लेखक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अमरावतीहून लक्ष्मण शिरभाते दिल्लीत येतात..
चार दशकांनंतर लेखक होतातही, पण चहाची टपरी सांभाळून आणि स्वतची पुस्तके स्वतच प्रकाशित करून, विकून! दिल्लीने त्यांना वैफल्य आणि पुढे यश अशी दोन्ही टोके दाखवली, लेखनाचे समाधानही दिले. म्हणूनच निवृत्तीचा काळदेखील लेखक आणि प्रकाशक म्हणूनच व्यतीत करण्याचे स्वप्न ते पाहताहेत..
स्वयंप्रेरणेने आणि स्वकष्टाने स्वयं‘प्रकाशित’ झालेले दिल्लीतील हिंदी लेखक म्हणजे ‘लक्ष्मण राव’. विपरीत परिस्थितीशी अखंड झुंज देत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर लक्ष्मणराव शिरभाते यांनी हिंदूी साहित्यक्षेत्रात आपले वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण केले आहे. अमरावतीच्या धामणगाव तहसिलीतील तळेगाव दशासरमधील शिरभाते कुटुंबात जन्मलेले लक्ष्मणराव यांना ३८ वर्षांपूर्वी रोमँटिक हिंदूी कादंबरीकार गुलशन नंदांसारखे प्रसिद्ध लेखक बनण्याच्या ‘जुनून’ने झपाटून टाकले होते. गुलशन नंदांच्या कादंबऱ्यांच्या पाच लाख प्रती विकल्या जात असतील तर आपल्या निदान पाच हजार तरी नक्कीच खपतील. तेवढय़ावर सहज गुजराण करता येईल, असा हिशेब करून घरच्यांना कल्पनाही न देता ते लेखक होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले. तिथून सुरू झाला त्यांच्या आयुष्यातील कधीही न संपणारा संघर्ष.
दिल्लीत पोहोचण्यापूर्वी लक्ष्मणराव गावातील शासकीय माध्यमिक विद्यालयात आठवीपर्यंत आणि अमरावतीच्या मराठा विद्यालयात दहावीपर्यंत शिकले. वडील नत्थूजी आणि आई लक्ष्मीदेवी. घरी सहा एकर शेती. राम त्यांचे जुळे बंधू. गुणवंत, अनंत आणि शोभा ही सख्खी भावंडे. शिवाय शकुंतला आणि सुशीला या थोरल्या सावत्र बहिणी. दहावीत नापास झाल्यानंतर त्यांनी अमरावतीच्या सूतगिरणीत नोकरी केली. वीजपुरवठय़ाअभावी गिरणी बंद पडली आणि लक्ष्मणराव आपले सामान गुंडाळून गावाकडे शेतीची कामे करू लागले. ‘लक्ष्मण काहीच करू शकणार नाही,’ अशी गावातले लोक टिंगल करायचे. हा उपमर्द जिव्हारी लागल्याने त्यांनी वडिलांकडे नोकरी शोधण्यासाठी ४० रुपये मागून भोपाळ गाठले. तिथे पैसे संपल्यावर मोलमजुरी करून दोन महिन्यांत नव्वद रुपये जमवले आणि जुलै महिन्यात दिल्लीत पोहोचले. दिल्लीत लष्कराची वसाहत असलेल्या पालम भागापासून कॅनॉट प्लेसपर्यंत इमारतींचे बांधकाम, चहा-पानाच्या टपऱ्या, हॉटेल, ढाबे, सीमेंटच्या गोदामात मजुरीची कामे करीत लेखक बनण्याचा ध्यास ठेवून रात्री वाचन व लेखन करायचे. लाला किरोडीमल गुप्ता नावाच्या गृहस्थाच्या चहाच्या टपरीवर ते नोकरी करू लागले. पुढे लालाचा १९७७ साली अपघाती मृत्यू झाला. लालाच्या घरच्या लोकांनी दिलेल्या पैशातून त्यांनी विष्णु दिगंबर मार्गावरील पंजाबी भवनापुढे सिगरेट, बिडी, पानाचे दुकान थाटले. फुटपाथवरील व्यवसायासाठी नवी दिल्ली महापालिकेचा ‘खुली तहबजाई’ परवाना मिळविला. चार दशकांनंतर लक्ष्मणराव यांचा विष्णु दिगंबर मार्ग, नवी दिल्ली, ११०००२ हाच कायमस्वरूपी पत्ता ठरला आहे. विष्णु दिगंबर मार्गापासून जवळच असलेल्या दिल्ली गेटला दर रविवारी भरणाऱ्या जुन्या पुस्तकांच्या बाजाराचे ते कायमचे ग्राहक बनले. येथेच लक्ष्मणरावांना शेक्सपिअर, कालिदास, शरश्चंद्र चटोपाध्याय, मुंशी प्रेमचंद आदी बडय़ा लेखकांचा परिचय घडला. त्यांचे विचार प्रगल्भ झाले. पान, बिडी, सिगरेटच्या टपरीच्या व्यवसायातून पैसा जमवत त्यांनी ‘रामदास’ आणि ‘नई दुनिया की नई कहानी’ अशी दोन पुस्तके लिहिली. ती प्रसिद्ध करण्यासाठी प्रकाशकांकडे गेले. हे काम अत्यंत खर्चीक असल्याचे सांगून एका प्रकाशकाने त्यांना हुसकावले. दुसऱ्या प्रकाशकाने तर चक्क हाकलून लावले. लेखक व्हायचे तर पुस्तक प्रकाशन आपणच केले पाहिजे, अशी खूणगाठ बांधून मग त्यांनी पाच-सहा हजार रुपये जमवले आणि शिरभाते प्रकाशन नावाने स्वत:ची प्रकाशन संस्था सुरू केली. नंतर त्याचे नाव बदलून भारतीय साहित्य कला प्रकाशन असे ठेवले. हा पानवाला लेखक आहे आणि पुस्तके लिहितो, याचे लोकांना आश्चर्य वाटायचे. १९८१ साली पत्रकार उषा राय यांनी त्यांची मुलाखत घेतली आणि लक्ष्मणराव दिल्लीत प्रसिद्धीच्या झोतात आले. अगदी इंदिरा गांधीही लक्ष्मणरावांच्या जिद्द आणि संघर्षांचे काँग्रेसजनांना उदाहरण द्यायच्या. माजी खासदार शशिभूषण यांच्या प्रेरणेने २७ मे १९८४ रोजी त्यांची इंदिरा गांधींशी भेट झाली. लक्ष्मणरावांनी इंदिरा गांधींवर पुस्तक लिहिण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांनी नकार दिला. उलट आम्ही राजकीय नेते काय करतो, आमचे प्रशासन कसे असते यावर पुस्तक लिहा, असे त्यांनी सुचविले. त्यानुसार लक्ष्मणरावांनी लिहिलेले ‘प्रधानमंत्री’ नावाचे नाटक १९८४ साली प्रकाशित झाले. पण पुस्तके लिहिल्याने पैसे मिळतील, ही त्यांची आशा फोल ठरली. दरम्यान, १९८६ साली नागपूरच्या रविनगरात राहणारे उद्धवराव गुल्हाणे यांच्या कन्या रेखा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. आपला पती लेखक कमी आणि पानवाला जास्त, हे वास्तव समोर आल्याने फसवणूक झाल्याची भावना त्यांच्या मनात घर करून राहिली.