देहात असूनही विदेही असलेल्या सद्गुरूंच्या निर्गुण तत्त्वाचा मागोवा स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ६०व्या ओवीत आहे. आता पुढील ओवी त्यांच्या आत्मतत्त्वाचा संकेत करते. ते कसे आहेत? ‘‘आनंद ना निरानंदु। एक ना विविधु। मुक्त ना बद्धु। आत्मपणें।। ६१।। ’’ (अ. १३, ओ. १११०). आता इथे आनंद हा शब्द ‘सुख’ या अर्थानं घ्या. सद्गुरू ‘सुखा’त दिसोत की ‘दु:खा’त, ते अखंड परमानंदातच निमग्न आहेत. त्यांना कोणत्याही एका साच्यात बसवू गेलो तर ते आपली विविध रूपं दाखवतात. त्यांना ‘मुक्त’ म्हणावं तर ते माझ्यासारखे प्रपंचात दिसतात आणि ‘बद्ध’ म्हणावं तर त्यांच्याइतकं मुक्तपणे कोणीच या जगात वावरत नाही! मग माउली सांगतात, ‘‘तें परम तत्त्व पार्था। होती ते सर्वथा। जे आत्मानात्मव्यवस्था। राजहंस।। ६२।।’’ (अ. १३/११४२). त्या परमतत्त्वाला तू ओळखू शकणार नाहीस. हो! पण एकाच गोष्टीवरून तू त्यांना ओळखू शकशील. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करून केवळ दूधच ग्रहण करतो, तसे ते शाश्वत आणि अशाश्वत यातून शाश्वताचीच सतत निवड करतात. शाश्वत अशा परमतत्त्वाशी एकरूप होऊन ते वावरतात. तुम्ही स्वामींचा पावसेतला वावर, लोकांशी असलेलं त्यांचं वात्सल्यपूर्ण वर्तन आणि जगण्याची सहज रीत डोळ्यासमोर आणलीत तर पुढील ओव्यांचा अर्थ आपोआप डोळ्यासमोर येईल! माउली म्हणतात – ‘‘ऐसेनि जे निजज्ञानी। खेळत असे त्रिभुवनी। जगद्रूपा मनीं। सांठऊनि मातें।। ६३।। (अ. १०/११७). हें विश्वचि माझें घर। ऐसी मति जयाची स्थिर। किंबहुना चराचर। आपण जाहला।। ६४।।’’ (अ. १२/२१३). हा आत्मज्ञानी त्रिभुवनांत सुखानं खेळत असतो! सद्गुरूंच्या कृत्यांना ‘लीला’ म्हणतात ना? आई मुलाला काय सांगते? अंगणाबाहेर खेळायला जाऊ नकोस. म्हणजे आपल्या आवारात धास्ती नसते ना? मग हे सर्व जग भगवद्रूपच आहे हे जो जाणतो आणि परमस्वरूपात सदोदित लीन असतो अशा सद्गुरूंना चराचरात सुखानं विहरायला कसला अटकाव? नव्हे, समस्त चराचरातही माझाच निवास ज्याला पदोपदी जाणवतो आणि जो माझ्याशी एकरूप आहे, या चराचरापासून अभिन्न आहे त्याला परकं कोण असणार? तो प्रत्येकालाच भवदु:खातून बाहेर काढण्यासाठी अविरत श्रमतो. एवढंच नाही अशाश्वताला भजत असलेल्या जिवांच्या अंतरंगात तो शाश्वताच्या भजनाची आस्था रुजवतो. या सद्गुरूला मी शिरोधार्य मानतो, असं भगवंत सांगतात. ‘‘मग याहीवरी पार्था। माझिया भजनीं आस्था। तरी तयातें मी माथां। मुकुट करीं।। ६५।।’’ (अ. १२/२१४). अशा सद्गुरू स्वरूपाशी आपली पूर्ण ऐक्यता प्रभू प्रकट करतात. मला अन्यत्र शोधू नकोस, मी तिथेच आहे, असं बजावतात! अरे मी वैकुंठात नाही की तेजप्रकाशात नाही. लोक मला वैकुंठात तर योगी तेजबिंदु आणि प्रकाशरूपात पाहायची धडपड करतात, पण त्या दोघांना माझा पत्ता लागत नाही! (तो मी वैकुंठीं नसें। वेळु एक भानुबिंबीं न दिसें। वरी योगियांचींहि मानसें। उमरडोनि जाय।। ६६।।).
२२९. एकरूपस्थ
देहात असूनही विदेही असलेल्या सद्गुरूंच्या निर्गुण तत्त्वाचा मागोवा स्वामी स्वरूपानंद संपादित ‘ज्ञानेश्वरी नित्यपाठा’तील ६०व्या ओवीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-11-2014 at 12:42 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan