|| मुकुंद संगोराम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
निर्मितीक्षणीच संपणारे संगीत रंजनाच्या पलीकडे जावे, त्यासाठी तंत्राचा अतिरेक थांबून अभिजाताच्या उगमाचे झरे जिवंतच राहावेत आणि श्रोते व संगीत यांचे अद्वैत उद्याही कायम राहावे या अपेक्षांसह, या सदराच्या समारोपाचा लेखांक…
एकविसाव्या शतकाच्या उर्वरित आठ दशकांत अभिजात संगीताची अवस्था कशी असेल, या प्रश्नाने कलावंत आणि रसिक हे दोघेही खरे तर हैराण व्हायला हवेत. परंपरेने चालत आले, म्हणून ते पुढेही चालतच राहील, ही मागील शतकापर्यंतची अवस्था या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतच विरून गेली आहे. आत्तापर्यंत चाललेङ्घ आता पुढे काय? हा प्रश्न या संगीतापुढे आ वासून उभा आहे. रागदारी संगीतात राग या संकल्पनेला यापुढील काळात काही अस्तित्व राहील का, तासभर एकच एक राग गायचा म्हटले, तरी त्यात ‘मजकूर’ भरण्याएवढी सर्जनशीलता असेल का, राग नष्ट होतील की त्यांचे मिश्रण होत नवेच काही स्वरसान्निध्य तयार होईल, अभिजात संगीताच्या आविष्कारातील महत्त्वाचा घटक म्हणून श्रोता तेच संगीत आवडून घेईल, की त्याकडे पाठ फिरवेल, सांगण्यासारखे कलावंताकडे खूप असले, तरी ते श्रवण करण्याची, क्षमता रसिकांमध्ये टिकून राहील का, संगीतासारख्या प्रयोगशरण कलांना आरोग्याच्या नव्या जागतिक महासंकटातून वाचण्यासाठी कोणता नवा मार्ग असू शकेल… हे आणि असे अनेक हैराण करणारे प्रश्न आहेत.
राग या संकल्पनेत एकाहून अनेक स्वरांच्या एकमेकांच्या सहवासातून निर्माण होणाऱ्या ‘भावा’ला महत्त्व असते. त्या त्या रागाला म्हणजे विशिष्ट पद्धतीने एकत्र आलेल्या स्वरसमूहातून तयार होणाऱ्या स्वरवाक्याला त्याचा म्हणून एक स्वभाव प्राप्त होतो. हा भाव प्रत्येक वेळी जसाच्या तसाच सादर न करण्याचे आविष्कार स्वातंत्र्य त्या रागानेच कलावंतांना दिलेले असते. गणिती पद्धतीने गेल्या काही काळात तयार करण्यात आलेल्या नवरागनिर्मितीला किती प्रमाणात प्रतिसाद मिळत आला आहे, याची जराशी उजळणी केली, तरी त्याचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नाही, हे लक्षात येईल. मग शतकानुशतके यमन कल्याण, मालकंस, पूरिया, कानडा, मल्हार, भैरवी यांसारखे अनेक राग प्रत्येक वेळी नवसर्जनाचे आव्हान पेलत का उभे राहतात, त्यातून प्रत्येक वेळी सर्जनाच्या नव्या शक्यता कशा काय दिसू शकतात, या प्रश्नांची उत्तरे आता राग संगीताला शोधावी लागणार आहेत. अनेक नव्या स्वरकल्पना सामावू शकणारे स्वरपुंज ललित संगीतात ठायीठायी दिसतात. त्यांचा जीव लहान असतो. त्यात विस्तारक्षमतेला फारसा वाव नसतो. चटपटीत, लक्ष वेधून घेणारे, कदाचित लगेचच विरून जाणारे म्हणजे क्षणिक आनंदपूर्ती करणारे संगीत आता भरभराटीला आले आहे. त्याचा अभिजात संगीतावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात परिणाम होणे ही अगदीच स्वाभाविक गोष्ट. परंतु तो परिणाम अभिजात संगीताला पोषक आहे काय, याचा विचार करण्याएवढा अवसर कलाकारांमध्ये तरी आहे का, असा प्रश्न आहे.
