पूँछमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यात पाच भारतीय जवान शहीद झाल्यानंतर सुरू झालेले गलिच्छ राजकारण जवानांच्या मनोधैर्यावर विपरीत परिणाम करणारे ठरू शकते. लष्कराचे मनोबल वाढविणे तर दूर, उलट परस्परांवर शरसंधान साधून राजकीय धुरिणांनी आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. सीमेवर भारतीय जवान कोणत्या प्रतिकूल स्थितीत काम करतो, याची जाणीव ना सत्ताधाऱ्यांना आहे, ना विरोधकांना.
नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैन्याने पूँछमधील सरला क्षेत्रातील टेहेळणी तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर मेंढर भागातही नियंत्रण रेषेच्या पलीकडून घुसखोरीचा प्रयत्न झाला. सांबा सेक्टरमध्ये असाच प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला. काही दिवसांतील हा घटनाक्रम गंभीर असूनही त्याचे गांभीर्य केंद्रातील सत्ताधाऱ्यांप्रमाणे विरोधकांकडूनही राखले गेले नाही. जानेवारीत पूँछ क्षेत्रात घुसखोरी करून दोन भारतीय जवानांचे शीर कापून नेण्यात आले होते. भारतीय प्रदेशात घुसखोरी करायची, दबा धरून बसायचे आणि अचानक हल्ला करायचा, ही नवीन रणनीती पाकिस्तानी सैन्याने अवलंबली आहे.
मुळात भारत-पाकिस्तानदरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या जवळपास १,०४९ किलोमीटर सीमावर्ती क्षेत्राची आंतरराष्ट्रीय सीमा, नियंत्रण रेषा व प्रत्यक्ष ताबा रेषा यात विभागणी झाली आहे. निकषानुसार आंतरराष्ट्रीय सीमेवर लष्कर तैनात करता येत नसल्याने या क्षेत्राची जबाबदारी सीमा सुरक्षा दलांवर आहे. जम्मू-काश्मीरमध्ये वादग्रस्त सीमा प्रदेश अधिक असल्याने उर्वरित संपूर्ण क्षेत्राच्या संरक्षणाची भिस्त भारतीय लष्करावर आहे. आंतरराष्ट्रीय सीमा रेषेच्या तुलनेत नियंत्रण रेषा व प्रत्यक्ष ताबा रेषेची सुरक्षितता अधिक जिकिरीची ठरते. आंतरराष्ट्रीय सीमा रेषा क्षेत्रात परस्परांच्या प्रदेशावर हक्क सांगणे अथवा ताबा मिळविण्याची फारशी संधी नसते. घुसखोरी होऊ न देणे हे मुख्य काम या ठिकाणी तैनात जवानांना करावे लागते. नेमके त्याउलट चित्र नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष ताबा रेषेवर असते. या ठिकाणी मुळातच वाद असल्याने तणावग्रस्त प्रदेश म्हणून त्याची ओळख बनते.
नियंत्रण रेषेचा पहिला भाग अखनूरपासून पीरपांजाल पर्वतरांगांपर्यंत जातो. जम्मूपासून आलेला रस्ता अखनूरपासून नियंत्रण रेषेच्या समांतर राजौरी व पूँछपर्यंत जातो. साधारणत: १० हजार फुटांपर्यंत वर जाणारा हा परिसर. त्यातील पूँछ हा अतिदुर्गम जिल्हा. तिन्ही बाजूंनी नियंत्रण रेषेने वेढलेला. फाळणीपासून त्यावर पाकिस्तानची नजर आहे. पूँछमधील बराचसा भाग त्याने तेव्हाच बळकावला आहे. नियंत्रण रेषेच्या पश्चिमेकडे पाकव्याप्त काश्मीर असून तिथे पाकिस्तानी लष्कराकडून दहशतवाद्यांना खुलेआम प्रशिक्षण दिले जाते. या अरण्यमय क्षेत्रातून भारतीय हद्दीत घुसखोरीची शक्यता नेहमी अधिक असते. याच भागातून उत्तुंग पीरपंजाल पर्वतरांगेला सुरुवात होते. पूँछचा परिसर काहीसा चढणीचा तर काहीसा समतल. पूँछ ब्रिगेडवर या क्षेत्राच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. सामरीकदृष्टय़ा भारतासाठी हा अतिशय महत्त्वाचा भाग.
जम्मू-काश्मीरमध्ये सीमावर्ती भागात लष्करी जवान किती उंचीवर कार्यरत आहेत, त्यावरून त्यांचा या भागातील तैनातीचा कालावधी ठरतो. म्हणजे, १० हजार फूट उंचीवरील क्षेत्रातील सीमावर्ती भागात साधारणपणे तीन र्वष तर त्याहून अधिक उंचीवर असणाऱ्यांना १८ महिने आघाडीवर तैनात रहावे लागते. उत्तुंग क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून हा कालावधी ठरविला गेला आहे. घुसखोरी रोखण्यासाठी भारताने नियंत्रण रेषेच्या आतील भागात तारेचे कुंपण घातले आहे. नियंत्रण रेषा आणि तारेचे कुंपण यातील अंतर स्थानिक स्थितीनुसार कमी-अधिक आहे. नियंत्रण रेषेवर ज्या आघाडीवरील चौक्या आहेत, तेथील जवानांचा थेट शत्रूशी सामना असतो. शत्रूच्या प्रदेशातील प्रत्येक हालचालींचे अवलोकन करणे आणि आगळीक घडल्यास चोख प्रत्युत्तर देण्याची त्यांच्यावर जबाबदारी. त्यातही काही भारतीय चौक्या शत्रूवर प्रभुत्व ठेवणाऱ्या तर काही ठिकाणी भौगोलिक स्थितीमुळे शत्रूचेही प्रभुत्व आहे. अनेक ठिकाणी दोन्ही देशांच्या आघाडीवरील या चौक्यांमधील अंतर केवळ ५० ते १०० मीटर आहे. म्हणजे, शत्रूच्या चौकीतील हालचाली डोळ्यांनी सहजपणे पाहता येतात. त्यामुळे डोळ्यात अंजन घालून काम करणे म्हणजे काय असते, त्याची शब्दश: अनुभूती येथे मिळते. शत्रूच्या बंदुकीच्या टप्प्यात येणारे हे क्षेत्र असल्याने आपल्या चौकीच्या आसपास फिरणेही धोकादायक ठरू शकते. शत्रूची चौकी अन् परिसरावर नजर ठेवणे, नियंत्रण रेषा पार करणाऱ्याला कंठस्नान घालणे ही मुख्य कामगिरी रात्रंदिवस जवान नेटाने पार पाडतात. त्यात किंचितसा हलगर्जीपणा झाल्यास तो स्वत:च्या जिवावर बेतणारा असतो. युद्धबंदी असो वा नसो, पाकिस्तानी सैन्याकडून वारंवार अशा कुरापती काढल्या जातात. त्यामागे भारतीय जवानांचे लक्ष एका ठिकाणी केंद्रित करून अन्य भागातून दहशतवाद्यांना सीमापार धाडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
आघाडीवरील दोन भारतीय चौक्यांमध्ये बरेच अंतर असल्याने त्यामधील मोकळ्या जागेतून घुसखोरी झाल्यास तिला अटकाव करण्याची जबाबदारी आतील भागात तारेच्या कुंपणालगतच्या चौक्यांवर आहे. तारेचे कुंपण वैशिष्टय़पूर्ण म्हणता येईल. त्यात कोणी फसले तर तो आपोआप जायबंदी होईल, अशी त्याची रचना. कुंपणात काही ठिकाणी विद्युत प्रवाहदेखील सोडण्यात आला आहे. शिवाय, देवळातील घंटेप्रमाणे लहान आकाराच्या त्यावर बसविलेल्या घंटय़ा म्हणजे कोणी कुंपण तोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याव्दारे जवानांना पूर्वसूचना मिळू शकते. कुंपणाला समांतर प्रखर प्रकाशझोताचे दिवेही बसविले गेले आहेत. या कुंपणाजवळ जवानांकडून गस्त घातली जाते. त्यावेळी घुसखोर अन् साप व इतर जंगली श्वापदांचा एकसारखाच धोका असतो. या क्षेत्रात सर्पदंशाने घायाळ झालेल्या जवानांची संख्याही बरीच आहे. अतिदुर्गम व निर्जन अशा या सीमावर्ती भागातील विशिष्ट क्षेत्राची जबाबदारी त्या त्या तुकडीतील जवानांवर आहे. कुंपणाजवळील चौक्या आघाडीवरील चौक्यांच्या तुलनेत निकट आहेत. तुकडीतील प्रत्येकाला दिवसा आठ तास टेहळणी तर रात्री चार तास गस्त असे काम असते. शत्रूच्या प्रदेशात हालचाली वाढल्याचे दिसले की, जवानांच्या कामांच्या तासात कधीही अचानक वाढ होते. दुर्गम पहाडी भागात लष्कराच्या एका कंपनीवर काही ठिकाणी तुलनेत अधिक क्षेत्राच्या सुरक्षिततेची जबाबदारी आहे. त्यामुळे गस्ती क्षेत्रात वाढ होते. रात्री नियंत्रण रेषेच्या पलीकडे अंधारात डोळे लावून बसणे हेदेखील अवघड काम. त्याचा प्रचंड मानसिक ताण येतो. त्यामुळे काही तासांनंतर जवानांना विश्रांती मिळते, पण स्थिती सामान्य असेल तरच.
