ज्याचं जीवन दुष्कर्माकडेच प्रारब्धवशात प्रवाहित आहे, त्यालादेखील भगवंताच्या मार्गावर वळण्याचा अधिकार निश्चितच आहे. अशा माणसालाही सद्गुरू कसं अत्यंत मायेने जवळ करतात आणि त्याच्यात पालट घडवतात, हे अनेकानेक संतांच्या चरित्रांत आपल्याला पाहायला मिळेल. जी गोष्ट आपण पाहणार आहोत ती आहे  हुजूर सावनसिंहजी महाराज यांच्यावर दर्याईलाल कपूर यांनी लिहिलेल्या ‘संत समागम’ या पुस्तकात नोंदलेली. हुजूरमहाराज एकदा सत्संगासाठी अमृतसरला मोटारीने निघाले होते. वाटेवर खूप गर्दी होती. तोच गाडीच्या पुढय़ात एक धट्टाकट्टा तरुण झोकांडी खात पडला. तो आणि त्याचे साथीदार दारूच्या नशेत होते. साथीदारांनी त्याला कसंबसं उठवलं. त्याची आणि हुजूर महाराजांची दृष्टादृष्ट झाली. हुजूर महाराजांच्या चेहऱ्यावर मोठी आत्मतृप्ती विलसत होती. तो भान हरपून जणू त्यांच्याकडे पाहत राहिला. गाडी निघून गेली. त्यानं विचारलं, ‘‘हे कोण होते?’’ त्याचे साथीदार हसत म्हणाले, ‘‘वेडे यांना परमेश्वराचा अवतार मानतात आणि तुझ्यासारख्या पाप्याला तारायला हे आले आहेत!’’ हा दारूच्या नशेत तर्र होता, तरी एकदम म्हणाला, मग मला त्यांच्याकडे गेलंच पाहिजे. सत्संगानंतर तो हुजूरमहाराजांकडे आला आणि त्यांचे पाय घट्ट पकडत म्हणाला, ‘‘माझी सर्व पापं नष्ट करून द्या! तुम्ही परमेश्वर आहात, तुम्हीच हे केलं पाहिजे.’’ हुजूर महाराजांनी त्याला खूप समजावलं, पण तो ऐकेना. अखेर हुजूर म्हणाले, तुझ्या विश्वासानंच सारं काही साधेल! संध्याकाळी त्यानं नामदीक्षाही घेतली. दीक्षेनंतर हुजूर त्याला म्हणाले, ‘‘तुला दारू व मांसमासळी वगैरे सोडावं लागेल.’’ तो उत्तरला, ‘‘दारू तर मी कधीच सोडू शकणार नाही. ’’ हुजूर म्हणाले, ‘‘तर मग माझ्यासमोर पिणार नाहीस, असे वचन दे.’’ तो म्हणाला, ‘‘हुजूर, हे मला मान्य आहे.’’ हुजूरांनी विचारलं, ‘‘तू आपला रोजगार कसा कमावतोस?‘‘ तो म्हणाला, ‘‘चोऱ्या आणि लूटमार करून!’’ त्याच्या उत्तरानं सर्वचजण सर्द झाले. हुजूरांनी फर्मावलं, ‘‘हेसुद्धा तुला सोडावं लागेल. दुसरा उद्योग करावा लागेल.’’ तो म्हणाला, ‘‘मी तर अन्य धंदा जाणतच नाही. दुसरा धंदा मी करूही शकणार नाही.’’ हुजूर म्हणाले, ‘‘ठीक आहे. मग तू मला आणखी एक वचन दे. तुला गरज आहे त्यापेक्षा अधिक चोरी करणार नाहीस आणि चोरी करताना आपल्याबरोबर अन्य कुणाला नेणार नाहीस.’’ त्यानं तेही वचन अगदी मनापासून दिलं. त्याचं नाव गंगू डाकू होतं. दीक्षेनंतर काही दिवस गेले. एकदा तो गुरुदासपूर जिल्ह्य़ात नातेवाईकाकडे गेला होता. तेथे जवळचे पैसे संपले. पैसे कमाविण्यात तर त्याचा हातखंडा होताच! गावातल्या सावकाराच्या घरात तो रात्री शिरला आणि त्याच्या लोखंडी तिजोरीचे कुलूप त्यानं फोडलं. तोच पेटीचं अवजड झाकण हातावर पडलं आणि तो पुरता अडकला. आता आपण वाचत नाही, हे त्याला कळून चुकलं. त्याच क्षणी हुजूर महाराज खोलीत आले आणि त्याचा हात सोडवत म्हणाले, ‘‘गरजेपेक्षा अधिक चोरणार नाहीस, असं तू वचन दिलं होतंस ना? आता सर्व काही इथेच टाक आणि पळून जा!’’