ज्याच्या चित्ताला चिंतनासाठी सद्गुरूबोधाशिवाय दुसरा विषय नाही, ज्याच्या मनाला मननासाठी सद्गुरूबोधाशिवाय दुसरा विषय नाही, ज्याच्या बुद्धीला प्रबोधनासाठी सद्गुरूबोधाशिवाय दुसरा आधार नाही, ज्याच्या ‘अहं’ला ‘सोऽहं’च्या जाणिवेशिवाय दुसरा आधार नाही तोच खरा अनन्य भक्त. ज्याच्या जगण्याला या कशाशिवाय अन्य हेतू नाही तोच खरा अनन्य भक्त. माउली सांगतात, ‘‘ऐसे अनन्ययोगें। विकले जीवें मनें आंगें। तयांचे कायि एक सांगें। जें सर्व मी करीं।।’’ ज्यांनी जीव, मन आणि शरीर सर्व काही मला विकून टाकले आहे, मला अर्पून टाकले आहे, माझ्याशिवाय अन्य कोणी नाही, या भावनेने ज्यांनी अनन्ययोग साधला आहे, त्यांचे सर्व भौतिक-पारमार्थिक कर्तव्यं मीच पार पाडतो. ‘‘किंबहुना धनुर्धरा। जो मातेचिया ये उदरा। तो मातेचा सोयरा। केतुला पां।।’’ जो मातेच्या पोटी जन्म घेतो, तो तिचा किती आवडता असतो? रूप-गुण कशातही मुलात कितीही न्यून असू दे, तिच्या वात्सल्यात काहीच उणं होत नाही.  त्याचप्रमाणे- ‘‘तेवि मी तयां। जैसे असती तैसियां। कळिकाळ नोकोनियां। घेतला पहां।।’’ तसे माझे हे अनन्यभक्त कसे का असेनात, त्यांच्याकडून भक्ती नीट होत नसेल, उपासना होत नसेल, अनंत विकार-वासनांशी ते झुंजत असतील आणि त्यापायी स्वत:ला हीन लेखत असतील तरीही ते जसे आहेत तसे आणि ते श्रीमंत असोत की गरीब, लोकांकडून सन्मानित असोत की अपमानित, ते ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीत मी त्यांना स्वीकारतो, त्यांच्यावर प्रेम करतो आणि कळीकाळाचा पराभव करून त्यांना माझ्या पदरात घेतो. मग जो असा माझा अनन्य भक्त आहे, त्याला संसाराची चिंता कशाला? राजाची राणी भीक कशाला मागेल? ‘‘येऱ्हवी तरी माझिया भक्तां। आणि संसाराची चिंता। काय समर्थाची कांता। कोरान्न मागे।।’’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १२, ओव्या ८२ ते ८५). नित्यपाठातील ‘‘देखें अखंडित प्रसन्नता। आथी जेथ चित्ता। तेथ रिगणें नाहीं समस्तां। संसारदु:खां।। जैसा अमृताचा निर्झरु। प्रसवे जयाचा जठरु। तया क्षुधेतृषेचा अडदरु। कंहींचि नाहीं।।’’ या ओव्यांचे विवरण इथे थांबवू. मग जो असा अनन्य भक्त आहे, ज्याचा जगण्याचा आधार अशाश्वत नव्हे तर शाश्वत आहे, त्यालाच खरी निश्िंचती येणार ना? त्याचंच हृदय खऱ्या अर्थानं प्रसन्न राहणार ना? त्याचीच बुद्धी आपोआप परमात्मबोधात एकाग्र होणार ना? स्वामी स्वरूपानंद संपादित ‘नित्यपाठा’तील पुढील दोन ओव्याही हेच सांगतात. त्या व त्यांचा प्रचलितार्थ असा :
तैसें हृदय प्रसन्न होये। तरी दु:ख कैचें कें आहे। तेथ आपैसी बुद्धि राहे। परमात्मरूपीं।। ४२।। (अ. २ / ३४०). जैसा निर्वातींचा दीपु। सर्वथा नेणे कंपु। तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु। योगयुक्त ।। ४३।। (अ. २ / ३४१).
प्रचलितार्थ :  त्याप्रमाणे अंत:करण प्रसन्न झाले तर मग दु:ख कसले आणि कुठले? त्यावेळी परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी सहजच स्थिर होते. ज्याप्रमाणे निवाऱ्याच्या ठिकाणी असलेली दिव्याची ज्योत मुळीच हलत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुष स्वस्वरूपी स्थिर बुद्धीने राहतो.

Story img Loader