या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा करता येईल, असाच त्यांचा प्रयत्न आहे.  संस्कृत, गीता, रामजादे विरुद्ध हरामजादे..  ही सर्व उपकथानके पुढे केली जात आहेत ती मूळ कथा सुरूच होऊ शकलेली नाही म्हणून.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय जलसंपत्तीमंत्री साध्वी उमा भारती, मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, लघुउद्योग राज्यमंत्री गिरीराज सिंह वा अलीकडे गाजलेल्या नव्या साध्वी आणि अन्नप्रक्रिया खात्याच्या राज्यमंत्री निरंजन ज्योती वगरेंच्या तुलनेत सुषमा स्वराज या संयत आणि विचारी असाव्यात असे समजले जात होते. भगवद्गीता या ग्रंथास राष्ट्रीय ग्रंथ म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी करून श्रीमती स्वराज यांनी तो धुळीस तर मिळवलाच. पण आपण अन्य कोणत्याही बेजबाबदार साध्वी वा साधूंपेक्षा तसूभरही कमी नाही हेही त्यांनी दाखवून दिले. काही वर्षांपूर्वी त्यांनी सोनिया गांधी पंतप्रधान झाल्या तर आपण केशवपन करू असे जाहीर करून आपण किती कर्कश होऊ शकतो हे सिद्ध केले होते. वास्तविक त्यानंतर स्वराज यांना गांभीर्याने घेण्याची गरज नव्हती. परंतु तरीही त्यांचे नाव पंतप्रधानपदाच्या चच्रेत होते. नरेंद्र मोदी यांनी त्यांची साग्रसंगीत पंचाईत केल्यामुळे ते मागे पडले. त्यामुळे त्यांना केवळ परराष्ट्र व्यवहार खात्यावरच समाधान मानावे लागले. पण ते खातेही दाखवण्यापुरतेच. कारण त्या खात्याचा खरा कारभार पंतप्रधान मोदी यांच्याच हाती असून आंतरराष्ट्रीय विषयांवर श्रीमती स्वराज यांना ते फार विचारतात असेही नाही. तेव्हा प्रसिद्धी आणि महत्त्व मिळवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणूनही असेल त्यांनी एकदम टोकाची भूमिकाच मांडली असून गीता या धर्मग्रंथाचे स्थान हे राज्यघटनेपेक्षाही वरचे असल्याचे सूचित केले आहे. मोदी सत्तेवर आल्यापासून जो बाष्कळपणा सुरू झाला आहे, त्यात स्वराजबाईंचे ताजे विधान शोभून दिसते. त्यांनी हे विधान केल्याकेल्या भाजप नेत्यांत त्याचे समर्थन करण्यासाठी चांगलीच अहमहमिका सुरू झालेली दिसते. हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर हे स्वराजबाईंच्या पुढे एक पाऊल गेले आणि अन्य देशीय राज्यघटनांच्या तुलनेत गीता ग्रंथात किती शाश्वत मूल्ये सांगितली आहेत आणि आपण गीतेलाच राज्यघटनेपेक्षाही अधिक महत्त्व कसे द्यायला हवे हे ते सांगत बसले. त्यांच्या हरयाणा राज्याने गीता जयंती साजरी करण्यासाठी दुप्पट निधीचे नियोजन केल्याचीही घोषणा त्यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनीही गीता जयंतीसाठी असेच काही करावे असा त्यांचा आग्रह आहे. हे सर्व गीतारहस्य विशद करायची संधी या सर्वाना मिळाली ती नवी दिल्लीत ग्लोबल इनस्पिरेशन अ‍ॅण्ड एन्लाइटन्मेंट ऑर्गनायझेशन ऑफ गीता, ऊर्फ जियोगीता, या संघप्रणीत संघटनेमार्फत आयोजित गीतेच्या ५१५१ व्या वर्धापन दिन सोहळ्यात. स्वराजबाईंच्या या विधानाने अनेकांना अपेक्षेप्रमाणे लगेचच चेव चढला. विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल यांनी लगेच गीता हा राष्ट्रग्रंथ म्हणून जाहीर केला जावा, अशी मागणी केली. जे झाले ते अगदीच हास्यास्पद म्हणावयास हवे.
याचे कारण समस्त हिंदूंसाठीदेखील भगवद्गीता पूज्य आहे, असे नाही. वास्तवात हिंदू असो वा अन्य कोणी. बुद्धीच्या आधारे जगताना कोणीही एकच एक ग्रंथ प्रमाण वा अंतिम मानण्याची गरज नाही. कोणतेही एक पुस्तक परिपूर्ण वा सर्व प्रश्नांना उत्तरे देणारे असू शकत नाही. त्यात धर्मग्रंथ तर नाहीच नाही. मग तो गीता असो वा अन्य कोणता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे देशातील सुखवस्तू हिंदूंना जेवढे गीतेचे आकर्षण होते वा आहे, तेवढे आíथकदृष्टय़ा निम्नस्तरावर असणाऱ्यांना नाही, हे ध्यानात घ्यावयास हवे. डॉ. आंबेडकर यांच्यातील सामाजिक तत्त्वचिंतकाने गीतेसंदर्भात विस्तृत विवेचन केले आहे. त्यांच्या मते गीतेचे महत्त्व वाढावयास सुरुवात झाली ब्रिटिशांच्या काळात. ख्रिस्ती, मुसलमान आदींप्रमाणे िहदूंसाठीही एखादा धर्मग्रंथ असावयास हवा असा विचार त्यांनी केला असावा, या डॉ. बाबासाहेबांच्या म्हणण्यात निश्चितच तथ्य आहे. डॉ. आंबेडकरांच्या मते बुद्धपूर्व आर्य संस्कृतीत कोणतीही नीतिनियमांची चौकट नव्हती. सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर येथे मोठी आधी सामाजिक आणि नंतर राजकीय क्रांती झाली. या काळात ब्राह्मणांच्या हितसंबंधांना बाधा आली. परंतु मौर्य साम्राज्य लयाला गेल्यानंतर ब्राह्मणांनी पुन्हा उचल खाल्ली आणि ब्राह्मणांच्या या प्रतिक्रांतीचे समर्थन करण्यासाठी गीतेचा घाट घालण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रमाणे डॉ. दयानंद कोसंबी यांनीदेखील गीतेची उत्तम चिकित्सा केली आहे. या गीतेमुळे नक्की कोणास कोणती प्रेरणा मिळाली याचा सविस्तर ऊहापोह डॉ. कोसंबी यांनी केलेला आहे. ते दाखवून देतात की ज्या ग्रंथापासून आधी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि पुढे महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढय़ाची प्रेरणा घेतली त्याच गीता ग्रंथावरून अरिवदबाबूंना स्वातंत्र्यलढा सोडून आत्मचिंतनात मग्न होण्याची प्रेरणा मिळाली. शैव आणि वैष्णव, योगमार्गी, ज्ञानमार्गी आणि भक्तीमार्गी, सुधारणावादी आणि सनातनी अशा सर्वानाच अधूनमधून गीतेपासून प्रेरणा मिळत असते, असे डॉ. कोसंबी लिहितात. ‘प्रत्येक जण आपल्याला सोयीस्कर असा या ग्रंथाचा अर्थ लावतो. जो ग्रंथ इतक्या परस्परविरोधी मनोवृत्तीच्या सर्वानाच सोयीस्कर अर्थ लावू देतो वा त्यांना लावता येतो तो ग्रंथ कमालीचा संदिग्ध असला पाहिजे, ही गोष्ट उघड आहे,’ असे डॉ. कोसंबी यांचे ठाम प्रतिपादन होते. परंतु तरीही त्यांचा मोठेपणा हा की ज्या अर्थी हा ग्रंथ इतक्या परस्परविरोधी विचारधारेच्या लोकांना जवळचा वाटतो, त्या अर्थी त्याची काही तरी उपयुक्तता असली पाहिजे, असेही ते मान्य करतात.

परंतु या अशा उपयुक्ततेस धर्माच्या बंधनात अडकवून तिची उदात्तता वाढवण्याचा सामुदायिक उद्योग आपल्याकडे सतत सुरू असतो. गाय या जनावरास अन्य प्राण्यांसारखाच एक असे न मानता तीस गोमातेच्या कोंदणात बसवण्यासारखेच हे. या अशा भाकड, निरुपयोगी म्हणून मालकांनी टाकलेल्या गोमाता आपल्याकडे रस्त्यारस्त्यांवर केविलवाण्या नजरेने उकिरडे शोधत असतात. खऱ्या उकिरडय़ांप्रमाणे वैचारिक उकिरडेदेखील आपल्याकडे देशभर पसरले असून त्यात अनेक जण सुखेनव रवंथ करीत असतात. अलीकडची वक्तव्ये याचेच निदर्शक. हा नवा गीताध्याय यातील सर्वात ताजा. तो रचणाऱ्या या सुषमा स्वराजबाईंना गीता इतकी प्रिय वा अनुकरणीय वाटत असेल तर त्यांनी स्वत:पासून तिचे आचरण करावयास सुरुवात करावी. सुख दु:खे समे कृत्वा यावर विश्वास ठेवून मोदी पंतप्रधान झाले काय किंवा स्वत:ला ते पद मिळाले काय वा न मिळाले काय, स्वराजबाईंनी आपले देशसेवेचे कार्य कोणताही जळफळाट न करता चालूच ठेवावयास हवे होते. सर्वाचा आत्मा एकच असतो. तेव्हा सोनिया गांधी यांना देशाचे नेतृत्व करावयाची संधी मिळाल्यास ती आपल्यालाच मिळाल्याचा आनंद या गीतेमुळे यापुढे आपल्याला होईल असे स्वराजबाईंनी जाहीर करावे.
यापैकी अर्थातच काहीही होणार नाही. याचे कारण या मंडळींना ना गीतेत रस आहे ना तत्त्वज्ञानात. कोणत्या ना कोणत्या कारणाने समाजात दुफळी माजवून आपला सत्ताखुंटा अधिकाधिक बळकट कसा करता येईल, असाच त्यांचा प्रयत्न आहे. संस्कृत शिकण्याचा मुद्दा चच्रेत आणणे असो वा रामजादे आणि हरामजादे ही विभागणी असो. हे सर्व मुद्दे उपस्थित केले जात आहेत कारण अन्य महत्त्वाच्या आघाडय़ांवर काहीही भरीव करून दाखवण्यात मोदी सरकारला अद्याप यश आलेले नाही. ही सर्व उपकथानके पुढे केली जात आहेत ती मूळ कथा सुरूच होऊ शकलेली नाही म्हणून. आता त्यात या नव्या गीताध्यायाची भर.
अभ्यास न करता केवळ श्रद्धा आणि विश्वास यांवरच विसंबून राहायचे, तरीही अर्जुनाला कार्यप्रवण करणारा संदेश गीतेने दिला होता एवढे  मान्य करावे लागेल. कार्यप्रवणतेचा तो धडा तर सरकारही शिकलेले दिसत नाही. अशा वेळी परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी आपले अपयश झाकण्यासाठी गीतेत स्वराजाध्यायाची भर घालू नये, हे बरे.

मराठीतील सर्व अग्रलेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma swaraj says bhagavad gita must be declared national scripture
Show comments