राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळालं की माणूस सुखी होईल. त्याची सर्व बंधनं संपतील, असं मानलं गेलं. प्रत्यक्षात जिथे जिथे ही तिन्ही स्वातंत्र्ये नांदत आहेत तिथेही माणसाची बंधनं संपली नाहीत. याचं कारण सांगताना श्रीपाद कुलकर्णी म्हणतात, ‘‘केवळ राहणीचे मान वाढले की सुखाचे प्रमाण वाढते, हे गेल्या अर्धशतकातील पाश्चात्त्य राष्ट्रांतील घटनांनी फोलच ठरवले आहे. ही सर्व स्वातंत्र्ये महत्त्वाची आहेत, पण ती अपुरी आहेत. या सर्व स्वातंत्र्यांना मानसिक स्वातंत्र्याची जोड मिळणे अवश्य आहे.’’ मानवी बंधनाची मूलगामी उपपत्ती केवळ अध्यात्मशास्त्राने मांडली आहे, असा ठाम दावा करताना कुलकर्णी ती उपपत्ती सांगतात ती अशी, ‘‘आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मूल स्रोत देह, मन व बुद्धी यापलीकडे असलेल्या आत्मतत्त्वात आहे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत आपण आपल्या देहमनबुद्धीशीच एकरूप होतो. म्हणजेच देहमनबुद्धीचे आत्म्यावर आवरण पडते.. हे देहात्मबुद्धीचे आत्म्यावरील अतिक्रमण हाच बंध होय. हे आवरण दूर झाले की बंधही दूर होतो आणि खऱ्या स्वातंत्र्याचा अनुभव येतो. या आवरणालाच शंकराचार्यानी अध्यास असे म्हटले आहे.’’ (आनंद तरंग). इथे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितलेला जीवनहेतू परत वाचू. स्वामी म्हणतात, ‘‘मनुष्याने आपले सर्व सामथ्र्य ईश्वरसेवेकडे लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पण त्यापूर्वी त्याला ईश्वराचे आणि स्वत:चे यथार्थ ज्ञान पाहिजे. ते मिळवण्यासाठी भाराभर पुस्तके वाचली पाहिजेत, असे नाही. हरघडी आपल्या प्रत्येक कृतीचा आपण विचार करायची सवय ठेवली तरीही त्या दिशेने आपली पुष्कळ प्रगती होते. मनुष्याने आपले मन तपासले पाहिजे.’’ याचाच अर्थ जोवर माणूस स्वत:चं मन तपासणार नाही, प्रत्येक कृतीमागील मनाची ओढ तपासणार नाही तोवर तो तटस्थपणे स्वत:चं निरीक्षण करू शकणार नाही. जेव्हा हे आत्मनिरीक्षण सुरू होईल तेव्हा अंतर्मुख होण्याची प्रक्रिया साधू लागेल. तसं झालं तरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा मूल स्रोत देह, मन व बुद्धी यापलीकडे आहे, याची जाणीव वाढू लागेल. मी म्हणजे देह नाही. मी म्हणजे बुद्धी नाही. मी म्हणजे मन नाही. देहानं मी व्यवहार करतो पण देह आणि इंद्रियं ही निव्वळ उपकरणं आहेत. त्याद्वारे व्यवहार करणारा कोण आहे? डोळे पाहतात पण काय पाहिलं ते सांगणारं तोंड आंधळं आहे. कानांनी माणूस ऐकतो पण मुके कान उत्तर देऊ शकत नाहीत. जे ऐकलं त्यावर प्रतिक्रिया देणारं तोंड बहिरं आहे. मग माझ्या विविध इंद्रियांमध्ये हा समन्वय साधणारा अंत:स्थ कोण आहे? माझं मन दु:खी झालं, माझी बुद्धी काम करीत नाही, असं आपण म्हणतो. याचाच अर्थ बुद्धी माझी आहे, मन माझं आहे हे खरं, पण बुद्धी म्हणजे मी नाही. मन म्हणजे मी नाही! मग या देह, मन, बुद्धीचा या जन्मातला जो साचा आहे, त्यालाच मी माझी ओळख मानतो आहे. या तिन्हीपलीकडे जे आहे त्याला संतसत्पुरुष आत्मतत्त्व म्हणतात. ते आत्मस्वरूप मला उकललं तर परमात्मस्वरूपही उकलेल! मोक्षासाठीचा अनुक्रम येथूनच सुरू होतो! 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा