चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय दिल्लीत राहून वाढवताना जग हेच कार्यक्षेत्र मानणारे; परंतु उत्तर भारतीयांशी आणि दिल्लीवाल्यांशी कसे वागावे याची नीट कल्पना असलेले विजय काळे आज यशाचे धनी आहेत.. त्या यशामागे संघर्ष आहे, परंतु या संघर्षांच्या कथा सांगण्याऐवजी, त्यातून काय शिकलो हे त्यांना महत्त्वाचे वाटते..
एखाद्याने नोकरी धरली किंवा एखादा धंद्यात पडला, यातील शाब्दिक भेद सहज लक्षात येणारा नसला तरी महत्त्वाचा आहे. जोखमीच्या व्यवसायापेक्षा नोकरीतील सुरक्षिततेला प्राधान्य देणारी सावध मराठी मानसिकता त्यातून नकळत अधोरेखित होते. ३३ वर्षांपूर्वी पहिल्या प्रयत्नात चार्टर्ड अकौंटंटची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर नोकरी की व्यवसाय, हा प्रश्न विजय काळेंनाही पडला होता. दिल्लीत तर कुणी मराठी व्यापारी नाहीत. मग तुझा व्यवसाय कसा चालेल? कोण काम देईल? त्यापेक्षा चांगली नोकरी कर, असे सल्ले त्यांना आप्तस्वकीयांकडून मिळत होते. चार्टर्ड अकौंटंट झाल्यानंतर पहिली दोन वर्षे त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ए. एफ. फग्र्युसन अॅण्ड कंपनीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम केले आणि त्यानंतर स्वत:चाच व्यवसाय करण्याची खूणगाठ मनाशी बांधली. प्रयत्न केले तर व्यवसायात चांगला जम बसेल, असा विश्वास त्यांना वाटत होता. करोलबागेतील दोन खोल्यांच्या भाडय़ाच्या घरातील एका खोलीत कार्यालय थाटून त्यांनी व्यवसायाची सुरुवात केली. ते कमी पडायला लागल्यावर एका ग्राहकाला विनंती करून टेबल टाकण्याएवढी जागा मिळविली. नंतर शंभर चौरस फुटांची जागा मिळविली. टप्प्याटप्प्याने तीनशे, पाचशे चौरस फुटांवर मजल मारली. आज दिल्लीत महागडय़ा करोलबागेतील मुख्य अजमल खान रोडवर त्यांचे स्वत:चे पावणेतीन हजार चौरस फुटांचे कार्यालय आहे आणि व्यवसायविस्ताराचा भाग म्हणून नोएडा येथे दहा हजार चौ. फुटांचे कार्यालय व निवासस्थान तयार होते आहे. केवळ दिल्लीच नव्हे तर राजस्थानसह उत्तर भारतातील नावाजलेल्या दीड-दोनशे कंपन्यांचे काम पाहणारी व्ही. व्ही. काळे अॅण्ड कंपनी ही उत्तर भारतातील अव्वल मराठी फर्म ठरली आहे. प्राप्तिकर, कंपनी कायदा, सेवा कर, व्हॅट आदी सेवांसह भारतात नव्या विदेशी कंपन्यांची नोंदणी करण्यात त्यांच्या फर्मचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. गोदरेज, मॅरिको, रिलायन्स, एस्सार, डाबर, किलरेस्कर, सारस्वत बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, कोका कोला आदी बडय़ा कंपन्यांसह स्पेन, जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, चीनमधील कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत. स्पेनमध्ये व्यापार विकसित करणाऱ्या कंपन्यांचे काम भारतात करतात. भारतात व्यापार कसा करायचा यावर मार्गदर्शन ते युरोप, अमेरिकेत नियमित करतात.
संघर्षशील वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि त्यासाठी लागणारा संयम त्यांना आई-वडिलांकडून वारशात मिळाला आहे. काळे यांचे वडील वसंत बाजीराव काळे हे मूळचे रत्नागिरीचे. ते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे खंदे समर्थक, हिंदूू महासभेचे सक्रिय कार्यकर्ते आणि हिंदूू स्टुडंट फेडरेशनचे सरचिटणीस होते. मुंबईत ब्लिट्झमध्ये पत्रकार होते. पत्रकारितेतील शिष्यवृत्ती मिळवून अमेरिकेला शिकायला जाण्यासाठी ते दिल्लीत दाखल झाले आणि तेवढय़ातच महात्मा गांधींची हत्या झाली. त्या वेळी हिंदूू महासभेच्या सर्व ज्ञात नेत्यांची धरपकड झाली. त्यात वसंतराव काळेंच्याही वाटय़ाला तुरुंगवास आला. ‘या मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना आपण ओळखतो. त्याचा या घटनेशी काहीही संबंध नाही,’ असे सांगून काकासाहेब गाडगीळांनी विठ्ठलभाई पटेल आणि जवाहरलाल नेहरूंना सांगून त्यांची सुटका केली. या घटनेचा धक्का बसून वसंतराव काळेंचा पत्रकारितेशी संबंध दुरावला तो कायमचा. तुरुंगांतून बाहेर आल्यानंतर मुंबईला परतण्याऐवजी त्यांनी दिल्लीतच छोटय़ा स्वरूपात प्रॉपर्टीचा व्यवसाय सुरू केला. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, विवेकानंद केंद्राचे संस्थापक एकनाथ रानडे तसेच संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. आणीबाणीपर्यंत या साऱ्या मंडळींची त्यांच्या घरी ऊठबस असे. वसंत साठे, विठ्ठलराव गाडगीळ यांच्याशीही मैत्री होती. आज वसंत काळे हयात नाहीत. पण घरी कधी कुठला कार्यक्रम असला तर अडवाणींसह सर्व जुने स्नेही आजही त्यांच्याकडे आवर्जून हजर असतात. समाजकार्यातील सक्रियतेमुळे वसंतरावांना त्या वेळी महापालिकेची निवडणूक लढण्याचा आग्रह करण्यात आला. पण त्यांनी पत्नी पुष्पा यांना मैदानात उतरविले. दिल्लीतील करोलबागसारख्या भागातून सत्तरीच्या दशकात महापालिकेवर नगरस्ेविका म्हणून निवडून जाणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती होण्याचा मान पुष्पा काळे यांनी मिळविला. त्यानंतर त्या नवी दिल्ली मेट्रोपॉलिटन कौन्सिलवरही निवडून गेल्या. शिवाय बाल न्यायालयात मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट, समाजकल्याण मंडळ, नारी निकेतन आदी संस्थांमध्येही त्या सक्रिय होत्या. वसंतराव काळेंनी गांधी-हत्येनंतर तुरुंगवास भोगला, तर पुष्पा काळे आणीबाणीच्या काळात पूर्ण १८ महिने तुरुंगात होत्या.
आईच्या गावी, डहाणूत १७ ऑक्टोबर १९५६ रोजी जन्मलेले विजय काळे यांचे संगोपन आणि सर्व शिक्षण दिल्लीत झाले. १९७२ साली अकरावी बोर्डात ते सातवे आले. श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये बी.कॉम. ऑनर्स केले. त्यानंतर चार्टर्ड अकौंटंटच्या अभ्यासक्रमाकडे वळून १९८० मध्ये पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले. व्यवसायात जम बसल्यावर एलएल.बी.ही केले. ग्राहकांना चांगली सेवा आणि रिझल्ट देऊन स्वत:ला प्रस्थापित करण्यावरच भर दिला. उद्योग जगताची कामे करायची, पण सरकारी कामे घ्यायचीच नाहीत, असा कटाक्ष त्यांनी बाळगला आहे.
विजय काळे यांनी आपल्या व्यवसायातील उत्तर भारतीय आणि मराठी मानसिकतेची केलेली तुलना मोलाची ठरावी. चार्टर्ड अकौंटंटच्या व्यवसायातील उत्तर भारतीय संस्कृती अतिशय भिन्न आहे. ती अजूनही आपल्याला उमगलेली नसल्याचे ते सांगतात. आश्वासन देऊनही एखादे काम झाले नाही तर उत्तर भारतीयांना फरक पडत नाही. काम होऊन जाईल, असे सांगून ते वेळ मारून नेतात, पण वेळ पाळत नाहीत. ग्राहकांना फारसे गंभीरपणे घेत नाहीत. ते सरळ आणि उलटय़ा, अशा दोन्ही मार्गानी व्यवसाय करू शकतात. अशा स्थितीत सरळ मार्गाने व्यवसाय करणे आणखीच अवघड होते. या व्यवसायात आपला मार्ग ठरवावा लागतो. शक्यतोवर सरळ मार्गाने जाता येते. पण अनेकांना सरळ जायचेच नसते. अशा लोकांना टाळणे इष्ट ठरते. मराठी लोकांमध्ये प्रामाणिकता, वक्तशीरपणा आणि शब्द पाळण्याला महत्त्व असते. मराठी माणूस मदत करतो, पण त्याच्या बोलण्यात कटुता असते. त्यामुळे त्याचे अनेकदा नुकसानही होते. उत्तर भारतातील लोक कटू न बोलताही स्वार्थ पाहू शकतात. दिल्लीत आक्रमकता जास्तच आहे. त्यामुळे व्यावसायिक यश मिळविण्यासाठी सहनशक्ती, जिद्द, चिकाटी आणि जास्त प्रयत्न करून ग्राहकांना चांगली सेवा देण्याची आवश्यकता असते. आक्रमकता, भांडवलाचा अभाव आणि व्यापार करण्याची मानसिकता नसलेल्या सरळमार्गी मराठी लोकांना त्यामुळे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सुरुवातीला खूपच संघर्ष करावा लागतो. सेवाक्षेत्राशी संबंधित असलेल्या या व्यवसायात प्रचंड दडपण असते. ग्राहकाचा विश्वास जपून वेळेवर काम करण्याला महत्त्व असते. विविध देशांतील कंपन्यांची कामे करताना टाइम झोनचा विचार करावा लागतो. त्यामुळे अनेकदा रात्री कामे करावी लागतात. ही दडपणे सहन करण्याची क्षमता मराठी माणसात असायला हवी. दहा ते सातच्या चाकोरीबद्ध वेळेपलीकडे किंवा आठवडय़ाचे सलग सात दिवस काम करणे अनेकांना जमत नाही. या क्षेत्रात काम करणारे मराठी लोकही दिल्लीत सापडत नाहीत, असे विजय काळे आपल्या अनुभवातून सांगतात.
गेल्या २५ वर्षांपासून ते दिल्ली महाराष्ट्र शैक्षणिक सांस्कृतिक संस्थेत खजिनदाराची भूमिका बजावत आहेत. जागतिक मराठी चेम्बर ऑफ कॉमर्सचे उत्तर भारताचे अध्यक्ष या नात्याने दिल्लीत व्यापार करण्यास इच्छुक मराठीजनांना मार्गदर्शन आणि शक्य तितकी मदत तसेच दिल्लीतील मराठी संस्थांना जमेल तेवढे सहकार्य करण्याचा आपला प्रयत्न असतो, असे ते सांगतात. वयाच्या ऐंशीव्या वर्षांचा टप्पा पार करणाऱ्या त्यांच्या आई आता निवृत्तीचे जीवन जगत आहेत. धाकटे बंधू मोहन काळे प्रॉपर्टीच्या व्यवसायात आहेत. बहीण आरती बर्वे पुण्याला असतात. त्यांचे पती अरुण बर्वे यांचा डेक्कन जिमखाना भागात प्रिंटिंगचा व्यवसाय आहे. घरातील मराठीपण जपण्यासाठी काळे भावंडांनी महाराष्ट्रातील मुलामुलींशी विवाह करण्याला प्राधान्य दिले. विजय काळेंच्या पत्नी स्मिता मुंबईच्या. यामुळेही घरात मराठीपण रुळले. काळे यांची जुळी मुले वरद आणि वरुण दोघेही चार्टर्ड अकौंटंटची परीक्षा उत्तीर्ण करून पुढच्या वर्षी व्यवसायात उतरण्याची शक्यता आहे; तर थोरली उत्तरा एमबीए करीत आहे. गझल आणि भावगीतांसारखे हलक्याफुलक्या संगीताचे शौकिन असलेले विजय काळे यांना व्यवस्थापनाविषयीची पुस्तके, चरित्रे-आत्मचरित्रे वाचायला आणि मुलांसह क्रिकेट खेळायला आवडते. ‘मॉइल’चे संचालक असल्यामुळे त्यांना दोन महिन्यांतून एकदा नागपूरला, तर महिन्यातून दोनदा मुंबई, गोव्याला जावे लागते. आपल्या जोरावर, आपल्या प्रयत्नांनी जीवनात एक स्तर गाठायचा ही आईवडिलांची शिकवण त्यांच्या यशात उपयुक्त ठरली. भांडवलाचा अभाव असूनही आईवडिलांना कर्ज काढायला लावायचे नाही, या निर्धाराने व्यवसाय सुरू केल्यामुळे दिल्लीसारख्या पैसेवाल्यांच्या शहरात प्रस्थापित व्हायला त्यांना भरपूर संघर्ष करावा लागला, बराच वेळही लागला. एखादे झाड नीट वाढेपर्यंत फार मेहनत घ्यावी लागते. हळूहळू झाड मोठे झाले की त्याचा फायदा सर्वानाच होतो, अशा शब्दांत आपल्या व्यवसायाचे मूल्यमापन करणारे विजय काळे यांना तीन दशकांच्या यशस्वी व्यावसायिक वाटचालीनंतर धंद्यात ‘पडल्या’चे रास्त समाधान वाटणे स्वाभाविक आहे.
धंद्यात पडल्याचे समाधान
चार्टर्ड अकाउंटन्सीचा व्यवसाय दिल्लीत राहून वाढवताना जग हेच कार्यक्षेत्र मानणारे; परंतु उत्तर भारतीयांशी आणि दिल्लीवाल्यांशी कसे वागावे याची नीट कल्पना असलेले विजय काळे आज यशाचे धनी आहेत.. त्या यशामागे संघर्ष आहे, परंतु या संघर्षांच्या कथा सांगण्याऐवजी, त्यातून काय शिकलो हे त्यांना महत्त्वाचे वाटते..
आणखी वाचा
First published on: 30-03-2013 at 04:31 IST
मराठीतील सर्व राजधानीवर मराठी मोहोर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successful marathi businessman vijay kale in capital of india