कोणत्याही कलाकृतीचे ग्रहण करत असताना मनावर होणारा परिणाम महत्त्वाचा. त्या क्षणी जे वाटते, जे अंतर्मनात मुरते, ज्याने मन उत्फुल्लित होते, उन्मनी अवस्थेला पोहोचते, ज्यामुळे कलेचा आस्वाद घेत असतानाचा क्षण अपूर्वाईचा आनंद देतो… तो परिणाम, ती अपूर्वाई आस्वाद संपल्यानंतरही टिकतो का? कलांच्या विश्वात कलास्वादानंतर ‘उरते काय?’ हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आणि कळीचा. ज्या संगीताच्या श्रवणानंतरही ते संगीत मनात सतत रुंजी घालू लागते, त्याची खुमारी, त्याचे वेगळेपण पुन:पुन्हा ‘सतावत’ राहते, तो अनुभव कलावंत आणि रसिक या दोहोंसाठी कशासाठी जगायचे, याचे उत्तर देणारा असतो. संगीतासारख्या निर्मितीक्षणीच संपणाऱ्या कलेच्या आस्वादनात असा अनुभव अनेकदा येतो. मनसमृद्धीच्या मार्गावरून पुन:पुन्हा जावेसे वाटावे आणि कधी तरी ती संपन्नता लाभावी, अशी आस जेव्हा निर्माण होते, तेव्हा कलांच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होऊ लागतो. गेल्या दोन दशकांत जे घडले, त्याहून अधिक आव्हानात्मक असे येत्या काही दशकांत घडणार आहे. ते आव्हान तंत्राचे तर असेलच, परंतु त्याच वेळी मानवी भावभावनांमधील वाढत जाणाऱ्या गुंतागुंतीचेही असेल. तंत्र जेव्हा भावनांचा ताबा घेते, तेव्हा एक नवे आव्हान उभे राहते. त्याला पुढील काळात आपण कसे सामोरे जाणार आहोत, याचा विचार एव्हाना सुरू व्हायला हवा होता. प्रज्ञा आणि प्रतिभा या मनुष्याच्या ठायी असलेल्या प्रेरणा मरू न देण्याची खबरदारी घेण्याचे भान टिकून राहिले, तर अभिजात संगीताचे भविष्य निराशाजनक नसेल नक्की. त्यासाठी सामूहिक पातळीवर नव्या प्रयत्नांची गरज असेल. प्रबंध संगीतापासून ख्याल संगीतापर्यंतचा प्रवास भवतालातील बदलांच्या अनुषंगानेच झाला, हे खरे. हे बदल घडवून आणणाऱ्यांना आपण एका नव्या मार्गाचा शोध लावत आहोत, याचे भानही नसेल कदाचित. परंतु त्या मार्गावरून नंतर जाणाऱ्यांनी तो आपल्या कलागुणांनी प्रशस्त केला, म्हणूनच तर संगीत येथवर टिकून राहिले. निसर्ग आणि मानवी मन यांचा अन्योन्यसंबंध लक्षात ठेवत असतानाच, समाजकारण, राजकारण, कलाकारण, कलांचे व्यापारीकरण, बदललेली अभिरुची याचा विचार आधी कलावंतांनीच करायचा असतो.
