माणूस हा भावनाशील, विचारशील प्राणी आहे. माणूस भावनेशिवाय जगू शकत नाही. त्याच्या मनात विचाराचा तरंग उमटल्याशिवाय राहात नाही. तेव्हा जगताना तो भावनेच्या आधारावर जगत असतो. विचाराच्या आधारावर जगत असतो. खूप मागे समर्थाच्या ‘मनाच्या श्लोका’वर लिहावं, असं माझ्या मनात येई. एकदा श्रीमहाराजांनी विचारलं, काय लिहिणार? मी उत्साहाच्या भरात म्हणालो की, ‘‘महाराज, मनाच्या श्लोकाचा अकरावा श्लोक फार विलक्षण आहे. समर्थ म्हणतात- जनीं सर्वसूखी असा कोण आहे?। विचारें मना तूंचि शोधूनि पाहे। याच श्लोकात एक प्रश्न आहे आणि त्यातच उत्तरही आहे. प्रश्न असा की, जगात सर्वात सुखी कोण आहे? उत्तर असं की, हे विचारी मना तूच जगात सुखी आहेस! जे मन विचारी आहे तेच सुखी आहे.’’ श्रीमहाराज हसले आणि म्हणाले, ‘‘विचार तर काय वेडाही करतो, कैदीही करतो.’’ मी निरुत्तर झालो. मग ते म्हणाले, ‘‘पूर्ण श्लोकाचा अर्थ पहा. मग समजेल की, ज्याचं मन भगवंताच्या विचारात मग्न होतं तोच जगात सर्वात सुखी आहे.’’ (पूर्ण श्लोक असा आहे – जनीं सर्वसूखी असा कोण आहे?। विचारें मना तूंचि शोधूनि पाहे। मना तां चि रे पूर्वसंचित केलें। तयासारिखें भोगणें प्राप्त झालें।। त्याचा अर्थ असा की, आपल्या पूर्वसंचितानुसार जीवनात सुख-दु:खादी भोग वाटय़ाला आले आहेत. मग खऱ्या अर्थानं सर्वार्थानं सुखी कोण आहे? तर ज्याचं मन भगवद्भावानं, भगवद्विचारानं व्याप्त आहे, तोच सुखी आहे!) किती खरं आहे.. माणूस मग तो सत्त्वगुणी असो, तमोगुणी असो की रजोगुणी असो, कैदी असो की वेडा असो, दुराचारी असो की सदाचारी असो, विद्वान असो की अडाणी असो.. प्रत्येक माणूस विचार करतोच, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या भावनेच्या प्रभावाखाली असतो आणि त्या भावनेच्या आधारावर जगतोच, पण तो करीत असलेला विचार हा प्रत्यक्षात अविचारही असू शकतो. त्याच्या मनावर अंमल गाजवणारी भावना ही चुकीचीही असू शकते. अविचाराच्या, कुभावनेच्या आधारावर काही कोणी सर्वसुखी होऊ शकत नाही. तेव्हा माणसाला जगताना मानसिक, भावनिक आधाराची गरज असते, पण तो आधार चुकीचा असेल तर त्याच्या जगण्यात कदापि समाधान येऊ शकणार नाही. जर तो आधार पूर्ण असेल तरच जगण्यात समाधान येईल. असा पूर्ण आधार केवळ एका सद्गुरूचाच असतो. त्या एकाच्याच आधारानं जीवनातही खरी एकवाक्यता येते. आपण अपूर्णाचा आधार पकडून जगत असतो आणि त्यामुळे जीवनातील चढउतारांकडे, सुख-दु:खाकडे, यश-अपयशाकडे आपल्याला निर्लिप्तपणे पाहाताच येत नाही. घटनेचं वास्तविक मूल्यमापन करण्याइतकी मनाची तटस्थता आपल्यात नसते. आपण घटनेबरोबर, प्रसंगाबरोबर हतबल होऊन वाहावत जात असतो. घटना, प्रसंग आपल्या मनावर तात्काळ आणि खोलवर इतका प्रभाव पाडतात की, अनेक प्रसंगांत आपण वागू नये तसं वागून जातो, बोलू नये ते बोलून जातो. केवळ सद्गुरूच प्रत्येक प्रसंगाकडे वास्तविकपणे पाहण्याची कला शिकवतात आणि जगण्याची रीत सुधारण्याची प्रेरणा देतात.
स्वरूप चिंतन: ८८. अंत:प्रेरणा
माणूस हा भावनाशील, विचारशील प्राणी आहे. माणूस भावनेशिवाय जगू शकत नाही. त्याच्या मनात विचाराचा तरंग उमटल्याशिवाय राहात नाही.
आणखी वाचा
First published on: 06-05-2014 at 01:12 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan