माणसाला बुद्धी आहे, क्रियाशक्ती आहे पण म्हणून उचित र्कम कोणतं आणि अनुचित कोणतं, याचा अचूक निर्णय त्याला त्याच्या बुद्धीच्या जोरावर साधेलंच असं नाही. निर्णय झाला तरी त्यानुसार अचूक आचरण करणं त्याला त्याच्या क्रियाशक्तीच्या जोरावर साधेल, असं नाही, हीच गोष्ट काका तुळपुळे सूचित करतात. जे अध्यात्म वगैरे मानत नाहीत त्यांचाही भर या पहिल्या दोन गोष्टींवरच तर असतो! ते म्हणतात, माणसाला बुद्धी आहे, क्रियाशक्ती आहे मग गुरू-बिरू कशाला हवा? पण त्यांना हे उकलत नाही की बुद्धी आणि क्रियाशक्ती असली तरी अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची कला अवगत नसेल तर नुसत्या बुद्धीच्या जोरावर आणि क्रियाशक्तीच्या बळावर अखंड तृप्तीचा अनुभव जीवनात येत नाही. माणसात बुद्धी असली तरी ती संकुचित ‘मी’ला चिकटल्याने त्या देहबुद्धीत अडकलेल्या माणसाला तटस्थ, अलिप्त, नि:स्वार्थ विचारही करता येत नाही. ‘मी’ आणि ‘माझे’च्या जपणुकीत आणि जोपासनेतच त्याची बुद्धी जुंपली असते. त्याच्यात क्रियाशक्ती असली तरी तीदेखील याच संकुचित ‘मी’च्या जपणुकीसाठी आणि जोपासनेसाठीच राबवली जात असते. माणसातली बुद्धी आणि क्रियाशक्ती अशी संकुचित ‘मी’पुरती राबत असल्याने खऱ्या अखंड तृप्तीचा अनुभव त्याला येत नाही. उलट ‘मी’ आणि ‘माझे’च्या काळजीनं तो सदोदित चिंतित आणि अतृप्तच राहातो. आपल्या जीवनात अखंड तृप्ती नाही, हा अनुभव अशा माणसालाही येतोच, पण त्या अतृप्तीचं कारण त्याला उमगत नाही. जोवर माणूस अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करीत नाही तोवर ‘मी’ आणि ‘माझे’च्या पलीकडे त्याची दृष्टीही जात नाही. जीवनाच्या वेगाबरोबर धावताना वास्तविकतेकडे आपलं कसं दुर्लक्ष होत आहे, हे त्याला उमगत नाही. आपण इतकं कशासाठी धावतो आहोत, कशासाठी आसुसलेले आहोत, कशासाठी धडपडत आहोत आणि इतकी धडपड करूनही निश्चिंत का होत नाही, शांत-समाधानी का होत नाही, याचा विचारही माणूस करीत नाही. श्रीसद्गुरूंच वाक्यच आहे, ‘‘बाहर की रोशनी ने अंदर के अंधेरे को और गहरा बना दिया है।’बाहेरच्या झगमगाटात डोळे इतके दिपून गेले आहेत की त्या डोळ्यांना अंतरंगातला अंधार दिसतच नाही! अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करण्याची कला सद्गुरूंच्याच सान्निध्यात सहजतेने शिकता आणि अभ्यासता येते. अंतर्मुख झाल्याशिवाय माणसाला आंतरिक आवाज ऐकता येत नाही. प्रत्येकात सदसद्विवेकबुद्धी असतेच पण बाह्य़ाच्या, भौतिकाच्या प्रभावामुळे आणि त्यासाठी सुरू असलेल्या अखंड धडपडीमुळे या आंतरिक सूक्ष्म बुद्धीवर जणू माती पडली आहे. सद्गुरूंच्या बोधानुरूप जगण्याचा प्रयत्न सुरू केला, त्यांच्या जगण्यातील सहजतेचे निरीक्षण करू लागलो, जीवनातील चढउतारांकडे स्थिरचित्त होऊन कसं पहावं आणि संकटांना कसं सामोरं जावं, हे त्यांच्या चरित्रातून जाणलं तरी हळूहळू आपल्या अंतरंगातली सदसद्विवेकबुद्धी जागी होऊ लागते. ती जागी झाल्यावरच आत्म्याची इच्छा कळू लागते.
स्वरूप चिंतन: ९२. उजेड-अंधार
माणसाला बुद्धी आहे, क्रियाशक्ती आहे पण म्हणून उचित र्कम कोणतं आणि अनुचित कोणतं, याचा अचूक निर्णय त्याला त्याच्या बुद्धीच्या जोरावर साधेलंच असं नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-05-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan