प्रपंचाचा प्रभाव मनातून न सुटलेल्या, कर्तव्याचं भान नाही आणि स्वार्थपोषक, भ्रममूलक कर्माकडे ओढा असलेल्या माझ्यासारख्या प्रापंचिक साधकाला भगवंत सांगत आहेत की, बाबा रे ‘स्व’चं भान टिकवून वाटय़ाला आलेली कर्म कर! ‘स्व’चं भान म्हणजे आपल्या शुद्ध स्वरूपाचं भान, पण हे भान पहिली पावलं टाकणाऱ्या साधकाला कुठून यावं? ते येण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे आपल्या जीवनप्रवाहाकडे आपण थोडं तरी तटस्थपणे पाहण्याचा अभ्यास केला पाहिजे. खरं तर जन्मापासून आपण अनाहूतपणे जगत आलो आहोत. अंतर्मुख होऊन तटस्थपणे आपण आपल्या जगण्याकडे सहसा पाहात नाही. गाडगेमहाराजांच्या हातून एक नाणं नदीच्या प्रवाहात पडलं आणि वेगानं वाहून गेलं. त्यांच्या मनात आलं, काळाच्या प्रवाहात हे आयुष्यही असंच वेगानं निघून चाललं आहे! ही जाण आपल्यात आहे का हो? त्यासाठी हे जीवन जगत असलेल्या, या जीवनाचा केंद्रबिंदू असलेल्या ‘मी’कडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. त्याची थोडी तपासणी केली पाहिजे. मी खरा कोण आहे? जन्मापासून मी स्वत:ला जे मानतो, तीच माझी खरी ओळख आहे का? आपण अगदी स्वाभाविकपणे म्हणू की, होय हो! मी अमुकच आहे आणि जन्मापासून माझी ओळख कायम आहे! थोडा बारकाईनं विचार केला तर जाणवेल, मी स्वत:ला जे मानतो त्यात जन्मापासून आजवर कालौघात किती बदल होत गेला आहे! आई-बापापलीकडे जग माहीत नसलेला लहानपणचा ‘मी’ आणि आजचा ‘मी’ यात किती बदल झाला आहे! लहानपणच्या आवडी-निवडी आणि आताच्या आवडी-निवडी यात किती बदल झाला आहे. लहानपणी चांद्या जमवायची आवड होती. कपाटातल्या खणात त्या कितीतरी राखल्या होत्या. वय वाढलं, एक दिवशी कपाट आवरताना त्या चांद्या दिसल्या. कचरा म्हणून टाकून दिल्या! लहानपणी जी गोष्ट आवडीनं उराशी जपली होती तिचीच वय वाढताच नावड झाली. म्हणजेच हा ‘मी’, या ‘मी’च्या आवडी-निवडी आणि नावडी, या ‘मी’चे अग्रक्रम, या ‘मी’चे जिव्हाळ्याचे मित्र, या ‘मी’च्या इच्छा, स्वप्नं यात कालौघात कितीवेळा कसकसा बदल होत गेला आहे! मग आज मी माझी जी ओळख मानतो, गृहीत धरतो, ती तरी कायमची थोडीच टिकणारी आहे? मग मी खरा आहे तरी कोण? कुठून आलो? का आलो? कधी जाणार आणि नेमका कुठे जाणार? तोवर हा जो माणसाचा जन्म मला लाभला आहे, त्याचा खरा हेतू काय आहे? त्या हेतूची पूर्ती होईल असं सार्थक जीवन जगण्याची रीत नेमकी कोणती? आत्ता मी ज्या पद्धतीचं आणि ज्या प्रतीचं जीवन जगत आहे, ते खरं सुयोग्य जगणं आहे का? या गोष्टींचं मनन जरी सुरू झालं ना, तरी कर्मातल्या आसक्तीची खपली कणमात्र का होईना सुटत जाईल. आंतरिक भ्रम व मोहमूलक आवेगांनुरूप वाहवत जाऊन कर्म करण्याची सवय थोडी तरी कमी होईल. मग वाटय़ाला आलेलं नेमकं अटळ कर्तव्यकर्म कोणतं आणि वायफळ कर्म कोणतं, याचं भान येऊ लागेल. त्या भानानुरूप लगेच जगणं साधणार नाही, हे खरं पण ते भान वाया जाणार नाही.
स्वरूप चिंतन: १३३. कर्म-भान
प्रपंचाचा प्रभाव मनातून न सुटलेल्या, कर्तव्याचं भान नाही आणि स्वार्थपोषक, भ्रममूलक कर्माकडे ओढा असलेल्या माझ्यासारख्या प्रापंचिक साधकाला भगवंत सांगत आहेत की, बाबा रे ‘स्व’चं भान टिकवून वाटय़ाला आलेली कर्म कर!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-07-2014 at 01:07 IST
मराठीतील सर्व विचारमंच बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swaroop chintan