आपण कलाकार आहोत, म्हणजे या पृथ्वीवर आकाशातून पडलो आहोत, असा समज करून घेऊन आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी विनासायास मिळायला हव्यात आणि जगाने आपलेच म्हणणे ऐकले पाहिजे, असा आग्रह धरणाऱ्या ज्या कलाकारांना परदेशाची ओढ आहे, त्यांची शासनानेच त्वरित निर्यात करून टाकायला हवी. महाराष्ट्रातील लालफितीच्या कारभाराला कंटाळून थेट देश सोडण्याची भाषा करणाऱ्या सुरेश वाडकर यांचा त्या निर्यातीच्या यादीत निश्चित वरचा क्रमांक लागेल! नाशिकमधील त्यांनी खरेदी केलेल्या अडीच एकरांचा भूखंड खोटी कागदपत्रे करून भलत्यांनाच विकल्याचे लक्षात आल्यानंतर वाडकर यांनी शासनाकडे तक्रार केली. त्याकडे दुर्लक्ष झाले, म्हणून त्यांना येथील अशा कारभारापेक्षा परदेशातील स्वच्छ कारभाराची ओढ लागली आहे. संगीत शाळा सुरू करण्यासाठी मुंबईतील मोक्याचा भूखंड मिळावा म्हणून हेच वाडकर काही वर्षांपूर्वी मंत्रालयात सतत दिसत असत. सांताक्रूझच्या जागेवरील त्यांचा ‘आजीवन’  हा अत्याधुनिक ध्वनीमुद्रणाचा स्टुडिओ सर्वानाच परिचित आहे. या जागेबाबत वाडकर आणि शासन यांच्यात वाद-विवाद सुरुच आहेत. काही काळापूर्वी मानधनाच्या रकमेतून टीडीएस या कराची वजावट केल्याबद्दल एका कलाकाराने संयोजकांना चांगलेच धारेवर धरले होते. अमेरिकेत जायची ओढ असणाऱ्या अशा सगळ्या कलावंतांना तेथील व्हिसा मिळवताना मिळणारी वागणूक जर मानाची वाटत असेल, तेथे गेल्यावर दुय्यम नागरिक असल्याची सतत टोचणारी बोच जाणवत नसेल तर त्यांनी तेथेच गेलेले बरे. फाळणीनंतर पाकिस्तानात राहिलेल्या अनेक कलावंतांना नंतर भारतात यायची तीव्र इच्छा का वाटू लागली, याचे उत्तर परदेशची ओढ असणाऱ्यांनी मिळवायला सुरुवात केली, तर मायदेश म्हणजे काय, याचे उत्तर त्यांना मिळेल. मुंबईतील पेडर रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या संदर्भात आशा भोसले यांनीही आपला राग व्यक्त करण्यासाठी अशीच परदेशात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कलावंत या समाजाचाच घटक असतो आणि या समाजातील सुखदु:खे समजावून घेणे हे त्याचेही कर्तव्य असते. उत्तराखंडमध्ये झालेल्या घटनेनंतर देशातील किती कलावंतांना त्याबद्दलच्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या? कोणाला तेथे जावेसे वाटले? निदान त्या दु:खितांचे अश्रू आपल्या स्वरांनी पुसण्याची तरी इच्छा किती जणांना झाली. त्यांच्या मदतीसाठी आपला खारीचा वाटा उचलावा, असे कुणालाच का वाटले नाही? एरवी कोणत्याही कारणासाठी पांढरेशुभ्र वेश परिधान करून आणि नट्टापट्टा करून सायकलफेरी काढणाऱ्या या कलावंतांना उत्तराखंडमधील भयावहतेची जराही झळ लागू नये? ‘सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है’ या ‘गमन’ चित्रपटातील गीतामुळे सुरेश वाडकर यांना रसिकांच्या हृदयात स्थान मिळाले, त्या गीतातील भावना आयुष्यात आचरण्याचीही गरज त्यांना वाटू नये? कलावंतपणाच्या पासपोर्टवर सरकारी मदत मिळवण्यासाठी मंत्र्यांचे उंबरे झिजवण्यात जराही लाज न बाळगणारे हे कलावंत स्वत:वरील अन्यायाने एवढे संतप्त होतात, याचे कारण आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, असे त्यांना वाटत असते. इथल्या भ्रष्ट यंत्रणेकडून सर्व लाभ उठवायचे आणि नंतर त्यांच्यावरच टीका करत परदेशी जायची भाषा करायची, ही वाडकर यांची प्रवृत्ती दिसते. कलावंत म्हणून मोठे होत असताना जमिनीवर राहणे बहुधा अवघड वाटणाऱ्या वाडकरांना परदेशातील स्वच्छ कारभाराची एवढी हौस असेल, तर त्यांनी मुंबई आणि नाशिकमध्ये जागा घेण्याच्या भानगडीतच न पडलेले बरे.

Story img Loader