याव्यतिरिक्त दैनंदिन कामांत जवानांवर आणखी एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे ती, तारेच्या कुंपणापलीकडे शेतीसाठी जाणाऱ्या स्थानिकांवर नजर ठेवणे अन् तपासणीची. अतिशय दुर्गम क्षेत्रातील नियंत्रण रेषा व तारेचे कुंपण यातील अंतर कुठे ५०० मीटर तर कुठे अर्धा ते एक किलोमीटर इतके कमी-अधिक आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने केलेल्या तटबंदीच्या जागेत स्थानिकांची शेती आहे. स्थानिकांना शेती कसता यावी म्हणून काही कुंपणावर विशिष्ट अंतरावर प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. ज्यांची या भागात शेती आहे, त्यांना लष्कराने विशिष्ट प्रकारचे ओळखपत्र दिले आहे. कुंपणावरील प्रवेशद्वारावर हे ओळखपत्र जमा करून त्यांना त्यांच्या शेतात सोडले जाते. शेतीसाठी पुरुष व महिला नियमितपणे जात असतात. सायंकाळी परतताना त्यांच्या सामानाची तपासणी व झडती घेतली जाते. हे काम लष्करी जवान स्थानिक पोलिसांच्या मदतीने करतात. पुरुषांची तपासणी केली जात असली तरी जम्मू-काश्मीर पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांची पुरेशी उपलब्धता नसल्याने महिलांच्या तपासणीची लष्करापुढे समस्या आहे. नियंत्रण रेषेलगत शेतीसाठी जाणाऱ्या नागरिकांचा असंतुष्ट घटक अमली पदार्थाची तस्करी वा अन्य कामांसाठी वापर करू शकतात.
घुसखोरी रोखण्यासाठी भारतीय जवान सर्वतोपरी दक्षता घेत असले तरी पाकिस्तानी लष्कराकडून कमकुवत ठिकाणांचा शोध घेतला जातो. त्याकरिता वारंवार टेहळणी केली जाते. काहीशी कमतरता राहिलेल्या भागात पाकिस्तानकडून अशी आगळीक केली जाते, असा प्रदीर्घ काळ या क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय जवान व अधिकाऱ्यांचे मत आहे. सतर्क जवानांवर शत्रू हल्ला करू शकत नाही. पण पाकिस्तानी लष्कराने आता अवलंबिलेली घुसखोरी करून अचानक हल्ला करण्याची पद्धत चिंताजनक आहे. भारतीय प्रदेशात घुसखोरी करून दबा धरायचा आणि आपल्याच प्रदेशात टेहळणी करणाऱ्या भारतीय जवानांना लक्ष्य करायचे, अशी रणनीती पाकिस्तान लष्कराने आखली आहे. जानेवारी व ऑगस्टमध्ये घडलेल्या या घटना त्याचे निदर्शक म्हणता येतील. या पाश्र्वभूमीवर किमान आता तरी सरकारच्या धोरणात काही बदल होईल का ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय सेना कोणत्याही स्थितीत आंतरराष्ट्रीय सीमा अथवा नियंत्रण रेषा ओलांडणार नाही या धोरणावर काम करते. यामुळे सैन्यदलाचे प्रशिक्षणदेखील शत्रूच्या प्रदेशात आपण किती शिरकाव करावा याऐवजी आपण शत्रूला आपल्या प्रदेशात किती शिरकाव करू द्यावा, या विचारधारेवर चालते. त्याची परिणती भारतीय सैन्याची रणनीती सीमेपर्यंत मर्यादित राहण्यात झाली आहे. यामुळे सीमेवर केवळ प्रतिकारक सेनेच्या भूमिकेत असणारा भारतीय जवान या एकूणच स्थितीचा धैर्याने सामना करत आहे.भारतीय जवानांच्या गस्ती पथकावर पाकिस्तानी लष्कराने ज्या चाकन-दा-बाग भागात हल्ला केला, त्याच परिसरात भारत-पाकिस्तानदरम्यान व्यापारी मार्ग आहे. ‘राह ए मिलन’ या नावाने तो ओळखला जातो. पाकिस्तानी लष्कराने अवलंबिलेल्या कपटनीतीमुळे उभय देशांत असे मनोमीलन कधी शक्य होईल, असा विचार करणेही मूर्खपणाच ठरेल.