कर्तेपणाचा भाव नसलेली ‘कर्तृत्वाभिमानरहित कर्मे’ केल्यानं माणूस जसा कर्मसाखळीत अडकत नाही, त्याचप्रमाणे ‘निष्काम कर्मा’नीही तो कर्मसाखळीत अडकत नाही. वरवर पाहता कर्तृत्वाभिमानरहित कर्मे आणि निष्काम कर्मे यात फारसा फरक जाणवत नाही. सकाम कर्मातच माणसाची अपेक्षा गुंतली असते आणि ती कर्मे तो कर्तेपणाच्याच भावनेतून करीत असतो, हेही खरं. तरी या दोन्हींत एक अगदी सूक्ष्मसा भेद आहे. निष्काम कर्म म्हणजे कामनारहित कर्म. एखादं सत्कार्य मी कर्तृत्वाभिमान येऊ न देता पार पाडत असलो तरी त्यात सकामता येऊ शकते. निष्काम कर्मानंच माणूस कर्मबंधनातून सुटतो, असं सनातन तत्त्वज्ञानही सांगतं, पण नेमकं निष्काम कर्म कोणतं, याची काही व्याख्या नाही. याचं एकच कारण म्हणजे साधकानुरूप कोणतं कर्म निष्काम आहे, हे केवळ सद्गुरूच जाणतात. सकामता कुठे येते? ज्यात मनाची आवड आहे, तिथेच. माझ्या मनाला जे आवडतं त्याच्या प्राप्तीसाठीच मी प्रयत्न अर्थात सकाम कर्म करतो. त्यातही गंमत अशी की जी इच्छा धरून मी कर्म करतो त्या कर्मानं तीच इच्छा पूर्ण होईल का, त्या कर्माचा अन्य विपरीत परिणाम होणार नाही ना, याचंही मला आकलन नसतं. हीराभाई ठक्कर तर सांगतात की, ‘‘(माणसाला स्वभावत:च वाईट कर्माची गोडी असते पण,) माणसाला स्वभावत: वाईट कर्माचं फळ नको असतं! चांगल्या कर्माचं फळ मात्र त्वरित मिळावं, अशी त्याची इच्छा असते. चांगलं फळ मिळण्यासाठी सत्कर्म आवश्यक असतं, ते करायला मात्र तो इच्छुक नसतो. सुख सर्वाना हवं, पण सुखाचं कारण जे पुण्य, ते करण्यास कोणी उत्सुक नसतो. दु:खाचं कारण पापकर्म, ते मात्र प्रतिक्षणी माणूस बिनदिक्कत करतो’’ (कर्माचा सिद्धान्त, पृ. ३५). थोडक्यात मनाच्या आवडीनुसार मी अपकर्म करतो, पण त्याचं फळ मला नको असतं. मनाची आवड नसतानाही मी ‘देवाचं करायचं’ म्हणून थोडी फार उपासना कशीबशी करतो, पण त्या सत्कर्माचा लाभ मला तात्काळ हवा असतो! माझा सकाम कर्माचा पसारा असा माझ्या मनाच्या आवडीनुसार विस्तारतच असतो. या माझ्या मनाच्या आवडी तोडणारं असं जे कर्म तेच खरं निष्काम कर्म आणि असं निष्काम कर्म माझ्या बाबतीत कुठलं आहे, हे सद्गुरूच जाणतात. आपल्या मनोधर्मानुसार साधक कर्मात रमत असतो. सत्त्वगुणी, रजोगुणी आणि तमोगुणी अशा तीन  स्वतंत्र वृत्तीच्या साधकांची मनोधारणा, मनाची घडण, मनाची आवड वेगवेगळी असते. सत्, रज आणि तम या गुणांपैकी जो गुण त्याच्यात प्रधान आहे त्यानुरूप त्याची वृत्ती बनते आणि त्या वृत्तीनुरूप त्याची मनोरचना असते. त्यानुसारच्या अपेक्षा त्याच्या अंतरंगात उमटत असतात आणि त्यानुसारचं सकाम कर्म त्याच्या हातून होतं. तेव्हा ज्याच्या त्याच्या मनोधारणेनुसार जो तो कोणत्या कर्माच्या खोडय़ात अडकला आहे आणि त्यातून तो कसा बाहेर येईल, हे सद्गुरूच जाणतात. साधना असो की प्रत्यक्ष जगणं, या दोन्हींतली माझी सकाम वृत्ती ते पालटतात. ही प्रक्रिया ते अगदी अलगद पार पाडतात आणि माझ्यात बदल घडवण्याला चालना देतात.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा