भाजपचे पंतप्रधानपदाचे अनभिषिक्त उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासाठी मंगळवारचा दिवस वाईटच गेला असणार. या एका दिवसात त्यांच्या पायाखाली तीन सुतळी बॉम्ब फुटले. मोदी सरकारचे गुजरात लोकायुक्त आयोग विधेयक राज्यपाल डॉ. कमला बेनीवाल यांनी पुनर्विचारासाठी परत पाठविले. त्याच दरम्यान तिकडे दिल्लीमध्ये एका मुक्त पत्रकाराने भाजपच्या दोन नेत्यांची सीडी प्रसिद्ध केली. मोदींचे सन्मित्र अमित शहा यांना तुलसीराम प्रजापती चकमक खटल्यामधून वाचविण्यासाठी प्रजापती यांच्या आईवर कसा दबाव आणता येईल, असे संभाषण त्या सीडीमध्ये असल्याचे प्रसिद्ध झाले आहे. या सीडीवरून लागलीच काँग्रेसच्या तोफा धडधडू लागल्या आणि त्यांचा आवाज विरत नाही तोच अहमदाबादमधून निलंबित आयपीएस अधिकारी डी. जी. वंजारा यांचे राजीनामापत्र प्रसिद्ध झाले. ती सीडी आणि हे पत्र लागोपाठ ‘फुटणे’ हा योगायोगाचा भाग नाही. पण त्यामागे कारस्थान असल्याचे मानले, तरी त्याने हे पत्र दुर्लक्षित करता येणार नाही. वंजारा यांच्यावर भाजप नेते टीकारोपांची राळ उडवू शकतात. परंतु वंजारा हे एके काळचे मोदी यांचे विश्वासू अधिकारी असल्याने त्यांच्या पत्रातील मजकुराचे काय, हा प्रश्न उरतोच. मोदी आणि त्यांचे शहा यांच्यासाठी ती मोठीच डोकेदुखी ठरणार आहे. पण तो राजकारण आणि न्यायिक प्रक्रियेचा भाग झाला. येथे मुद्दा तो नसून, वंजारा यांच्या पत्रातील भाषा आणि ‘विचारां’चा आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रशासन आणि सत्ताधारी यांच्यातील संबंधांचा आहे. समाजमाध्यमांतील मोदीगण नरेद्रभाईंचा नमो नम: म्हणून गौरव करीतच असतात. वंजारा यांनी त्यांना चक्क देवाच्या स्थानी बसविले. हा आयपीएस अधिकारी. तो मुख्यमंत्रिपदी असलेल्या एका राजकीय व्यक्तीला देव म्हणतो आणि आपणास ज्या गुन्हय़ांसाठी अटक झाली, ते आपण त्या देवाच्या ‘धोरणा’नुसार केले असे सांगतो. वर देवाच्या ‘बडव्या’ला- अमित शहा यांना- दोष देतो, हे सर्वच धक्कादायक आहे. राजकारण्यांना आपली कामे- मग ती चांगली असोत वा बेकायदा- करण्यासाठी अधिकाऱ्यांची गरज असतेच. ते अधिकाऱ्यांना वापरून घेतात, यात काही नवे लोकज्ञान नाही. मात्र सनदी सेवेचे कवच लाभलेल्या अधिकाऱ्यांनी आपला घटनाबाहय़, बेकायदा कामांसाठी वापर करू द्यावा काय? तसे होऊ नये हा आदर्शवाद झाला. तसे होत नाही, हे वास्तव आहे. अधिकाऱ्यांचेच या विकृत व्यवस्थेत हितसंबंध तयार झालेले असल्याने ते आपला वापर करू देतात. वंजारा यांची आताची भूमिका ही ‘मी तर बुडेनच, पण तुम्हालाही घेऊन बुडेल’ अशी आहे. आपल्या वरिष्ठांची देवपूजा करताना त्यांना आपण कायद्याचे रक्षक आहोत, या जबाबदारीची जाणीव असती, तर त्यांच्यावर आज ही वेळ आली नसती. मोदी यांनी गुजरातचा विकास करताना कशा प्रकारचे अधिकारी भोवती गोळा केले होते, हेही या प्रकरणातून दिसून आले आहे. कमरेत वाकणे हीच त्यांची गुणवत्ता होती असे दिसते. वंजारा यांच्या पत्रातील मजकुराचा अर्थ जो तो आपल्या मगदुराप्रमाणे, आपण वर्णमालेतील कोणत्या पटावर- भगव्या, पांढऱ्या की हिरव्या- उभे आहोत, त्यावरून ठरवील. पण या पत्राचा आणखी एक अर्थ अत्यंत सुस्पष्ट आहे. अधिकारी आणि सत्ताधारी यांनी शासनव्यवस्थेत पेरलेल्या विषाला कोणती फळे लागू शकतात हेच त्या पत्राने दाखवून दिले आहे.