सिगरेट, बिडय़ा आणि पानाचा धंदा कमी झाल्याने लक्ष्मणरावांनी चहाचे दुकान सुरू केले. भाडय़ाचे घर, पैशाची कमतरता, पत्नीचे अपेक्षाभंगातून उद्भवलेले वैफल्य अशा सर्व आघाडय़ांवर सुरू झालेल्या ओढाताणीमुळे लक्ष्मणरावांना लेखनकार्य सोडून देण्यापर्यंत नैराश्याने ग्रासले. पण इच्छाशक्तीच्या जोरावर या प्रतिकूलतेवर मात करीत त्यांनी स्वत:मधला लेखक जिवंत ठेवला. १९९२ साली त्यांची ‘रामदास’ ही कादंबरी प्रकाशित झाली, पण वितरकांकडून तिला उठाव नव्हता. हे लक्षात आल्याने लक्ष्मणरावांनी सायकलवर पुस्तकांचा गठ्ठा बांधून दिल्ली, नोएडा, गुरगाव, गाझियाबाद, फरीदाबादमधील शाळांच्या चकरा मारल्या आणि मुख्याध्यापकांना भेटून पुस्तकांच्या प्रती खपविल्या. गेल्या ३४ वर्षांत ‘नई दुनिया की नई कहानी’, ‘प्रधानमंत्री’, ‘रामदास’, ‘नर्मदा’, ‘परंपरा से जुडी भारतीय राजनीति’, ‘रेणु’, ‘पत्तियों की सरसराहट’, ‘सर्पदंश’, ‘साहिल’, ‘प्रात:काल’, ‘शिव अरुणा’, ‘प्रशासन’, ‘राष्ट्रपती’, ‘संयम (राजीव गांधी की जीवनी)’, ‘साहित्य व्यासपीठ (आत्मकथा)’, ‘दृष्टिकोन’, ‘समकालीन संविधान’, ‘अहंकार’, ‘अभिव्यक्ती’, ‘मौलिक पत्रकारिता’, ‘द बॅरिस्टर गांधी’, ‘प्रधानमंत्री (इंदिरा गांधी)’, ‘रामदास (नाटक)’ आणि ‘पतझड’ अशी २४ पुस्तके लेखक लक्ष्मणराव यांच्या नावावर आहेत. सामाजिक आणि राजकीय आशय, इंग्रजी/ उर्दूचा लवलेश नसलेली सरळ, शुद्ध हिंदूी भाषा यामुळे त्यांची पुस्तके उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहारचे लोक विकत घेतात. आज ते पुस्तके विकण्यासाठी विक्रेता, वितरक, प्रकाशक किंवा पुस्तक मेळ्यावरही अवलंबून नाहीत. चार तास यूपीएससी किंवा शास्त्री भवनापुढे उभे राहून पुस्तके विकणे सहज शक्य आहे, असा विश्वास त्यांना वाटतो.
साहित्य क्षेत्रात विक्रीपासून प्रकाशनापर्यंत पुस्तक कसे असावे, किती पानांचे असावे, किंमत किती असावी, पुस्तक कुणाला विकावे, उधारीचा व्यवहार करू नये, असे सर्व अनुभव या २४ पुस्तकांचे लेखन, प्रकाशन आणि विक्री करताना त्यांना आले. त्यांच्या मते लिहिण्यापासून विक्रीपर्यंत सर्व गोष्टींचा अनुभव आवश्यक असतो. प्रकाशनक्षेत्रात पैसा आहे. पण येथे कोणी येत नाही. पुस्तके सर्वत्र पोहोचविण्यासाठी वितरणाचे जाळे आवश्यक असते, असे ते सांगतात. दिल्लीतील पाचशे शाळांमध्ये पुस्तके विकण्याचा अनुभव गाठीशी असलेले लक्ष्मणराव ग्रंथालयांकडे फिरकत नाहीत. ग्रंथालयांसाठी पुस्तके निवडणाऱ्या समितीतच अनेक लेखक असतात, अशी त्यांची तक्रार असते.
दुपारी बारा-एक वाजेपासून सुरू केलेले चहाचे दुकान रात्री नऊ-दहा वाजता बंद करायचे आणि अकराच्या सुमाराला घरी भोजन करून पहाटे चार-पाच वाजेपर्यंत लेखन करायचे. या दरम्यान दोन-तीन वेळा स्वत:च चहा करायचा. रोज दहा-बारा तरी पाने लिहायची. पाच वाजता झोपून अकरा वाजता उठायचे, अशा चहावाला आणि लेखकाच्या दुहेरी भूमिकेत त्यांचा दिवस जातो. चहाच्या दुकानाने साहित्यक्षेत्रात कौतुक होऊन लक्ष्मणराव नावारूपाला आले. पण त्याच चहाच्या दुकानामुळे आपल्या साहित्याचा हवा तसा प्रचार-प्रसार झाला नाही, याची त्यांना खंतही वाटते. अर्थात, पंजाबी भवनासमोर चहाची टपरी चालविणाऱ्या लक्ष्मणरावांची पुस्तके त्याच पंजाबी भवनातील ग्रंथालयाच्या आलमारीत बघून मोठमोठय़ा लेखकांना त्यांचा हेवाही वाटतो. चहावाल्या लक्ष्मणरावांचे पुस्तक नामवंत शाळांमध्येशिकणाऱ्या मुलांच्या हाती पाहून नावाजलेल्या साहित्यिकांचा जळफळाट झाल्यावाचून राहत नाही.
दिल्लीत गेल्या चार दशकांपासून सरस्वतीची आराधना करताना लक्ष्मणरावांवर लक्ष्मी कधीही प्रसन्न झाली नाही. त्यांच्या कार्याची दखल परदेशातील तसेच दिल्लीतील तमाम लहानमोठय़ा प्रसिद्धी माध्यमांनी घेतली. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. पण चहाच्या धंद्यावर दररोज पाचशे रुपये कमावून घर चालविणाऱ्या लक्ष्मणरावांना कधीच आर्थिक स्थैर्य लाभले नाही. दिल्लीत घरे स्वस्तात, पण अनधिकृत वस्त्यांमध्ये मिळत असताना स्वत:चे घर घेण्याची त्यांची िहमत झाली नाही. आता किमती आवाक्याबाहेर गेल्यामुळे ते घर विकत घेण्याची कल्पनाही मनात आणू शकत नाहीत. त्यांच्या पुस्तकांच्या विक्रीतून येणारा पैसा नव्या पुस्तकनिर्मितीत गुंततो आहे. पुस्तकांमुळे पैसे येऊ लागल्याने ते लेखक आहेत, याची खात्री पटून पत्नीचे वैफल्य कमी झाले आहे. त्यांचे सर्व भाऊ आणि बहिणी नागपूर आणि अमरावतीच्या आसपास स्थायिक झाले आहेत. नागपुरात आपली पुस्तके मराठीत प्रसिद्ध करायची. दिल्लीत उर्दू आणि पंजाबीमध्ये त्यांचे भाषांतर करायचे आणि पैसा खुळखुळल्यावर इंग्रजी भाषांतराकडे वळायचे, अशा योजना त्यांनी आखल्या आहेत. चार्टर्ड अकौंटंटच्या परीक्षेत गुंतलेला त्यांचा मोठा मुलगा हितेश प्रकाशन व वितरणाची व्यवस्था बघतो. छोटा परेश बी.कॉम. होऊन नोकरीला लागला आहे.
दिल्लीतील वास्तव्यात लक्ष्मणराव गुलशन नंदा बनले नाहीत किंवा आपल्या पुस्तकाच्या अजूनपर्यंत पाच हजार प्रती विकू शकले नाहीत. पण तळहातावरचे आयुष्य जगत असूनही सर्वार्थाने स्वयं‘प्रकाशित’ लेखक बनलेल्या लक्ष्मणरावांचे जगजिंकल्याचे रास्त समाधान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.