोन्ही नागपूरकर नेते काँग्रेस नेत्यांसारखे उघडपणे भांडत नसले तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र हे भांडण पुढे नेण्याचा जोरदार प्रयत्न चालवला आहे. संघ मुख्यालयात सुरू झालेल्या या शीतयुद्धाकडे म्हणूनच राज्याचे लक्ष आहे.
अभ्यासू नेता अशी प्रतिमा असलेले फडणवीस प्रदेशाध्यक्षपदी नकोत, ही गडकरींची इच्छा होती. म्हणून त्यांनी शेवटपर्यंत सुधीर मुनगंटीवारांचा आग्रह धरला. नागपुरात दुसरे सत्ताकेंद्र नको, यामागील हा हेतू. ती सल असल्याप्रमाणे, फडणवीसांनी नंतर स्वतंत्रपणे निर्णय घेणे आरंभले. यामुळे आता गडकरींच्या गोटात अस्वस्थता आहे. पदवीधर मतदारसंघात नागपूरचे महापौर अनिल सोलेंना उमेदवारी मिळावी, ही गडकरींची इच्छा होती. त्याला सुरुंग लावण्यासाठीच फडणवीसांकडून संदीप जोशींचे नाव समोर करण्यात आले. या वादात तेव्हाचे पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, राज्यसभा सदस्य अजय संचेती यांनी या वादात फडणवीसांना साथ दिली. मुळात या संचेतींना खासदारकी मिळाली ती गडकरींच्या कृपेने. गडकरींच्या या निर्णयामुळे माध्यमात मोठे वादळही उडाले होते. संचेतींच्या विविध उद्योगांमुळे गडकरींना बदनामीची झळही सोसावी लागली. आता तेच संचेती फडणवीसांच्या बाजूने व गडकरींच्या विरोधात उभे ठाकले असल्याचे चित्र बघावयास मिळते.
फडणवीसांनी सोलेंना विरोध करण्याचे कारणही मजेशीर आहे. पालिकेच्या निवडणुकीत सोलेंसाठी सुरक्षितप्रभाग फडणवीसांनी त्याच्या मतदारसंघात मिळवून दिला. त्यासाठी संजय बंगाले या समर्थकाला उमेदवारी नाकारण्यात आली. याच बंगालेंना स्वीकृत सदस्य म्हणून घ्या, हा फडणवीसांचा आग्रह सोलेंनी मान्य केला नाही. हा राग मनात असल्याने फडणवीसांनी सोलेंची, पर्यायाने गडकरींची अडवणूक केली व उमेदवारी जाहीर करण्यास पाच महिने उशीर लावला. या इतिहासाची उजळणी यासाठी की, आता धरमपेठचा फडणवीसांचा बंगला आणि गडकरींचा महालवरचा वाडा यातील अंतर वाढत चालले आहे. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या अनेक घडामोडी, समर्थकांमध्ये सुरू झालेले वाद या शीतयुद्धाची साक्ष पटवणारे आहेत. या शीतयुद्धात पक्षाचे नागपुरातील चारही आमदार गडकरींच्या बाजूने आहेत. आमदार वाडय़ावर निष्ठा ठेवतीलच. कारण, त्यांना उमेदवारीच गडकरींनी दिली होती, हा फडणवीस समर्थकांचा त्यावरचा युक्तिवाद आहे. फडणवीस प्रदेशाध्यक्ष असतील, तर गडकरी पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे त्यांनी गडकरींना विचारून राजकारण केले पाहिजे, असा वाडय़ावरचा आग्रह आहे. फडणवीस राज्याच्या संदर्भात तर सोडाच, पण शहराच्या पातळीवरसुद्धा गडकरींना विचारत नाहीत. त्यामुळे शहरातील आमदार नाराज आहेत.