या टप्प्यावर असे काही घडताना दिसत तरी नाही. ख्याल संगीताच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असणारा कुणी आता कलेच्या क्षितिजावर उगवलेलाही दिसत नाही. आविष्कार सतत बदलत राहिले, प्रवाही राहिले, म्हणूनच तर संगीत टिकून राहिले. कोणत्याच स्थितीजन्य संगीताला चिरकालत्वाचे वरदान नसते. ते प्रवाही असते, म्हणूनच टिकून राहते. संगीताकडे नव्या नजरेने पाहण्याची आणि त्यामध्ये नवसर्जन करण्याची प्रतिभा असणाऱ्याकडे अभिजात संगीत आता डोळे लावून बसले आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवरील जगण्याचे ताण सैल करणाऱ्या, मेंदूला तरतरी आणणाऱ्या आणि उदात्ततेचा अनुभव देऊ शकणाऱ्या बदलांची वाट पाहात बसण्याशिवाय या क्षणी पर्याय नाही. राग संगीतातील रागांचे काय होईल आणि त्या रागांची विशिष्ट शैलीत मांडणी करणाऱ्या घराणे पद्धतीचे काय होईल, या प्रश्नाने कलावंतांनी अस्वस्थ व्हायला हवे. नवीन काही घडवू इच्छिणाऱ्यांपुढे जर जिवंत राहण्याचेच आव्हान असेल, तर संगीतासारख्या सर्वात तरल कलांचे अस्तित्वही अडचणीत येऊ शकेल. भारतीय अभिजात संगीतात आजवर जेव्हा जेव्हा असे मळभ आले, तेव्हा तेव्हा प्रतिभावान कलावंतांनी पुढाकार घेऊन ते संगीत जिवंत ठेवण्यासाठी कशाचीही पर्वा न करता प्राण पणाला लावले. अशा पहिल्या प्रयत्नांना लगेचच यशाची किनार लाभली नसेलही, परंतु त्या प्रयत्नांमुळेच ही कला पुन्हा नव्याने उभारी धरू शकली आणि नवप्राणांनी टवटवीतही होऊ शकली. असे करता येण्याएवढी स्वस्थचित्तता तेव्हाही नव्हतीच. जिवावर उदार होऊन कला टिकवून ठेवण्यासाठी आणि ती समाजाभिमुख करण्यासाठी ज्यांनी प्रचंड कष्ट घेतले, तेच खरे पायाचे भक्कम दगड. आताच्या आणि येणाऱ्या भविष्यात असे शांत राहून कलांचा व्यासंग करता येण्यासारखी परिस्थिती असेल, असे दिसत नाही. कलावंताच्या अंत:प्रेरणांनी उमलत जाणे, हेच कलेचे भागध्येय असते. आजवरच्या सगळ्या कठीण काळातही ती सतत फुलत राहिली, नव्याचा शोध घेत राहिली आणि त्या नवेपणालाच भरजरी वस्त्रे चढवत ती पुन्हा उभी राहिली. आता गरज आहे, ती बदलत्या परिस्थितीचे भान ठेवून ही वस्त्रे बदलण्याची.
संगीतासमोरील आव्हान केवळ नवआधुनिकतेचे नाही. ते तंत्राच्या अतिरेकाचे आहे, तसेच संगीत श्रवण करणाऱ्या जनांच्या जगण्याशीही संबंधित आहे. तंत्राने नवनादाचे आव्हान कदाचित पेलताही येईल. नवआधुनिकतेमध्ये येणाऱ्या नव्या विचारांना सामोरे जात संगीताला आपली वाट बदलता येईल. पण शेवटी अभिजात संगीत ही केवळ ध्वनिमुद्रित स्वरूपात संग्रहालयात जपता येणारी कला नाही, हे लक्षात घेऊन, तिच्या उगमापाशी म्हणजे ते निर्माण होत असतानाच्या प्रक्रियांशी, निगडित नवा विचार या संगीतात दिसायला हवा. म्हणजेच ज्यांच्यासाठी हे संगीत निर्माण होते, ज्यांच्या सहभागानेच ते प्रयोगशील होते, ज्यांचे अस्तित्व आणि दाद संगीतनिर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, त्या सांस्कृतिक मानवी समूहांच्या जगण्याचाही विचार संगीतात उमटायला हवा. हा विचार घेऊन नवसर्जनाचे आव्हान पेलण्याची कमालीची प्रतिभा असणाऱ्या नव्या कलावंतांचा शोध आता सुरू झाला आहे. मानवाच्या आदिम प्रेरणांमध्ये स्वरसौंदर्याची जाणीव अंतर्भूत असते. त्या जाणिवा कालानुरूप बदलत जातात. त्यांवर भवतालातील घडामोडींचा अदृश्य परिणाम होत असतो. जे संगीत नव्या प्राप्त परिस्थितीतही रंजनाच्या पलीकडे जाऊन कार्य करते, ते काळाबरोबर राहते आणि त्यातच बदलांच्या खुणाही सामावलेल्या असतात. येत्या काही दशकांत असे काही घडावे, घडेल, अशी आशा करण्यास काय हरकत आहे?
mukund.sangoram@expressindia.com