शल्यचिकित्सकाची- सर्जनची बोटे निपुण असावीच लागतात, पण पंतप्रधानांच्याच बोटांवर शस्त्रक्रिया करणे किंवा अंगठा नसलेल्यांना तो जोडणे यांसारखी हात व बोटांवरील अवघड शल्यकर्मे दिल्लीतील ‘एम्स’मधील विभागप्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल पार पाडत आहेत..
हातावर शस्त्रक्रिया करणाऱ्या देशातील मोजक्याच तज्ज्ञ डॉक्टरांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था म्हणजे एम्समधील अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश कोतवाल यांचा समावेश होतो. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाले तेव्हा त्यांचे हे कौशल्य पणाला लागले. २००४ साली पंतप्रधान होऊन दीड-दोन वर्षे लोटत नाहीत तोच डॉ. मनमोहन सिंग यांना उजव्या हाताच्या बोटांवर हवे तसे नियंत्रण ठेवता येत नसल्याचे जाणवू लागले. त्यांच्या वैयक्तिक डॉक्टरांनी मग डॉ. कोतवाल यांच्याशी संपर्क साधला. कोतवाल यांनी केलेल्या विविध चाचण्यांतून पंतप्रधानांच्या उजव्या मनगटाच्या मज्जातंतूवर दबाव येत असल्याने त्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष निघाला. जगातील सर्वोत्तम डॉक्टरकडून ही शस्त्रक्रिया करून घेण्याचा पर्याय मनमोहन सिंग यांच्याकडे होता, पण त्यांनी मराठी डॉक्टर कोतवाल यांच्यावर विश्वास टाकला आणि एम्समध्येच शस्त्रक्रिया करून घेतली. उजव्या हाताच्या बोटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर पंतप्रधानांना डाव्या हाताच्या बोटांनाही तसाच त्रास जाणवू लागला. त्या वेळी- मे २००६ दरम्यान एम्समध्ये ओबीसी आरक्षणविरोधी आंदोलन शिगेला पोहोचले होते. पंतप्रधानांना त्या आंदोलनाचा उपसर्ग पोहोचू नये म्हणून कोतवाल यांनी एम्समधील आपल्या सहकाऱ्यांनिशी दुसरी शस्त्रक्रिया करण्यासाठी लष्कराचे रुग्णालय गाठले. मनमोहन सिंग यांनी दोन्ही शस्त्रक्रियांदरम्यान पुरेपूर सहकार्य केले, तीन-चार आठवडे चाललेल्या उपचारांदरम्यान कोतवाल यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन केले आणि फारसा गाजावाजा न करता या दोन्ही शस्त्रक्रिया अर्थातच यशस्वी झाल्या. तेव्हापासून डॉ. कोतवाल यांच्या पंतप्रधानांच्या दिमतीला असलेल्या डॉक्टरांच्या पथकात कोतवाल यांचा समावेश झाला. मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांच्याशी कौटुंबिक स्नेह वाढून ७, रेसकोर्स रोडवर निवडक नोकरशहा आणि डॉक्टरांसाठी आयोजित होणाऱ्या चहापानाच्या कार्यक्रमांना त्यांची सहकुटुंब हजेरी लागायला लागली. डॉ. मनमोहन सिंग मितभाषी आहेत. ते फारसे खुलत नाहीत. पण लोकांना ते जसे भासतात त्यापेक्षा व्यक्तिगत जीवनात अगदी वेगळे आहेत. चहा घेतल्याशिवाय जाऊ नका, असा आग्रह करताना ते स्वत:ही चहा घेतात असे डॉ. कोतवाल नमूद करतात.
वीस वर्षांपूर्वी अमेरिकेतील केंटकी लुईव्हिलमधील हॅण्ड सर्जरीची संस्था आणि न्यूयॉर्कमधील हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीमध्ये दोन्ही ठिकाणी प्रत्येकी तीन-चार महिने प्रशिक्षण घेत हात आणि खांद्यांच्या व्याधींवर मात करणाऱ्या शस्त्रक्रियांमध्ये डॉ. कोतवाल यांनी नैपुण्य संपादन केले. भारतात होणाऱ्या हॅण्ड सर्जरीच्या परिषदेत अनेक ठिकाणी त्यांना मार्गदर्शनासाठी आमंत्रित केले जाते.
डॉ. प्रकाश कोतवाल यांचा जन्म ५ मे १९५१ चा जळगावचा. पण महाराष्ट्राशी त्यांचा संबंध तेवढय़ापुरताच आला. त्यांचे आजोबा दामोदर कोतवाल तार विभागातून निवृत्त झाल्यानंतर रतलामला स्थायिक झाले. वडील प्रभाकर कोतवाल रेल्वेच्या विभागीय कार्यालयात नकाशे काढण्याच्या विभागाचे प्रमुख होते. त्यांच्या आई उषा नंदुरबार जिल्हय़ातील बेटावदच्या देशमुख कुटुंबातील. रतलाममध्ये माळवी संस्कृतीच्या प्रभावात वाढलेले प्रकाश कोतवाल यांचे मराठीत शिक्षण झाले नसले तरी त्यांचे मराठी उत्तम आहे. तीन भावंडांमध्ये डॉ. प्रकाश कोतवाल थोरले. त्यांच्या भगिनी साधना भालोदकर अनेक वर्षांपासून अमेरिकेत, तर धाकटे बंधू अजय हैदराबादला स्थायिक आहेत. नागपुरातील हरी इनामदार यांच्या कन्या अरुंधती यांच्याशी डॉ. प्रकाश यांचा १९८१ साली विवाह झाला. व्यावसायिक यश गाठण्यात अरुंधती यांची खूपच साथ मिळाल्याचा ते आवर्जून उल्लेख करतात. कोतवाल यांचे आई आणि वडील त्यांच्या सोबतच असतात.
खरे तर प्रकाश कोतवाल यांनी इंजिनीअर किंवा आयएएसला जावे, अशी वडिलांची इच्छा होती. गणितात त्यांना नेहमी ९८-९९ गुणही मिळायचे. पण घरात कुणीतरी डॉक्टर व्हावे, अशी आजोबांची इच्छा होती. त्यामुळे गणित सोडून ते जीवशास्त्राकडे वळले आणि त्यांच्या कारकिर्दीची दिशा बदलली. १९६८ साली रतलामपासून शंभर किमीवरील इंदूरच्या महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेजमध्ये सातत्याने पहिल्या दहामध्ये स्थान पटकावत त्यांनी एमबीबीएस केले आणि इंदूरमध्येच अस्थिरोगशास्त्रात एमएस केले. १९७७ च्या प्रारंभी नोकरीच्या शोधात दिल्लीला आलेल्या डॉ. कोतवाल यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण इस्पितळ, विलिंग्डन, एम्समध्ये अर्ज केले. तिन्ही ठिकाणी सीनियर रेसिडेंटपदासाठी निवड झालेल्या डॉ. कोतवालांनी अर्थातच देशभरात नावाजलेल्या, प्रतिष्ठेच्या एम्सची निवड केली. एम्समध्ये त्या वेळी अस्थिरोगशास्त्र विभागात कडक शिस्तीचे भोक्ते आणि कुठेही कमी-जास्त झालेले खपवून न घेणारे डॉ. प्रकाश चंद्रा यांच्या हाताखाली कनिष्ठ डॉक्टर टिकत नसे. पण डॉ. कोतवाल या अग्निपरीक्षेत केवळ पासच झाले नाहीत तर डॉ. चंद्रा यांच्याशी त्यांची गट्टीही जमली.
इंदूरच्या तुलनेत दिल्लीत उपलब्ध असलेली अद्ययावत वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णांच्या समस्यांचे स्वरूप खूपच गुंतागुंतीचे असूनही एम्ससारख्या प्रतिष्ठित संस्थेत अनेक नव्या गोष्टी शिकताना इंदूरमध्ये मिळालेले वैद्यकीय शिक्षण अपुरे होते, असेही त्यांना कधी जाणवले नाही. तीन वर्षांनंतर १९८० मध्ये त्यांची अध्यापकपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून एम्समध्ये अध्यापक, सहायक प्राध्यापक आणि प्राध्यापक असा प्रवास करीत ते अस्थिरोगशास्त्र विभागाचे प्रमुख या पदावर स्थिरावले आहेत. एम्समध्ये रिक्त होणाऱ्या प्रत्येक पदासाठी नऊ सदस्यांच्या निवड समितीच्या मुलाखतीला सामोरे जावे लागते. ही खुली संस्था असल्यामुळे बाहेरूनही उमेदवार अर्ज करू शकतात. पदोन्नती हवी असेल तर तुम्हाला स्पर्धेसाठी सज्ज असावे लागते. या स्पर्धेत टिकण्यासाठी किती लेख प्रकाशित झाले, किती संशोधन केले, किती रुग्णांवर उपचार केले हे सर्व निर्णायक ठरत असल्यामुळे डॉ. कोतवाल यांनी भरपूर शैक्षणिक आणि संशोधनात्मक कार्य केले. अस्थिरोगशास्त्रावर त्यांनी दोन पुस्तके, विविध अभ्यासक्रमांसाठी २५ धडे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये सव्वाशेच्या आसपास संशोधनपूर्ण लेख लिहिले आहेत.
‘एम्सपेक्षा अन्य इस्पितळांच्या इमारती खूप प्रशस्त, आकर्षक आणि स्वच्छ असतील. पण इमारती नव्हे तर त्यात काम करणारे लोक आणि कार्यसंस्कृती महत्त्वाची असते. एम्समधील डॉक्टरांचे हितसंबंध अन्यत्र गुंतलेले नसतात. एम्समधील सर्व डॉक्टर्स पूर्णवेळ काम करणारे असल्यामुळे त्यांना खासगी प्रॅक्टिस करायची अनुमती नाही. रुग्णांवर उपचार करतानाच शिकविण्याच्याही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शिवाय नव्या संशोधन कार्यातही गुंतावे लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत नाही. या कार्यसंस्कृतीमध्येच एम्सचे वैशिष्टय़ दडले आहे आणि त्यामुळेच एम्सचे वलय अजूनही कायम आहे,’ असे एम्समधील ३६ वर्षांच्या दीर्घ वाटचालीचा आढावा घेताना ते सांगतात.
फ्रॅक्चर झालेल्या रुग्णाला शक्य तितक्या लवकर बरे करण्यासाठी धातूंच्या सळ्यांचा वापर करून शस्त्रक्रिया करण्याचे जर्मनी आणि स्वित्र्झलडमध्ये ५० वर्षांपूर्वी विकसित झालेले तंत्र १९८५ साली शिगेला पोहोचले असताना डॉ. कोतवाल शिकून आले आणि त्याचा एम्समध्ये पुरेपूर वापर केला. भारत पाश्चात्त्य तंत्रापासून आधी खूप म्हणजे पाच ते सात वर्षांनी मागे असायचा. आता अद्ययावत उपकरणे आयात करायला वेळ लागतो इतकेच, असे कोतवाल सांगतात. मोडलेली हाडे जुळविण्यावर सतत संशोधन करणारी स्वित्र्झलडच्या ए ओ फौंडेशन या जगभर पसरलेल्या संघटनेशी ते गेल्या २८ वर्षांपासून संलग्न असून या संघटनेचे भारतातील विश्वस्तही आहेत. त्यांच्या मते फ्रॅक्चरच्या उपचारांमध्ये अनेक आमूलाग्र आणि क्रांतिकारी सुधारणा झाल्या. उपचारांनंतर पूर्वी दिसणारी वैगुण्ये आता उरली नाहीत. इलिझारो तंत्रामुळे छोटा पाय मोठा करता येतो, न जुळणारी हाडे जुळतात. जन्मजात वैगुण्ये बरी होतात. सांधे बदलले जातात. अत्यंत गुंतागुंतीचे फ्रॅक्चरही बरे होतात. पाठीचे कुबडदेखील दूर होते.
महाभारतात द्रोणाचार्यानी गुरुदक्षिणेत एकलव्याचा अंगठा मागून घेतल्याचे उदाहरण आहे, पण डॉ. कोतवाल यांनी जन्मत:च अंगठा नसलेल्या किंवा अपघातात अंगठा गमावणाऱ्या असंख्य एकलव्यांना पूर्ववत करण्याचे काम केले आहे. अंगठय़ाशिवाय संपूर्ण हात जवळजवळ निकामी ठरत असतो. अंगठय़ाशिवाय चार बोटांनिशी जन्मलेल्यांनाही तर्जनीसारखे एक बोट कापून अंगठा लावता येतो. त्याची वाढ, लवचीकता मूळ अंगठय़ाप्रमाणेच असते. अशा सुमारे दीडशे शस्त्रक्रिया कोतवाल यांनी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.
वयाच्या ४५-५० व्या वर्षांनंतर अस्थिरोगाच्या समस्या अधिक उग्र होतात. त्या टाळण्यासाठी आहारात हिरव्या भाज्या आणि कडधान्यांचे सेवन तसेच नीट व नियमित व्यायाम केला तर साठ टक्के समस्या दूर होऊ शकतात. आठवडय़ातून किमान चार दिवस रोज ४०-४५ मिनिटे चालल्याने हाडांची ताकद आणि सांध्यांची गतिक्षमता वाढते, स्नायू सक्षम होऊन सांध्यांचे रक्षण चांगले होते. आहार आणि स्वच्छता चांगली असेल तर भारतात अजूनही अस्तित्वात असलेला हाडांचा क्षयरोग टाळता येतो, असे त्यांनी अभ्यासांती काढलेले निष्कर्ष आहेत.
सकाळी आठ ते सायंकाळी साडेसातपर्यंत सतत व्यग्र असलेले कोतवाल यांना तीन वर्षांनी निवृत्त झाल्यानंतर दिल्लीतच स्थायिक व्हायचे आहे. रतलामसारख्या गावातून दिल्लीत पोहोचताना देशातल्या सर्वोत्तम रुग्णालयात या पदावर काम करण्याची संधी मिळेल, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंख्य लोकांशी संपर्क होईल, अशी त्यांनी कल्पनाही केली नव्हती. त्यामुळे आपल्या व्यावसायिक प्रवासावर ते अर्थातच समाधानी आहेत.
sunil.chawake@expressindia.com