गडकरींचे महत्त्व कमी करण्याचा हा पद्धतशीर प्रयत्न असल्याचा आक्षेप वाडय़ावरून घेतला जातो. तो फडणवीस समर्थकांना अर्थातच मान्य नाही. प्रदेशाध्यक्षांचे राजकारण सरळमार्गी आहे. संघाला अपेक्षित असलेल्या संघटन बांधणीसाठी ते कार्यरत आहेत. यावर गडकरी समर्थकच काय, पण इतर कुणाचाही आक्षेप असण्याचे काही कारण नाही, असा युक्तिवाद प्रदेशाध्यक्षांच्या गोटातून केला जातो. येईल त्याला पक्षात घ्या, उमेदवारी द्या, निष्ठावानांवर अन्याय करा, अशी भूमिका फडणवीस कधीच घेणार नाहीत, असा टोलाही गडकरींचे नाव न घेता, सुधाकर देशमुख, दत्ता मेघे, अशी उदाहरणे देत मारला जातो. गडकरी समर्थकांना अर्थातच हे सारे मान्य नाही. पक्षाच्या वाढीसाठी गडकरी करतात ते योग्यच, असा युक्तिवाद या समर्थकांकडून केला जातो.
मध्यंतरी पक्षाध्यक्ष अमित शहा नागपुरात आले. त्यांनी फडणवीसांच्या बंगल्यावर तळ ठोकला. लगेच माध्यमांतून महालच्या वाडय़ाचे महत्त्व कमी झाले, अशा बातम्या फिरू लागल्या. मुळात शहा आले त्या दिवशी गडकरी शहरात नव्हते. त्यामुळे त्यांनी वाडय़ावर जाण्याचा प्रश्न नव्हता. तरीही बातम्या पेरण्यात आल्या, याला सरळमार्गी व संघाला अपेक्षित असलेले राजकारण कसे म्हणता येईल, हा वाडय़ावरचा सवाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील निवडणुकीच्या संदर्भात एकटय़ा फडणवीसांना दिल्लीत बोलावून दीड तास चर्चा केली, ही बातमी मुद्दाम पेरण्यात आली. अशी कोणतीही चर्चा दिल्लीत झालीच नव्हती. हा प्रकार कसा खपवून घ्यायचा, हा गडकरी समर्थकांचा सवाल आहे. राज्याच्या राजकारणासाठी मोदींनी विश्वासात घेतले तर इतरांच्या पोटात दुखण्याचे कारणच काय, असे फडणवीस समर्थक बोलून दाखवतात. एकीकडे मी राज्याच्या राजकारणात कधीच परत येणार नाही, असे जाहीरपणे सांगायचे व दुसरीकडे मला विचारत नाहीत अशी भावना बोलून दाखवायची, हा दुटप्पीपणा झाला, असा युक्तिवाद या समर्थकांकडून केला जातो.
संघ व मोदी यांच्यात समन्वयाची जबाबदारी गडकरींकडून पार पाडली जात आहे, असा प्रचार गेल्या दोन महिन्यांत जाणीवपूर्वक करण्यात आला. मोदी स्वत: प्रचारक होते व प्रचारकाला संघाशी समन्वय ठेवण्यासाठी तिसऱ्या नेत्याची गरज कधीच भासत नाही. गडकरी कधीच प्रचारक नव्हते, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, या वास्तवाकडेही हे समर्थक लक्ष वेधतात. बंगला व वाडा या दोन वास्तूंत सुरू असलेल्या या शीतयुद्धात संघाजवळचे कोण, हाही वाद व चर्चेचा मुद्दा राहिला आहे. संघाचे आशीर्वाद आम्हालाच, असा दावा दोन्ही वास्तूंतून होतो. त्यासोबत संघाचे आशीर्वाद कायम असते तर दुसऱ्यांदा पक्षाध्यक्षपद मिळाले असते, असा टोला बंगल्यावरून वाडय़ाकडे बोट दाखवत हाणला जातो. विधानसभेत संघाची शक्ती बंगल्याच्या पाठीशी राहील, असेही सांगितले जाते. अर्थात, वाडय़ावरून हे आक्षेप उडवले जातात. महापालिकेचा कारभार व त्यावरचे नियंत्रण हासुद्धा या शीतयुद्धातला महत्त्वाचा भाग आहे. राष्ट्रीय राजकारणात सक्रिय असूनसुद्धा महापालिकेवरील नियंत्रणाचा सोस सुटत नाही. आता पालिकेची जबाबदारी स्थानिक पातळीस दिली पाहिजे, असे फडणवीस समर्थक बोलतात. आमदार झाल्यावरही नगरसेवकपदाला चिकटून राहणारे सोले वाडय़ाला कसे सहन होतात, असा सवालही केला जातो. वाडय़ावरून त्याला उत्तरही दिले जाते ते, शहराचा खासदार शहराच्या विकासाकडे लक्ष देणार नाही का, अशा प्रतिसवालाचे. या शहरातील पाणीपुरवठय़ाचे खासगीकरण झाले आहे. गडकरींच्या पुढाकाराने हे घडले. त्यास संघाच्या एका प्रतिनिधीने एका सभेत सूचक विरोध केल्याची आठवण बंगल्यावरून करून दिली जाते. पाणी विकणारी कंपनी कुणाची, असा खोचक सवालही केला जातो. खासगीकरण ही काळाची गरज आहे, हा युक्तिवाद वाडय़ावरून केला जातो. अमलात न येणारी अतिविशाल स्वप्ने बघणे योग्य नाही. वास्तववादी असणेच योग्य, असा टोला फडणवीस समर्थक लगावतात, तर विशाल स्वप्ने बघण्यात वाईट काय, असा प्रतिसवाल गडकरी समर्थक उपस्थित करतात.
मोदींच्या आगमनाच्या पाश्र्वभूमीवर गेल्या आठवडय़ात गडकरींनी सर्व प्रमुख नेत्यांची बैठक वाडय़ावर घेतली. तेथे फडणवीस नव्हते. दोन दिवसांपूर्वी मोहन मते व बंटी भांगडियांचा पक्ष प्रवेश वाडय़ावर झाला, तेव्हाही ते नव्हते. वाडय़ाकडे ते फारसे फिरकत नाहीत. मी माझ्या पद्धतीने राजकारण करेन, असे त्यांनी गडकरींना सांगितल्याचे बोलले जाते. मुख्य म्हणजे, या चर्चाचे खंडन गडकरी वा फडणवीस करताना दिसत नाहीत. त्यातल्या त्यात एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न करतात. म्हणून हे शीतयुद्ध रंगतेच आहे. या वादात काय करायचे, कुणाची बाजू घ्यायची, असा प्रश्न राज्यातील अनेक नेत्यांना आहे. तर मीच खरा नेता, असे सांगणारे मुंबईतील काही जण हा वाद आणखी कसा वाढेल, याकडे जातीने लक्ष देत आहेत. विदर्भात भाजपला पदवीधर मतदारसंघात यश देऊन विजयाची चव चाखायला शिकवले गंगाधर फडणवीस यांनी. त्यांच्या निधनानंतर हा वारसा पुढे नेला गडकरींनी, हे खरे असले तरी आता फडणवीसांचे पुत्र देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाल्याने तेच नैसर्गिक वारसदार, असा प्रचार आता त्यांच्या समर्थकांकडून सुरू झाला असून तो या शीतयुद्धाला कळसावर नेणारा आहे.
वाडा-बंगल्याचे शीतयुद्ध
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांचे डावपेच एरवीही सुरू असतातच, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २१ रोजी ठरलेल्या नागपूरभेटीत काय होणार, याकडे लक्ष आहे..
First published on: 19-08-2014 at 12:05 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Strategy of bjp maharashtra president devendra fadnavis and union minister nitin gadkari supporters