रत्नागिरी जिल्ह्य़ाच्या चिपळूण शहराला, त्यामुळे उभ्या कोकण किनारपट्टीला आणि साहजिकच महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी एक बातमी संसद भवनातून सर्वदूर पसरली. चिपळूणच्या पुरुषोत्तम साठय़ेंची मुलगी, इंदूरच्या जयंत महाजन वकिलांची पत्नी आणि सलग आठ वेळा इंदूर मतदारसंघातून लोकसभेत गेलेल्या सुस्वभावी, मृदुभाषी सुमित्रा महाजन यांची सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड होणार हे नक्की झाल्याची ती बातमी!
१२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्राताई २९ जानेवारी १९६५ रोजी विवाहबद्ध होऊन मध्य प्रदेशातील इंदूरला गेल्या आणि तेथील विद्यापीठातून वकिली करू लागल्या. संघ विचारसरणीच्या प्रभावामुळे भाजप राजकीय प्रवाहातही सामील झाल्या. १९८२ ते ८५ या काळात इंदूर महापालिकेच्या नगरसेविका, त्यापैकी १९८४-८५ मध्ये उपमहापौरपद, या पायऱ्या गाठतानाच विधानसभा निवडणुकाही त्यांनी लढवून पाहिल्या, पण लागोपाठ तीनदा अपयश आले. यश १९८९ मध्ये मिळाले, ते थेट लोकसभा निवडणुकीत! तोवर दांडगा लोकसंग्रह, समस्यांचा नेमका अभ्यास आणि संसदीय कामकाजाची जाण यांमुळे राजकारणात त्या स्थिरावल्या होत्या. पुढे सलगपणे लोकसभा निवडणुका जिंकणाऱ्या सुमित्राताईंना मध्य प्रदेशातील राजकारणात मात्र अंतर्गत विरोधामुळे शिरकाव जमलाच नाही, त्यामुळे त्या मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी त्यांच्या पतीची इच्छा पूर्ण झालीच नाही. याआधी वाजपेयी सरकारमध्ये राज्यमंत्रिपद भूषविलेल्या सुमित्राताई या लोकसभाध्यक्षपद भूषविणाऱ्या दुसऱ्या महिला आहेत.
आपल्या मतदारसंघातील समस्यांबरोबरच, देशापुढील प्रश्नांचीही नेमकी जाण असल्याने खासदारकीच्या जवळपास २५ वर्षांच्या संसदेच्या कामकाजात सुमित्राताईंचा सहभाग केवळ हजेरीपुरता न राहता, अनेक प्रश्नांना त्यांनी वाचा फोडली आणि न्यायही मिळवून दिला. संघविचारांचा जबरदस्त पगडा असलेल्या सुमित्राताईंना संसदीय कामकाजासोबतच, नाटय़, साहित्य, संगीत, आदी क्षेत्रांचीही सखोल जाण आहे. विशेषत: महिलांच्या प्रश्नांबाबत त्या नेहमीच सजग असतात. कविता हा त्यांच्या स्वभावाचा हळवा कोपरा आहे. भारतीय क्रीडाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या सतत धडपडत असतात. शहरीकरणाच्या भेसूर प्रक्रियेत क्रीडांगणांचा ऱ्हास होऊ नये, यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. इंदुरात महिलांच्या खो खो स्पर्धा भरवून या देशी खेळास प्रोत्साहन देण्याचा उपक्रमही त्यांनी राबविला आहे. भरपूर प्रवास, प्रचंड वाचन, कायद्याचे ज्ञान आणि सामाजिक प्रश्नांची जाण असलेली ही मराठमोळी महिला सोळाव्या लोकसभेची अध्यक्ष झाल्याने, देशातील महिलावर्गाचा आणि महाराष्ट्राचाही सन्मान झाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा