कर्म निष्काम करायचं, अचूकतेनं करायचं, पूर्ण क्षमतेनुसार करायचं पण त्यात कर्तेपण येऊ द्यायचं नाही. त्याच्या फळाबाबत अनासक्त राहायचं. फळाची इच्छा मनात धरून कर्म करायचं नाही. पण म्हणून कर्म कसंतरी उरकून टाकायचं नाही. परमात्म्याशी योग साधत, चित्त परमात्म्याकडे देऊन कर्म करायचं; हा भावार्थ असलेल्या ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ओव्या आपण पाहिल्या. आता ‘नित्यपाठा’तील पुढील तीन ओव्या पाहू. त्या अशा:
परि आदरिलें कर्म दैवें। जरी समाप्तीतें पावे। तरी विशेषें तेथ तोषावें। हें हि नको ।।१४।। (अ. २/ २६८) कीं निमित्तें कोणे एके। तें सिद्धी न वचतां ठाके। तरी तेथीचेनि अपरितोखें। क्षोभावें ना।। १५।। (अ. २ / २६९). देखें जेतुलालें कर्म निपजे। तेतुलें आदिपुरुषीं अर्पिजे। तरी परिपूर्ण सहजें। जाहलें जाण।। १६।। (अ. २/ २७१).
प्रचलितार्थ : परंतु दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जरी यथासांग पार पडले, तरी त्यात विशेष संतोष मानावा, हे ही नको (१४) किंवा, काही कारणामुळे ते आरंभिलेले कर्म जरी सिद्धीस न जाता, पूर्णत्वास न जाता अर्धवट राहिले, तरीही त्यामुळे असंतोषाने चित्त विचलित होऊ देऊ नकोस, क्षोभ येऊ देऊ नकोस (१५) कारण जेवढे म्हणून कर्म हातून होईल, तेवढे सगळे जर परमात्म्याला समर्पित केले, तर ते सहजच परिपूर्ण झाले, असे समज (१६).
विशेषार्थ : यात कर्माची पूर्णता वा अपूर्णता यात मनाचं अडकणं व्यर्थ आहे, हे सांगितलं आहे. उलट प्रत्येक कर्म जर भगवंताला समर्पित झालं, भगवद्भावनेनं झालं तर कोणतंही कर्म अपूर्ण राहत नाही, ते पूर्णत्वासच जातं, हे बिंबवलं आहे. अर्थात स्थूलरूपानं पाहू जाता कर्म अपूर्ण राहिलं असलं तरी भगवद्भावनेनं ते केल्यानं जेवढं कर्म झालं ते भगवद्इच्छेनंच झालं, हा भाव प्रधान होतो. त्यामुळे प्रत्येक कर्म हे पूर्णच भासतं.
विवरण : इथे एका प्रसंगाची आठवण होते. ‘अनंत आठवणीतले अनंत निवास’ या पुस्तकात श्री. वसंत र. देसाई यांनी ती सांगितली आहे. स्वामी स्वरूपानंद यांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी अभंग छंदात आजच्या सोप्या पण अत्यंत रसाळ मराठीत भावानुवादित केली. हे काम दोन-अडीच वर्षे सुरू होतं. एकदा ओवी लिहिल्यानंतर त्यात कधीही दुरुस्ती करावी लागत नसे. रोज १० ओव्यांवरील अभंगचरण लिहायचे, अशा शिस्तीत हे कार्य सुरू होतं. दिवसभरात कधी सकाळी, तर कधी दुपारी अगर रात्री ते लिहीत. या कामात एकही दिवस खंड पडला नाही. मातोश्रींचं निधन झालं त्या दिवशीही पहाटेच त्यांनी ओवीलेखन केलं होतं. ज्ञानेश्वरीचे एक गाढे अभ्यासक स्वामींच्या दर्शनासाठी आले होते. अभंग ज्ञानेश्वरीत काही ओव्या कमी आहेत व काही जास्तीच्या दिसत आहेत. तरी दुरुस्ती करायची का, असं त्यांनी विचारलं. त्यावर स्वामी नम्रपणे म्हणाले की, ‘ज्या ओव्या राहिल्या व ज्या जास्त झाल्या ती परमेश्वराचीच इच्छा.’ म्हणजे जे काम सलग अडीच वर्ष सुरू होतं त्यात स्वकर्तृत्वाचा लेशमात्र भास नव्हता तर ते कार्य भगवद्इच्छेनंच झालं, हाच भाव होता!
स्वरूप चिंतन: ८३. पूर्णकर्म
कर्म निष्काम करायचं, अचूकतेनं करायचं, पूर्ण क्षमतेनुसार करायचं पण त्यात कर्तेपण येऊ द्यायचं नाही. त्याच्या फळाबाबत अनासक्त राहायचं. फळाची इच्छा मनात धरून कर्म करायचं नाही.
आणखी वाचा
First published on: 29-04-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan